मर्मवेध : त्याग!

बहुआयामी वामन सरदेसाईंच्या जन्मशताब्दीला 5 मे रोजी प्रारंभ झाला. वामनराव सरदेसाई कवी म्हणून श्रेष्ठ होतेच- बाकीबाबांच्या परंपरेतील होते, परंतु त्याहूनही मोठे कार्य त्यांच्या हातून घडायचे होते. ते त्यांनी गोवामुक्ती चळवळीत साकार केले. अनेक लोकांच्या आयुष्यात असे महत्त्वाचे क्षण येतात.
Vaman Sardesai
Vaman SardesaiDainik Gomantak

वामनराव यांचे जीवन तेजःपुंज बनले ते याच मुक्तीच्या ध्यासामुळे. गोवामुक्तीसाठी ज्या अनेकांनी त्याग केला, बलिदान दिले, त्यात वामनरावांचे नाव नेहमीच तेजस्वी म्हणून घेतले जाईल. नवा गोवा निर्माण करण्याच्या कार्यातही त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.

गेल्या आठवड्यात स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांची टीव्हीसाठी मुलाखत घेतली. मुलाखतीचा विषय वामनराव सरदेसाई. पद्मश्री वामन बाळकृष्ण नायक प्रतापराव सरदेसाई. (५ मे १९२३-६ मे १९९४) भल्यामोठ्या नावाप्रमाणेच त्यांची कारकीर्दही मोठी आणि लखलखती. लेखक, कवी, स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी, आयएएस, अंगोलातील भारताचे राजदूत...

लिबिया लोबो सरदेसाई यांनी आपल्या पतीबद्दल बोलताना स्वतःचीच स्वातंत्र्यसैनिक म्हणून कारकीर्द अधोरेखित केली. दोघांचीही कारकीर्द स्वातंत्र्यसैनिक म्हणून समांतर चाललेली. दोघांनीही सहा वर्षे कॅसलरॉकच्या अरण्यात भूमिगत रेडिओ केंद्र चालवले. दोघांनीही आपली सरकारी नोकरी सोडून हे जोखमीचे काम पत्करले.

गोव्याच्या मुक्तीचा पत्ता नव्हता. मुंबईतील आकाशवाणीची नोकरी सोडून जेव्हा हे दोघे तरुण सुरुवातीला आंबोलीच्या रानात आणि त्यानंतर कॅसलरॉकला अरण्यात जिथे चिटपाखरूही नसायचे, जेव्हा हे दांपत्य ट्रकमधून बसून गोव्याच्या मुक्तीचा प्रसार करायचे, वार्तापत्रे वितरित करायचे, तेव्हा गोव्याच्या मुक्तीचा मागमूस नव्हता. या तरुणांनी आपली कारकीर्द सोडून गोव्यासाठी झोकून देण्याचे ठरविले होते. तेव्हा त्यांना आपले कर्तव्य सचोटीने बजावायचे होते.

१९५४मध्ये बेळगावला आपली बदली झाल्याचे घरी सांगून लिबिया लोबो निघाल्या तेव्हा जास्तीत जास्त सहा महिने हे काम करावे लागेल, असे त्यांना वाटले होते. परंतु त्या घनदाट अरण्यात त्यांना सहा वर्षे काढावी लागली. दोघेही लिव्ह इन रिलेशिनशीपमध्ये तिथे राहत होते. कारण त्यांच्याशिवाय त्या जगात तिसरे कोणीच नव्हते!

परंतु त्यांचे भाग्य म्हणजे, ‘गोवा मुक्त झाला आहे. भारतीय लष्कर तुमच्या मदतीला गोव्यात आले आहे. भारताचे तुम्ही आता भाग झाला आहात’, अशी घोषणा करण्याचे भाग्यही या दांपत्याला प्राप्त झाले. लष्करी कारवाईच्या ‘आॅपरेशन विजय’च्या बातम्या त्यांनीच सर्वप्रथम प्रक्षेपित केल्या. पणजीच्या आदिलशहा पॅलेसवर पोर्तुगीज ध्वज उतरवून तिथे तिरंगा फडकविण्यात आला, त्यावेळी सकाळी अकरा वाजता आकाशात घिरट्या घालणाऱ्या लष्करी विमानातून पत्रके फेकत हे दाम्पत्य लोकांना उद्देशून ही खुषखबर देत होते, ‘तुम्ही आता स्वतंत्र भारताचे नागरिक आहात...’

