कोरोना विषाणूबरोबरचं वर्ष अखेर...

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 डिसेंबर 2020

यंदाच्या सरत्या दोन हजार वीस सालचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे कोरोना नावाच्या चिनी जंतूमुळे जन्माला आलेल्या ‘कोविड-१९’ या महामारीनं जगभर घातलेला अभूतपूर्व धुमाकूळ. चालू वर्ष आटोपत आलंय, पण ‘कोरोना-१९’ संपण्याचं म्हणा वा आटोक्यात येण्याचं चिन्ह काही दिसत नाहीये.

यंदाच्या सरत्या दोन हजार वीस सालचं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे कोरोना नावाच्या चिनी जंतूमुळे जन्माला आलेल्या ‘कोविड-१९’ या महामारीनं जगभर घातलेला अभूतपूर्व धुमाकूळ. चालू वर्ष आटोपत आलंय, पण ‘कोरोना-१९’ संपण्याचं म्हणा वा आटोक्यात येण्याचं चिन्ह काही दिसत नाहीये. कोरोनाचे पडसाद विविध क्षेत्रात पहायला, ऐकायला मिळाले. अहो, दिवसाला केवळ तास-दीड तासांची नावापुरती विश्रांती घेऊन धाड्‌ धाड्‌ धावणाऱ्या मुंबईच्या लोकलगाड्या बंद पडल्या. अर्थात त्याचा एक सुपरिणाम म्हणजे तोबा गर्दीनं ठासून भरलेल्या लोकलच्या डब्यात चढण्या-उतरण्याच्या दिव्यापासून मुंबईकरांची सुटका झाली! जावे तेथे आणि हजर टाकावी तिथं गर्दीच गर्दी, या प्रकाराला आळा बसला.

जवळजवळ सगळ्यांनीच स्वतःला आपापल्या घरात जणू कोंडूनच घेतलं. एरवीसुद्धा अगाऊ सूचना देऊन म्हणा वा आगंतुकपणे दुसऱ्याच्या घराच्या दारात दत्त म्हणून उभ्या राहणाऱ्या पाहुणे - रावळे मंडळींना आपसूकच आळा बसला - नव्हे पाहुण्यांना प्रकर्षानं वाटू लागलं की, नेहमीच्या आपल्या सवयीनुसार आपण दार ठोठावायला गेलो, तर ते आपल्या तोंडावरच धाड्‍‍दिशी बंद केले जाणार...अनेकांचा दुसऱ्यावरचा विश्‍वास उडाला. समोरचा माणूस आपल्याला ‘कोविड-१९’चा शाप देऊन तर जाणार नाही ना, या विचारानं अनेकांची झोप उडाली.

दररोजच्या वर्तमानपत्रातला सर्वांत अधिक पाहिला - वाचला जाणारा कॉलम म्हणजे कोरोना मीटर. जगभरातील लागण, त्यामुळे झालेले मृत्यू यांचे आकडे हृदयाची धडधड वाढवू लागले. ‘कोरोना-१९’ पुढं अनेकांनी माना टाकल्या; त्याच्याशी चार हात करून त्याला नमवणारे वीरही पाहायला मिळाले. पुष्कळजण केवळ भयानंच अर्धमेले झाले. ज्यांच्यापाशी जंतू फिरकला नाही, ते स्वतःला भाग्यवान समजू लागले...‘कोरोना-१९’चे कितीतर साइड इफेक्‍टस दिसले. अनेकांनी आपल्या सोन्यासारख्या नोकऱ्या गमावल्या. काहींनी ऑनलाईन पद्धतीनं आपल्या नोकऱ्या टिकवल्या. कचेरीत जाऊन काम करणे आणि घरबसल्या ऑनलाईन कामाच्या पाट्या टाकणे, यातला ठळक फरक अनेकांनी अनुभवला. उबदार हस्तांदोलने आणि अलिंगने इतिहासजमा होण्याच्या मार्गावर लागली. खोकणे, शिंकणे, अंगात कणकण वाटणे, अंगात ताप येणे या एरवी दुर्लक्षित गोष्टींना खूपच महत्त्व प्राप्त झाले.

