nature

nature

Dainik Gomantak

निसर्गच आमचा जीवरक्षक

हेमा नायक

श्रावण महिन्याचा महिमा सांगणारा हा पानोपानी बहरलेला निसर्ग. फुलापेक्षा पानांना जास्त बहर. आणि या बहुतेक पानांचा उपयोग या महिन्यात होतोच होतो. केळीची पाने, दूर्वा, करबिल, बेल, जागोजागी उगवलेली पत्री. भरगच्च फुलांनी उभा असलेल्या चाफ्याच्या झाडाला आज एक देखील फुल नाही, पण पानापानांनी तो बहरलेला आहे. सगळी झाडे हिरवीगार दिसतात. हिरव्या पालेभाज्या विपुल प्रमाणात याच दिवसात मिळतात.

श्रावण महिना म्हणजे सण उत्सवांचा माहोल. येणारा प्रत्येक दिवस मंगलमयी वातावरणात उगवतो. परवाचीच गोष्ट. नागपंचमी. बहुतेकांच्या घरी या दिवशी नाग पुजला जातो. नागाची पुजा म्हणजे लहानपणी मला आश्र्चर्यच वाटायचे. आमच्या घरी नव्हती आणि इथेही ती प्रथा नाही. पण दरवर्षी येणारी नागपंचमी माझी आठवण जागवतेच. मडगावी आमच्या शेजारच्या घरी नाग पुजला जायचा. सकाळी आई म्हणायची, आज अम्माकडे जा. जाताना तिथे ठेवलेले ते वाटीभर दूध आणि मूठभर लाह्यांनी. नाग पुजलेला असेल त्या पाटाजवळ ठेव. डोळे झाकून नमस्कार कर आणि म्हण दूध पी, लाह्या खा आणि माझ्या भावांना राख. सांगितल्याप्रमाणे आम्ही करीत होतो. पण त्या पाटावरची ती नागाची मूर्ती आकर्षित वाटायची. नागाला वंदन करायचो आणि आपल्या भावाची रक्षा करण्यासाठी प्रार्थना करायचो. घरी आल्यावर नागावर आधारीत सुंदर कथा आई सांगायची. कथा एका शेतकरी कुटुंबाची. लग्न करून दुसऱ्या गावी गेलेली ती बहीण. तिच्या भावाकडून एका नागिणीच्या पिल्लांना मारले जाते शेत नांगरताना आणि ती डंख घेऊन त्याचा चावा घेते आणि सरळ त्याच्या बहिणीकडे येते त्यांना चावायला. नागपंचमीचा दिवस. 

चवताळलेली ती नागीण फुत्कारीत तिच्या घरी आली, तर ती बहीण पाटावर नागाची प्रतिमा करून तिला पुजत होती आणि आपल्या भावाची रक्षा करण्यासाठी विनवून प्रार्थना करीत होती. तिचे डोळे मिटलेले होते. तिच्याने राहवेना. ती आल्या वाटेने परत फिरली आणि सरळ तिच्या भावाकडे जाऊन आपले विष परत त्यांच्यात घालून त्याला जिवंत केला. कथा ती बरीच रंगून सांगायची आणि आम्हाला आवडायची. त्या कथेचा लहान वयात बराच प्रभाव पडला आणि अशा जीवांना देखील माया प्रेम असते हे पटून आले.