‘मुंबई गर्ल’ असलेली लिबिया लोबो...मुंबईमध्ये सुरू असलेली सतत पेटती राहिलेली स्वातंत्र्याची ऊर्मी, गांधीजींच्या सत्याग्रहाचे जनामनांत पेटलेले निखारे अजून शमले नव्हते. त्यामुळे तरुण लोबोंच्या मनात राष्ट्रवादाचे अंगार धगधगतच होते. त्यातच त्यांना राष्ट्रवादी पाद्री एचओ मास्कारेन्हास यांची साथ मिळाली. गोव्यात सत्याग्रही पाठविण्यात मुंबईमध्ये सभा झाली. त्यावेळीही लिबिया लोबो तेथे हाडाची कार्यकर्ती म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्या आकाशवाणीच्या सेवेत होत्या. तेथेच पाचव्या मजल्यावर वामन सरदेसाई नभोवाणीच्या परराष्ट्र सेवेत होते. राष्ट्रवादी गोवेकरांच्या गाठीभेटी, त्यांच्या मुलाखती या परराष्ट्र सेवेतून प्रक्षेपित करण्याचे काम ते करीत. स्वतः कवी असल्याने आकाशवाणी मुंबईच्या कोकणी विभागात कार्यक्रमाची निर्मितीही ते करीत असत.

मुंबईतील सभेत नेहरूंच्या आदेशामुळे सत्याग्रहाचा निर्णय बदलण्यात आला. गोव्यात घुसू पाहणाऱ्या अनेक स्वयंसेवकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली. त्यामुळे व्यथित झालेल्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी सत्याग्रहींना अटकाव केला होता. त्यामुळे मुंबईची सभा आटोपती घ्यावी लागली. परंतु सभा पांगताच स्वातंत्र्यवादी गोवेकर तेथे रेंगाळत राहिले. तेथेच ध्येयनिष्ठेचे वामन सरदेसाई व लढवय्या लिबिया लोबो एकमेकांना भेटले.

गोव्याच्या मुक्तिलढ्याला बळ मिळाले होते. पोर्तुगिजांनीही विषारी प्रचार चालविला होता. त्यावेळी भारताने ब्लॉकेड जाहीर केले होते. उच्चार स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने गोव्यातून बातम्या येत नव्हत्या. अशावेळी गोव्याच्या मुक्तिलढ्यांच्या बातम्या देणारी व पोर्तुगिजांचा विषारी प्रचार मोडून काढणारी भूमिगत रेडिओ यंत्रणा सुरू करण्याची निकड निर्माण झाली होती. त्यावेळी गोव्याच्या मुक्तीच्या ऊर्मीने काम करणारे अनेकजण सरकारी सेवेत होते.

जवाहरलाल नेहरूंनी गोव्याच्या याच प्रेमाचा आदर करणारी भूमिका सरकारात बाळगली होती. त्यामुळे गोव्यातून परागंदा होणारे अनेक कवी, साहित्यिक सरकारी सेवेत रुजू करून घेतले जात. भारत सरकारच्या त्या कनवाळू धोरणामुळे वामन सरदेसाई यांना आकाशवाणीच्या परराष्ट्र सेवेत नोकरी मिळाली.

परंतु गोव्याच्या लढ्याचा प्रचार करणारी यंत्रणा तयार होत असल्याचे समजताच सरकारी नोकरीवर लाथ मारून वामन सरदेसाई बाहेर पडले. त्यांना एक महिला आवाजाची आवश्यकता होती. परंतु आकाशवाणीतून कोणी यायला तयार नव्हते.

अशावेळी एचओ मास्कारेन्हास त्यांच्या एका बैठकीत बोलताना सहज म्हणाले, ‘अरे तुम्ही काय शोधता, आपल्याबरोबरच तर लिबिया लोबो आहेत, त्यांचा का विचार करीत नाही?’ लिबिया लोबोही एका पायावर तयार झाल्या. सरकारी नोकरी सोडून त्या आंबोलीच्या रानात जायला निघाल्या तेव्हा घरी, ‘आपली बदली बेळगावला झाली आहे’, अशी थाप त्यांना मारावी लागली. कोणतेही कुटुंब रानात आपल्या मुलीला पाठवायला तयार झाले नसते. परंतु लिबिया लोबो, वामन सरदेसाई यांच्याप्रमाणेच निडर होत्या. काहीतरी करून दाखविण्याची ऊर्मी होती.

