गोव्याचा माईम कलाकार.....

द्रुपद गावकर ओरविले (पॉन्डिचेरी) येथील ‘मूलध्वनी इन्स्टिट्यूट ऑफ मुव्हमेंट अँड एक्सप्रेशन’ या संस्थेचा संचालक आहे. ‘माईम’ या माध्यमातून काम करणाऱ्या द्रुपदला नृत्य, नाट्य आणि कसरत या क्षेत्रातही काम करणे आवडते
Drama
DramaDainik Gomantak

द्रुपदला घरात त्यांच्या आई-वडिलांकडून नेहमीच एक मोकळे वातावरण लाभले. शिक्षणाला नेहमीच घरात अग्रक्रम होता- सर्व प्रकारचे शिक्षण. शिक्षणाचा हेतू पैसे मिळवणे हा कधीच नव्हता. पैसे शिक्षण घेऊन किंवा न घेताही मिळवता येतात. शिक्षण हे वर्तणूक आणि चरित्र यासाठी महत्त्वाचे आहे असेच त्यांच्या घरचे म्हणणे होते.

जर संस्कारांची जाणीव नसली तर अति श्रीमंत असणे किंवा अति गरीब असणे यात फरक नसतो. अशा संस्कारात द्रुपद (आणि त्याची बहीण सर्विष्ठा) वाढल्या होत्या. मुलांसाठी असलेल्या कार्यक्रमाची व्हीसिडी लावून त्यांना ते कार्यक्रम पाहायला लावणे व त्या संबंधात प्रश्न विचारणे हे नेहमीचे होते. अर्थात द्रुपद व त्याच्या बहिणीला त्याचा कंटाळा येत असे. पण द्रुपद म्हणतो, ‘त्यातूनच लक्ष देऊन पाहण्याची सवय निर्माण झाली.’

शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये द्रुपदला इतरांचा हस्तक्षेप आवडत नसे- अगदी शिक्षकांचा देखील. त्याला स्वतःहून शिकणे आवडायचे. अर्थात फक्त अभ्यासच नव्हे तर इतर प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण तो स्वतंत्रपणे करायचा. ‘मी एका दगडाला का समजून घेऊ शकत नाही? मी दगड का बनू शकत नाही किंवा दगड मला का समजून घेऊ शकत नाही?’ अशा प्रकारच्या प्रश्नांनी तो बालपणी घेरलेला असायचा.

शिक्षकांकडून शिकवून घेणे टाळावे म्हणून तो अगोदरच, बहुदा उन्हाळी सुट्टीत, सर्व अभ्यासक्रम पूर्ण करायचा. जे समजत नसेल तर वडिलांकडून समजून घ्यायचा. द्रुपद म्हणतो, ‘कदाचित हा माझा इगो (अहंकार)ही असू शकतो.’

द्रुपद आज देशातील काही अवघ्या माईम (मूकनाट्य) आर्टिस्टपैकी एक आहे. कुठल्याही कार्यशाळेत किंवा त्या विषयाचे औपचारिक शिक्षण न घेता तो माईम कलाकार बनला आहे. त्याचे शिक्षण पणजी येथील पीपल्स हायस्कूलमधून झाले, शाळेत सर्व धर्मातील व वर्गातील मुले होती. तो म्हणतो, ‘माझ्या साऱ्या जीवनात शिक्षकांपेक्षा मित्रांकडूनच मी अधिक मार्गदर्शन मिळवले आहे.’

Drama
Blog: वर्ण संकल्पनेचा विचार
Drama
DramaDainik Gomantak

विद्यालयीन काळानंतर द्रुपदने अनेक शाखांमधून वेगवेगळे कोर्स केले. नवीन नवीन गोष्टी तो शिकत राहिला. त्याने कॉलेजमधून शिक्षण घेतले नाही पण आंतर महाविद्यालयीन स्पर्धामधून सहभागी होण्यासाठी तो तात्पुरते अ‍ॅडमिशन घ्यायचा. स्पर्धा संपल्यानंतर त्याचा त्या कॉलेजशी संबंधही संपायचा. लोक त्याला एक प्रकारे वेडाच समजायचे. त्यांने त्या काळात काही फुटकळ नोकऱ्या केल्या. हॉटेल, मेगा स्टोअर, डिझाईन वगैरे प्रत्येक क्षेत्रात त्याने काम केले.

