आत्मघातापासून परावृत्त होताना..!

नरेंद्र तारी
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

उपेक्षितांच्या जीवनात आनंद पेरणाऱ्या बाबा आमटे यांच्या आनंदवनात त्यांच्या नातीने केलेल्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. मुळात आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यासारखी स्थिती उद्‌भवते, नेमक्‍या त्याचवेळेला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणाऱ्या विचारांची पेरणी 

दुःखी, आजारी, शोषित आणि उपेक्षितांच्या जीवनात आनंदाचा क्षण पेरलेल्या बाबा आमटे यांच्या आनंदवनातच दुःखाची छाया पसरली आहे. बाबा आमटे यांच्या नात डॉ. शीतल आमटे करजगे यांच्या आत्महत्येमुळे आनंदवनावर ही विषादाची झालर पडली असून पेशाने डॉक्‍टर असलेल्या शीतल यांची आत्महत्या अनेक प्रश्‍नांना निरुत्तर करून गेली आहे. आजारपणामुळे थकलेल्या, मानसिक दौर्बल्य आलेल्या अनेक रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या आणि आता संपले काही, जगून काहीच उपयोग नाही, असा मनात विचार आणणाऱ्या कुष्ठरोगी तसेच इतर आजारी रुग्णांच्या मनात जीवन जगण्याची एक नवी ऊर्मी तयार करणाऱ्या ऊर्जेचा एक स्रोत तयार करणाऱ्या आनंदवनातीलच खुद्द एक डॉक्‍टर आत्महत्या करू शकते, यावर हा वाद आहे. 

 

आनंदवनचा अंतर्गत कलह या आत्महत्येच्या पाठी असल्याचे दिसत असले तरी उच्च विद्याविभूषित, सर्व सुखे पायाशी असलेल्या आणि कौटुंबिक स्वास्थ्य लाभलेल्या डॉ. शीतल यांनी मुळात आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे म्हणजे समाजमन ढवळून निघण्यासारखे आहे. मागे एकदा डॉ. शीतल यांनी श्रीलंकेत असताना आत्महत्येचा विचार आपल्या मनात आल्याचे नमूद केले होते. त्यामुळे आत्महत्येचा हा विचार हा केवळ आजच्या घडीचा नव्हे तर फार पूर्वीच त्यांच्या मनाला चाटून गेला आहे, हे निश्‍चित. मात्र त्यावेळेला त्यांनी आपल्या मनावर विजय मिळवला आणि आत्महत्येच्या विचारांना पार पिटाळून लावले. पण शेवटी याच नकारात्मक विचारांनीच सारासार विवेकबुद्धीवर विजय 
मिळवला.

 

विषय आनंदवनाचा नाही, पण ज्या सुसंस्कृत आणि समृद्ध विचारांच्या पायावर आनंदवनची वीट रचली गेली, त्या आनंदवनाचाच एक महत्त्वाचा चिरा निखळला गेला, त्यामुळेच तर आत्महत्या आणि त्यानंतरचे वादळ यासंबंधी हा ऊहापोह आहे. आत्महत्या केली म्हणून प्रश्‍न सुटतात का, मूळ समस्या मिटते का, एखादा विचार दाबून टाकला जाऊ शकतो का..! मूळीच नाही. आत्महत्येमुळे जरी एखाद्याच्या जीवनाची फाईल बंद होत असली तरी मूळात आत्महत्या कुणामुळे झाली, कशामुळे झाली आणि कोणत्या कारणास्तव झाली, हा विषय अधोरेखित होतो. जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेण्यासारखी अशी कोणती स्थिती आपद्‌ग्रस्तासमोर उद्‌भवली, ज्यामुळे जीवनाची इतिश्री करण्याचा विचार संबंधिताच्या मनात आला, यावर हे विचारमंथन व्हायला हवे. दहशतवादी संघटना तर अशाच नकारात्मक विचारांचा आधार घेऊन सकारात्मकतेवर विजय मिळवतात, त्याचाच परिपाक म्हणून मानवी बॉंब तयार होतात. 

 

आत्महत्येसंबंधी एका संस्थेने केलेल्या निरीक्षणात भारतात वीस ते पन्नास या वयोगटातील लोकच जास्त आत्महत्या करतात, असे आढळून आले आहे. मानसिक खच्चीकरणामुळेच आत्महत्येचा विचार एखाद्याच्या मनात येतो. जीवनाबद्दलचा आशावाद तुटलेला असतो. सगळं काही संपलेले आहे, जगून काहीच उपयोग नाही, असे विचार ज्यावेळेला एखाद्याच्या मनात येतात, त्यावेळेला या नकारात्मक विचारांचे सकारात्मक विचारांत परिवर्तन करण्याजोगी स्थिती त्यावेळेला आणि तात्काळ निर्माण व्हायला हवी. अर्थातच अशावेळेला खचलेल्या व्यक्तीला आधार देण्याबरोबरच त्याच्या मनातील नकारात्मक विचार घालवून त्याजागी सकारात्मक विचार पेरण्याची खरी आवश्‍यकता असते.

