सागराच्या गर्भात मानवी हस्तक्षेप वाढल्यास...

सागराच्या गर्भात मानवी हस्तक्षेप वाढल्यास...
Marine Day was first celebrated on 5 April 1964

राष्ट्रीय समुद्री दिवस सर्वप्रथम 5 एप्रिल 1964 रोजी साजरा करण्यात आला. 5 एप्रिल 1919  रोजी ‘एस.एस. लॉयल्टी’ हे ‘सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी लिमिटेड’चे पहिले जहाज मुंबईहून युनायटेड किंगडम (लंडन) पर्यंत गेले तेव्हा भारतीय जहाज सफरीची सुरवात झाली. जेव्हा ब्रिटिशांनी समुद्री मार्ग नियंत्रित केले तेव्हा भारताच्या नौवहन इतिहासासाठी ती एक महत्त्वपूर्ण घटना होती.

भारताच्या सागरी इतिहासात तो दिवस ‘रेड लेटर डे’ म्हणून पाळण्यात आला.
भारतीय समुद्री इतिहास इ.स.पूर्व तिसऱ्या शतकादरम्यान सुरू होतो,  जेव्हा सिंधू खोऱ्यातील रहिवाशांनी ‘मेसोपोटामिया’शी सागरी व्यापार संपर्क सुरू केला होता. वैदिक नोंदीनुसार भारतीय व्यापारी अतिपूर्व प्रांतातील देशांशी तसेच अरब देशांशी व्यापार करत होते. मौर्य शासनाच्या कार्यकाळाच्या दरम्यान, जहाजे व व्यापारावर देखरेख ठेवण्यासाठी एक समर्पित ''नौदल विभाग'' कार्यरत होता. ऑगस्टसच्या कारकिर्दीत भारतीय उत्पादने रोमी लोकांपर्यंत पोहोचली आणि भारतीय व्यापाऱ्यांनी त्या काळात मोठे आर्थिक उत्पन्न मिळवले. इजिप्तवर रोमने विजय संपादन केल्यानंतर भारताबरोबर रोमन व्यापार वाढल्याचा उल्लेख रोमन  इतिहासकार स्ट्राबो याने केला आहे.

भारत आणि ग्रीको-रोमन दरम्यान (ग्रीस व रोम यांच्या दरम्यान) व्यापारवाढल्यामुळे रेशीम व इतर वस्तूंची निर्यात कमी होऊन  मसाले ही पश्चिमेकडील जगाला भारताकडून निर्यात होणारे प्रमुख उत्पादन ठरले..पोर्तुगालच्या ‘मॅन्युएल-प्रथम’च्या आदेशानुसार, दर्यावर्दी वास्को-द-गामाच्या नेतृत्वाखाली चार जहाजांनी ‘केप ऑफ गूड होप’ला वळसा घालून आफ्रिकेच्या पूर्वेकडील मालिंदी पार करीत ते हिंद महासागर ओलांडून कालिकत किनाऱ्यावर पोहोचले. भारतातील संपत्ती आता युरोपीय लोकांकरिता व्यापारासाठी मोकळी झाली होती. पोर्तुगीज साम्राज्य मसाल्याच्या व्यापारापासून विकसित होणारे पहिले युरोपियन साम्राज्य होते.

भारताला सुमारे 7516 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणात एकूण 182 बंदरे आहेत; त्यापैकी ‘मेजर पोर्ट्स’ हा विशेष दर्जा दिलेली 12 बंदरे आहेत. गोव्यात असलेले ‘मुरगाव पोर्ट ट्रस्ट’ हे या 12 प्रमुख बंदरांपैकी एक आहे. यासंदर्भात मला नमूद करायला आनंद वाटतो, की या  मुरगाव पोर्ट ट्रस्टचा ट्रस्टी म्हणून मी काम केले आहे. त्या कारकिर्दीत मला बंदर कामकाजाबद्दल बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेता आला. 
गोव्याबद्दल बोलायचे झाले तर राज्यात सुमारे 555 किलोमीटरचा अंतर्देशीय जलमार्ग असून, त्यापैकी फक्त 255 किलोमीटर मार्ग हा मांडवी, झुवारी आणि त्यांच्या साहाय्यक नद्यांमार्गे जलवाहतूक करण्यायोग्य आहे.

यापैकी बराचसा भाग हा खनिज उद्योगाकडून आपल्या अतिदुर्गम भागांतील ‘लोडिंग पॉइट’वरून मुरगाव आणि पणजी बंदरात खनिज वाहतुकीसाठी वापरला जातो. जर या जलवाहिन्यांची योग्य प्रकारे देखभाल करण्यात आली तर ते प्रवाशांना आणि मालाच्या वाहतुकीसाठी एक जलद आणि स्वस्त वाहतुकीचा पर्याय म्हणून उपयोगात येऊ शकेल; पण, इथे नमूद करणे गरजेचे आहे, की हे करताना पारंपरिक मच्छीमार आणि इतर लोकांच्या पोटापाण्यावर त्याचा विपरित परिणाम होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे.

