साथरोगाला निमंत्रण बर्फाखालूनच?

Pandemic is an indirect impact of global warming
Pandemic is an indirect impact of global warming

जागतिक तापमानवाढीचा परिणाम जगातल्या सगळ्यांच्या वाट्याला येतोय. जसा, भौगोलिक अडथळ्यांना ओलांडून कोरोना विषाणूने जगभर विध्वंस चालवलाय. तापमानवाढीने टोकाचे हवामानबदल जाणवताहेत. ध्रुवीय बर्फ वितळतोय. दुष्काळाचा धोका वाढलाय. वादळे आणि समुद्राची पातळी वाढल्याने पुराची शक्‍यताही वाढतेय. हिमनद्या, आर्क्‍टिकवरील बर्फ (आर्क्‍टिक महासागर आणि त्याच्या आसपासच्या समुद्रावरील बर्फाचे आवरण), हिमालयीन प्रदेश किंवा इतर कोणत्याही ठिकाणी लपलेल्या प्राचीन सूक्ष्मजीवांमुळे (विषाणू/जिवाणू) संसर्गजन्य रोगाचा उदय विशद करणे हा लेखाचा हेतू आहे. अत्यंत संसर्गजन्य रोग हा जागतिक तापमानवाढीचा अप्रत्यक्ष परिणाम आहे. 

कोरोनाचा विषाणू चीनमधील वुहान शहरात सापडला. त्याने मानवी जीवन, आरोग्य आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. २० लाखांवर लोकांना संसर्ग आणि अडीच लाखांवर मृत्युमुखी पडले. सध्याचा साथीचा रोग काही चित्रपट कथानकांसारखाच दिसतोय. सर्वसाधारणपणे आपण पाहतो की, कला खरे जीवन दाखवते. पण, कधीतरी काही वास्तविक जीवनातील घटनांकडे पाहिले की वाटते, जीवन एखाद्या चित्रपटाचे अनुकरण करतेय. विध्वंसक प्रसंगांचे प्रतिध्वनी उमटताहेत. सध्या कोरोना जगभरात पसरत असताना हॉलिवूड ब्लॉकबस्टर ‘कंटेजन’ किंवा मल्याळम थ्रिलर ‘द व्हायरस’सारखे चित्रपट प्रत्यक्ष जगतोय, असे वाटतेय. आता मुद्द्याकडे वळूया! पृथ्वीवरील उष्णता जसजशी वाढेल, तसतसा अधिकाधिक बर्फ वितळेल. सध्या विज्ञानाला अज्ञात प्राचीन रोगजंतूंचा पुन्हा उदय होताना दिसेल, असा इशारा वैज्ञानिक देताहेत. तापमानवाढीमुळे बर्फ, हिमनद्यांमध्ये असलेले हजारो-शेकडो वर्षांचे विषाणू बाहेर आले तर काय होईल? अशा प्राणघातक विषाणू-जिवाणूंच्या संपर्कात आलो तर काय? गहनच प्रश्‍न आहे. चला, जगातील वेगवेगळ्या भागातील वैज्ञानिकांनी नोंदविलेली काही उदाहरणे पाहूया.

