लोणावळ्यातील ‘मम्मीज होमली फूड’

Mummys Homely Food: मम्मीज होमली फूड’चा डंका मुंबईपर्यंत वाजतो.
Mummys Homely Food
Mummys Homely FoodDainik Gomantak

मनस्विनी प्रभुणे-नायक

पुण्यावरून मुंबईला जाताना लोणावळा-खंडाळा ही जुळी गावं लागतात. पुण्यावरून मुंबईला प्रवास करताना प्रवासात कितीही झोप आली तरी लोणावळा सुरू होताच ती दूर सारली जाते. वळणावळणाचे घाट, वेगवेगळ्या ऋतूत फुलणारे दुर्मिळ वृक्ष यांचं मोठं आकर्षण असायचं.

‘मम्मीज होमली फूड’ (Mummys Homely Food) नावाच्या खानावळीच्या रूपाने गेल्या काही वर्षांपासून या आकर्षणात आणखी एक भर पडली. तसं लोणावळ्याच्या जवळच माझ्या आईचं घर आहे, पण मुंबईला येता-जाताना किंवा मुद्दाम असे लोणावळ्यात कधीच थांबणं झालं नाही.

‘मम्मीज होमली फूड’ या खाणावळीबद्दल आणि त्याच्या मालक शैलजा फासे यांच्याबद्दल अनेकजणांकडून ऐकलं होतं. मात्र कधी तिथे जाण्याचा योग आला नाही. एका लग्नाच्या निमित्ताने नुकतीच लोणावळ्याला गेले होते. यावेळी मात्र अगदी ठरवून ‘मम्मीज होमली फूड’मध्ये गेले.

‘मम्मीज होमली फूड’ ही शैलजा फासे यांनी 1975 साली सुरू केलेली सर्वांत जुनी खानावळ. ती आता इतकी प्रसिद्ध झाली आहे की लोणावळ्यात कोणतंही नवं रेस्टॉरंट सुरू होतं त्याचं नाव ‘मम्मीज होमली फूड’ असं ठेवलं जातं. त्यामुळे लोणावळ्यात जर तुम्ही ‘मम्मीज होमली फूड’ असा शोध सुरू केला तर चुकून दुसऱ्याच कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) पोहोचण्याची अधिक शक्यता आहे.

या नावाच्या प्रसिद्धतेचा फायदा घेऊन अनेकांनी आपलं रेस्टॉरंट मोठ्या दिमाखात थाटलं आहे. त्यामुळे शैलजा फासे यांचे ‘मम्मीज होमली फूड’ असा शोध घेतला तर योग्य ठिकाणी पोहोचाल हे अनुभवांती लक्षात आलं. लोणावळ्यात शैलजा फासे यांना अनेकजण ‘मम्मी’ याच नावाने ओळखतात. त्या अखिल लोणावळ्याच्या मम्मी आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्वच तसं आहे.

शैलजा फासे या 1975 साली मुंबईवरून लोणावळ्यात स्थायिक झाल्या. मुंबईत (Mumbai) त्या सामाजिक उपक्रमांमध्ये खूप सक्रिय होत्या. शिवसेनेच्या महिला मोर्चामध्ये एकदम आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या.

राजकारण-समाजकारण खूप झालं आता वेगळं काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं त्यांनी वेगळा रस्ता शोधायला सुरूवात केली. लोणावळ्यात त्यांना ‘जोशी सॅनिटोरियम’ची जागा मिळाली. मुंबई सोडून नव्या जागेत जाऊन नव्याने काही तरी सुरू करायची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

1975 सालीचा लोणावळा खूपच वेगळा होता. पण इथे काम करायला काही वेगळा मार्ग दिसत नव्हता. पर्यटन क्षेत्र असल्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्‌सची एकदम चलती होती. आपल्यासोबत स्थानिक महिलांना (Women) घेऊन काहीतरी उपक्रम सुरू करावा असं मनात असताना त्यातील काही महिलांना आपण खानावळ सुरू करूया असं सुचवलं.

