मनभावन श्रावण

विद्या राणे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी नुकतीच साजरी झाली. या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते. शेतातल्या उंदराचा नाश करणारा प्राणी म्हणून नाग आणि अन्य साप शेतकऱ्याला आपले मित्र वाटत असतात. त्यादृष्टिकोनातून विचार केला तर नागपंचमी जसा स्त्रियांचा सण तसाच शेतकऱ्यांच्या दृष्टिनेही त्याला विशेष महत्त्व असते.

विद्या राणे

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते, सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण महिना हर्ष उल्हास घेऊन येतो. इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाची उधळण याच श्रावण महिन्यात आपल्याला पाहायला मिळते. श्रावण महिन्यातला ऊनपावसाचा खेळ विलोभनीय असतो. कधी पावसाच्या सरी कोसळतात तर कधी अचानक ऊन पडते. ऊन-पावसाच्या या खेळाचे रंग अधिक मोहक बनवण्यासाठी आपले अनेक सण-उत्सव श्रावण महिन्यात दाखल होत असतात. सणावारांची नुसती रेलचेल असते. हिरवीगार नटलेली सृष्टी आणि पशुपक्ष्यांचा किलबिलाट यामुळे वातावरण चैतन्यदायी बनते. झाडे, वेली, वृक्ष आनंदाने डोलत असतात.
नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत असतात. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे याची अनुभूती येत असते.
श्रावण महिन्यातल्या सोमवारला सगळीकडेच विशेष महत्त्व असते. दर सोमवारी मनोभावे महादेवाची पूजा केली जाते. यंदा करोनामुळे मंदिरांमधील गर्दी दिसणार नाही, परंतु श्रावणातील चैतन्य आणि उत्साह कायम आहे.
श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी नुकतीच साजरी झाली. या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते. शेतातल्या उंदराचा नाश करणारा प्राणी म्हणून नाग आणि अन्य साप शेतकऱ्याला आपले मित्र वाटत असतात. त्यादृष्टिकोनातून विचार केला तर नागपंचमी जसा स्त्रियांचा सण तसाच शेतकऱ्यांच्या दृष्टिनेही त्याला विशेष महत्त्व असते. त्यानंतरचा सण नारळी पौर्णिमा. रक्षाबंधन. पावसाळा सुरू झाल्यानंतर मासेमारी बंद ठेवण्यात आलेली असते. नारळी पौर्णिमेदिवशी समुद्राला नारळ अर्पण करून आणि पूजा करून मासेमारीची सुरुवात केली जाते. याच दिवशी भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण रक्षाबंधन साजरा केला जातो. जगातील  सर्व नात्यांमध्ये  बहिण भावाचे प्रेम निस्वार्थी आणि आणि पवित्र मानले जाते. भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी हा सण साजरा केला जातो. अलीकडे या सणाला व्यक्तिगत भावनांबरोबरच सामाजिक संदर्भांचीही जोड देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे सामाजिक महत्त्वही वाढत चालले आहे. पुढचा सण येतो गोकुळाष्टमी. श्रीकृष्ण जन्मदिवस म्हणून हा दिवस अष्टमी साजरी केली जाते. सृष्टीचा पालन करता विष्णूने यादिवशी आपल्या आठव्या अवतारात श्रीकृष्णाच्या रूपात जन्म घेतला असे पुराणात सांगितले आहे. यानिमित्ताने दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदा करोनामुळे दहीहंडीच्या उत्सवावरही परिणाम झाला असला तरी आपल्या जगण्यातील या सणाचे महत्त्व कमी होत नाही.
श्रावण महिन्यात सात्विक आहार केला जातो. घरोघरी पूजा अर्चा केली जाते. मांसाहार करणारे लोकही श्रावण महिन्यात शाकाहारच घेतात. त्याला श्रावण पाळणे असे म्हणतात. श्रावण पाळण्यामागे किंवा श्रावणात मांसाहार न करण्यामागेही एक शास्त्रीय कारण आपल्याला पाहायला मिळते. बकरी, मेंढ्या, कोंबड्या वगैरेंना पावसाळ्यात रोगराईची लागण होण्याची शक्यता असते. त्या रोगराईचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये म्हणून श्रावणात मांसाहार टाळला जातो.
असा हा मनभावन श्रावण! चैतन्याची उधळण करणारा.. जगण्यातला आनंद द्विगुणित करणारा!

 

संबंधित बातम्या