देवभूमी 'गोमंतक’ची बदनामी नको!

देवभूमी 'गोमंतक’ची बदनामी नको!
No one should be given a chance to disrepute the sacred land of Gomantak

गोवा ही देवदैवतांची भूमी आहे. गोवा म्हणजे फक्त विलोभनीय समुद्र किनाऱ्यांची, बिनधास्त मौजमजेची भूमी नव्हे. येथे संस्काराची, संस्कृतीची खाण आहे. ही तपोभूमी आहे. या भूमीचा इतिहास मोठा आहे. येथील मंदिरातून, मठातून दिलेल्या शिकवणीतून येथे आजही संस्काराचा ठेवा जतन केला जातो. सर्व धर्मियांना गुण्यागोविंदाने वावरण्याचा मंत्र दिला जातो. अशा देवभूमीत अश्लिलतेचा धिंगाणा घालणाऱ्यांना, गोमंतभूमीची बदनामी करणाऱ्यांना वेळीच रोखले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाबरोबरच प्रत्येकाने अखंड सावध राहायला हवे.

आपला गोवा चिमुकला असला तरीसुद्धा तो काश्मिरप्रमाणे नंदनवन आहे. राज्यात कुठेही गेल्यास संस्कृती, संस्काराचे संवर्धन करणारी गोमंतकीय मंडळी भेटतात. आतिथ्यशिलता हा तर येतील प्रत्येकाचा मूळ धर्म आहे. त्यामुळे कोणत्याही जाती, धर्माचे नागरिक एकमेकांशी मनमोकळे आणि मिसळून राहात. येणाऱ्यांचे स्वागत करतात, त्यांना योग्य सेवा-सुविधा पुरवतात. पण याच गुणांचा काही दांभिक, संस्कृतीवर घाला घालणारे लोक गैरफायदा घेतात आणि उघडे नागडे फिरतात. समुद्रकिनारा असो किंवा हमरस्त्यावरूनसुद्धा उघडे नागडे, अगदीच कमी कपडे परिधान करून ते वावरतात. या प्रकाराकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे चापोली धरण परिसरातील पूनम पांडेचा प्रकार असेल किंवा समुद्र किनाऱ्यावरील मिलिंद सोमणचे नग्‍न अवस्थेतील धावणे असेल, हे प्रकार गोव्याची बदनामी करण्यासाठी पुरेसे आहेत. कारण या व्यक्ती झगमगाटात राहणाऱ्या, प्रसिद्धीत राहणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांचे असले अश्लील चाळे कसे काय चालले, त्यावेळी आपले कोणीच जागरूक नागरिक, अस्मितेचा पालन करणारे नव्हते का? तेथे कोणीच नव्हेत की असूनसुद्धा डोळेझाक केली? की आंबट शौकिनाप्रमाणे पाहत राहिले. काहीही असो पण या प्रकारामुळे आपल्या गोव्याची प्रतिमा वाईट पद्धतीने जगासमोर मांडली गेली. देश-विदेशात हा प्रकार प्रचंड गतीने पोहोचला, अशीच बदनामी सुरू राहिली तर भविष्यात गोव्याची वेगळी ओळख निर्माण होईल. ती पुसणे कठीण होईल. सरकारने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका मंत्र्यांच्या मोबाईलवरूनही एक अश्लील चित्रफीत मोबाईल हॅक करून कोणी तरी इतरत्र फिरवली. त्याचाही छडा अद्याप लागलेला नाही. इतक्यात पूनम पांडेची चित्रफीत फिरू लागली. तिचा धिंगाणा तोही चापोली धरणाजवळ चित्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे. पूनम पांडे अनेक प्रकरणात प्रसिद्ध आहे. पाच फूट सात इंच उंचीची ही अभिनेत्री, मॉडेल नेहमीच चर्चेत राहिली आहे. किंगफिशरचे कॅलेंडर असो किंवा क्रिकेट विश्व चषक २०११ च्या दरम्यान तिने केलेल्या घोषणेमुळे ती नेहमीच चर्चेत आहे. टाळेबंदीनंतर काणकोणात तिने आपल्या नवऱ्याबद्दल तिने केलेली तक्रार, तो प्रकार पाहता. तिच्यामुळे राज्याची बदनामीच झाली असून आता चापोली धरणावरील चित्रफितीमुळे त्यावर कळस झालेला आहे.

