कोरोनाचा नवा प्रकार आला समोर ; घाबरू नका, पण काळजी घ्या!

डॉ. नानासाहेब थोरात
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

लंडनमध्ये सध्या असणाऱ्या कोविड रुग्णांमध्ये ६० टक्के रुग्ण हे नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे झालेल्या संसर्गाचे आहेत. इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स या भागामध्येसुद्धा नवीन प्रकारच्या विषाणूचे रुग्ण वाढले असून, सरकारने पुन्हा एकदा, लॉकडाउन केले आहे. 
 

इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) सापडला... घाबरू नका पण काळजी घ्या. ‘कोविड -१९’ या विषाणूचा एक नवीन प्रकार काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये सापडला असून, लंडन मध्ये नवीन कोविड रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लंडनमध्ये सध्या असणाऱ्या कोविड रुग्णांमध्ये ६० टक्के रुग्ण हे नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे झालेल्या संसर्गाचे आहेत. इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स या भागामध्येसुद्धा नवीन प्रकारच्या विषाणूचे रुग्ण वाढले असून, सरकारने पुन्हा एकदा, लॉकडाउन केले आहे. 
 

काय आहे हा नवीन बदल?

नोव्हेंबर २०१९ पासून आतापर्यंत कोरोनाच्या विषाणूचे सात वेगवेगळे प्रकार आढळून आले आहेत. शास्त्रीय भाषेत याचे  नामकरण ‘व्हीयूआय २०२०/०१’ असे करण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये सापडलेला आताचा विषाणू मात्र वेगाने पसरत असून आहे.

 

सप्टेंबरमध्येच या बदललेल्या विषाणूचा पहिला रुग्ण 

इंग्लंडमधील हॉस्पिटलमध्ये सापडला होता. त्यानंतर रुग्णाच्या शरीरातून तो वेगळा करून त्याचा जनुकीय आराखडा केल्यानंतर बदलाचे स्वरुप स्पष्ट झाले. नोव्हेंबर महिन्यापासून ब्रिटनमध्ये अचानक कोरोना रुग्ण वाढल्यानंतर वाढलेले रुग्ण हे नवीन बदललेल्या कोरोना विषाणूचे असल्याचे दिसून आले. तसेच हा बदललेला विषाणू हा पूर्वीपेक्षा वेगाने पसरत आहे.  बदललेल्या कोरोना विषाणूमध्ये मूळ विषाणूपेक्षा २३ प्रकारचे नवीन बदल दिसून आले आहेत. हे बदल मुखत्वेकरून कोरोना व्हायरसच्या बाह्य आवरणातील प्रथिनांमध्ये दिसून आले आहेत.
संपूर्ण ब्रिटनमध्ये हा कोरोना पसरला असून, लंडन आणि दक्षिण आणि पूर्व इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इंग्लंडच्या बाहेर नेदरलॅंड, डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका, इटली आणि ऑस्ट्रेलियामध्येही हा विषाणू आढळून आला आहे. 

कसे समजले?

इंग्लंडमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्णपणे लॉकडाउन होते. तरीही लंडन आणि केंट या दोन ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांच्यामध्ये अचानक वाढ होत होती. याची काय करणे आहेत, हे शोधताना हा वेगवान प्रसार बदललेल्या विषाणूमुळे होत असल्याचे आढळले. इंग्लंडमध्ये ऑक्टोबरपर्यंत १०० कोरोना रुग्ण फक्त ८० नवीन रुग्ण तयार करत होते. याचाच अर्थ कोरोना पसरण्याचे प्रमाण कमी-कमी होत होते. नोव्हेंबरमध्ये मात्र हे प्रमाण अचानक वाढून १०० रुग्ण नवीन १२०-१३० रुग्ण तयार करू लागले. यावरून विषाणू वेगाने पसरतोय हे आढळून आले.

 
मृत्युदरात बदल नाही

बदललेला विषाणू वेगाने पसरत असला तरी, यामुळे होणाऱ्या मृत्युदरात बदल झालेला नाही. सध्या अनेक देशांतील सरकारी आरोग्य यंत्रणा या बदलामुळे नक्की काय फरक पडेल याचा शोध घेत आहेत. लंडनमधील इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये या नवीन प्रकारच्या विषाणूवर संशोधन सुरु केले आहे. बदललेल्या स्वरूपामुळे सध्या सुरु असणाऱ्या लस निर्मिती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल केला जाणार नसून, आता विकसित होत असलेल्या लसी या नवीन बदललेल्या विषाणूविरुद्धही उपयोगी ठरतील असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जायची गरज नाही. या बदललेल्या विषाणूचा प्रसार रोखायचा असेल तर, मास्क वापरणे बंधनकारक आहे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. 

(लेखक ऑक्सफर्ड विद्यापीठात मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये कार्यरत आहेत)

संबंधित बातम्या