सहा वर्षांत रेडिओची शंभरी भरणार म्हणायची!

सहा वर्षांत रेडिओची शंभरी भरणार म्हणायची!
In the next six years radio will be a hundred years old

रेडिओ नावाच्या एका उपकरणाने, ‘मेरा भारत महान’मधील वास्तव्याची चौऱ्याण्णव वर्षे हल्लीच पूर्ण केली. म्हणजे पुढील अवघ्या सहा वर्षांत रेडिओची शंभरी भरणार म्हणायची! तसे पाहू जाता घराघरांत ‘चित्रवाणी’ संचाचा खोका प्रवेशिला आणि रेडिओ अडगळीच्या वस्तूतलाच एक झाला. म्हणजे मोबाईलच्या आगमनाने ‘काळाराक्षस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोनचे झाले, तसेच रेडिओचेही झाले. पण, एक मात्र खरे. कोणे एकेकाळी घरात रेडिओ असणे हे श्रीमंतीचे/सुबत्तेचे लक्षण मानले जायचे.

म्हणजे एखाद्या घरातल्या मुलाशी लग्न जुळवण्याआधी मुलाचा एक गुण म्हणून मुलीला ऐकविले जायचे, ‘अगं, त्यांच्या घरी रेडिओ आहे. मज्जाच मज्जा आहे बाई एका मुलीची!’ याचप्रमाणे आपल्या श्रीमंत नातेवाईकाचा गुणगौरव करताना त्यांच्या घरातल्या रेडिओ संचाचा उल्लेख मानाने करण्याची पद्धतच होती. रेडिओसोबत फोनदेखील असेल, तर मग काय विचारायलाच नको. गावातल्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात रेडिओ आणि फोनच्या मालकाला पहिल्या रांगेतली खुर्ची मिळायचीच!

रेडिओवर सकाळी सकाळी जाग आल्यापासून ते रात्री डोळे जडावू लागून जांभयामागून जांभया येऊ लागेपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम कानांच्या पडद्यावर आघात करून जायचे. किंबहुना रेडिओचे बटन दाबल्याबरोबर एक विशिष्ट प्रकारची धून कानावर पडली की, सकाळ झाल्याचे जाणवायचे. जुन्या काळातल्या कोंबड्याच्या आरवण्याची जागा रेडिओवरच्या धुनेने घेतली, एवढाच याचा अर्थ. रेडिओ सिलोन नावाच्या एका स्टेशनाचे तर भारतीयांच्या हृदयाचा आणि डोक्याचा ठावच घेतला होता. रेडिओवरची गाणी ऐकायला मिळणे ही परमभाग्याची गोष्ट समजली जायची.

त्यामुळे घरात रेडिओ आणण्याइतकी सुबत्ता आपल्याकडे कधी येणार, या विचाराने अनेकजण हैराण व्हायचे. अर्थात रेडिओवरची गाणी कानात साठवण्याचे अन्य मार्गही शोधलेले असायचे. गावातल्या रेस्टॉरंटचा अधार वाटायचा. एक कप चहाची ऑर्डर देताना कप टेबलावर आदळायला थोडा उशीर झाला तरी चालेल, असे वेटरला ऐकवणारेही असायचे. इराणी हॉटेलात तर एखादे गिऱ्हाईक केवळ गाणी ऐकण्यासाठी खुर्ची अडवून बसले आहे, हे कळताच गल्ल्यावरचा मालक आधी डोक्यावरचा पंखा आणि नंतर रेडिओसुद्धा बंद करायला मागेपुढे पाहायचा नाही. अर्थात ‘समझदार को इशारा काफी है’, असे स्वतःशी म्हणत गिऱ्हाईक हॉटेलातली जागा रिकामी करून हॉटेलाबाहेर पायात रग येईपर्यंत उभा राहायचा!

‘बिनाका गीतमाला’ नावाचा एक गाण्याचा कार्यक्रम दर बुधवारी रेडिओवरून ऐकवला जायचा आणि रात्रीच्या आठ ते नऊच्या काळात गाणी ऐकण्याव्यतिरिक्त दुसरे काही करायला घेणे म्हणजे ‘पाप’ समजले जायचे. या ‘पापा’चा हिशोब स्वर्गात चित्रगुप्त करणार, असे समजणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती...यावेळी घरात पाहुण्यांचे येणे म्हणजे घातवेळच मानली जायची!


रेडिओेचे ट्रॅन्झिस्टरमध्ये रुपांतर होण्याआधी म्हणजे व्हॉल्ववाल्या रेडिओच्या बाबतीत आपल्याला हवे ते स्टेशन लागण्यासाठी रेडिओच्या गुंड्या फिरवत बसण्याचे कष्ट करावे लागत आणि एका क्षणी नेमके स्टेशन लागले, तर तो क्षण परमोच्च आनंदाचा समजला जायचा. व्हॉल्ववाला रिडिओ बेसावधक्षणी बंद करायचा राहिला, तर त्याला आग लागायची आणि ती घरभर पसरायला वेळ लागत नसे. घराला कडी-कुलूप लावून बाहेर पडत्यावेळी रेडिओ बंद करायचा राहिला. परिणामी, त्याला आग लागून घर बेचिराख होण्याच्या घाईत आले, या अक्षम्य अपराधाबद्दल माझ्या एका मित्राला त्याच्या मामीने घराबाहेर काढल्याची घटना मी त्याच्याच तोंडून ऐकली होती!

सुटसुटीत आकाराचा ट्रॅन्झिस्टर आला आणि बेढब आकाराच्या रेडिओला गचांडी मिळाली...होय! एक सांगायचे राहिलेच. गाण्यांएवढंच लोकप्रिय असा दुसरा एक कार्यक्रम कानात साठवण्यासाठी मंडळी जिवाचे रान करायचा. तो कार्यक्रम म्हणजे क्रिकेट सामन्यांचे धावते समालोचन. ते ऐकताना विविध प्रकारच्या आवाजांचे इतके म्हणून अडथळे याचचे की, आपल्या आवडत्या फलंदाजाने चौकार/षटकार फटकावला, का तो त्रिफळाचित झाला ते समजून घ्यायला वेळ लागायचा आणि ते समजल्यावरच आनंदोत्सव वा दुखवटा जाहीररित्या व्यक्त होत असे!

मुंबई ‘ब’ नावाच्या स्टेशनवर रात्रीच्यावेळी श्रृतिका सादर केल्या जात. त्यातल्या नायिका इतक्या म्हणून हुमसाहमशी रडत की, मनाच्या अस्वस्थेमुळे झोप उडायची! गडगडाटी वा सातमजली हास्य मात्र रेडिओवर दुर्मिळच असायचे...पण, रेडिओचे एकमात्र आहे. आजच्या याक्षणीदेखील टीव्ही पाहण्याऱ्या रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या अधिक असावी. उगाच नाही पंतप्रधान मोदींना आली, ‘मन की बात’ ऐकवण्यासाठी रेडिओचीच मदत 
घेतात!!

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com