नको अंत हा असा देवा.....

किर्ती काशिनाथ गावडे
शनिवार, 16 मे 2020

लोकडाऊनचे नियम, अटी, त्याच्यात लागू केलेले कायदे खूप लोक अगदी मनापासून आणि शिस्तीने पाळतात, पण काही आपले तेच खरे करणारे लोक कुणाचंच ऐकत नाहीत.

 श्रुष्टीचा अंत होणार का आता? कोण जगणार, कोण मरणार कुणालाही काहीही माहिती नाही. "आज आहे उद्या नाही." हे अनेकवेळा ऐकले होते आम्ही, पण हल्ली हे वाक्य प्रत्यक्षात घड़ताना दिसत आहे, ह्या कोरोना नावाच्या जंतुमुळे. आज असलेला माणूस उद्या नसू शकतो हे या कोरोनाने प्रत्यक्ष करून दाखविले आहे.माणसाला कधीही काहीही होऊन तो मृत्युमुखी पडू शकतो हे तर आम्हा सर्वांना माहीतच आहे, पण या काही दिवसात होणारा मनुष्य-अंत कधी न ऐकलेला, कधी न घड़लेला असा आहे. दिवसेंदिवस जगभर हजारों लोक ह्या कोरोना रोगाचे बळी होत आहेत. याचा जन्म चीनमध्ये झाला खरा, पण त्याचा प्रसार आज पूर्ण जगभर झालेला आम्हाला दिसत आहे. चीनचे तर खूप कमी लोक या कोरोनाच्या जाळ्यात अडकले, पण अमेरिका, इराण, इटली इत्यादी देशांमध्ये या कोरोनाने लोकांचे जगणे हैराण करून टाकले आहे. मी फक्त या तीन देशांची नावे घेतली याचा अर्थ असा होत नाही की बाकीचे देश सुरक्षित आहेत. हळूहळू बाकीच्या देशांची अवस्थासुद्धा या तीन देशांसारखी होण्याची शक्यता आहे, जर ह्या कोरोनाला आपण हलक्यावर घेतले तर. सूर्याची किरणे जितक्या वेगात आपल्यापर्यंत पहोचतात ना, त्याच्याही कितपत जास्त वेगाने हा कोरोना जगभर पसरत आहे. कोरोनाने तिसऱ्या विश्वयुद्धाची जागा घेतली आहे असे वाटते, फक्त फरक इतकाच की विश्वयुद्धात माणूस रणभूमीत एकमेकांवर हल्ला करून मृत्युमुखी जातो आणि कोरोना प्रभावात हल्ला न करताही समोरच्याचे प्राण धोक्यात घालता येतात. माझ्या भारतात म्हणायला गेलो तर अजूनपर्यंत जनसंख्येच्या तुलनेत खूप कमी बळी गेले आहेत असे दिसून येते. पण येणाऱ्या काळात काय होईल हे काही सांगता येत नाही. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी खूप विचार-विमर्ष करून जनहितदायक असे निर्णय घेत आहेत, जसे की संपूर्ण देशात लागू केलेला लोकडाऊन. या लोकडाऊनमुळे कित्येक लोक कोरोना-बळी होण्यापासून सुरक्षित राहिले आहेत असे म्हणण्यात काहीच हरकत नाही. पण काही अतिहुशार लोकांमुळे कोरोनाचा प्रसार भारतातही होत आहे. कमी का असेना भीती ही आहेच. लोकडाऊनचे नियम, अटी, त्याच्यात लागू केलेले कायदे खूप लोक अगदी मनापासून आणि शिस्तीने पाळतात, पण काही आपले तेच खरे करणारे लोक कुणाचंच ऐकत नाहीत. स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायला सांगितली आहे सगळ्यांना, पण काहीजण आतंकवादी, देशद्रोह्यांसारखे वागून स्वतःची काळजी घेणे तर सोडाच दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालत आहेत. लोकडाऊन पाळा हे खूप आवर्जून सांगितले आहे भारतीय जनतेला प्रधानमंत्रींनी. हो ना! तरीही आम्ही पाहत आहोत की काही लोक उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यासारखे इकडे-तिकडे हिंडत आहेत. बिचारे पोलिस आपल्या कुटुंबासोबत घरी राहायच्या वेळी रस्त्यावर राहून सगळ्यांना घरी थांबण्याची विनंती करीत आहेत, निदान त्यांचा तरी विचार करून आणि त्यांची मनःस्थिती समजून आम्ही घरी राहायला हवं, हो ना! पण कुठं-काय? आम्हाला तर घरी राहायला सांगून