समुद्र म्हटले की आपण सर्वसाधारणपणे मत्स्यसंपत्तीचाच विचार करतो. पृथ्वीतलावरील 70 टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. त्यात सागरी क्षेत्राचा समावेश सर्वाधिक आहे. समुद्र ही निसर्गाने दिलेली बहुमोल देणगी आहे. त्यामुळे समुद्रातील संपत्ती शोधण्याची आणि त्या संपत्तीचा उपयोग करून घेण्याची चढाओढ जगातील सर्वच देशांमध्ये लागलेली आहे. समुद्रात अनेक प्रकारची जैविक विविधता आढळून येते. वाढत्या लोकसंख्येमुळे समुद्राकडे मानवाचा कल वाढू लागला आहे, उदाहरणार्थ, पर्यावरणपूरक अशा सागरी जलवाहतुकीला चालना, समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचा प्रयत्न, सागरी संपत्तीचा वापर वाढवणे, अन्नधान्य टंचाईमुळे मासेमारीवर भर देणे. समुद्रामध्ये प्रवाळ, बहुविध प्रकारचे मासे, कीटक, साप यांसारखी जैविक संपत्ती आजही कायम आहे. मानवाला महासागराच्या अंतरंगात फारशी ढवळाढवळ करता येत नसल्यामुळे तेथील जैविक विविधता अजून शाबूत आहे.

पण सागराच्या गर्भात मिळणाऱ्या खनिज तेल आणि संपत्तीचा शोध घेण्याकडे वाढलेला कल पाहता सागरी भागातही यापुढील काळात मानवी हस्तक्षेप वाढत जाणार आहे. सागरी भागातील तापमान आणि हवामान पृथ्वीवरील विविध भागांतील हवामान आणि तापमानाला कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ, ‘एल निनो’, ‘ला निनो’ सारखे घटक भारतीय उपखंडातील मान्सूनवर परिणाम करतात. त्यामुळे सागरी भागातील तापमान, पर्यावरण, बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने घडणारे नैसर्गिक बदल यांवर सदैव लक्ष ठेवणे गरजेचे बनते.  

‘फायटोप्लांकटोन’ नामक समुद्रात राहणारे छोटेखानी वनस्पतीसारखे दिसणारे जीव पृथ्वीवरील कमीत कमी 50 टक्के प्राणवायूचा (‘ऑक्सिजन’चा) पुरवठा करतात. जमिनीवरील वनस्पतींप्रमाणेच त्यात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ‘क्लोरोफिल’ असते आणि ‘फोटोसिन्थेसिस’च्या साहाय्याने आवश्यक ऊर्जांमध्ये रूपांतरण होत असते व त्यामुळे प्राणवायूची निर्मिती होते. ते ‘कार्बन डायऑक्साइड’ देखील वापरतात. त्या माध्यमातून दरवर्षी वातावरणातून सुमारे १० गिगाटन कार्बन खोल समुद्रात स्थानांतरित केले जाते.
समुद्र सूर्यापासून प्रचंड प्रमाणात उष्णता शोषून घेतो. माझ्या अमेरिकेच्या दौऱ्यात मला ‘यूएस नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’मध्ये जाण्याचा योग्य आला. त्या वेळी मला तिथे झालेल्या संशोधनावरून दिसून आले, की गेल्या 50 वर्षांत पृथ्वीवर 90 टक्के पेक्षा जास्त तापमानवाढ समुद्रात झाली आहे. ती उष्णता विषुववृत्तीय (‘इक्वेटर’च्या) भागात सर्वांत तीव्र असते आणि तेथील पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान सर्वांत जास्त असते. समुद्राचे प्रवाह उष्णतेची वाहतूक जगभरात करतात. ‘ओईसीडी’ (ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉ-ऑपरेशन ॲण्ड डेव्हलपमेण्ट) च्या अहवालानुसार वर्ष 2030 पर्यंत महासागर-आधारित उद्योग जगभरात 40 दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार देतील. त्या नोकऱ्यांत सर्वांत मोठा वाटा मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा असेल आणि त्या पाठोपाठ पर्यटन असेल. मूलत: समुद्री उद्योगांचे आर्थिक स्वास्थ्य महासागराच्या एकूण स्वास्थ्याशी निगडित आहे. विकसनशील देशांमध्ये समुद्राच्या अर्थव्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. त्या देशांतील साधारणत: ३ अब्ज लोक रोजीरोटीसाठी समुद्रावर अवलंबून आहेत. हवामान बदल, प्रदूषण आणि महासागर यांच्या अनुबंधाविषयी जागरूकता नसणे यासारख्या आव्हानामुळे  सागरी संसाधनांवर ताण वाढत आहे. त्यामुळे, भविष्यकालीन पिढ्यांसाठी या संसाधनांपासून मिळणारा संभाव्य सामाजिक-आर्थिक लाभ कमी होण्याची शक्यता आहे. 

सागर पर्जन्यमान आणि दुष्काळाचे नियमन करतो, पृथ्वीतलावरील 97 टक्के पाणी स्वत:मध्ये सामावून घेतो, कार्बनचक्र संतुलित ठेवण्यात मदत करतो, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो तसेच अन्नापासून ते नोकरीपर्यंत समुद्र ही कोट्यवधी लोकांसाठी जीवनवाहिनी आहे. आज राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त मला असे आग्रहपूर्वक नमूद करावेसे वाटते, की मनुष्यजातीसह पृथ्वीवरील तमाम प्राणिमात्र तसेच अन्य सर्व जीवजंतू व वनस्पतींसाठी सागर-महासागर आवश्यक असल्याने शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आपण निरोगी सागरी पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करणे आवश्यक आहे.

-गुरुदास नाटेकर

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com