माझी 'बस' वारी

कु. नेहा उपाध्ये खोर्ली, म्हापसा
मंगळवार, 23 जून 2020

कदंब बसनं मला कधीच दगा दिला नाही. कधी उशिरा पोचवलं नाही, की मला उशीर झाला तर माझ्यासाठी थांबलीदेखील नाही. तत्त्वानं जगणाऱ्या पेन्शनर म्हाताऱ्यासारखी मला ती वाटते. तिचा टापटीपपणा, भरधाव वेगानं धावणं आणि रुबाब अगदी वेगळाच. हलगर्जीपणा ठाऊकच नाही मुळी.

गेल्या वर्षापासून माझ्या आयुष्यात बसप्रवास सुरू झाला. अनेकांना बसप्रवास म्हणताच उशीर होणं, गर्दी असणं, बसायला जागा न मिळणं, ढकलाढकली अशी चित्रं डोळ्यांसमोर येणं साहजिकच आहे; पण, बस म्हणताच माझ्या डोळ्यांसमोर सकाळी ७ .१५ ला डिचोलीला जाणारी 'सत्पुरुष' ही खासगी बस आणि पुन्हा म्हापसा येथे पोहोचवणारी दुपारी २ .१० ची लाडकी 'कदंब महामंडळा'ची बसगाडी येते. माणसानं अन्न, वस्त्र, निवारा आणि पाण्यासोबत 'वायफाय'ला जेवढं महत्त्व दिलंय, तेवढंच महत्त्व मी या दोन्ही बसगाड्यांना देते.
'सत्पुरुष' बसगाडी गोव्यातल्या खासगी बसेस जशा आहेत तशीच रंगीत संगीत आणि तेवढीच चित्रमय! त्या बसगाडीत चढताक्षणी कानांवर हिंदी सिनेमातली गाणी अक्षरशः आदळतात. त्या गाण्यांच्या कोलाहलापेक्षा वरच्या पट्टीत ओरडणारा कंडक्‍टर! या दोहोंच्या आवाजाशी स्पर्धा करणारी एखादी मासेवाली वा भाजीवाली... शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुलं... अशी सगळी मंडळी आणि वातावरण असतं.
या खासगी बसचा कंडक्‍टर खरं तर 'पु.लं'च्या "व्यक्ती आणि वल्ली'त शोभावा असाच असतो. बसमध्ये नेहमी चढणाऱ्या मावशीची विचारपूस करणं, शाळकरी मुलांची टर उडवणं, त्याची सलगी असलेल्या तरुणीशी चार गोष्टी करणं हे तर नित्याचंच. अशा अनेक चिंता व काळजी वाहणं ही त्या कंडक्‍टरची खासियत. आपली राष्ट्रभाषा हिंदी व कोकणी कंडक्‍टर यांचं कदाचित हाडवैर असावं. त्यात परप्रांतीय कामगार बसमध्ये चढले की त्यांना तिकिटाचा हिशोब समजावणं म्हणजे नाकी नऊ!
हिंदी भाषा ही कंडक्‍टरसाठी डोकेदुखीच. त्यांची कोकणीमिश्रित हिंदी ऐकून आगामी काळात त्या शैलीची स्वतंत्र भाषा जन्मास येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 'साधकाच्या हाती जपमाळ व मुखी अखंड नामस्मरण असावं' हीच दशा या कंडक्‍टरची. हातात पैसे व मुखात 'फुडे चल! फुडे चल गो मात्शें' याव्यतिरिक्‍त दुसरे शब्दच नसतात. झोपेतही कदाचित 'फुडे चल' या पलीकडे तो काही पुटपुटत असेल का, याबाबत मला शंका आहे. आयुष्यात फक्त पुढेच जायचे याची अंमलबजावणी कशी करावी, हे मी कुणाकडून शिकले असेन तर ते खासगी बसच्या कंडक्‍टरकडून. आयुष्यात कितीही अपयश आले तरीही सकारात्मक दृष्टी ठेवून संधी कशी शोधावी, हे कंडक्‍टरकडूनच शिकावं. भरगच्च भरलेल्या बसमध्ये त्याच्या 'आणखीन एखादा अख्खा माणूस उभा राहू शकतो' या कल्पनाशक्तीला मी दाद देते.
या बसच्या ड्रायव्हरला एखादा प्रतिस्पर्धी डिवचून गेला तर तो पोहोचण्याअगोदर बसस्थानकावर पोहोचून दाखवण्याचीही जिद्द आणि मेहनत मी या समस्त ड्रायव्हर परिवाराकडून शिकले. बसमधली मजेदार गोष्ट म्हणजे त्यांची भांडणं. दोन कंडक्‍टर भांडू लागले आणि प्रवाशांच्या रोषामुळे बस पुढे गेलीच तर एकमेकांस फोन करून भांडणारे कंडक्‍टर मी अनुभवले आहेत. स्वत:चाच मुद्दा हा कायम बरोबर आणि बरोबरच असतो अशी मनोधारणा ठेवणं भांडणासाठी जरुरीचं असतं.
ही खासगी बस जर एखाद्या नखरेल पोरीसाखी तर कदंब बस ही कडक शिस्तीच्या, धरंदाज, उच्चकोटीच्या संस्कारात वाढलेली मुलगी वाटते. संपूर्ण गोमंतकात वाहतुकसेवा देत असताना कदंब बसगाडीनं कितीही वळणं घेतली असली तरीही कदंब गाडी 'सरळ वळणाचीच', बरं का? महाराष्ट्रातील 'एस.टी.'ला आपण 'लाल परी' म्हणत असलो तरी गोव्याची कदंबगाडी मात्र 'शुभ्रपरी' मुळीच भासत नाही. ती मला एखाद्या योगिनीसारखी भासते. तिच्या पदरी