गोव्यातील कोणत्याही धरणावर जाण्यास बंदी आहे. कोणालाही फोटो काढण्यास मनाई केली जाते. पत्रकारांनाही विचारले जाते, कशासाठी, कोणत्या वर्तमानपत्राचे प्रतिनिधी आहात? अशी चौकशी केल्यानंतर नोंद करून आत सोडले जाते. तर मग असा नग्‍न धिंगाणा घालण्यासाठी फक्त पूनम व तिच्या साथीदारांना कोणी सोडले? तिचे चित्रिकरण करण्यासाठी किमान दोन-चार व्यक्ती तेथे गेल्या असतील. तर त्यावेळी तेथील अधिकारी काय करीत होते? सुरक्षारक्षक कुठे होते? पोलिस यंत्रणा कुठे होती? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही सर्व यंत्रणाच झोपी गेली होती किंवा झोपेचे सोंग घेतले होते की सर्वजण पाहात होते. संबंधितांनी केलेला हा प्रकार माफ करण्यासारखा नाही. पूनम आणि संबंधितापेक्षाही आपल्या अधिकाऱ्यांनी, तेथील कर्मचाऱ्यांनी केलेली चूकही चूकही तितकीच मोठी आहे. देशातसुद्धा अनेक पर्यटनस्थळे आहेत. समुद्र किनारेही आहेत. पण तेथे उघड्या-नागड्या पर्यटकांना प्रवेश नाही. ठिकाणी तर अल्प कपड्यातील पर्यटकांना बंदीच आहे. गोव्यात अल्प कपड्यात फिरणारे पर्यटक दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, चेन्नईत कुठेही दिसत नाहीत. तेथे गेल्यानंतर ते तेथील पद्धतीनेच कपडे घालतात. मग गोव्यातच का अर्धेच कपडे घालतात, येथे त्यांच्यावर निर्बंध नाहीत का? निर्बंध, नियमांचे पालन केले जात नाही. पर्यटक म्हणून त्यांना सवलत दिली जाते. त्यामुळेच गोव्यात येणाऱ्या अभिनेत्री, मॉडेल यांचा समजही वेगळा कसा असेल, त्यांना या भूमीत काहीही केले तरी चालते, असा गोडगैरसमज झालेला आहे. त्यामुळेच असे प्रकार घडतात. पण आता येथील जनता जागृती झाली आहे, महिलाशक्ती असे प्रकार खपवून घेणार नाही. तेव्हा सरकारने गोव्याची संस्कृती, संस्कार यांचे संवर्धन होईल, अशा नियमांची अंमलबजावणी करावी, यातच गोव्याचे हित आहे. प्रत्येक गोमंतकीयानेसुद्धा गोव्यात येणाऱ्या पर्यटकांबरोबरच इतरांनासुद्धा आपल्या संस्कृतीवर आघात करण्यास मोकळे रान ठेवू नये. त्यांचे स्वागत करताना, नियमांचेही पालन करण्यास भाग पाडले पाहिजे. तरच आपला संस्कृत गोवा अबाधित राहणार आहे.

पूनम पांडेबरोबरच अभिनेता मिलिंद सोमणही अशा नग्‍न प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहे. त्यांचाही समुद्र किनाऱ्यावरील नग्‍न फोटो व्‍हायरल झाला आहे. या दोन्ही घटना गोव्याची बदनामी करणाऱ्या आहेत. त्याबद्दल त्यांना व संबंधितांवरही कडक कारवाई करायला हवी. तरच भविष्यात होणारी गोव्याची बदनामी टळेल. असे प्रकार करणाऱ्यावर बंधने येतील. अन्यतः हे प्रकार वाढत जातील. सुसंस्कृत गोवा बदनाम होईल. याचा परिणाम राज्याच्या प्रतिमेवर होईल. राज्य शासनाने कडक कारवाई करून गोव्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, याकडेही लक्ष द्यावे. काणकोणबरोबरच गोव्यातील जनतेने या प्रकाराबद्दल निषेधच नोंदवला आहे. महिला संघटनांनीही कडक कारवाईची मागणी केली आहे. आता शासनाने फक्त घोषणा देऊन, आश्वासन देऊन चालणार नाही तर भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठीही नेमकी भूमिका स्पष्ट करावी. तसेच पूनम पांडे, सोमण यांना गोव्यात येण्यावरच बंदी घालावी. फक्त त्यांना अटक केली, ताब्यात घेतले, चौकशी सुरू आहे. अशा कृतीतून काहीही होणार नाही. तर असे प्रकार गोव्यात खपवून घेतले जाणार नाहीत, या संदर्भात ठोस निर्णय घ्यायला हवेत. अशी कृती करणे म्हणजे गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेवरच घाला घालण्यासारखे आहे. तेव्हा या प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्यावरही ठोस कारवाई करावी. अशी कृत्ये करणाऱ्यांना पाठबळ देणारेही एक प्रकारचा आपल्या संस्कृतीला बदनाम करणारा भ्रष्टाचारच करतात. त्यांना मोकाट सोडणेही चुकीचे आहे, त्यांच्यावरच पहिला लगाम घातला पाहिजे, तरच देवभूमी गोवा पूर्वीप्रमाणे सुसंस्कारी राहील, लागलेला बदनामीचा डाग पुसला जाईल. भविष्यात कोणीही अशी चित्रफीत बनवणे किंवा समुद्र किनारा किंवा रस्त्यावर विवस्त्र फिरण्याचे धाडस करणार नाहीत.

- संजय घुग्रटकर

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com