...अन्यथा गोवा मुक्तीला झाला असता उशीर!

भारतीय लष्कराची मुसंडी: कृष्ण मेनन यांनी नेहरूंना मारली होती थाप
Memories of liberation of Goa

Memories of liberation of Goa

Dainik Gomantak

गोवा मुक्तीला (Goa Liberation Day) विलंब झाला, यावर स्‍वातंत्र्यसैनिकांमध्‍ये एकमत झाले आहे. वास्तविक गोव्यात धाडसाने कारवाई करणारे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन (Defense Minister Krishna Menon) यांच्याकडून एक महत्त्वाची चूक घडली. कारवाई करण्यापूर्वी तेथील परिस्थितीची इत्‍यंभूत माहिती प्राप्त करणे त्यांना भाग होते. त्यांनी आपले अत्यंत विश्‍वासू पोलिस अधिकारी गोपी हांडू - ज्यांना तद्‌नंतर मुक्त गोव्याचे लष्करी प्रशासक कँडेथ यांचे खास सल्लागार बनविण्यात आले. त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली, जी दुर्दैवाने योग्यरितीने पार पाडण्यात आली नाही. परिणामी भारतीय लष्कराला (Indian Army) मोठा भुर्दंड बसला.

पोर्तुगीज शस्त्रसाठ्याची तकलादू माहिती

हांडू यांनी गोव्याच्या पोर्तुगीज लष्कर (Portuguese army) सज्जतेसंदर्भात ज्या स्वातंत्र्यसैनिकांकडून माहिती मिळवली ती एकतर तकलादू होती किंवा त्यांची माहिती ऐकीव स्वरूपाची होती. गोव्यातील पोर्तुगीज लष्कराकडे खूप मोठा शस्त्रसाठा असल्याचा खोटा समज भारतीय लष्कराला झाला. विमानांवर मारा करणाऱ्या तोफा ‘जेट फायटर’, युद्धवाहू नौका व नाझी प्रशिक्षित कमांडो आदींनीयुक्त असा शस्त्रसाठा गोव्यात असल्याची खोटी माहिती मिळाल्याने मोठ्या ताकदीने भारतीय लष्कराने गोव्याकडे कूच केली.

वास्तविक 17 डिसेंबरची मध्यरात्र उलटून गेल्यानंतर काही क्षणातच ब्रिगेडियर सनथ सिंग - ज्यांनी पुढे बांगलादेश युद्धात 1971 मध्ये अत्यंत मोलाची कामगिरी बजावली व ढाका ताब्यात घेण्यामागचे ते खरे हिरो ठरले - आपल्या 50 पॅराट्रूपर्समधून गोव्यात प्रवेश केलाच होता. मावळिंगे वगैरे भागातून लष्कराला गोवा हद्दीत प्रवेश करता यावा म्हणून हे सैनिक पुढे पाठवण्यात आले होते. जे रस्त्यावरचे अडथळे दूर करण्याचे काम करणार होते. काही किरकोळ प्रतिकार झाला तरी त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी ही तुकडी सज्ज होती. मोठ्या ताकदीने भारतीय लष्कराने गोव्याकडे कूच केली. त्यासाठी एअरफोर्स, पायदळ व नौदलाचा वापर करण्यात आला.

...तर निष्‍पापांचा जीव वाचला असता!

15 ऑगस्ट 1955 या दिवशीच वास्तविक भारत सरकारने गोव्यात कारवाई करणे भाग होते. गोव्यात शांततापूर्ण मार्गाने शिरू पाहणाऱ्या निदर्शकांवर जुलमी पोर्तुगीज सेनेने निष्ठूर गोळीबार केला. त्यात असंख्य मृत्यूमुखी पडले. त्यामुळे देशभर असंतोष उसळला. त्यावेळी नेहरू अत्यंत क्रोधीत झाले होते. परंतु, त्यांनी गोव्यात कारवाई न करता बाहेरील निदर्शकांना मात्र गोव्यात जाण्यापासून मज्जाव केला. गोव्याची मुक्ती स्थानिकांच्या बलिदानातूनच झाली पाहिजे, असे त्यांचे मत होते. ही माहिती देऊन इतिहासकार वाल्मिकी फालेरो म्हणाले, गोव्याविषयी ही भावना बाळगणाऱ्या नेहरूंनी काश्‍मिरी प्रश्‍न सोडविण्यासाठी तेथे लष्कर पाठवण्याची कारवाई केली. गोव्यात 1955 मध्येच ती करता आली असती.

