गोव्यातील मूर्तिशास्त्रातील नाग

भारतीय मूर्तिशास्त्राच्या परंपरेचा प्रभाव गोव्यातल्या धर्म, संस्कृती, इतिहास, कलेतल्या विविध संचितांवरती दृष्टीस पडत असून, इथल्या समाजाने केवळ पूजेकरिताच नव्हे तर मंदिरे, भिंती, दारे, खांब त्याचप्रमाणे वास्तुच्या विविध भागांना सजवण्यासाठी प्रतिमांचे प्रयोजन केलेले आहे.
गोव्यातील मूर्तिशास्त्रातील नाग
गोव्यातील मूर्तिशास्त्रातील नाग(संग्रहित)

निराकार, निर्गुण स्वरूपात आपल्या आराध्याचे पूजन करणाऱ्या भाविकांच्या मनावरती कालांतराने त्यांच्या मूर्ती पूजन करण्याच्या विचाराने घट्ट पकड घेतली. जैन, बौध्दातल्या नास्तिक मतांच्या आचार्यांनी मूर्तिपूजेबाबत कोणतीही आस्था दाखविली नाही, पण त्यांचा शून्यवाद सर्वसामान्य भाविकांना आकलन होत नसल्याने, त्यांनी प्रारंभी प्रतिके आणि पुढे मूर्तींचे पूजनप्रसंगी ग्रहण केले. भारतीय मूर्तिशास्त्राच्या वैविध्यपूर्ण अशा परंपरेतून गोव्यात गेल्या शेकडो वर्षांपासून वावरणाऱ्या विविध संप्रदायांनी आपल्या आराध्यांच्या ज्या दगड, रत्ने, धातू, लाकूड, माती, मेण, पीठ आदी माध्यमांद्वारे मूर्ती केल्या, त्यात नाग प्रतिमांचे लक्षवेधक वैविध्य अनुभवायला मिळते. भारतीय लोकधर्मांचे खरंतर नागपूजन हे एक खूप प्राचीन रूप असून, आज इतकी शतके उलटूनदेखील नागपूजनाची पकड ढिली झालेली नाही, तिची रूपे मात्र बदलत्या स्वरूपात पहायला मिळतात. गोव्यातल्या जैन, ब्राह्मण, आदिवासी, बौध्द आणि अन्य जातींच्या समुदायांत नागपूजनाचा घनिष्ट समन्वय झाला; व त्याची फलश्रुती म्हणून प्रत्येक उपास्य पध्दतींत महत्त्वाचे स्थान तिला प्राप्त झाले. श्रीकृष्णाने केलेले कालियामर्दन, गरूड व नागांचे पारंपरिक शत्रुत्व, तक्षकाचा परिक्षिताशी संबंध, जनमेजयाच्या नागयज्ञात झालेला नागांचा संहार आदी कथांद्वारे नागांचा पाडाव दर्शवलेला असला तरी त्यांचे देवतास्वरूप कायम राहिले. |

नाग हे सर्पपूजक मानव असावेत असे युरोपियन संशोधक फर्ग्युसन आणि ओल्डहॅम यांनी प्रतिपादन केलेले आहे. मुळात सर्प हे त्यांचे वंशचिन्ह, कालांतराने सापाशी तादात्‍म्य पावले. नागाशी संबंध असलेल्या देवांना मानवरूपांसह दर्शविण्याची परंपरा इसवीसनाच्या कमीत कमी दोन शतकांच्या पूर्वीपासून प्रचलित होती. सापाचे चापल्य, त्याची गती व्रक व विचित्र तसेच शरीर आकर्षक आणि दंश व विळखा घातक असल्याची धारणा झाल्याने आदिमानावाने त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यात धन्यता मानली. सापाच्या अलौकिकपणामुळे, मनात भय व आश्‍चर्य निर्माण झालेल्या भारतीय लोकमानसाला त्याच्या देहात देवाचे किंवा भुताचे वास्तव्य असल्याची भावना दृढ झाली. वारूळ हे भूमिदेवतेचे प्रतीक आहे आणि वारुळात आढळणाऱ्या सापाचा भूमीच्या उपजाऊ शक्तीशी संबंध जोडून सर्व प्रतिमांद्वारे त्यांच्या पूजनाला प्राधान्य लाभले. शिवोपासकांनी शिवाच्या देहावरती प्रत्यक्ष नाग तसेच विविध नागभूषणे परिधान करून, तर वैष्णवांनी श्री विष्णूच्या एकंदर शयनासाठी शेषनागाचे प्रयोजन केले. अन्य देवदेवतांच्या मस्तकावर नागफणी तर शरीरावरती नागबंध दाखवलेले आहे.

