
माणसाच ह्रदय जिंकायचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. हॉलिवूडचा सुपरस्टार सिल्वेस्टर स्टॅलन याच्याबाबतही तसंच घडलं. रेम्बोची गाजलेली भूमिका करणाऱ्या स्टेलनने आपली ‘पोर्क विंडालू’ची प्लेट साफ केली आणि मेनूकार्डवर ‘विंडालू’ च्या समोर असलेल्या शेफचे नाव वाचून तो सरळ रेस्टॉरंटच्या किचनच्या दिशेने वळला.
शेफ फ्रांसिस्को मार्कुस ती आठवण काढत सांगतो. ‘रॅम्बो मला म्हणाला तू बनवलेलं विंडालू अप्रतिम होतं. मला खूप आवडलं. त्यानंतर त्याने माझ्याबरोबर छायाचित्र देखील काढले.'
विंडालू ही मार्कुसची ‘सिग्नेचर डिश’ आहे. तो म्हणतो की विंडालू बनवणे हे त्याच्यासाठी उत्कट आवडीचं काम आहे. जेव्हा कुणी रेस्टॉरंटमध्ये विंडालू ऑर्डर करतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलते. ते बनवताना तो त्यात 100 टक्के माझे ह्रदय ओततो.
मार्कुस मुळचा गोव्यातील शिरदोणा या गांवचा. अगदी लहान असल्यापासून तो जेवण बनवतो. त्याची आई मासे विकायची. त्याला बहीण नव्हती किंवा घरात इतर कोणी दुसरी स्त्री नव्हती त्यामुळे मार्कुस स्वतःच जेवण बनवायला शिकला.
मार्कुस आपल्या कौशल्याचे श्रेय आपल्या आईलाच देतो. इंग्लंडमध्ये लोकप्रिय असलेल्या त्याच्या कॅटरिंग सेवेला त्याने आपल्या आईचेच नाव दिले आहे- ‘लुईझास किचन’! गेली 24 वर्षे तिथे त्याची ही कॅटरींग सेवा सुरु आहे.
तो सांगतो, ‘माझी आई मला सांगायची, भविष्यात तुझ्याकडे पैसे येतील पण आपल्या अन्नाच्या दर्जाशी तू तडजोड करु नकोस. अन्न बनवताना त्यात तुझं ह्रदय ओतलं गेलं पाहीजे. ते सांगणारी माझी आईच माझ्या यशाची शिल्पकार आहे. गेल्याच वर्षी ती गेली.'
मार्कुसच्या व्यवसायात त्याचे भाऊ आणि त्यांचे सर्व कुटूंब मिळून त्याला सहाय्य करते. मार्कुसला गोव्यातले जुने दिवस आठवून तो सांगतो, 'मी जेव्हा तरुण होतो तेव्हा या प्रकारचा व्यवसाय गोव्यात सुरु करणे मला शक्य नव्हते.
माझे कुटूंबाची परिस्थिती अतिशय साधारण होती. मोटरवर चालणारी एक होडी तेवढी आमच्यापाशी होती. तिच्यावर आमचा खर्च भागायचा. गोव्यात व्यवसाय सुरु करण्यासाठी आमच्याकडे भांडवल नव्हते. शेवटी मी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. मला वाटले की माझे स्वयंपाकाचे कौशल्य इथे उपयोगाचे होईल.
मार्कुसच्या ‘लुईझास किचन' ची प्रसिद्धी लगेच व्हायला सुरुवात झाली. चार वर्षांपूर्वीच सोशल मेडीआवरुन त्यांनी आपल्या व्यवसायाची जाहिरात करायला सुरुवात केली असली तरी त्याची होणारी तोंडी प्रसिध्दीच त्याच्या व्यवसायाला पूरक ठरली.
तिथे होणाऱ्या ‘गोवा डे’ सारख्या महोत्सवात त्याने उभारलेल्या स्टॉलवर लोकांची गर्दी व्हायची. लोकांना त्याचे खाद्यपदार्थ आवडायचे. अनेकजण त्यांच्या कार्यक्रमासाठी मार्कुसला बुक करायचे. अशाप्रकारे त्याची प्रसिध्दी होत गेली.
इंग्लंडमधील ‘ले पोर्टे देस इंडेस’ मध्येही मार्कुस शेफ म्हणून कार्यरत असतो. तिथे टॉम क्रूज, संजय दत्त, सुनील शेट्टी, श्रीदेवी, सनथ जयसूर्या, वेंडल रॉड्रिगीज अशा सेलेब्रिटींना भेटला आहे. ‘ले पोर्टे देस इंडेस मध्ये मार्कुसच्या प्रसिध्द पोर्क विंडालू 'ऑर्डिनेयर' रेसिपीचा उल्लेख आहे.
त्याला प्रसिध्दी मिळवून देणाऱ्या ‘विंडालू’बद्दद सांगताना मार्कूस म्हणतो, 'त्याची मसालेदार योग्य चव मिळवण्यासाठी विंडालू प्रथम नीट शिजवावे लागते. मांस कोवळे आणि व्हिनेगर योग्य प्रमाणात असावे लागते.
शिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा स्वाद उत्कृष्ट असतो. पहील्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या स्वादात सुक्ष्म असा फरक असतो. त्यात टाकलेल्या व्हिनेगरमुळे दिवसागणीक त्याचा स्वाद परिपूर्ण होत जातो.'
मार्कुस परिपूर्णपणे बनवत असलेला दुसरा स्वादीष्ट पदार्थ म्हणजे ‘सान्ना’. मार्कुसने बनवलेल्या ‘सान्ना’ना अमेरिका स्कॉडलॅण्ड, पोर्तुगाल आणि दुबई इथूनही मागणी असते. गुळाच्या ‘सान्ना’ बनवण्यात मार्कुस माहिर आहे. संपूर्णपणे गोमंतकीय पाककृती सर्व्ह करणारे रेस्टॉरंट सुरु करण्याचे मार्कुसचे ध्येय आहे. आणि देवाच्या कृपेने ते घडेल असा त्याचा विश्वास आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.