ज्या परिसरात आता आम्ही राहतो, ती जागा शांत आणि माणसांची जास्त वर्दळ नसलेली तसेच झाडे वृक्ष यांची दाटी असलेली. रम्य असा परिसर आणि सृजनाची पोषण करणारा. श्रावणात तो जास्त आकर्षक वाटतो. आभाळातून कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याने न्हाऊन लख्ख झालेली धर्तरी. मातीवरील केर कचरा वाहून गेल्याने तांबडीगुंज झालेली माती. प्रत्येक झाडावर उगवून आलेली नवी पालवी आणि ताजी टवटवीत हिरवीगार पाने. मातीतून उगवून येणारी नवी रोपटी. नागपंचमीला हळदीच्या पानांवर पातोळ्या करण्याची प्रथा आहे आणि अचानक दृष्टीस पडली अंगणात उगवून आलेली हळदीची पाने. दरवर्षी चतुर्थीला गणपती विसर्जना वेळी गौर चविताना जे हळदीचे मूळ असते, ते ज्या जागी आपण ठेवतो त्या जागेच्या मातीतून वर आलेली ही कितीतरी हळदीची पाने. छानपैकी पातोळ्या झाल्या आणि मग या निसर्गात एक ओली ओली नजर टाकली आणि सभोवतालचा रम्य परिसर अधिकाधिक सुखमय वाटू लागला.

श्रावण महिन्याचा महिमा सांगणारा हा पानोपानी बहरलेला निसर्ग. फुलापेक्षा पानांना जास्त बहर. आणि या बहुतेक पानांचा उपयोग या महिन्यात होतोच होतो. केळीची पाने, दूर्वा, करबिल, बेल, जागोजागी उगवलेली पत्री. भरगच्च फुलांनी उभा असलेल्या चाफ्याच्या झाडाला आज एक देखील फुल नाही, पण पानापानांनी तो बहरलेला आहे. सगळी झाडे हिरवीगार दिसतात. हिरव्या पालेभाज्या विपुल प्रमाणात याच दिवसात मिळतात. कुड्डुकेची भाजी, ताळखिळा, मुळा सारख्या भाज्यांनी लोकांचे मळे फुलले आहेत. जणू असे वाटते ह्या हिरव्या भाज्या म्हणजे कोरोना सारख्य्या रोगावर मात करायला लागणारी आपल्यांतली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सृष्टीने आपल्याला हे वरदान तर नाही ना दिले असेल?

एरव्ही म्हणून आपण सर्वजण तंदुरुस्त कोठे आहोत? प्रत्येकाला कसली ना कसली तरी पीडा असतेच. जोपर्यंत त्याचे निदान होत नाही, तोपर्यंत समजतो आपण ठीक आहोत. ज्या मातीत आपण जन्म घेतला, ती मातीच आपलं पोषण करते, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. ती आपल्याला राहायला जागा देते, खायला अन्न देते आणि त्याच बरोबर आपल्या रोगांवर मात करण्यासाठी आणि आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधी वनस्पती पण निर्माण करते. बेल वृक्षाचे गुणधर्म हल्ली वाचनात आले आणि आश्चर्यच वाटले. गणेशचतुर्थीला गणपतीला बेलाची पानं अर्पण करतात.

या संपूर्ण वृक्षात म्हणे औषधी गुणधर्म आहेत. वात, पित्त, कफ सारखे दोष बेल नाहीसे करते. बेलफळाचा औषधी उपयोग होतो. आवेमुळे पोट दुखत असल्यास बेलफळाचा मुरंबा खातात. बेलाच्या पानाचे पाणी प्यायल्यास तरतरी येते. मेंदूज्वर, तापातील वाताने रोगी बडबडत असेल, तर हे पाणी पिण्यास देतात. त्वचा रोगावरही बेल उपयोगी आहे. पोटात जंत झाल्यास बेलाच्या पानांचा रस घेतात. उलटी थांबण्यासाठी ही बेलफळाचा काढा देतात. हे सगळे आपल्याच मातीत उगवलेले आरोग्यदायी धन आहे आणि आपल्याला त्याची जाणीवच नव्हती.

श्रावण महिन्याच्या ह्या मंगलमय वातावरणात आपण निसर्गाची पुजा करूया गंजन, पुनर्नवा, तुळस अशा विविध पानांचे सेवन करूया, हिरव्या पालेभाज्या खावुया, केळींच्या निर्मळ पानावर जेवुया आणि श्रावणातच कोरोनापासून मुक्त होऊया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com