निदान गोव्याचा इतिहास नीट शिकवला तरी पुरे...

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

आणखीन दोन दिवसांनी गोवा मुक्तीची षष्ठ्यब्दीपूर्ती होणार आहे. गोवा पोर्तुगीजांच्या जाचक राजवटीतून मुक्त झाल्यास साठ वर्षे पूर्ण होणार आहेत.

आणखीन दोन दिवसांनी गोवा मुक्तीची षष्ठ्यब्दीपूर्ती होणार आहे. गोवा पोर्तुगीजांच्या जाचक राजवटीतून मुक्त झाल्यास साठ वर्षे पूर्ण होणार आहेत. पूर्वीच्या राजकीय व्यवस्थेत पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला प्रदेश म्हणजे गोवा असा समज अनेकांचा आहे. पोर्तुगीजांपूर्वी गोवा होता की नाही याविषयी अनेक मते मतांतरे आहेत. गोव्याच्या सीमा आज आहेत तेवढ्याच होत्या की गोवा त्यापेक्षा लहान मोठ्या होत्या याविषयीही अनेक मते आहेत. गोवा हा प्रदेश प्राचीन आहे याविषयी कोणाचेही दुमत नसावे. गोव्यातील काही स्थानांचा उल्लेख सह्याद्रीखंड या संस्कृत ग्रंथात आहे. यावरून गोव्याची प्राचीनता लक्षात यावी.

गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती त्यातून गोवा मुक्त झाला, असे सांगण्यात येते. खरे म्हणजे पू्र्ण गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती हे कितपत सत्य आहे हे तपासले गेले पाहिजे. गोव्याच्या निरनिराळ्या भूभागांवर अनेक राजवटींची सत्ता होती. त्यांचे कालखंड व अन्य माहिती याबाबत इतिहास अभ्यासकांतही मतभेद आहेत. इसवीसनापूर्वीचा इतिहास उपलब्ध नाही. परंतु सनपूर्व दुसऱ्या व तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्याचे अधिपत्य होते. पहिल्या शतकात सातवाहन किंवा आंध्रभृत्य यांचा अंमल होता. दुसऱ्या शतकात अमीरांची राजवट होती. चौथ्या शतकात वनवासी लोकांची सत्ता होती. सहाव्या शतकाच्या मध्यास ते ७५३ पर्यंत चालुक्यांचे राज्य होते. दहाव्या शतकाअखेरीस राष्ट्रकुटांची सत्ता होती. त्यानंतर विजयनगर साम्राज्य, कदंबांची सत्ता, आदिलशाही आणि १५१० ते १९६१ पर्यंत पोर्तुगीजांची राजवट होती.

हे सांगण्याचे कारण म्हणजे आज ‘आमचा गोवा आम्हाला हवा’ अशा हाका दिल्या जात आहेत. हा गोवा मुळचा आहे की आज वेगळाच गोवा आहे हे समजण्यासाठी इतिहासात डोकावल्याशिवाय पर्याय नाही. गोव्यावर राज्य केलेल्या अनेक राजवटींनी अनेक सांस्कृतिक प्रवाह, लोककला प्रकार गोव्यात आणले. येथील जीवनाने ते स्वीकारले यात मोठा वाटा दक्षिणेकडील राजवटी व पोर्तुगीज यांचा असल्याचे दिसते. गोव्यावरील तत्कालीन लोक हे हिंदुधर्मिय होते व आदिलशाही सोडल्यास राज्यकर्ते हिंदू होते. त्यामुळे त्यांनी आणलेले प्रकार हिंदू जनजीवनात आपोआप रुळले. वीरभद्र, घोडेमोडणी गोव्यातीलच होऊन गेले.

स्वेच्छेने नव्हे जबरदस्तीने गोमंतकीयांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तसे करण्यासाठी सामुदायिक धर्मांतरे कशी झाली हे समजून घेण्यासाठी पुरातत्व खात्याकडील कागदपत्रांचे भाषांतर सरकारने करून ती खुली केली पाहिजेत. धर्म बदलला तरी जुन्या चालीरीती कायम राहिल्या. विवाह हा संस्कृतीदर्शक मानल्यास ख्रिस्ती लोकजीवनात लग्नगीतांचे गायन, चुडा भरणे, ओटी भरणे, मांडव परतणी असे विधी होतात. त्यात रश्श्यांकडे नारळ ठेवणे हा विधीही काहीजण करतात त्यात वधु-वरांना तेलहळदीऐवजी नारळाचा रस लावतात. हिंदूच्या शिमग्यासारखा इंत्रुज हा सण होतो. हिंदू महिला धालो खेळतात तर ख्रिस्ती झालेल्या महिला जागर करतात.

