गोव्यातील मिलिंद म्हाडगुत एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

गोव्यातील (Goa) सिनेमावरचे पहिले पुस्तक ‘चंदेरी दुनिया’ मिलिंद म्हाडगुत यांनी लिहिले होते.
Milind Mhadgut from Goa is a versatile personality

Milind Mhadgut from Goa is a versatile personality

Dainik Gomantak 

यंदा गोवा (Goa) राज्य सरकारने त्यांना साहित्याचा राज्यपुरस्कार देऊन गौरविले आहे. शिक्षण, नाटक, सिनेमा, नभोनाट्य, पत्रकारिता, अभिनय, ललित, चरित्र लेखन, समाजसेवा अशा विभिन्न क्षेत्रात समर्थपणे वावरणारे असे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व. पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्राची एम.ए. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी वास्कोच्या एम.ई.एस. महाविद्यालयातून अध्यापनाला सुरुवात केली. 32 वर्षे विद्यादान करून ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. निवृत्त झाले असले तरी कला व साहित्यक्षेत्रात गेली कित्येक वर्षे सुरू असलेला त्यांचा संचार अजूनही चालूच आहे. कथा- पटकथा- संवाद, नभोनाट्ये व नाटके अशा सर्व प्रकारच्या लेखनात त्यांनी हात घातला आहे. 18 लघुपट, चित्रपट, मालिका, सोळा नभोनाट्ये, अकरा नाटके असे लेखन त्यांनी केले आहे. त्याशिवाय इतर विषयांवरची 21 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

गोव्यातील (Goa) सिनेमावरचे पहिले पुस्तक ‘चंदेरी दुनिया’ हेही त्यांनीच लिहिले होते. लेखनाबरोबरच त्यांनी चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन व अभिनयही केला आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘वृध्दाश्रम’ या कोंकणी नभोनाट्याला राष्ट्रीय पुरस्कार, तर ‘दिसता तशे नासता’ व ‘हास मरे हास’, या त्यांच्या चित्रपटांना राज्यचित्रपट महोत्सवात पुरस्कार (Award) प्राप्त झाले आहेत. ‘ खा मरे खा’ हे त्यांचे राजकारणावरचे नाटक कला अकादमीच्या स्पर्धेत पुरस्कार प्राप्त ठरले होते. सबंध गोव्यात या नाटकाचे शेकडोनी प्रयोग झाले आहेत. बाप्पा टोपले पुरस्कार, रंगोली पुरस्कार, जीवनविद्या पुरस्कार, शारदीय जीवन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्याना प्राप्त झाले आहेत.

<div class="paragraphs"><p>Milind Mhadgut from Goa is a versatile personality </p></div>
Novel: 'ओरबिन' खाण उद्योगाचे वास्तव

‘मस्त कलंदर’ या गोव्यातील पहिल्या तेरा भागांच्या मालिकेचे कथा-पटकथा-संवाद म्हाडगुत यांचे होते व त्यांनीच ती दिग्दर्शित केली होती. 2011 साली एका खाजगी वाहिनीवरून प्रसारित झालेली ही मालिका त्यावेळी बरीच गाजली होती. पत्रकारितेतही ते अग्रेसर असून गेल्या चाळीस वर्षात त्यांचे विविध दैनिकांतून 3200 हून अधिक स्तंभलेख प्रसिध्द झाले आहेत. सध्या ते ‘दै. गोमन्तक’ मधून स्तंभलेखन करत आहेत. त्यांनी अनेक नाट्यस्पर्धांचे परीक्षण केले असून एक नाट्यसमीक्षक म्हणूनही ते प्रसिध्द आहेत. फोंड्याच्या (Ponda) राजीव गांधी कलामंदिराचे उपाध्यक्ष, इफ्फीच्या (IFFI) शॉर्ट फिल्म सेंटरच्या ज्युरी पॅनलचे सदस्य, मनोरंजन संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य, गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या सल्लागार समितीचे सदस्य अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. 2008 साली झालेल्या इफ्फीच्या चित्रपटांच्या (Movie) निवड समितीचे ते गोवा सरकारचे नियुक्त सदस्य होते.

यामुळे जगभरातल्या विविध भाषेतील चित्रपट पहायला मिळालेच त्याचप्रमाणे इफ्फीकरिता चित्रपट कसे निवडावेत याचे ज्ञानही मिळाले असे त्यांनी सांगितले. ‘फिल्म मेकर्स’ (Film Maker) या गोव्यातील चित्रपट निर्माता संघटनेचे ते 2006 पासून अध्यक्ष आहेत. या संघटनेद्वारे त्यांनी चित्रपट निर्मात्यांवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडली आहे. ‘विकासपुरुष’ या त्यांनी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला लोकसभेत पोहचण्याचा मान प्राप्त झाला आहे. ‘लोकनायक’ ही त्यांची रवींवरची चित्रफीत 2011 साली गोव्यातील सर्व वाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आली होती. ‘चक्र’ या त्यांच्या चित्रपटाला कोंकणी अकादमीने, तर ‘बदलते रंग’ या त्यांच्या पुस्तकाला गोवा मराठी अकादमीने आर्थिक अनुदान देऊन गौरविले आहे.

म्हाडगुत यांची खासियत म्हणजे ते कोंकणी व मराठी दोन्ही भाषेत लिहितात. साहित्याला भाषेचे बंधन असता कामा नये असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीनिमित्त त्यांनी कला व साहित्य क्षेत्राला दिलेल्या योगदानावर एकदंत क्रिएशनने 2013 साली ‘प्रिय हा मिलिंद’ ही एक तासाची चित्रफीत निर्माण केली होती. प्राचार्य माधवराव कामत, दै. गोमन्तकचे माजी संपादक कै. नारायणराव आठवले, रंगकर्मी महादेव खानोलकर यांना ते आपला आदर्श मानतात. खासकरून प्राचार्य कामत यांच्या प्रोत्साहन व सहकार्यामुळेच आपण कला साहित्य क्षेत्रात योगदान देऊ शकलो असे ते म्हणतात.

सध्या ते सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. राज्य पुरस्कार हा कला (Art) व साहित्याच्या योगदानावर सरकारने केलेले शिक्कामोर्तब असले तरी लोकांची पोचपावती हा सगळ्यात ‘मोठा पुरस्कार’ असे ते म्हणतात. नुकत्याच झालेल्या राज्य पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी 1989 सालच्या त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांना भेटवस्तू देऊन जो गौरव केला त्यामुळे आपण कृतार्थ झालो असे ते नमूद करतात. साहित्य व कलेचा प्रवास अव्याहत असतो व त्यात खंड पडता कामा नये असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या ‘कुवाडे’ हा त्यांचा चित्रपट निर्मितीवस्थेत असून ‘शोध सुखाचो’ हे कोंकणी नाट्यपुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. यातून म्हाडगुतांची साधना कशी अखंड सुरू आहे याचा प्रत्यय येत आहे.

- नामदेव शेट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com