ही सारी कोरोनाचीच लक्षणे तर नाहीत ना, या भयानं अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला...ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय खेळू लागला. कोरोनाशिवाय दुसरं काही म्हणजे काहीच कुणाला सुचेना. कोरोनानं आपलं तोंड काळं करावं म्हणून अनेकांनी आपल्या घरातल्या देवांना पाण्यात घातलं. देवळे बंद झाल्यामुळे देवाला भक्तांचं आणि भक्तांना देवाचं दर्शन घडणं कठीण होऊन बसलं...घराघरातली परिस्थिती अविश्‍वसनीय वाटावी इतकी बदलली. एरवी नोकरीच्या निमित्तानं दिवसभर घराबाहेर राहणारा नवरा त्यांच्या बायको नावाच्या प्राण्याच्या हाती आयता लागला. त्याचा योग्य तो उपयोग करून घेतला नसता तर बायकोच्या नावाला जणू बट्टाच लागला असता. समस्त महिलावर्गानं कामवाली बाईच्या अनुपस्थितीची ढाल पुढं करून नवऱ्याला कामाला  लावलं. कामांची समसमान वाटणीच केली. नवऱ्यानं भांडी घासायची, बायकोनं ती व्यवस्थित फडताळ्यात ठेवायची, नवऱ्यानं कपडे धुवायचे, बायकोनं ते दोरीवर वाळत घालायचे, केरसुणी फिरवून पोछा मारण्याचं काम नवऱ्याचं. पाणी लवकर वाळण्यासाठी फॅनचं बटन दाबायचं काम बायकोचं.. इत्‍यादी प्रकार सुरू झाले. नवरा संसारात पुरता रमला म्हणा, वा अडकला तो कोविडच्याच कृपेनं. शाळा बंद झाल्यामुळे घराघरातल्या मुलांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ऑनलाईन शिकण्याचं नशिबी आलं, पण ते त्यांनी चांगल्या रितीनं निभावलं.

गावातली केशकर्तनालयं बंद पडली आणि पुरुषमंडळींच्या डोक्यावर केसांचं जंगलच झालं. फणी-कात्री घेऊन केस-कापणीच्या कर्माला महिलांना सामोरं जावं लागलं. टक्कल पडलेल्या नवऱ्याबद्दल त्याच्या बायकोचं प्रेम उफाळून आलं! ‘शादी किसीकी हो...अपना दिल गाता है’ हे गाणं गुणगुणत अप्तमित्र, नातेवाईकांच्या लग्नाला हजेरी लावून जेवणावळीचा लाभ घेणाऱ्यांवर बंधन आलं. उपस्थितांत आपला नंबर लागेल का? या एकाच विचारानं अनेकांना हैराण केलं.

मास्क, जंतुनाशके, साबण आदींच्या उत्पादनाला बहर आला. सगळ्यात जास्त खपला तो च्यवनप्राश, अनेकांच्या बचतीच्या पुंजीला ओेहोटी लागली...पण भाजी, मासे आणि गरजेच्या वस्तूंची घरपोच करणाऱ्यांची चांदी झाली. कर्जबाऱ्यांना तोंड चुकवण्याच्या बाबतीत मास्कची मदत झाली. नामवंत शास्त्रज्ञ मंडळी कोरोनावरील लसीच्या शोधात रात्रीचा दिवस करू लागले. आता कुठे त्यांच्या प्रयत्नाना यश येऊ लागलंय म्हणे. पाहुया यंदाचे वर्ष तर असेच गेले...पुढचे वर्ष कोरोनामुक्त असेल, अशी अपेक्षा करूया. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा!

संबंधित बातम्या