<div class="paragraphs"><p>Memories of liberation of Goa</p></div>
Freedom Fighter of Goa Liberation: श्रीधर महादेव जोशी; एक अष्टपैलू व्यक्तित्व

आठवणी अजूनही ताज्‍याच

स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी यांनी अत्यंत कोवळ्या वयात गोव्याच्या मुक्तिलढ्यात भाग घेतला होता. लढा देताना अत्यंत हाल-अपेष्टा, अत्याचार, जुलूम त्यांनी वेळोवेळी सोसला. अजूनही त्यांच्या पायावर बंदुकीच्या गोळ्या व बॉम्बस्फोटातील जखमांचे व्रण आहेत. गोव्याची मुक्ती नेहरूंमुळेच लांबली, त्याबद्दल या ९३व्या वर्षीय लढवय्याच्या मनात कोणताही संदेह नाही. नेहरूंनी लष्करी कारवाई करून आधीच गोवा मुक्त केला असता, तर गोव्यातील दडपशाही थांबली असती.

...तर क्रूरात्‍म्‍याला ठेचलेच असते?

प्रभाकर सिनारी म्हणाले, बेळगावमधील स्वातंत्र्यसैनिकांच्या छावणीत आम्ही काही काळ मुक्काम केला. एक-दोनवेळा गोव्यातून बदलीवर परत निघालेले पोर्तुगीज गव्हर्नर व क्रुरात्मा अजेंत मोन्तेरो यांना मी रेल्वेतून प्रवास करताना पाहिले. मोन्तेरो हे गोव्यात १९५३ पासून अवघे तीन वर्षे होते. परंतु, त्या काळात त्यांनी दडपशाहीचा उच्छाद मांडला होता. त्यामुळे मोन्तेरोंसह जुलमी अधिकाऱ्यांना यमसदनी पाठवायला स्वातंत्र्यसैनिकांचे हात शिवशिवत होते. भारत सरकारचे लेचेपेचे धोरण आमच्या मार्गात आड आले.

...आणि चिन्यांचा समज खोटा ठरला

पोर्तुगालचे हुकूमशहा आंतोनियो दी आलोवेरा सालाझार यांनी चीनशी संपर्क साधला होता. गोव्याचे विलीनीकरण अडवल्यास मुरगाव विमानतळ व बंदर चिन्यांच्या ताब्यातही देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. परंतु चीनी अध्यक्षांनी समजावत नेहरू काही गोव्यावर आक्रमण करणार नाहीत असे छातीठोकपणे सांगितले. चिन्यांचा नेहरूंबद्दलचा समज अशा पद्धतीने पहिल्यांदाच चूक ठरला.

...तर खूप कमी खर्चात झाली असती कारवाई

लष्करी तज्ज्ञांच्या मते, वायू दलाची विमाने टेहळणीसाठी गोव्यात खूप उंचावरून घिरट्या घालत होती. पोर्तुगीज सैन्यांकडून त्यांना प्रतिकार झाला नाही. पोर्तुगीज लष्कराकडे कोणताही मोठा शस्त्रसाठा नाही हे त्यावेळी लष्कराच्या लक्षात आले. त्यावेळी पोर्तुगीजांच्या लष्करी सामर्थ्याची इत्थंभूत माहिती असती, तर भारताला खूप कमी खर्चात ही कारवाई करता आली असती.

<div class="paragraphs"><p>Memories of liberation of Goa</p></div>
Freedom fighter in Goa liberation: शिरूभाऊ लिमये एक मुक्तात्मा

अजूनही सल...!

गोव्याबद्दल नेहरूंना प्रेम होते आणि तो भारताचा अविभाज्य भाग असल्याचे नेहरूंनी मनोमनी मानले होते. परंतु नेहरूंना आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची फिकीर होती. शिवाय हिंसक मार्गाने गोवा ताब्यात घेतला जाऊ नये, असे त्यांनी ठरवले होते. गोव्यातील बहुसंख्य स्वातंत्र्यसैनिक ज्यांचा अतोनात छळ पोर्तुगीज लष्करशाहीने केला ते अजूनही नेहरूंना याबद्दल दोष देतात.

स्वातंत्र्यसेनानी प्रभाकर सिनारी म्हणाले, नेहरूंकडून कधीच स्वातंत्र्यसैनिकांना मदत मिळाली नाही. त्यांना खूप आधी लष्करी कारवाई करून गोव्यावरील अत्याचार थांबवता आले असते.

स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांच्या मते, गोव्याची मुक्ती नेहरूंना शांततापूर्ण मार्गानेच करायची होती, परंतु नेहरूंच्या स्वभाव वैशिष्ट्यांविषयी आदरभाव असूनही करमली यांना गोव्याच्या मुक्तीला उशीर झाला. परिणामी छळवाद अनेकवर्षे चालू राहिला.

गोव्यातील खाणउद्योगाने नेहमीच स्वातंत्र चळवळीची उपेक्षा केली. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब यांच्याकडूनही आम्हाला पाठिंबा नव्हता, असेही करमली म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com