अकाली वैराग्य पडलं आहे असं वाटून जातं.
कदंब बसनं मला कधीच दगा दिला नाही. कधी उशिरा पोचवलं नाही, की मला उशीर झाला तर माझ्यासाठी थांबलीदेखील नाही. तत्त्वानं जगणाऱ्या पेन्शनर म्हाताऱ्यासारखी मला ती वाटते. तिचा टापटीपपणा, भरधाव वेगानं धावणं आणि रुबाब अगदी वेगळाच. हलगर्जीपणा ठाऊकच नाही मुळी.
कदंब बसगाडीत चढल्यानंतर कित्येकदा एखाद्या राजकीय पक्षाची सध्या असलेली स्थिती, असे राजकीय, अथवा आर्थिक स्वरूपाचे रूक्ष विषय कानांवर पडतात. तुम्ही कुठं उतरणार, आयडी कार्ड आणि पास याव्यतिरिक्‍त कदंबच्या कंडक्‍टरला प्रवाशांची काहीच देणेघेणं नसतं. वर्गात रोज गृहपाठ पूर्ण करून येणाऱ्या, पहिला नंबर न सोडणाऱ्या आदर्श विद्यार्थिनीचा शिष्टपणा कदंब गाडीत दिसून येतो. परंतु, काहीशा अरसिक असणाऱ्या, छानछोकीची आवड नसणाऱ्या कदंब बसगाडीनं स्वत:वर "सिंह' हे चिन्ह कसं काय लावू दिलं, याचं मात्र नेहमीच नवल वाटतं.
घरून डिचोलीत नेणारी 'सत्पुरुष' आणि घरी पोहोचवून प्रवास संपवणारी कदंब बसगाडी या दोघींकडून मी जीवनाचे धडे घेतले. आपल्या जीवनप्रवासाचा पूर्वार्ध हा 'सत्पुरुष'सारखा मौजेचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, रंगबेरंगी केला ना, तरीही जीवनप्रवास अंताजवळ येताना त्याचा उत्तरार्ध हा "कदंब' बसगाडीसारखा त्यागमय, वैराग्यपूर्ण, विरक्तीचा करायचा असतो. प्रपंचात राहूनही संन्यासी असणारी कदंब बसगाडी! एवढ्या माणसांच्या गजबजाहाटात ती कधीच माणसांची सुखदु:ख माथी घेऊन फिरत नाही. "सत्पुरुष' आणि "कदंब' या जीवनरूपी नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाणेफेक करून सत्पुरुषची बॅटिंग घेतलीत तरीही पुढच्या इनिंगमधे कदंबची बॉलिंग करून तोही आनंद लुटायचा असतो. आंब्याचं रायतं जसं तिखट गोड लागतं, तशीच आयुष्याची तिखट गोड चव घेतली तर किती मजा येईल! फक्त त्यासाठी सत्पुरुष आणि कदंब या दोघींना लक्षात ठेवा, बरं का?
 

संबंधित बातम्या