स्वराज्याची सर सुराज्याला नाही: मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

पत्रातून चोवीस चोवीस काॅलम लिहिणारे बाबासाहेबांचे हात, दलितांच्या नवसृष्टीचे रचनाकार होते. बाबासाहेबांची लेखणी स्वयंभू आणि स्वयंसिद्ध होती.

भारतीय व्यवस्था ही चार आधारस्तंभावर उभी आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे तीन स्तंभ आपले काम करतच असते. पण या तीन स्तंभांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली तर त्यासाठी "पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे".

तळागाळातील माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे, उच्चभ्रुंना त्यांच्यातील उन्मत्तपणाचा आरसा दाखविण्याचे, माहिती मनोरंजनाचे आणि विशेष म्हणजे समाज परिवर्तनाचे सामर्थ्य लेखनीमध्ये आहे. आणि एखाद्या पत्रकाराची लेखणी प्रसंगी किती ताकदवान होवू शकते याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

बाबासाहेबांच्या लेखणीने आज पूर्ण देश चालतोय, स्वातंत्र्य, समता बंधुता या तत्वांच्या आधारावर देशाची एक एक वीट रचली जाते तेव्हा खरोखर लिखाणाची ताकद दिसून येते. समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी सुद्धा पत्रकारितेचा आधार घेतला. आधुनिक महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाच्या आंदोलनाला अनन्यसाधारण महत्व आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाला समृद्ध करणाऱ्यासाठी अनेक विभुतींनी पत्रकारिता केली. त्यातीलच अग्रभागीचे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

"आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही". म्हणूनच त्यांनी वृत्तपत्र काढून मुक्या समाजाचा वाचा फोडण्याच काम केले.

काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||1||

नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||2||

संत तुकारामांच्या या ओळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायकाच्या बिरुदासाठी निवडाव्या यात केवढे तरी औचित्य आहे. वृत्तपत्राचे 'मूकनायक' हे नावही त्यांना ''नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण'' या चरणावरुन सुचले आहे. यातुन व आपल्या लेखनीतुन ते अस्पृश्य समाजामध्ये सतत युद्धप्रेरणा चेतवीत असतं.

सत्य निर्भयपणे आणि प्रखरपणे सांगावेच लागते. जननिंदा, उपहास यांची पर्वा न करता समाजपरिवर्तनाचा त्यांचा द्यास चिरंतन असतो. डॉ आंबेडकर हे असे एक थोर समाजचिंतक आणि संस्कृतीपुरुष होते, ज्यांना आमूलाग्र समाज परिवर्तन हवे होते. वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजोन्नती होईल, यावर त्यांचा विश्वास होता. यासाठीच त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत ह्या वृत्तपत्रांची निर्मिती केली. त्यांनी एकनिष्ठ संपादक आणि तटस्थ लेखक म्हणून वृत्तपत्रसृष्टीत पाऊल ठेवले. अस्पृश्यांबरोबरच स्पृश्यांचेही विचार जागृत करून आत्मपरीक्षण करण्यासाठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून पराकाष्ठा केली. बाबासाहेबांच्या वृत्तपत्रातून साकारते ती ध्येयवादी आणि निर्भीड पत्रकार ही प्रतिमा.

त्यांच्या विचार करण्याची आणि लेखनाची एक शिस्त होती. इतिहासाची कल्पनारम्यता त्यांना मान्य नव्हती. "स्वराज्य कोणाचे व ते कशासाठी हे केल्याखेरीज या तत्वांची री आम्ही तरी ओढू शकत नाही." असे प्रखर मत त्यांनी (स्वराज्याची सर सुराज्याला नाही: मूकनायक 14 फेब्रुवारी 1920) ह्यातून मांडले होते.

आंबेडकरांना कोणत्याही विषयाचे वावडे नव्हते. ते दि प्राॅब्लेम ऑफ रुपी यामध्ये अर्थिक विषयावर जेवढे अभ्यासपुर्ण लिखान करीत तेवढ्याच विद्वत्तेने ते 'हिंदू समाजात धार्मिक सुधारणेखेरीज सामाजिक सुधारणा होणे शक्य नाही.' (बहिष्कृतभारत) असे म्हणत धार्मिक व सामाजिक विचारांवर देखील लिहीत. तेवढ्याच सहजतेने ते राजकीय विचारांवरही आपले मत मांडत असतं. त्यांनी देशाच्या निदर्शनास आणून दिले की, या प्रचंड देशात राजकीय प्रश्नासोबतच इतरही अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. अर्थ, शेती, शिक्षण आणि वाड़मय या विषयावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्रीय लेखन चिरंतन स्वरूपाचे आहेत.

लोकसाहित्य हा सांस्कृतिक आविष्कार आहे असे त्यांचे मत होते. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासात वृत्तपत्रीय कर्तृत्वाला महत्वाचे स्थान आहे. ते विख्यात अर्थशास्त्रज्ञ होते पण ही पत्रकारिता करित असताना त्यांना आपल्या वृत्तपत्राचे अर्थशास्त्र कधीच जुळवता आले नाही. मात्र आपल्या पत्रातून चोवीस चोवीस काॅलम लिहिणारे बाबासाहेबांचे हात, दलितांच्या नवसृष्टीचे रचनाकार होते. बाबासाहेबांची लेखणी स्वयंभू आणि स्वयंसिद्ध होती.

बाबासाहेबांचे मराठी वृत्तपत्रीय लेखन आत्मप्रिय होते. कारण लोकजागृतीच्या चळवळीसाठी लोकभाषेचे माध्यम स्वीकारावे लागते. इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि वृत्तपत्रीय लेखन केले असले तरी, मराठी वृत्तपत्रे स्थापून व मराठी भाषेचाच जाणिवपुर्वक वापर त्यांनी जनसामान्यांना प्रबोधित करण्यासाठी त्यांनी केलेला दिसून येतो.

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायमूल्यांची जाणीव सतत जागती ठेवली. त्यांची मराठी वृत्तपत्रकारिताही याचीच साक्ष देते. डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाच्या 'मुकनायका'ने, 'बहिष्कृत भारता' तील, 'जनते' ला, 'प्रबुद्ध भारता' ची दिक्षा दिली. आणि एक मन्वंतर घडले.....

-प्रियंका देशमुख

संबंधित बातम्या