भावनांचे देणे

भावनांचे देणे
भावनांचे देणे

भावना आणि माणसांच्या अंतर्मनाचा अतिशय जवळचा संबंध असतो. आपल्या मनाच्या खोल तळांतून रुजून आलेल्या भावनांना कधी अंत नसतो आणि याच भावनांतून तयार होत असतात, आपल्या साहित्यकृती. मातृत्व हा प्रत्येक स्त्रीला तिच्या गर्भातून लाभलेला एक अमूल्य ठेवा, असे आपण समजतो. ते तर झालेच, पण तरीही कुसव्यात गर्भाचे फळ न धरलेल्या स्त्रीच्या अंतर्मनातून जेव्हा मातृत्वाच्या भावना उन्मळून येतात. तेव्हा कधीकधी तिचा पान्हाही ओला होतो, असे म्हटले, तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पण त्या भावनांना देखील निव्वळ मातृत्वाचा ओलावा असतो. आईपण देगा देवा म्हणून आळवणारी एखाद दुसरी स्त्री देव्हाऱ्याच्या दारी अथवा मंदिराच्या पायऱ्या समोर डोळे मिटून उभी राहिलेली अधून मधून आपल्याला दिसल्या शिवाय राहणार नाही. या भावनांना अर्थ आहे.

आधीपासून आमचे वाचन विपुल. घरात येऊन पडणारी पुस्तके वाचीत असायचो. शाळेत असताना शिक्षक नीतिमत्तेच्या आणि विवेक बुद्धीच्या गोष्टी सांगायचे. घरी आई, बहिणीकडून रामायण महाभारतातल्या गोष्टी तसेच बादशाह आणि चतूर बिरबलाच्या गोष्टी ऐकल्या. साने गुरूजींची श्यामची आई गोष्ट मनाला अधिकच भावुक बनवून सोडणारी होती. शाळेत आम्हा मुलांना घेऊन बाई सिनेमा दाखवून आल्या. तो सिनेमा बघताना डोळ्यातून अश्रू वाहात होते. अजूनही आठवते शेजारी बसलेला  हुंडके देऊन रडत होता. मलाही रडू आवरेना. घरी येताच धावत जाऊन आईला मिठी मारली. इथपर्यंत आठवते मला. नंतर कोकणीतून शणै गोंयबाबांची ‘म्हजी बा खंय गेली?’ ही कथा वाचली आणि याच्यात आणखी भर पडली. भावना अधिक तीव्र होत गेल्या. वाचन आसो, सिनेमा असो अथवा नाटक असो वाचताना अथवा बघताना ते पुढे जातच नाही म्हणून हातात नेहमी हातरूमाल सांभाळण्याची सवय करून घेतली.

हायस्कुलात पोचल्यावर कथा कादंबरी वाचनाकडे मन ओढून गेले. जास्त गोडी लागली ती कॉलेजमध्ये शिकताना. मडगावात गोमंत विद्या निकेतनच्या ग्रंथालयात वाचकासाठी मराठी कादंबऱ्या विपुल प्रमाणात उपलब्ध असायच्या. वि. स. खांडेकर हे त्यावेळचे माझे प्रिय आणि आवडते लेखक. त्यांच्या कादंबऱ्या भावनांनी ओतप्रोत भरलेल्या असायच्या. एक वाचली की दुसरी शोधू लागायची. त्यातील वर्णने आणि संवादातून प्रकट होणाऱ्या संवेदनांनी तेव्हा अंतर्मन चिप्प भिजून जायचे. आवडायचे त्यातील संवाद आणि वर्णने. परिच्छेदांचे परिच्छेद मी वहीवर लिहून ठेवायची. पुस्तक वाचनालयात परत केले तरी लिहून ठेवलेले ते मी परत वाचायची आणि वाटायचे, कोठून गोळा करत होते, हे साहित्यिक इतकी माहिती आणि होत असतील  एवढी निर्मिती? वाटले, मलाही व्हायचंय लेखक. व्यक्ती आणि भावना, मी संदर्भ जुळवू लागली. वि. स. खांडेकारांची ययाती कादंबरी जास्त भावली. भारतीय मिथकांचे समकालीन संदर्भ शोधून त्यांचे गूढ-गंभीर चिंतन व्यक्त करण्याची त्यांची श्रेष्ठ बुध्दी. वाचता वाचता रमून जायची. ययातीची मूळ कथा महाभारतातील. खांडेकरांनी मूळ कथेत बदल करून ते वर्तमानाशी जोडले. ही ''ययाति''ची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा तर कचाची भक्तिकथा होय. या कथेचा मोह कुसुमाग्रजांना झाला, तसाच तो हिंदीतील प्रसिद्ध कवी कादंबरीकार भगवतीचरण वर्मीनाही. कुसुमाग्रजांनी ''ययाति आणि देवयानी'' हे नाटक लिहिलं, तर वर्मांनी ‘चित्रलेखा'' कादंबरी. दोन्ही प्रेक्षकांनी, वाचकांनी पसंत केली.

इतक्या भावुकतेंत गेल्यावर त्यातून बाहेर येणे कठीण असते. पण मी त्यात गुरफटून नाही राहिली. ह्या भावुकते बाहेर देखिल एक वेगऴे जग आहे. साहसाचे. बंड करण्याचे. धैर्यवान, बुध्दिमान लोकांची स्थीर बुध्दी कुठल्याही संकटाला विचलीत होत नाही. हा सिध्दांत माझ्या मनात रुतून बसला आणि समाजात वावुरतना मी अशा माणसांच्या शोधात राहू लागली. मला माझ्या लेखनासाठी फक्त भावनांच्या आहारी गेलेली माणसेच नको होती तर आपल्या भावनांना मुर्त स्वरूप देण्या करीता धाडसाने समाजात नवा विचार रूढ करण्यास तत्पर असणारी धैर्याची माणसे हवी होती.

लग्न होऊन दोन वर्षांचा काळ गेला आणि अपत्याला मूल झाले नाही, तर समाज कुजबूचू लागतो. स्त्रीच्या कानी पडल्यावर ती अस्वस्थ होते. मग डॉक्टर, तपासण्या, देव, देवतांची पुजा, प्रसाद याच्यात आणखी वर्षे जातात. शेवटी ती कंटाळते. लोकांची कुजबूज वाढत जाते. तिला मूल हवे असते. तिच्या ह्रदयातून मातृत्वाच्या कळा येवू लागतात.

समाज तिला वांझ म्हणून जेव्हा आरोप करतो तेव्हा ती आक्रोशाने खंबीर होवून उठते आणि दृढ निश्चय करून आपल्या पतिला म्हणते, मला मूल हवं आहे. माझ्या कुसव्यात नाही जन्मले तरी माझ्या अंत:करणात ते जन्मलेले आहे, आम्ही अनाथाश्रमातील नव्यानेच जन्मलेली इवलीशी मुलगी दत्तक घेवुया. मी त्याला आईचा लळा लावेन, तिला वाढवेन. माझे अंतर्मन मला साद घालीत आहे. मला मूल हवे आहे. आणि भावनांचा ओघ तीव्र होता क्षणी तिच्या धाडसाला बळकटी येते आणि ती पुटपुटते, कोणाच्याही रक्ताचे का होईना माझ्या ह्रदयात तिच्या मायेचे पाझर फुटतिल. काय त्या मातृत्वाच्या भावना, हा हा हा….मला अनुभवायच्या आहेत. माझे बाळ, चिमुकले, गोंडस!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com