हे सारे मागे पडून आजचा गोवा उभा आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य १९४७ मध्ये मिळाले तरी गोवा मुक्त होण्यास १९६१ साल उजाडावे लागले. उशीर का झाला याची कारणमीमांसा करण्याची स्पर्धा सध्या सुरू झाली आहे. गोवा मुक्तीचे महत्त्व काय याचा आधी विचार केला पाहिजे. औद्योगिक क्रांतीनंतर त्या क्रांतीचा परिणाम स्वरूप वसाहतवाद फोफावला. पुढे महायुद्ध झाले नाझीवाद आक्रसला ब्रिटन दुबळे झाले आणि त्यांना भारताला स्वातंत्र्य देणे भाग पडले. देश स्वतंत्र झाला तरी गोवा, दमण, दीव, पॉंडिचेरी, माहे हे प्रदेश मुक्त झाले नव्हते. फ्रेंचांनी बदललेल्या परिस्थितीचे भान ठेवत माहे व पॉंडिचेरी भारताच्या ताब्यात देत काढता पाय घेतला. १९५४ मध्ये भारत सरकारच्या प्रोत्साहनातून गोव्याच्या मुक्तीसाठी देशभरातील सत्याग्रही आले होते, अनेकांवर पोर्तुगीजांनी गोळ्या चालवल्या. त्यावेळीच सोबतीला भारत सरकारने लष्करी कारवाई केली असती तर गोवा तेव्हाच मुक्त झाला असता, असे सांगितले जाते. गोवा मुक्तीसाठी भारत सरकार आग्रही नाही असा समज पश्चिमी जगताचा त्यावेळी झाला होता व पोर्तुगीज गोव्याला आपला सागरपार प्रदेश आहे, असे मानत होते.

अखेर भारत सरकारने १९६१ मध्ये लष्करी कारवाई केली. तेव्हा पोर्तुगीजांच्या मदतीसाठी ब्रिटनने आपले नौदलाचे जहाज गोव्याकडे रवाना केले होते. इजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष कर्नल गमाल अब्दूल नासेर यांनी ते सुएझ कालव्यातून जाताना अडवले व रोखले. पश्चिमी जग गोवा दमण दीववरील भारताचा हक्क मान्य करण्यास तयार नव्हते हे यातून दिसते. सोव्हिएत युनियन या काळात भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. पोर्तुगालने हा प्रश्न संयु्क्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा मंडळात नेला. तेव्हा सोव्हिएत युनियनने आपला नकाराधिकार (व्हेटो) वापरून युरोप अमेरिकेचा डाव हाणून पाडला. गोव्याच्या मुक्तिचा प्रश्न असा त्यावेळी आंतरराष्ट्रीय बनला होता. हा प्रश्‍न पुढे पोर्तुगालने हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर नेला. पोर्तुगालमधील सालाझारशाहीचा शेवट होऊन उदारमतवादी डॉ. मारीओ सुवारीस पोर्तुगालचे पंतप्रधान झाले. त्यांनी गोवा, दमण, दीवच्या सामीलीकरणाच्या करारावर सही केली. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हे सामीलीकरण झाले. यामुळे मयेसह इतर ठिकाणचे प्रश्न निर्माण झाले पण तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. गोवा भारतीय संघराज्यात सामील झाल्याचे शल्य आजही काही जणांना आहे. ते ‘पोर्तुगीजांच्या वेळी असे नव्हते’ असे पालुपद आळवून दिवस ढकलत आहेत. त्यांचीच पुढील पिढी काय उपद्रव देते आहे याचा अनुभव सरकार घेत आहे.

भारताच्या लष्करी कारवाईने जसे जग हादरले होते तेवढाच धक्का गोवा मुक्तीनंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सत्तेवर आला तेव्हा जगाला बसला होता. १९६३ मध्ये घेण्यात आलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मगोला बहुमत मिळाले आणि स्व. दयानंद बांदोडकरांसारखा नवखा गोमंतकीय सरकार प्रमुख झाला याचा जबर धक्का अनेकांना बसला. विदेशातील संस्था, संघटना आणि व्यक्ती यांच्याकडून बांदोडकर यांना त्यावेळी आलेली पत्रे नजरेखाली घातली तर याची खात्री पटू शकते. त्यात भाऊंचे अभिनंदनही केले गेले होते. एखाद्या राज्याचा कोणी मुख्यमंत्री झाला म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर, जगाने दखल घेण्याची ही दुर्मिळ घटना असावी. या निवडणुकीत सत्तेचा दावेदार आणि हक्कदार समजल्या जाणाऱ्या कॉंग्रेसची पूर्ण वाताहात त्यावेळी झाली.

 
होती. त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. गोवा मुक्तीनंतर गोव्याची लोकसंख्या कशी वाढली, नैसर्गिक साधनांवर कसा ताण आला याचा लेखाजोखा ‘गोमन्तक’च्या यंदाच्या दिवाळी अंकात मांडल्याने ते मुद्दे येथे न देता म्हणता येते की आजच्या गोव्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. सरकार आता गोव्याचे दर्शन सर्वांना करायला निघाले आहे. तसे करताना गोव्यातील विद्यार्थ्यांना तरी निदान गोव्याचा इतिहास नीट शिकवला तरी पुरे...

-अवित बगळे

संबंधित बातम्या