Mother's Day 2021: दारात ऊभी राहून निरोप देणारी आई आठवली

Mother days 2021 Once again I remembered my mother who saying goodbye through the door
Mother days 2021 Once again I remembered my mother who saying goodbye through the door

या लाडक्या मुलांनो, 
तुम्ही मला आधार,
नव हिंदवी युगाचे, 
तुम्हीच शिल्पकार.
आईस देव माना, 
वंदा गुरुजनांना,
जगी भावनेहूनी त्या, 
कर्तव्य थोर जाणा...

(Mothers day 2021)सुमन कल्याणपूर(suman kalyanpur ) यांच्या सुरेल आवाजातील, गीतकार मधुकर जोशी(Mdhukar joshi) यांचे दशरथ पुजारी यांनी संगीतबध्द केलेले गीत रात्रीची निरव शांतता भंग करीत होते. घरातली सगळी मंडळी निद्रेच्या आधीन झाली होती. व. पु. काळे(Va.Pu. Kale) यांच्यावर काढलेला "नाट्यदर्पण" चा जुना अंक मी चाळीत एकटाच बाहेर बसलो होतो. वास्तविक हे गाणे मी आज प्रथमच ऐकतो अशातला काही भाग नव्हता. कधीकधी मनात धगधगणाऱ्या विषयाशी साधर्म्य साधणारी एखादी घटना घडली, की अशा वेळी ऐकलेले गीत आपसूकच आपल्याही ओठावर येते. मन एकदम अस्वस्थ होऊन जाते. कधीकधी एखादे पुस्तक आवडीने आपण वाचायला घेतो परंतु हवे, तसे त्या पुस्तकांत लक्षच लागत नाही. वाचता वाचता भलत्याच विषयाची विचार श्रृंखला आपल्या मनाचा ताबा घेते. आणि वाचन बाजूला पडते. मी हातातले पुस्तक बाजूला सारुन विचारमग्न झालो. वाचनात आपसूकच खंड पडला.(Mother days 2021 Once again I remembered my mother who saying goodbye through the door)

वास्तविक हे गीत जगावे कसे ? वागावे कसे? याची आपल्याला शिकवण देते. अशा आशयाची गीते, काव्य आता हळूहळू लोप पावत गेलीय. कधीकधी वाटते, लेखकांची प्रतिभा आटलीय की काय? आई-वडिलांचा, गुरुजनांचा आदर करावा, गंगेपरी पवित्र विचार मानात ठेवावेत. शिवरायापरी दिलदार आणि शूर व्हावे, टिळकांप्रमाणे ध्येयाने प्रेरीत व्हावे. चांगल्याचा स्वीकार करुन आपल्या देशाप्रती स्वाभिमान बाळगण्याची शिकवण देणारे हे गीत आमच्या पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच लिहिलेले होते, असे वाटून जाते.

आजारपणात आपल्या आई-वडिलांकडे ढूंकुनही न पहाणारी मुले, त्यांच्या मृत्यूपश्चात मात्र अस्थिविसर्जनासाठी पंढरपूर, नरसोबाचीवाडी येथे जातात. वर्तमानपत्रात बाराव्या दिवशी मोठमोठे फोटो छापून आणतात. "तुझ्या आठवणी शिवाय आमचा एकही दिवस जात नाही" असे खोटे खोटे छापून आणतात, त्यावेळी अशा मुलांची कीव येते. त्यांना ओरडून सांगावेसे वाटते, अरे जीवंतपणी आपण आपल्या जन्मदात्याना अन्नाला मोताद केलेत. ना धड अन्न दिलेत, ना धड तुमचा आधार! आज तुम्हाला रडण्याचा, शोक करण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कशाला आपल्या आई-वडिलांच्या फोटोचा ढाली सारखा वापर करुन शोक करता? ज्या मातेने विविध यातना सहन करुन, स्वतः पोटच्या गोळ्याला नऊ महिने आपल्या ऊदरात प्राणापलिकडेही सांभाळले, जपले, तोच पोटचा गोळा आपल्या आईला मोठेपणी ढूंकुनही पहात नाही, हे कशाचे लक्षण समजावे? मुलांवर चांगले संस्कार करायला आपणच कमी पडलो, असेच समजायचे का? अशी माणसे भेटली की मनस्वी चीड येते. "वृध्दाश्रम" ही आजच्या काळाची गरज होऊन बसलेली आहे.