 

जीवनात आलेले अपयश, प्रेमभंग किंवा आजारपण हीच आत्महत्येसाठी प्रमुख कारणे ठरू शकतात. पण जीवन किती सुंदर आहे. "हार के आगे जीत है'' असे म्हणताना अपयशाला टोलवून विजय हाशील करण्याची मानसिक ताकद अशा व्यक्तीच्या मनात निर्माण करण्याची गरज असते. प्रेमभंग झाला तरी केवळ एका व्यक्तीमुळे जीवन संपवण्याची गरजच काय, असे जेव्हा प्रेमवीर स्वतःच स्वतःला विचारेल, तेव्हाच नकारात्मक विचार जाऊन   त्याठिकाणी सकारात्मक विचारांची पेरण होईल. आजाराच्या भयाने किंवा आजारग्रस्ततेमुळे नैराश आल्यास अशा स्थितीलाही धीराने आपण तोंड देऊ शकतो, आपल्यापेक्षा असे कितीतरी पीडित असतील, पण त्यांची जीवन जगण्याची दुर्दम्य ईच्छाशक्ती ही आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, हे जेव्हा एखाद्या पीडिताला समजेल, तेव्हाच असा पीडित टोकाचे पाऊल टाकण्यास धजावणार नाही, ही टिप्पणी या स्वयंसेवी संघटनेने केली आहे. खुद्द मानसोपचार तज्ज्ञांच्या मते जेव्हा नैराश्‍याचे झटके येतात, त्याचवेळेला चांगले ते विचार पेरणारी माणसे अशा माणसाच्या जवळ असायला 
हवी.  

 

आत्महत्येच्याबाबतीत जागतिक क्रमवारीतही आपला देश मागे नाही. विशेष म्हणजे वीस ते पन्नास या वयोगटातील लोक जास्त आत्महत्या करतात, असा जरी निष्कर्ष काढला तरी पंधरा ते वीस या वयोगटातील शाळकरी मुलेही आपले जीवन संपवण्याचा धाडसी निर्णय घेतात, हेही मान्य करायला हवे. परीक्षांत आलेले अपयश आणि पौगंडावस्थेतील प्रेमप्रकरण या वयोगटातील मुलांत जीवनाबद्दल तिरस्कार निर्माण करण्यास आणि नैराश्‍याला चालना देण्यास कारणीभूत ठरते, हेही आपण मान्य करायला हवे. आजची मुले हे उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे पालकांचे जर मुलांकडे व्यवस्थित लक्ष असेल तर असे टोकाचे निर्णय घेण्यापासून पालकच मुलांना परावृत्त करू शकतो, मित्र बनून! पण आज नोकरी करणाऱ्या आणि सामाजिक संस्था, संघटनांशी संबंधित आईला मुलाकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही, हे आपण आधी मान्य केले पाहिजे. आई वडील कमावण्यासाठी सकाळी घराबाहेर पडणार ते दिवस मावळल्यावरच घरी परतणार. थकून भागून आल्यानंतर मुलांकडे आणखी कसले हो लक्ष जाणार...! त्याही स्थितीत मुलांची खबरबात घेणाऱ्या पालकांना धन्यवाद म्हटलेच पाहिजे.

 

मुलांची छानछोकी आज वाढत चालली आहे. हातात महागडा मोबाईल, बुडाखाली महागडी दुचाकी आणि खिशात पैसा असेल तर हे जग आपल्यापेक्षा थिटे असल्याची भावना या मुलांत वाढीस लागते. मुलांना मोबाईल हा हवाच, आज ती काळाची गरज आहे, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. मोबाईलचा विद्यार्थ्यांमधील वापर हा केवळ गरजेपुरता असायला हवा. त्यासाठीच तर अशा मुलांवर नियंत्रण आणि निरीक्षण असणे गरजेचे आहे.

 

हे जीवन...हे जग किती सुंदर आहे, याचा प्रत्यय प्रत्येकाला यायला हवा. अपयशावर मात करून मनातील नैराश्‍य सातासमुद्रापार हाकलण्याची क्षमता निर्माण करण्याची खरी गरज आहे. आत्महत्येच्या निर्णयामुळे आज अनेक घरे उद्‌ध्वस्त झालेली आपल्याला दिसताहेत. कर्ते सवरत्या पुरुष आणि महिलांनी जीवनच संपवण्याचा निर्णय घेतल्यावर घर आणखी कुठले सावरणार...! त्यासाठी सकारात्मकतेचा आणि मदतीचा हात देणाऱ्या संस्थांची निकड निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच जर व्यवस्थित काऊन्सिलिंग झाले तर आयुष्याची बुनयाद घट्ट आणि सक्षम होण्यास कारणीभूत ठरणार आहे. 

 

बाबा आमटे यांनी ज्या उदात्त हेतूने आनंदवन उभारले, दुःखितांच्या, पीडितांच्या जीवनात आशेचे किरण पेरले, नैराश्‍याने ग्रासलेल्यांचा जीवनाकडे पाहण्याचा हताश दृष्टिकोन बदलला, त्या आनंदवनातच खुद्द बाबा आमटे यांच्या नातीने आत्महत्या करावी, हा विचार मूळात अस्वस्थ करणारा आहे. उच्चशिक्षित आणि सर्व काही हाती असलेल्या एका डॉक्‍टरकडून अशाप्रकारची अपेक्षा नव्हतीच मूळी या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे व्यक्तही झाल्या, पण या नैराश्‍याच्या मूळाशी दडलेले कारण नेमके बाहेर आले नाही. आनंदवनातील हक्कासंबंधी, कार्यपद्धतीमुळे आत्महत्येचा विचार डॉ. शीतल यांनी घेतला, असे सांगितले जात असले तरी आनंदवनातील आत्मविश्‍वासालाच एकापरीने हा तडा गेला आहे, असे वाटत.

-  नरेंद्र तारी

संबंधित बातम्या