आमचं स्वातंत्र्य हिसकावून घेतल्यासारखं वाटत आहे, आमचं खेळणं-फिरणं या पोलिसांनीच बंद करून टाकलं आहे असे भलते-सलते विचार मनात आणून आम्ही त्या देवदूतांनाच दोष देण्यात तत्पर आहोत. पोलिसांनी मारहाण केली म्हणजे ते वाईट असा विचार या आपत्काळात करणे खूप चुकीचं ठरेल, कारण ते स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आम्हा सर्वांचा जीव वाचवा, आम्ही सुरक्षित राहिलो पाहिजे म्हणून धडपडत आहेत. डॉक्टर आणि नर्स यांची हिंमत आणि जनकल्याणकारी वृत्तीबद्धल बोलावं तितकं कमी पडेल. ते अशा लोकांचे उपचार आणि तपासणी करीत आहेत ज्यांच्याजवळ जाण्यातसुद्धा जिवाला धोका आहे. पोलिस, डॉक्टर, नर्स यांना वाईट म्हणून दोषी ठरविणे हा निव्वळ मूर्खपणा आहे, जो काही लोक त्यांच्यावर दगड मारून सिध्द करीत आहेत. भारतात प्रधानमंत्र्यांनी इतके कठोर कायदे आणि जीवतोड प्रयत्न करूनसुद्धा कोरोनाचा पसर वाढताना आम्हाला दिसत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली इत्यादी भागांमध्ये कोरोनाचे खूप रुग्ण सापडत आहेत, याचं कारण म्हणजे लोकडाऊन केल्यानंतरही या भागातील लोकांचे बेजबाबदारपणाने वागणे. हे लोक सामाजिक अंतर ठेवण्याऐवजी तो तोडण्यात स्वतःचा मान समजत आहेत आणि अशा लोकांना समजावणं खूप कठीण आहे. भारतात अशा पण काही घटना समोर आल्या आहेत ज्यामुळे हे स्पष्ट होत आहे की, थोड्या लोकांना अजूनही कोरोना म्हणजे एक क्षुल्लक बाब वाटत आहे. या लॉकडाऊनच्या काळात आवश्यक वस्तू घरी पोहचविताना कोरोनादेखील काही लोकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात आला आहे. असंच जर चालत राहिलं तर जसे डायनासोर या पृथ्वीवरून नष्ट झाले होते ना तसेच मनुष्यजीवनदेखील या पृथ्वीवर एक प्रश्नचिन्ह बनून राहील हे मात्र नक्की. "शीर सलामत तो पगडी पचास", ह्या म्हणीचा अर्थ समजून घेणे खूप गरजेचे आहे आणि या दुष्काळात आपण आपापल्या घरी राहूनच आपलं 'शीर सलामत ' म्हणजेच स्वतःच्या जीवाला सुखरूप आणि स्वस्थ ठेवू शकतो. या इतक्या सगळ्या वाईट घटना घडत असताना एका नाण्याची दुसरी बाजू ही खूप आनंददायक आणि शिकवण घेण्यासारखी आहे. ती म्हणजे असे काही लोक जे स्वतःची तर काळजी घेतच आहेत त्याचबरोबर ज्यांना लॉकडाऊनमुळे खाण्यापिण्याचे वांदे होत आहेत अशा लोकांना जेवण आणि घरी आवश्यक असणाऱ्या वस्तू देत आहेत. कित्तेकजण आर्थिक मदतसुद्धा करीत आहेत ज्याने कोरोना रुग्णांचे उपचार होत आहेत. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी आणि पोलिसांसारखेच हे परोपकारी लोकसुद्धा देवदूतच आहेत. शेवटी जाता जाता इतकचं सांगेन की "नको हा अंत असा देवा." असे म्हणण्यापेक्षा जे देवाच्या रूपात सगळ्यांना मदत करून त्यांची काळजी घेत आहेत त्यांचा आदर करा. डॉक्टर आणि पोलिसांना शिव्या देण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या डोक्यावर घेतलेल्या भल्या मोठ्या जवाबदारीचा आणि त्यांच्यावर असलेल्या संकटाचा भान ठेवा. तुमच्याकडे होईल तितकी मदत त्यांना तसेच गरजू लोकांना करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरीच थांबा,स्वतःची नि घरच्यांची काळजी घ्या, स्वस्थ राहा मस्त राहा आणि लवकरात लवकर हे संकट टळून जाऊदे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करा.....

 

संबंधित बातम्या