पण कधीकधी रखरखत्या वाळवंटातही पाण्याचे झरे सापडावेत  त्याप्रमाणे आपल्या जन्मदात्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे "श्रावणबाळ" आपल्याला भेटतात. आईवडिलांचा शब्द ते पडू देत नाहीत. खूप काळजी घेतात. वास्तविक हा संस्काराचा, विचारांचा, त्यांच्या जडणघडणीचा भाग असावा, असे मला वाटते. असे चित्र पहायला मिळाले, की माणसातली माणूसकी अजून मेलेली नाही याची प्रचिती येते. खूप बरे वाटते. कधीकधी काही मुले कामामुळे आई-वडिलांना सोडून शहरात बि-हाड थाटतात, परंतु ओढीपोटी दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला अगदी न चुकता गावी येतात. आपल्या कुटूंबात रमतात. अशा प्रसंगी ती माय-माऊली रस्त्याला डोळे लाऊन बसलेली असते. आपला मुलगा घरी येईल म्हणून विशेष बेत आखते. चांगले चांगले पदार्थ खाऊ घालते. भावंडेही गमतीने म्हणतात, "आज दादा आला आणि आम्हाला चमचमीत खायला मिळाले". आई पुढ्यात बसली की जेवण्याची मजाच काही और असते. कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी सकाळी सकाळी ऊठून बाहेर पडावे लागते. जाताना पुन्हा महिनाभर तरी मुलाचे तोंड आपल्याला दिसणार नाही, म्हणून आईही भल्या पहाटे निरोप देण्यासाठी ऊठते. दारात ऊभी राहून  निरोप देणारी  आई आठवली की पुन्हा घराची ओढ लागते. तो दिवस बेचैनीत जातो, पण त्याला काहीही ईलाज नसतो. बाहेर गावी कामावर जाणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग आले असतील.

आमची आई होती, तोपर्यत आमच्या घरचे सगळे आर्थिक व्यवहार ती पहायची. हिशोब तीला जरी नीट कळत नसला तरी पगार पडल्यानंतर दोन्ही मुलांनी आपला वाटा तीच्या हातात दिला की तीला बरे वाटे. मग ती मिळेल तसे खर्च करायची. तीच्या मनाला वेदना होईल असे कधी आमचे वागणे झाले नाही. "आपली कमावती मुले लग्ने झाली तरीही आपल्या कब्जात आहेत " याचा सार्थ अभिमान ती बाळगून होती. वडील आमच्या लहानपणीच गेले होते. आई संपुर्ण अशिक्षित, तरीही शिक्षणाचे महत्व ती जाणून होती. कष्टाची, अंगमेहनतीची कामे करुन तीने आम्हाला चांगले शिक्षण दिले. ईमारतीच्या बांधकामासाठी तीने डोक्यावर दगड घेतले.दुसऱ्यांच्या शेतात राब राब राबली. भर पावसात रानात फिरुन लाकडे आणली. ती विकून चरितार्थ चालवला. हे उघड्या डोळ्यानी आम्ही पहात होतो. आपसूकच संस्कार होत गेले. "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"  किंवा "घार हिंडते आकाशी लक्ष तीचे पिल्लांपाशी" अशी सुभाषिते वाचायला किंवा ऐकायला मिळाली की आईची खूप आठवण येते. माझ्या आईची थोरवी  दुसऱ्यांच्या तोंडून ऐकण्याचा जेव्हा जेव्हा मला योग येतो, तेव्हा तेव्हा उत्तुग ईमारतीच्या मजल्यांपेक्षाही आईची प्रतिमा मला उंच उंच भासते आणि आईचा  सार्थ अभिमान वाटायला लागतो.

- आनंद एम. नाईक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com