पोर्तुगीजांविषयी पसरलेल्या भयगंडाला पहिला तडा दिला 'पिंटोंच्या बंडाने'

सोळाव्या शतकातील पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचाराला पहिला प्रतिकार झाला तो साष्टी तालुक्यातील कुंकळ्ळी गावांत.
Revolt
RevoltDainik Gomantak

प्रत्येक मनुष्याला जसे मानसिक विकार होतात तसेच प्रत्येक देशातील वेगवेगळ्या समाजाचे मानसिक आरोग्य असते. या समाजाच्या मानसिक आरोग्यावर राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा परिणाम होत असतो. त्यातीलच स्टॉकहोम सिड्रोम म्हणजे भयगंड हा मानसिक आजार समाजात‌ पसरतो. भयगंड आजार म्हणजे एखाद्या देशावर (Country) अत्याचार, दहशतीचे राज्य करणारे राज्यकर्ते वर्षानुवर्षे निरंकुश राज्य करत असतात.

Revolt
गोव्यातील 'मांगिरीश विद्यालयाची' 70 वर्षांची वाटचाल...

या अत्याचारी राज्यांना फारसा कोणी प्रतिकार करत नाही, आणि जर प्रतिकार केलाच तर तो अत्यंत अमानुषपणे चिरडून टाकला जातो. त्यामुळे प्रतिकार करणारी माणसेच समाजालाही दोषी वाटू लागतात. त्याशिवाय अनेक वर्षांच्या अत्याचाराची दहशत समाजावर बसल्यामुळे अत्याचारी राज्यकर्त्यांची चाकरी करणे, त्यांची भाषा, संस्कृती (Culture), जेवण-खाण,पोषाख या सर्वांचे अनुकरण करण्यात समाजाला धन्यता वाटू लागते. यालाच सामाजिक भयगंड या सामाजिक मानसिक आजाराचे स्वरूप लाभते. अशाच प्रकारच्या सामाजिक भयगंड उर्फ स्टॉकहोम सिंड्रोमने गोव्याच्या एका मोठ्या सामाजिक घटकाला अनेक वर्ष पछाडले होते. आजही काही तुरुळक घटक या आजाराने पछाडले आहेत. गोव्यात पोर्तुगीजांनी जुन्या काबिजादीतील बार्देश, तिसवाडी, मुरगाव, साष्टी या तालुक्यांत सोळाव्या शतकात ज्या प्रकारे धार्मिक अत्याचार केले त्यामागच्या क्रौर्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. सोळाव्या शतकातील पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचाराला पहिला प्रतिकार झाला तो साष्टी तालुक्यातील कुंकळ्ळी गावात. या कुंकळ्ळीच्या बंडातील सोळा गावकारांची पोर्तुगीजानी अमानुष प्रकारे हत्या करून हे बंड मोडून काढले. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांच्या अत्याचाराला आवर घालण्याची इच्छा असणारी एकही भारतीय राज्यसत्ता अस्तित्वात नव्हती.

सतराव्या शतकाच्या मध्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या रूपाने पोर्तुगीजांच्या (Portuguese) राजकीय महत्त्वाकांक्षेला खीळ बसली. सतराव्या शतकात मराठ्यांच्या वसई मोहिमेमुळे उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्ता कायमची उखडली गेली. परंतु, गोव्यात दोन शतकांहून अधिक काळ पोर्तुगीजांनी केलेल्या धार्मिक अत्याचारामुळे गोव्यातील बहुसंख्य धर्मांतरित ख्रिश्चन समाजात पोर्तुगीजांविषयी जबरदस्त भयगंड निर्माण झाला होता. पोर्तुगीजांची भाषा, पोशाख, आहार या सर्वांचे अनुकरण करण्यात धन्यता मानून पोर्तुगीजांची संस्कृती हीच आपली संस्कृती आहे असे हा समाज मनोमन मानायला लागला होता. या भयगंडाला पहिला तडा दिला तो पिंटोंच्या बंडाने, ज्याला पाद्रींचे बंड असेही म्हणतात. या बंडाला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरला तो युरोपातला फ्रान्स देश.

गोव्यात (Goa) पोर्तुगीजांनी येथील स्थानिक लोकांना राजकीय आणि धार्मिक प्रशासनात कायमस्वरूपी पदे दिली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात, सन १७८५मध्ये पणजीचे कायतानु फ्रांसिस्क कौतू आणि दिवाडीचे जुजे आंतोनियु गोन्साल्वीस आणि पिंतू पाद्री हे पिंटोंच्या बंडाचे पुढारी होत. धार्मिक शिक्षणाच्या निमित्ताने गोव्यातील अनेक विद्यार्थी युरोपातील रोम शहरांत जात. तेथे युरोपातील अनेक देशातील विद्यार्थी (Students) येत. तेव्हा पोर्तुगीज भारतातून आलेल्या आणि युरोपातील विद्यार्थ्यांमधील फरक या विद्यार्थ्यांना जाणवू लागे. पोर्तुगीज अधिकारी, पाद्री भारतीय विद्यार्थ्यांपुढे नेहमीच जेत्याच्या गुर्मींत वावरत. अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळात युरोपात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राजकीय क्रांतीचे वारे वाहत होते. इंग्लंड, फ्रान्समध्ये राजेशाहीला हादरे बसू लागले होते.