गोव्यातील मूर्तिशास्त्रातील नाग
सुसंस्कृत गोव्यालाही लैंगिक हिंसेचे गालबोट

गोव्यात डिचोली तालुक्यातल्या नार्वेच्या हिंदोळे वाड्यावरती जैन तीर्थंकर पार्श्‍वनाथाच्या आसनस्थ मूर्तीवरती फणाछत्र धरलेल्या नागाला दाखवलेले आहे. कुडणे गावातल्या मूर्तिवैभवात ललामभूत ठरण्यासारखी कमरेखालचा भाग नागसापाचा असून, वरचा भाग मनुष्‍याचा नागमूर्तीत आहे. गोव्यात आजतागायत नागांच्या ज्या वैविध्यपूर्ण प्रतिमा आढळलेल्या आहेत, त्यापैकी कुडणेतील ही प्रतिमा लक्षवेधक अशीच आहे. डोके नागाचे व धड मानवाचे अशा मूर्ती सांची, भरहूत येथील शिल्पांत आढळलेल्या आहेत. धड नागाचे आणि तोंड मानवाचे अशी नागप्रतिके आदिवासी जमातीत आढळलेली आहेत. त्यामुळे कुडणे येथील मूर्ती संशोधकांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.

भारतात कुशाण राजकर्त्यांच्या काळात नागपूजनाचे प्रस्थ विकसित पावले. त्यात एखाद्या पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या मस्तकावर सर्पछत्रात फणांची असलेली संख्या त्यांच्या एकंदर सामाजिक क्षेत्रातल्या हुद्द्यावरती अवलंबून असल्याचे नमूद केलेले आहे. अशा स्वरूपातल्या मूर्तीशी साधर्म्य सांगणारी मूर्ती काणकोण तालुक्यातल्या श्री विष्णूच्या मंदिरात आढळलेली आहे. लोलये गावातली ही पाषाणी मूर्ती अरबी सागर आणि सह्याद्री यांच्या कुशीत वसलेल्या या परिसराच्या गतवैभवाची प्रचिती देत आहे. नागांचा पाण्याशी जवळचा संबंध असून, त्या जलस्रोताच्या परिसरात नागाचे वास्तव्य असल्याचे मानून गोव्यात ठिकठिकाणी असलेल्या झऱ्यांचे पावित्र्य त्यांना नागझर अशी संज्ञा देऊन जतन केलेले आहे. काही ठिकाणी अशा झरी, तळी असलेल्या जाग्यांवरती नागमूर्तींचे पूजन चालू आहे. मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईड यांच्या मते सर्प हा लैंगिकतेचे आणि कामवासनेचे प्रतीक मानला गेला आहे, याचा प्रत्यय आपल्या इथे प्रचलित असलेल्या लोकधर्मांतल्या विविध संचितांतून आणि विधींतून येतो. लोकसंस्कृतीने सापाला आदिपुरुष मानलेला आहे आणि त्यामुळे त्याला भूमीचा नायक आणि रक्षणकर्ता मानून, त्याचे वास्तव्य असलेला परिसर पवित्र मानून त्याला ब्राह्मणाची संज्ञा दिलेली आहे. नाग हा पुरुषत्वाचे प्रतीक मानला गेल्याने आणि तो भूमीचे सुफलन जागवतो अशी लोकश्रध्दा असल्याने स्त्रीसाठीही तो ‘संतानदाता’ असल्याची भावना लोकमानसात प्रचलित झालेली आहे. आणि म्हणूनच अपत्यप्राप्तीसाठी नागपूजन करण्याची परंपरा व्यापक प्रमाणात केवळ भारतातच नव्हे तर अन्यत्रही पहायला मिळते. नाग आणि समस्त सापांचा समावेश सरपटणाऱ्या प्राण्यांत होत असून, श्रावण-भाद्रपदाच्या पावसाळी मौसमात त्‍याचे दर्शन मोठ्या प्रमाणात होत असल्याने श्रावणात नागपंचमी आणि भाद्रपद चतुर्दशीला अनंतव्रतास नागाची प्रतिकात्मक पूजा केली जाते. त्याला नागाने भूमीची सुफलन क्षमता जागवून धनधान्यांची समृध्दी आणावी आणि पिके फस्त करणाऱ्या उंदरांचे भक्षण करून पिकांचे रक्षण करावे अशी भावना असते. नागपूजा ही पृथ्वीच्या सुफलीकरणाशी निगडीत असल्याची बाब आपल्या लोकपरंपरांतून स्पष्ट होते.