दोघेही आंबोलीच्या रानात आले तेव्हा पावसाचे थैमान चालू होते. तेथे लोकांची वर्दळही होती. गोव्यातून सतत ये-जा चालू असायची. त्यामुळे तेथे सुरक्षितता नाही, हे दोघांच्या लक्षात आले. त्यानंतर ट्रान्स्मीटर एका ट्रकमध्ये घालून दोघांची रवानगी कॅसलरॉकच्या आणखी घनदाट अरण्यात करण्यात आली. रेल्वे सेवा बंद केल्यामुळे तो परिसर निर्जन होता. त्यामुळे अधिक सुरक्षित होते.

दादरा नगर हवेली मुक्त केल्यानंतर तेथे पोर्तुगिजांचे दोन ट्रान्स्मीटर स्वातंत्र्यसैनिकांनी जप्त केले होते. ते फळाला आले, एका ट्रकवर हे ट्रान्स्मीटर चढवून भूमिगत रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले. सहा महिन्यांसाठी सुरू केलेले हे केंद्र पुढे सहा वर्षे अखंडित चालू राहिले. गोवा मुक्तीला नवा स्वर प्राप्त झाला. खऱ्या बातम्या कळू लागल्या. पोर्तुगिजांचा खोडसाळ प्रचार त्यांना मोडून काढता आला.

लिबिया लोबोंचा आवाज घराघरांत पोहोचला होता. त्यामुळे आवाजावरून त्यांना ओळखू लागले होते. लिबिया लोबो सांगतात, ‘रस्त्यावरून चालत असताना माझा आवाज कानावर पडला, तर लोक थबकून मागे वळून पाहत’. फेरीबोटमध्ये अनेकांनी आपला आवाज ओळखल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एखाद्या चित्रपटाला साजेसे हे कथानक आहे. लिबियांची मी टीव्हीसाठी मुलाखत घेत होतो, तेव्हा मनस्विनी उत्स्फूर्तपणे म्हणाली, ‘याच्यावर चित्रपट निघायला पाहिजे’. वामन सरदेसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षातच कोणीतरी हा संकल्प सोडला तर गोव्याच्या मुक्तिलढ्याचे जिवंत कथानक तयार होऊ शकेल. त्या तुलनेने गोवा मुक्तिलढ्याच्या साठ वर्षांतही अभावाने असे चित्रपट तयार झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील एखाद्या महत्त्वाच्या दिग्दर्शकाकडून गोवा सरकारने असा चित्रपट तयार करून घेतला तर गांधी चित्रपटासारखी एखादी अद्वितीय कलाकृती तयार होऊ शकेल.

वामनराव सरदेसाई स्वातंत्र्यसैनिक म्हणून थोर आहेतच, परंतु कोकणीतील एक प्रमुख कवी, साहित्यिक म्हणूनही त्यांचे काम थोर आहे. माधव बोरकर सांगत होते, ‘वामन सरदेसाई बाकीबाबांच्याच परंपरेतील श्रेष्ठ कवी आहेत. ‘अभिजित’ या नावाने त्यांनी कविता लिहिल्या, परंतु नंतरच्या कारकिर्दीत वामनरावांचे कवितेकडे दुर्लक्ष झाले’.

वामनरावांच्या गोवा मुक्तीनंतरच्या जीवनाचा आलेख घेतला तर आढळेल की, वामनराव करिअरिस्ट प्रशासकीय अधिकारी बनले. विभाग संचालकांपासून आयएएसपर्यंत व त्यानंतर अंगोलामध्ये राजदूतपदापर्यंत (१९८८-९२) त्यांनी मजल गाठली. पद्मश्री (१९९२) म्हणून त्यांच्या प्रशासकीय सेवेचा गौरव झालाच, शिवाय राजदूत म्हणूनही अंगोलाच्या सरकारने विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. असे भाग्य खूप थोड्या अधिकाऱ्यांच्या नशिबी असते.

परंतु कवी म्हणून आणि गोव्याच्या प्रेमाने ओथंबलेले साहित्यिक म्हणून त्यांनी तरुणपणी केलेले कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैद्यकीय शाखेत प्रथम वर्षात शिकत असताना मुक्ती चळवळीत त्यांनी भाग घेतला. ‘ज्वाला’ हे राष्ट्रवाद्यांचे मासिक वितरित करण्याचे काम ते करीत. त्यामुळे डिसेंबर १९४७ मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले. त्यांना परागंदा व्हावे लागले. अशा वेळी त्यांनी वर्धा येथील गांधी आश्रमाचा मार्ग अनुसरला. अनेक देशभक्तांसाठी त्यावेळी वर्धा हे एक विद्यापीठच होते.

