मन आणि बुद्धी

Prapti Gaokar
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

मन आणि वैचारिक क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य होय. प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधण्याची बुद्धिमत्ता ही फक्त मनुष्याला लाभलेली नैसर्गिक शक्ती आहे. आपल्या मानवी देहामध्ये न दिसणारे अदृश्य असे दोन निराकार घटक म्हणजे आपलं मन व बुद्धी. हे दोन्हीही आपल्याला आपल्या सुखात व दुःखात विविध प्रकारे वाट दाखवत असतात.

 

प्राप्ती महेंद्र गावकर

आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये, क्षणाक्षणाला वैचारिक पेच प्रसंग उभे ठाकलेले असतात. कोणताही छोटा मोठा निर्णय घेण्याची वेळ आली, तर त्या बाबत शेकडो विचार आपल्या मनामध्ये येऊन जातात. आपली बुद्धी अनेक तर्क-वितर्क पडताळत असते. शेवटी निर्णय घ्यायची वेळ आली, की दोघांचाही संघर्ष सुरू होतो. शेवटी मनाच्या सुज्ञपणावर विश्वास ठेवावा, का बुद्धीच्या प्रगल्भतेवर ठाम राहून निर्णय घ्यावा असा प्रश्न आपल्या सर्वानाच पडतो.
मन आणि वैचारिक क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य होय. प्रत्येक प्रश्नावर उत्तर शोधण्याची बुद्धिमत्ता ही फक्त मनुष्याला लाभलेली नैसर्गिक शक्ती आहे. आपल्या मानवी देहामध्ये न दिसणारे अदृश्य असे दोन निराकार घटक म्हणजे आपलं मन व बुद्धी. हे दोन्हीही आपल्याला आपल्या सुखात व दुःखात विविध प्रकारे वाट दाखवत असतात. अन् सततची द्विधामनःस्थिती सुद्धा उत्पन्न करत असतात. ह्या दोघांचं अस्तित्व शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला जाणवत असतं. जसा मनाचा सुज्ञपणा आहे तशीच बुद्धीची प्रगल्भता सुध्दा आहेच.
या दोघांचे स्वभाव मात्र विशेष टोकाचे, मनाची व्याख्या सांगताना बहिणाबाई सांगतात की मन मोकाट मोकाट त्यांच्या ठायी ठायी वाटा जशा वाऱ्यांना चालल्या पाण्यावरल्या रे लाटा, मन पाखरू ,पाखरू त्याची काय सांगू मात आता वाहत भुईवर गेलं गेलं आभाळात.. मन कसं, चंचल वेगवान व स्वैर. तर बुद्धी ही तेज तरल, तीक्ष्ण. आपलं मन म्हणजे पाण्यासारखं, वाट फुटेल तसं पाळणारं, कधी मलिन तर कधी तीर्थाच्या कुंडाप्रमाणे पावन. पण बुद्धी मात्र एका जागी ठामपणे उभी असलेली, तर कधी वेळ पडल्यास चार पावलं पुढे मागे जाऊन काळानुरूप वर्तणूक करणारी. मन हे भावनांनी घेरलेलं, तर बुद्धी तर्काने चालणारी. असं म्हणतात की स्वच्छंदी मन क्षणात चंद्रावर जातं, मात्र बुद्धीला तिथे जायला यान बनावं लागतं. ह्याचच आणखी एक उदाहरण घ्यायचं झाल्यास, असं म्हणता येईल की, निराकार ईश्वराला ओळखण्याची पात्रता व शक्यता या दोन अदृश्य अवयवात आहे. परंतु मन हे निराकार, तेजाळू ईश्र्वराचा उलगडा करतं तर बुद्धी तर्कशुद्ध विचार करून मनाने तयार केलेल्या ईश्वराला निसर्गाच्या स्वरूपात पाहते.
बुद्धी आणि मन यातील वेगळेपणा स्पष्ट करायचा झाल्यास असं उदाहरण घेता येईल, की जर एखाद्या व्यक्तीला वेळेत एके ठिकाणी पोहोचायचे आहे, पण वाटेत एका निर्जन रस्त्यावरून जात असताना अपघातात सापडलेल्या एका इसमाची मदत करावी लागली, तर त्यावेळी त्याला त्याच्या मनाची सुज्ञता माणुसकी म्हणून त्या अपघातग्रस्ताला मदत करण्याची सूचना देईल, तर दुसरीकडे बुद्धीची प्रगल्भता वेळेचं महत्त्व दर्शविताना त्याला ज्या ठिकाणी वेळेत पोहोचायचे आहे त्याची आठवण करून देईल.
मानवाच्या जीवनात यश प्राप्ती करण्याच्या विचारात असतानाच, बुद्धी व मन यांच्यात ओढाताण होत असते. अशा वेळी मनाचा मार्ग अनुसरावा का बुद्धीचा, हा मोठा सवालच असतो. अशा परिस्थितीत दोन्हींचा समतोल राखला तरच यश प्राप्ती होते. नातं टिकून राहतं, सामाजिक, वैचारिक आर्थिक प्रगती होते.
आपल्या समाजामध्ये भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेणारी, भावना विवश होऊन वर्तणूक करणारी, अनेक माणसं आपण पाहतो तसेच बुद्धिमत्तेच्या जोरावर, भावनाशून्य होऊन अगदी टोकाचे निर्णय घेणारी मंडळी सुध्दा पाहायला मिळते. मात्र ज्यांच्या ठिकाणी भावना व तर्क या दोघांचा समतोल पाहायला मिळतो तिथेच प्रगती दिसून येते. अर्थात काय तर मानव हा जसा विचारशील आहे तसाच तो भावनाशिलही आहे. पण प्रत्येक वेळी बुद्धीचा सुज्ञ पणा मनाला भावणारा असेलच असं नाही. मात्र दोघेही आपापल्या बाजूने बरोबरच असतात. पण जर का या दोघात समतोल साधला गेला नाही ,तर कित्येकदा आपणच आपल्याला नेस्तनाभूत करतो. आणि इतरांनाही दुखावून बसतो. आणि म्हणूनच थोर संतमहात्मे सुध्दा आपल्याला आपल्या षड्रिपूंवर ताबा मिळवून आपल्या मनाला बुद्धीच्या स्वाधीन करण्याचा उपदेश करतात. मनाच्या सुज्ञतेला बुद्धीच्या प्रगल्भतेने हातळलं, तर मानवाचं जीवन सफलतेच्या मार्गाला लागेल. शांती व समृद्धतेत वाढ होईल. फक्त प्रसंगावधान राखून बुध्दी व मन यांच्यात समतोल कसा राखायचा हे आपणच ठरवलं, तर जगणं सुखी होईल.

 

 

 

संबंधित बातम्या