पण या काळात तो एक गोष्ट शिकला, ती म्हणजे, ‘मी इतरांशी कम्युनिकेट करू शकतो, मी इतरांशी बोलू शकतो. मी जणू एक परफॉर्मर होतो. डिझाईन हे माझे मुख्य कौशल्य असल्याची जाणीव मला झाली. नृत्य हे माझ्याकडे असणारे दुसरे एक कौशल्य होते. मी गोव्यात नृत्य कोरिओग्राफर म्हणूनही काम केले आहे. ‘द्रुपद डान्स गुरुकुल’ची स्थापना मी त्या काळात केली होती.’ शेवटचे वाक्य बोलून द्रुपद हसतो.

पण त्यानंतर अचानक द्रुपद ‘माईम’ याप्रकारे प्रकाराकडे वळला. 2000 च्या दशकात गोव्यात माईम कलाकार नव्हते त्यामुळे त्याच्या नाट्य सादरीकरणासाठी जेव्हा त्याला माईम कलाकारांची गरज भासायची तेव्हा तोच त्यांना मार्गदर्शन करायचा. पण अचानक द्रुपदची भेट न्युटन नावाच्या एका गोमंतकीय माईम कलाकाराशी झाली.

न्यूटन फार्मसी कॉलेजचा विद्यार्थी होता. मग न्यूटन समवेत द्रुपदचे माईम सादरीकरण सुरू झाले. पण न्यूटनला लंडनमध्ये फार्मसीस्ट म्हणून संधी लाभली आणि द्रुपद पुन्हा एकदा पडला. पुढची दोन-तीन वर्षे त्याने स्वतःच्या बळावर रेटली. ज्यांना द्रुपदने माईम शिकवायचे ठरवले ते देखील त्या कलेप्रती निष्ठा ठेवू शकले नाहीत.

Drama
Blog: विद्याधर हा शुद्ध क्षत्रिय असावा का?

‘माईम कलाकाराकडे किमान पाच कौशल्ये हवीत- तो एक चांगला अभिनेता असला पाहिजे, तो चांगला नर्तक असायला हवा, समाजात काय चालले आहे याचे भान त्याला हवे, मानसशास्त्राची आणि काव्यशास्त्राचीही जाणीव त्याला असली पाहिजे तसेच संगीताचेसुद्धा त्याला ज्ञान असले पाहिजे. माईनमध्ये काटेकोरपणाला खूप महत्त्व असते. या साऱ्यामुळे कदाचित कलाकार माईमला स्वीकारत नसतील.’ माइमसंबंधी अशाप्रकारे विचार करता करता द्रुपद स्वतःच माईममध्ये इतका गुंतला की लोक त्याला माईम आर्टिस्ट म्हणूनच ओळखायला लागले. मग द्रुपदनेही माईमला पूर्णपणे स्वीकारायचे ठरवले.

देशात अवघे पूर्णवेळ माईम आर्टिस्ट आहेत. द्रुपद त्यांच्यापैकी एक आहे. आता त्याचे उद्दिष्ट आहे 1000 चांगले माईम कलाकार तयार करणे. तो म्हणतो, ‘मी अजूनही शिकतो आहे आणि इतरांनाही शिकण्यात मदत करतो आहे. माईम हे माझ्यासाठी शिकवण्याचे आणि शिकण्याचे एक उत्कृष्ट तंत्र आहे.

द्रुपद गावकर ओरविले (पॉन्डिचेरी) येथील ‘मूलध्वनी इन्स्टिट्यूट ऑफ मुव्हमेंट अँड एक्सप्रेशन’ या संस्थेचा संचालक आहे. ‘माईम’ या माध्यमातून काम करणाऱ्या द्रुपदला नृत्य, नाट्य आणि कसरत या क्षेत्रातही काम करणे आवडते. 2018 साली, त्याने केलेल्य 50 तासांच्या दीर्घ माईम सादरीकरणाचा जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहे. भारताचे राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांच्या 5 व्या जयंतीच्या निमित्ताने तो 12 तास 12 मिनिटे त्यांचा ‘लिव्हिंग स्टॅच्यू’ बनून राहिला होता. हा देखील त्याच्या नावावर असलेला दुसरा विश्वविक्रम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com