आपण आपल्या आपल्यावर उभ्या आहोत, सक्षम आहोत तशा इथल्या महिला देखील स्वावलंबी झाल्या पाहिजेत असं असं शैलजा फासे यांना वाटायचं. खानावळ सुरू करायला तेवढं पुरेसं भांडवल त्यांच्याकडे नव्हतं.

मग त्यांनी स्वतःचे दागिने विकून भांडवल उभं केलं आणि यातून ‘मम्मीज होमली फूड’ सुरू झालं. आम्ही मैत्रिणी गेलो होतो त्या दिवशी भरपूर गर्दी होती. वर्षानुवर्षे येणारे नेहमीचे ग्राहक होतेच, पण शैलजा फासे यांचे नाव ऐकून ही खानावळ शोधत येणारे पर्यटक (Tourist) देखील होते.

Mummys Homely Food
Goan Food: शिंपले खा अन् रहा निरोगी

मम्मीज होमली फूड’ कशासाठी प्रसिद्ध?

शैलजा फासे या स्वतः कोकणातल्या. त्यामुळे खास कोकणातील शाकाहारी आणि मासळीचा स्वयंपाक प्रसिद्ध आहे. शिवाय चिकन आणि मटणाचे पदार्थ खायला लोक मुद्दाम इथे येत असतात. शाकाहारी पदार्थांमध्ये बिरड्याची उसळ, मुगाची उसळ, भरली वांगी, पिठलं-भाकरी, फ्लॉवर बटाटा रस्सा, भेंडी-कोबी भाजी, मटार पनीर, पोळ्या, भात-आमटी असे पर्याय उपलब्ध आहेत. अनेक गुजराती पर्यटक देखील इथे येतात. त्यांना सात्त्विक शाकाहारी पदार्थ लागतात. ते त्यांना बनवून दिले जातात. आता लोणावळ्यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण 1975 साली एवढे पर्याय नव्हते. त्यामुळे तेव्हा शाकाहारी लोकसुद्धा इथेच जेवायचे.

मांसाहारी आणि मासळीचे पदार्थ

यात सुकं चिकन, चिकन रस्सा, सुकं मटण, मटण रस्सा प्रसिद्ध आहेत. यात त्या त्यांनीच बनवलेला मसाला वापरतात. त्यामुळे इतर ठिकाणी मिळणाऱ्या मटण-चिकनपेक्षा एक वेगळी चव इथल्या पदार्थांना असते. सुरमई, पापलेट, प्रॉन्स, बोंबील असे वेगवेगळे ताजे ताजे मासळीचे प्रकारही इथे मिळतात. लोणावळा हे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध मग ‘लोणावळ्यात ताजी मासळी कुठून येते?’ असं मी

शैलजा फासे यांना उत्सुकतेनं विचारलं. तर त्यांच्या आवडत्या विषयाला हात घातल्यासारखे झालं. मग त्या त्यावर सविस्तर बोलू लागल्या. लोणावळ्याला जवळच पनवेल आहे. शिवाय जुना शेवा, उरण या बंदर असलेल्या भागातून ताजी मासळी आणली जाते. मुंबईतील खवय्ये मंडळी दोन तासांचा प्रवास करून मुद्दाम इथे मासळी खायला येतात. छान फिरणंही होतं आणि मनसोक्त चिकन मटण, ताजी मासळीवर ताव मारायला मिळतो. एखाद्या हिल स्टेशनवर समुद्रातील ताजी मासळी खायला मिळणं हे आगळंवेगळं उदाहरण लोणावळ्यातच बघायला मिळतं. ‘मम्मीज होमली फूड’मध्ये चांगले उत्तम दर्जाचे शाकाहारी पदार्थ मिळत असले तरी ते प्रसिद्ध आहे मांसाहारी पदार्थांसाठी.