काकासाहेब कालेलकर, विनोबा भावे यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे वर्धा पुनीत झाले होते. रवींद्र केळेकरांनी लिहिले आहे, ‘आम्ही काकासाहेबांकडे पोहोचलो, तेव्हा एका ऋषीकडे आल्याची आमची भावना बनली होती. जीवनाच्या प्रत्येक अंगाचा काकासाहेबांनी विचार केला होता. गांधी-रवींद्रनाथांपर्यंतची सांस्कृतिक परंपरा त्यांनी चालविली आणि ही तत्त्वे आपल्या जीवनात ज्यांनी आचरणात आणली, ते सर्व शिष्य थोर बनले.

त्यामुळेच त्यांच्या शिष्यांना स्वराज्याचा खरा अर्थ सापडला. सांस्कृतिक आणि साहित्यिक या क्षेत्रामध्ये त्यांचे हे शिष्य नाव कमावू शकले व ज्यांना ज्ञाननिधी म्हणतात, त्यांचे संस्कार त्यांनी समाजात घडविले’.

या युगाला ‘भारतीय रेन्हेसांस’ असे म्हटले जाते. त्याचाच भाग बनण्याचे भाग्य यावेळी अनेक गोवेकरांना लाभले, त्यात वामन सरदेसाई होते. याच नव्या जीवनाची दीक्षा घेऊन रवींद्र केळेकर व वामन सरदेसाई यांनी वर्ध्याहून ‘मीर्ग’ हे नियतकालिक चालविले. त्यासाठी वामनराव नागपूर आणि आसपासच्या भागांत फिरून आले.

संपूर्ण देशात हे अंक जावेत, यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. ‘मीर्ग’चे अनेक अंक अजूनही गोव्यात उपलब्ध आहेत. गोवा मुक्तीच्या आरंभाच्या काळात सुरू असलेल्या या नियतकालिकाने केलेली भाषा जागृती, साहित्य व त्यातून घडलेले गोवामुक्तीचे कार्य अद्वितीय आहे.

वामनराव हे मूलतःच गोवावादी. गोवा मुक्त झाल्याशिवाय आपले कर्तव्य संपणार नाही, असे मनापासून मानणारे व जिवावर उदार होऊन त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती. या प्रेरणेतूनच ते गोव्यात पोर्तुगिजांविरुद्ध लढले व त्यामुळेच वर्ध्यालाही येऊन मिळाले. वामनरावांची साहित्यिक ऊर्मी याच काळात बहरली.

कोकणी-मराठीबरोबरच पोर्तुगीज भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. शिक्षण अर्धवट सोडले तरी पणजीतील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी भाषा विषय शिकविला. गोवा मुक्तीनंतर इंग्रजी व हिंदी भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. ‘मीर्ग’मधील त्यांच्या कविता व साहित्य त्यांच्या या भाषा प्रभुत्वाची साक्ष देतात. मुंबई आकाशवाणीवर असताना त्यांची अनेक कोकणी गीते गाजली. जाहीर मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात वामनरावांचे कोकणी गीत गायले जायचे.

वामनरावांनी कवितेला वाहून घेतले असते, तर बाकीबाबांच्याच तोलामोलाचे कवी म्हणून ते गणले गेले असते. परंतु ते क्रियाशील साहित्यिक होते. कर्मयोगात त्यांना अधिक रस होता.

गोव्याच्या मुक्तिलढ्याविषयी फारसा अभ्यास झालेला नाही. शिवाय स्वातंत्र्यैनिकांच्या योगदानाचे पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देऊ शकेल, असे उचित स्मारकही तयार झालेले नाही. वास्तविक, गोवा मुक्तीच्या ६०व्या वर्धापनदिनी असा संकल्प सोडणे आवश्यक होते.

गोवा मुक्तीनंतर स्वातंत्र्यसैनिकांची थट्टा झाली, त्यांच्या मानधनाकडे चेष्टेने पाहिले गेले. असे असले तरी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले योगदान वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि अनेकांची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी आहे.

वामनराव व लिबिया लोबो यांची कथा तर चित्रपटाला साजेशी आहे. गोवामुक्तीत अनेकांनी योगदान दिले, अनेकांनी दिलेली जीवनाची आहुती कामी आली. भारत स्वतंत्र झाल्यावर अनेकांना वाटले एक-दोन वर्षांतच गोवा मुक्त होईल, त्यामुळे अनेकजण गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात पडले होते. परंतु त्यानंतर अनेकजण निराश झाले.