Revolt
‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत आजचे नाटक-‘सौ.’

अशा काळात फ्रान्समध्ये धार्मिक शिक्षण घेणारे पाद्री जुझे कुश्तोदियू फारीय, ज्याना संपूर्ण गोवा आबादी फारीय या नावाने ओळखतो आणि ज्याना मोहिनी विद्येचे जनक मानले जाते, ते कार्यरत होते. फ्रान्समध्ये धार्मिक शिक्षण घेत फादर ही पदवी मिळवलेल्या आबादी फारीय यानाही आपल्या भारतीयत्वाची जाणीव फ्रान्समधील राज्यक्रांतीने झाली. फ्रान्समधील राज्यक्रांतींत सक्रिय सहभाग घेऊन ते युरोपात शिक्षण घेणाऱ्या गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये सहभागी झाले. या सर्वांच्या मनातून गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता उखडून टाकण्याविषयीचे बेत शिजत होते. गोव्यात आल्यावर ठिकठिकाणी बंडाच्या तयारीसाठी गुप्त बैठका घेऊ लागते. पोर्तुगीज लष्करातील गोवेकर अधिकारी व सैनिक आणि ठिकठिकाणी असलेले स्थानिक पाद्री यांच्याशी संवाद साधत ते बंडाबाबत मानसिक तयारी करू लागले. बंडाच्या पुढाऱ्यांनी टिपू सुलतानाशी संपर्क वरून मदत मागितली. पोर्तुगीजांविरुद्ध बंड करणे आणि तेही पाद्रींनी, ही सोपी गोष्ट मुळीच नव्हती. पोर्तुगीजांच्या भयगंडाने पछाडलेला वर्ग गोव्यात होता. शेवटी घात झालाच. शिवोलीच्या फादरने आणि हळदोण्याच्या सावकाराने गव्हर्नरकडे कटाची सर्व माहिती पोहोचवली. गव्हर्नरने लगेच लष्कराला कारवाईचे आदेश देत सर्व बंडकऱ्याना पकडले. लष्करी कोर्टापुढे तातडीने खटले चालवून पाद्री मंडळीना जन्मठेप व सक्तमजुरीच्या सजा देत त्यांची पोर्तुगालच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. जे स्थानिक लष्करी सैनिक आणि अधिकारी कटांत सामील झाले होते त्यांना पणजी शहरांत अत्यंत क्रूरपणे जाहीर सजा देण्यात आल्या. त्याना घोड्याच्या शेपटीस बांधून पहिल्यांदा शहरभर फरपटत फिरवले गेले व नंतर हातपाय, शीर तोडून त्याचे अवयव शहरात विविध ठिकाणी लावले. अशा रितीने पोर्तुगीजांच्या धार्मिक व्यवस्थेला धार्मिक व्यवस्थेतूनच प्रतिकार करणाऱ्या बंडाचा शेवट झाला. पोर्तुगामधील जे विद्यार्थी आणि पाद्री या बंडांत सामील होते, ते फसलेल्या बंडाची बातमी ऐकताच फ्रान्समध्ये पळाले. त्यांत आबादी फारीयचा समावेश होता. अशा प्रकारे पोर्तुगीजांचा अत्याचारी भयंगडाविरुद्ध प्रतिकार करणारा प्रयत्न पोर्तुगीजांनी अमानुषपणे चिरडून टाकून परत एकदा संपूर्ण समाजावर आपला भयगंड कायम ठेवला. पुढे, विसाव्या शतकाच्या सुरवातीला युरोपात शिक्षण घेणाऱ्या गोवेकर ख्रिस्ती विद्यार्थ्यांनाही पोर्तुगीजांच्या भयगंडाची जाणीव झाली.

सोळाव्या शतकातील पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचाराला पहिला प्रतिकार झाला तो साष्टी तालुक्यातील कुंकळ्ळी गावांत. पोर्तुगीजांविषयी जनमानसांत पसरलेल्या भयगंडाला पहिला तडा दिला तो पिंटोंच्या बंडाने (Revolt), ज्याला पाद्रींचे बंड असेही म्हणतात.

- सचिन मदगे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com