Mummys Homely Food
दक्षिण गोव्यातील ‘गड्यांची जत्रा’ पारंपरिक उत्सव

एकदम स्वच्छ स्वयंपाकघर

ज्यांनी इथलं स्वयंपाकघर बघितलं असेल ते डोळे झाकून इथे शाकाहारी जेवतात. इथे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही संपूर्णपणे वेगळं स्वयंपाकघर आहेत. आपलं स्वयंपाकघर स्वच्छ नसेल इतकं इथलं स्वयंपाकघर लखलखीत असतं. शैलजाताई स्वच्छतेसाठी प्रचंड आग्रही असतात. एकदम कडक शिस्तीच्या आहेत. त्यांच्या नियमांमध्ये बदल केलेला त्यांना चालत नाही. ताटं पुसायला, हात पुसायला वेगवेगळे टॉवेल, नॅपकिन्स वापरतात. ते देखील अतिशय स्वच्छ असतात. एवढी स्वच्छता बघून दोन घास जास्तच खाल्ले जातात. इथं स्वयंपाकघरात राबणाऱ्या सर्व महिलाच आहेत. अतिशय शिस्तीत त्या आपलं काम करत असतात.

‘मम्मीज होमली फूड’चा डंका

‘मम्मीज होमली फूड’चा डंका मुंबईपर्यंत वाजतो. मुंबईत शैलजा फासे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या, त्यामुळे तेथील अनेकजण मुद्दाम इथे येतातच, शिवाय राजकारणी, कलाकार मंडळी देखील इथं येऊन जेवून जातात.

यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सचिन तेंडुलकर,आशा भोसले, प्रशांत दामले, जितेंद्र जोशी, अलका कुबल, सुनील शेट्टी अशी असंख्य मंडळी इथे येत असतात. यात आशा भोसले फक्त जेवायला येत नाहीत तर त्या थेट स्वयंपाकघरात शिरतात.

काय आणि कसं बनवतात हे त्यांना बघायचं असतं. इथले पदार्थ इतके चविष्ट कसे बनतात, हे त्या प्रत्यक्ष स्वयंपाकघरात जाऊन जाणून घेतात. शैलजा फासे या लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवर्जून उल्लेख करतात. लक्ष्मीकांत बेर्डे शैलजाताईंना ‘मम्मी’ म्हणायचा.

त्याच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं. आता लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा अभिनय देखील येतो. सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाचा सेट लोणावळ्यात लावला जातो. त्याच्या या सेटवर देखील शैलजा फासे पूर्ण जेवण पुरवतात. शिवाय पनवेलला सलमान खानचा फार्म हाऊस आहे.

तिथे तो कधी मुक्कामाला आला तर ‘मम्मीज होमली फूड’मधून त्याला जेवण पाठवलं जातं. पर्यटक ते सेलिब्रिटींसाठी खास स्वयंपाक बनवणाऱ्या शैलजा फासे या स्वतः मोठ्या सेलिब्रिटी आहेत. लोक आता खास त्यांना भेटायला येतात आणि त्या देखील खूप उत्साहाने त्यांच्याशी गप्पा मारतात. आम्ही मैत्रिणी त्यांच्याकडे गेलो, त्यावेळी त्या इतक्या उत्साहाने गप्पा मारत होत्या की आम्हाला तिथून निघावसं वाटत नव्हतं.

आता चहा घेऊन जा म्हणून अगदी घरातल्यासारखं अगत्य त्या आम्हाला करत होत्या. त्यांच्या या आपलेपणाने त्यांनी अनेकजणांना जोडलं आहे. या वयातही त्या लोणावळ्यात हायवेलगत ‘पराठा हाऊस’सारखं काहीतरी नवं सुरू करायचं स्वप्न बघत आहेत.

लोणावळा हायवेवरून जाणाऱ्या प्रवाशांना काहीतरी चांगलं आणि पटकन खाता येईल असं करायला पाहिजे असं त्यांना वाटतं. स्वतःचे दागिने मोडून स्थानिक बायकांना रोजगार मिळून देणाऱ्या शैलजा फासे हे एक वेगळंच रसायन आहे. कधी पुणे-मुंबई प्रवास करत असाल तर मुद्दाम लोणावळा गावात जाऊन शैलजाताईंच्या ‘मम्मीज होमली फूड’मध्ये जेवायला जा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com