नेहरूंवरही मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. गोव्यात राम मनोहर लोहिया यांनी या निराश भूमीत पुन्हा उत्साह पेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही उत्साहाच्या नव्या लाटा तयार झाल्या, परंतु पुन्हा हा उत्साह निपचित पडून राहिला. निराशा निर्माण झाली. त्या वातावरणातही सतत लढ्याचे काम होत होते.

अनेकजण आपापल्यापरिने या लढ्यात स्वतःचे योगदान देत होते, अशावेळी कोणाच्याही संपर्कात न राहता अखंडपणे रेडिओ केंद्र चालवून पोर्तुगिजांचा विषारी प्रचार खोडून काढण्याचे काम वामनराव व लिबिया यांनी न थकता केलेले आहे आणि त्या कामाच्या बदल्यात त्यांची काही अपेक्षाही नव्हती.

लिबिया लोबो सरदेसाई सांगतात, ‘गोवा मुक्त झाला. लष्करी कारवाई यशस्वी झाली. तेव्हा त्यांना लष्करी कारवाईचे प्रमुख चौधरी विचारते झाले, आता तुम्ही काय करणार?’,

लिबिया लोबो उत्तरल्या, ‘आता काय मी पुन्हा मुंबईत जाईन!’

अशावेळी त्यांच्यासमोर नवीन आव्हान उभे करण्यात आले. तुम्ही आता जबाबदारीतून पळून जाऊ शकणार नाही.

गोवा प्रशासन नव्याने उभे करण्याचे आव्हान होते, नवा गोवा निर्माण करण्याची ती जबाबदारी होती. कारण खात्यांचे प्रमुख, न्यायाधीश, प्रशासक गोवा सोडून निघून गेले होते. बाहेरून अधिकारी आणून येथे बसविले, तर त्यांना स्थानिकांची नस ओळखता आली नसती. स्थानिक लोकांकडूनही जबाबदारीची पदे भरून घेणे शक्य झाले नाही. लिबिया लोबो सांगतात, ‘लोक कमी महत्त्वाची पदे घेण्यास उत्सुक होते. त्यांना वरिष्ठ पदांची जबाबदारी नको होती. त्यामुळे अनेक स्वातंत्र्यसैनिकांना ती उणीवही भरून काढावी लागली’.

लिबिया लोबो पर्यटन खात्याच्या संचालक बनल्या. वामनरावांनाही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी अनेक खात्यांचे संचालक म्हणून काम केले. त्यात उद्योग, माहिती संचालक, विक्रीकर आयुक्तालय, जिल्हाधिकारी अशा हुद्यांचाही समावेश होता.गोव्याच्या तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांना पुढे आयएएस सेवेत रुजू करून घेण्यात आले. त्यात पहिल्या अधिकाऱ्यांमध्ये वामनरावांचाही समावेश होता. ‘गोवा टुडे’चे संपादक म्हणूनही काही काळ त्यांनी काम पाहिले.

अनेकांच्या आयुष्यात महत्त्वाचे क्षण येतात. परंतु सर्वांनाच ते ध्येय बाळगणे जमतेच, असे नाही. वामनरावांनी निराश न होता, सतत विजयाच्या नवीन पताका फडकवल्या. त्यामुळे त्यांचे जीवन घडले. कठीण कामे, विशेषतः मुक्तिलढ्याचे कार्य करण्याची ज्यांना संधी मिळाली, ज्यांनी ते कार्य हातात घेतले, त्यांच्या जीवनाला नवा अर्थ प्राप्त झाला.

वामनरावांनी केवळ जीवनाला अर्थ दिला नाही, तर नवा गोवा घडविण्याचेही काम केले आहे. त्यामुळे त्यांचा जीवनउद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला. हाच जीवनाचा स्वधर्म आहे आणि तो माणसाला नवी आशा देत असतो. कोणाचा पाठिंबा मिळाला नाही, तर असा स्वधर्माने पेटून उठलेला माणूस कोणाची वाट पाहत बसत नाही. तो एकटाच चालत पुढे जातो. यालाच श्रद्धा म्हणतात. अशाच लोकांनी गोव्याला मुक्ती मिळवून दिली. जे अशक्य होते, ते शक्य करून दाखवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com