रगाडो नदीच्या किनाऱ्यावरती गोवा कदंब राज्यकर्त्यांच्या काळातले काळ्या दगडातले महादेवाचे जे ऐतिहासिक मंदिर उभे आहे, त्यात नागप्रतिमांचे दर्शन भारतीय सांस्कृतिक वारश्‍याची प्रचिती आणून देते. भगवान शिवाच्या मस्तकी आणि अंगावरती नाग साप दाखवलेला असून, अंत्रूज महालात त्याची उपासना भाविक पूर्वापार नागेश म्हणून करत आलेले आहे. नागाच्या प्रतिमांनी अलंकृत शिवलिंगाच्या पूजनाला येथील विविध जातीजमातींत विखुरलेल्या लोकमानसाने महत्त्वाचे स्थान बहाल केलेले आहे. गोव्यात आणि परिसरातल्या महाराष्ट्र आणि

कर्नाटकातल्या बऱ्याच सीमेवरच्या गावांत ब्राह्मणी मायेची जी देवस्थाने आहेत, त्यात ही देवी कधी आपल्या हाती नाग किंवा नागाच्या सान्निध्यात पूजलेली पहायला मिळते. कर्नाटक राज्यातल्या भीमगड अभयारण्याच्या कक्षेत येणाऱ्या गवाळी गावातल्या ‘तीर्थांची न्हंय’ या म्हादईच्या एका उपनदीचा उगम होतो तेथेच ब्राह्मणी मायेच्या पाषाणी मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातल्या दोडामार्ग, चंदगड तालुक्यातल्या बऱ्याच गावातल्या देवरायांत सर्पधारी किंवा सर्पाच्या सान्निध्यातल्या ब्राह्मणी देवीच्या पाषाणी मूर्तीच्या पूजकाला प्राधान्य दिलेले आहे.

गोव्यातील मूर्तिशास्त्रातील नाग
International Day of Sign Languages: खुणांची भाषा समजून घ्या

गोव्यातल्या पोर्तुगीज पूर्वकाळातल्या बऱ्याच मंदिरांत असलेल्या उमासहित महेश, गणपती आणि अन्य देवदेवतांच्या मूर्तीवरती सर्पकुंडले, सर्पयज्ञोपवित, सर्पवलये, सर्पमेखला, सर्पांचे केशबंधन, सर्पाचा पाश, हातात घेतलेले साप, त्रिशुळावर गुंडाळलेले साप, मूर्तीतील प्रभावळीच्या टोकांवरती केलेल्या कोरीव कामातून नागांचे दर्शन होत असते. एकेकाळी गोवा आणि कोकणपट्टीतल्या मंदिरात प्रचलित असलेल्या काविकलेत्या रंगकामात नागप्रतिमांचा कल्पकेतनं वापर केला होता. सत्तरी तालुक्यातल्या रावण गावातल्या महादेव मंदिरातल्या लिंगावरती बत्तीस नागांच्या प्रतिमाशिल्पांचे विलोभनीय दर्शन घडते आणि या साऱ्या परंपरेतून गोव्यातल्या मूर्तिशास्‍त्रातल्या नागसंकल्पनेचे महत्त्व अधोरेखित झालेले पाहायला मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com