हे कृतघ्न मानवा..!

हे मानवा, विचारवंता; आजच्या घडीला तू हतबल झालेला दिसतोयस. सुक्ष्म आणि अदृश्‍य रोगाशी मुकाबला करताना तू थकलेला आहेस.
हे कृतघ्न मानवा..!
Goa NatureDainik Gomantak

मधू य. ना. गावकर

हे मानवा, विचारवंता; आजच्या घडीला तू हतबल झालेला दिसतोयस. सुक्ष्म आणि अदृश्‍य रोगाशी मुकाबला करताना तू थकलेला आहेस. सुरवातीला आपली बुद्धी तू चांगल्या कामासाठी वापरत होतास. पण, हळूहळू तुझी बुद्धी भ्रष्ट होत गेली आणि तुम्ही एकमेकांना ओरबाडण्यास सुरवात केली. पुढे पशू, पक्ष्यांना आणि फळझाडांना ओरबाडू लागलात.

मला, तुमच्या पालकनकर्त्या निसर्गालाच ओरबाडू लागला आहेस. स्वतःच्या करमणुकीसाठी पशू-पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंडलं, आपलं घर उभारण्यासाठी झाडांची कत्तल केली, जणू काय तो आपला छंदच झाला.

विकासाच्या नावाखाली वातावरणात प्रदूषण, नदी जलप्रदुषण करत आलास, जमिनीची वारेमाप खुदाई करून निसर्गावर अत्याचार करू लागलास. मग डोळे वटारल्याशिवाय मलाही आज पर्यायच उरलेला नाही.

मानवा, निसर्गातील वनस्पतींपासून तू औषधे बनविलीस, आपल्यासाठी घरे, बंगले, सदनिका बांधल्या. पण तुला उपयोग पडणाऱ्या वनस्पती तुझ्यापूर्वी जन्मास आल्या होत्या. चित्त्याला जोरात पळताना तू पाहिलंस आणि मोटारगाडी बनवलीस, शार्क माशाला समुद्रात पोहताना पाहिलंस आणि जहाज बनवलं, गरूडाला आकाशात भरारी घेताना पाहून विमान तयार केलेस.

आधूनिक निर्मिती तू केली असलीस तरी मूळ कल्पना माझी- निसर्गाचीच आहे. हे स्वार्थी मानवा, तरीसुद्धा मी तुझं कौतुकच केले. तू जलऊर्जेचा आणि पवनऊर्जेचा शोध लावलास, तेव्हा तुझा मला अभिमान वाटला. पण पुढे विनाशकाले विपरीत बद्धीने तुझा प्रवास सुरू झाला.

अरे अभाग्या, पूर्वी तू मला देव मानत होतास पण, आता माझा दुरुपयोग कसतो आहेस. हस्तीदंतासाठी वाघाच्या चामडीसाठी, डुकराच्या मांसासाठी, सापाच्या चामडीसाठी, हरणाच्या कस्तूरीसाठी, देवमाशाच्या लाळेसाठी, गाईगुरांच्या गोड मांसासाठी, मुक्या प्राण्यांची हत्या करीत आलास.

बांधकासाठी नदीतील वाळू उपसा, डोंगर फोडून पाषाणी खडी आणि लाल दगड अशाने नदीपात्र, शेती, ओहळ, तलाव बुजवलेस. झाडे तोडायची तुला सवयच झालेली आहे. त्यात कारखान्यांमुळे हवामान, जलस्रोत, कृषिक्षेत्र, डोंगर, दऱ्या समुद्र यांना विस्कळीत करून टाकलेस. शेतीचे पीक लवकर येण्यासाठी रासायनिक खतांचा भडिमार केलास.

अशाने तुझ्याच भूमीमातेची मृदा बिघडत आहे, हे तुझ्या लक्षात येत नाही. कधी कधी तुला वठणीवर आणण्यासाठी वादळे, त्सुनामी, पुर, महामारी, भुकंप अशी अस्त्रे तुझ्यावर फेकावी लागतात.

सगळ्या जैवविविधतेला प्रथम जन्मास घालून शेवटी माझ्या लाडाचे अपत्य म्हणून तुला जन्मास घातले. हुशार, समजुतदार म्हणून तुला लाडाने वाढवलं. पण तू बेफिकरीने माझ्या इतर लेकरांचे हाल करतोस, प्रगती, विकास, उत्कर्ष याला माझा कधीच विरोध नव्हता. पण जेव्हा तू स्वार्थाच्या नावाखाली तुझी सदसद्‍व बुध्दी हरवून बसलास.

तुला दुष्काळाचे धक्के देऊन मी सावध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तेव्हा तु क्षमा याचना करून शरण आलास. पण माझा क्रोध शमतात येरे माझ्या मागल्या, अशी तुझी वृत्ती बनलेली आहे.

आज तू कोरोना महामारीच्या भीतीने वावरत आहेस. जरा दुरवर बघ, तुला एकट्यालाच घरी बसवल्यावर माझ्या इतर लेकरांचं जगणं किती सुसह्य झालेय. वन्यजीव तर बिनधास्तपणे रानावनात मुक्तपणे वावताहेत. झाडे आनंदाने डोलू लागलीयत, पाण्याचे डोह निर्मळ वाहू लागले, हवा शुद्ध झाली, याचा उपभोग आज तूच घेत आहेस.

माझं हे क्षमाशील अंतःकरण तुला पटवून देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. कोरोनाचे महाभंयकर संकट देखील काही दिवसात आटोपेल. पण यानंतर भविष्यात वाटचाल करताना तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. तुला दिलेल्या वरदानाचा स्वार्थासाठी तू गैरवापर करू नकोस.

हे मानवा, मी- निसर्ग- तुझा एकट्याचा नाही, तर सर्व सजीवांचा पालनकर्ता, रक्षणकर्ता आहे. तुला या पृथ्वीवर भविष्य घडवायचे असेल तर आपल्या सर्व मुक्या भावंडाना सांभाळून, जपून पुढील वाटचाल कर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com