२००४मध्ये फ्रेंच संशोधकांच्या गटाला रशियामधील सायबेरियन पर्माफ्रॉस्टमध्ये (गोठलेली माती) ३०,००० वर्षांपूर्वीचा पूर्णपणे संरक्षित विषाणू सापडला. तो अजूनही क्रियाशील संसर्गजन्य होता. तो शास्त्रज्ञांना आत्तापर्यंत सापडलेला सर्वांत मोठा विषाणू होता. १.५ मायक्रॉनचे हे विषाणू इतर नॅनोमीटर रेंजच्या विषाणूंच्या तुलनेत सूक्ष्मदर्शकाखाली सहज दिसू शकतात. सुदैवाने हा महाकाय विषाणू फक्त अमिबाला संसर्ग करतो, मानवांसाठी धोकादायक नाही. परंतु, अशा विषाणूंच्या अस्तित्वामुळे चिंता वाटते, की प्राणघातक स्मॉलपॉक्‍स किंवा नामशेष अज्ञात विषाणू बर्फाखाली लपून बसलेले असावेत. आणखी उदाहरण म्हणजे, स्मॉलपॉक्‍स हा आत्तापर्यंतचा सर्वांत जीवघेणा रोग मानला जातो. एकट्या विसाव्या शतकात किमान ३० कोटींचा बळी गेला. १९८०मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) या आजाराचे समूळ निर्मूलन झाल्याचे जाहीर केले. या विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या शेवटच्या ज्ञात व्यक्तीला ४० वर्षांपूर्वी संसर्ग झाला होता. तरीही हा रोग चिंतेचाच आहे. कारण, व्हेरिओला नामक हा स्मॉलपॉक्‍स विषाणू अत्यंत चिवट, दीर्घकाळ जिवंत राहतो. 
१८९०च्या दशकात, स्मॉलपॉक्‍समुळे सायबेरियन शहराच्या लोकसंख्येपैकी ४० टक्के मृत्युमुखी पडले, असे सांगितले जाते. हे मृतदेह कोलिमा नदीकाठावर पर्माफ्रॉस्ट मातीच्या वरच्या थराखाली पुरले होते. आता १०० वर्षांनंतर हा पर्माफ्रॉस्टचा थर कोलिमा नदीत वितळतोय. आता रशियाच्या व्हायरॉलॉजी अँड बायोटेक्‍नॉलॉजी सेंटरच्या शास्त्रज्ञांना शरीरात स्मॉलपॉक्‍समध्ये असतात तशी लक्षणे आणि स्मॉलपॉक्‍सचे डीएनए आढळलेत. त्यामुळे हा आजार पुन्हा डोके वर काढण्याची भीती वाटते. अजून एक उदाहरण पाहूया. २०१६मध्ये सायबेरियात अँथ्रॅक्‍समुळे १२ वर्षांचा मुलगा मृत पावला, डझनभर लोकांना रुग्णालयात दाखल केले. शास्त्रज्ञांचा विश्वास आहे, की २०१६च्या उन्हाळ्यात उष्णतेच्या असामान्य लाटेमुळे सायबेरिया प्रदेशात पर्माफ्रॉस्टचे वितळणे सुरू झाले. जमिनीच्या वितळण्याने व सरकण्यामुळे १९४१मध्ये गाडलेला आणि गोठलेला ॲन्थ्रॅक्‍स संक्रमित रेनडियरचा मृतदेह उघडा पडला. त्याच्या मृतदेहामधून ॲन्थ्रॅक्‍सच्या जंतूंनी मातीच्या वरच्या थरात आणि जवळपासच्या पाण्याच्या वरच्या थरात प्रवेश केला. त्यानंतर हे विषाणू त्या भागातील हजारो रेनडियरमध्ये संक्रमित झाले, नंतर भटक्‍या लोकांपर्यंत पोचले.

२००५मध्ये, संशोधकांच्या गटाला अलास्कामध्ये पुरलेल्या फ्लूग्रस्ताच्या गोठलेल्या अवशेषांमधून १९१८च्या फ्लूच्या विषाणूंचे अंश परत मिळविण्यात यश आले. त्यांनी प्रयोगशाळेत या विषाणूची पुनर्रचना केली आणि निष्कर्ष काढला की, तो पक्ष्यांमध्ये उगम पावला होता. संशोधकांनी लस विकसित केली आणि स्पॅनिश फ्लूचा पुन्हा कोणालाही संसर्ग होणार नाही, याची खात्री दिली.  या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकी व चिनी संशोधकांच्या गटाला तिबेटी पठाराच्या उत्तर-पश्‍चिम भागातील गुलिया बर्फाच्या थरातून ३३ प्राचीन विषाणू सापडले. हा बर्फ साधारण १५,००० वर्षांपूर्वीचा आहे. सापडलेल्यांपैकी २८ विषाणू वैज्ञानिकांसाठी नवीन आहेत. तापमानवाढ अशीच सुरू राहिल्यास भविष्यात संसर्गजन्य विषाणूंचा उदय होण्याची दाट शक्‍यता आहे. (अनुवाद ः मोहिनीराज भावे)

-  डॉ. अरिंदम अधिकारी

अधिक वाचा : 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com