Portuguese Order in Goa : गोव्यात लग्नसमारंभांवर प्रतिबंध आणणारा 1736 चा आदेश माहित आहे का?

गोव्यातील हिंदूंवर अमानुष अत्याचार झाले, त्यांचे ख्रिस्तीकरण दडपशाहीने झाले ही गोष्ट मान्यच आहे. पण, त्यासाठी आजच्या ख्रिश्चनांना दोष देणे किंवा त्याच नजरेने पाहणेही योग्य होणार नाही!
Portuguese
PortugueseDainik Gomantak

धर्मांतरित स्थानिक वर आणि वधूच्या नातेवाइकांना, मग ते पुरुष किंवा स्त्री असोत, दायजी किंवा गोत्री असोत, त्यांच्या विवाह समारंभाला आमंत्रित करू शकत नाहीत किंवा आहेर स्वीकारू शकत नाहीत, असे 1736 च्या आदेशात म्हटले आहे. नव-ख्रिश्चनांना लग्नाच्या वेळी गायिली जाणारी गीते व ओव्या म्हणण्यासही परवानगी नव्हती.हिंदू वाद्ये वापरली जाऊ शकत नव्हती. लग्न समारंभात तेल वापरले जाऊ शकत नव्हते. नव-धर्मांतरितांना लग्नाच्याप्रसंगी तांदूळ किंवा धान्य दळायलाही मिळत नसे. वधू-वरांच्या घरासमोर साधा पानांनी शाकारलेला मंडप उभारण्यासही मनाई होती.

नवविवाहित जोडप्यांना किंवा पाहुण्यांवर सुगंधित द्रव्य किंवा फुले, अक्षता टाकण्यास मनाई होती. वाढपी व स्वयंपाकी यांना वाढताना, स्वयंपाक करताना चप्पल काढण्यास मनाई होती. विवाहित जोडपे ज्या पलंगावर झोपतात त्याखाली सुपारीची पाने किंवा सुपारी ठेवण्यास मनाई होती. लग्नाच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या कोणत्याही दिवशी कोणीही वधूला हळदकुंकू किंवा अक्षता लावण्यासही बंदी होती.वर किंवा वधू यांनी एकमेकांच्या घरी जाताना, त्यांनी किंवा त्यांच्यासोबत येणाऱ्या लोकांनी तांदूळ, सुपारी, नारळ किंवा इतर कोणताही खाद्यपदार्थ सोबत नेता येत नसे. त्यांनी कोणत्याही समारंभात विडे देण्यावरही बंदी होती.

मूल जन्मल्यावर...

अपत्यजन्माच्या सहाव्या दिवशी सटीपूजन (षष्ठीपूजन) करण्यास, त्यानिमित्त जागरण करण्यास, समारंभ करण्यास मनाई होती. त्यांच्या घरी कोणत्याही व्यक्तीला जाण्यासही मनाई होती.

धर्मांतरित झालेल्यांच्या मालमत्ता

ख्रिश्चन पंथ स्वीकारणाऱ्या हिंदूंना डिझिमो (जमीन कर) भरण्यापासून सूट दिली जात असे. मृत हिंदूच्या विधवा आणि मुलींनी ख्रिश्चन पंथ स्वीकारल्यास संपत्तीचा वारसा मिळेल. हिंदू वडिलांचा मुलगा किंवा मुलगी ख्रिश्चन झाली, तर तो किंवा ती वडिलांच्या हयातीतही त्यांचा एक तृतीयांश संपत्तीवर हक्क सिद्ध होई.

Portuguese
Portuguese Order in Goa : गोव्याचा चेहरामोहरा बदलणारा 1736 चा आदेश

जीवनपद्धतीवरील इतर प्रतिबंध

हिंदूंना व्रतवैकल्यांतर्गत येणारे उपवास करता येत नसत. पुरुषांना घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी धोतर नेसून जाण्यास मनाई होती. महिलांना चोळी घालण्यास मनाई होती. ख्रिश्चन बोईस (अध्यक्षांचा वाहन चालक) यांनी हिंदूंच्या सेडान चालवू नयेत. ख्रिश्चन शेतमजुरांना हिंदूंच्या मालकीच्या जमिनीवर काम करण्यास मनाई करण्यात आली होती आणि हिंदू मजुरांना ख्रिश्चनांच्या जमिनीत काम करण्यासदेखील मनाई होती. ख्रिस्त पंथाच्या प्रसारासाठी आलेल्या पंथगुरू आणि मिशनरींसमोर त्यांनी दिलेला ख्रिश्चन पंथाचा उपदेश ऐकण्यास उपस्थित राहणे बंधनकारक होते.

राजा दो जुआंवच्या आदेशानुसार त्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याने ब्राह्मण किंवा इतर काफिरांना लाभ होईल, अशा पद्धतीने आपल्या पदाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली. जमिनीच्या मूळ रहिवाशांना दिलेली सर्व कार्यालये हिंदूंना न देता ख्रिश्चनांना दिली गेली. महिलांना सोवळ्याने अन्न शिजवण्यावर बंदी आणली गेली. आंघोळ न करता अन्न शिजवण्यास लावले गेले. ख्रिश्चन घरासमोर तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोप लावण्यास मनाई होती. एवढेच नव्हे तर तुळशीचे रोप, तुलसीवृंदावन दिसल्यास ते उपटून फेकून देण्याच्या आज्ञा होत्या. बाराव्याचे तेराव्याचे जेवण घालण्यास मनाई होती. श्राद्ध आदी कर्मे करण्यावर बंदी होती. महिलांना साडी नेसण्याची परवानगी नव्हती. ख्रिश्चन झालेल्या हिंदूंना जमिनीच्या मोबदल्यापासून सूट देण्यात आली होती, परंतु त्यांना नियमितपणे सामूहिक प्रार्थनेस उपस्थित राहणे आवश्यक होते.

पोर्तुगीज सरकारने या कायद्याचा वापर करून हिंदूंच्या अनेक प्राचीन सांस्कृतिक प्रथा नष्ट केल्या. या कायद्यांचे पालन न करणे म्हणजे तुरुंगवास, चौकशी आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार दंड. हात कापण्याच्या, जिवंत जाळण्याच्या शिक्षा दिल्या जात. न्यायाधीश कुणी सामान्य पोर्तुगीज किंवा ख्रिश्चन व्यक्ती नसायची, तर ख्रिस्ती पाद्री असायचे. त्यामुळे, सापडल्यास शिक्षा ही निश्चितच व्हायची. त्यातल्या त्यात सौम्य शिक्षा म्हणजे हद्दपारी, फटके मारणे आणि सक्तमजुरी. परंतु, या नियमांचे उल्लंघन केल्यास कठिणातली कठीण शिक्षा केली जाई. यामुळे, ख्रिश्चन झालेले अधिक कट्टर ख्रिश्चन झाले. हिंदू आपल्या प्रथांपासून, संस्कृतीपासून दूर जात गेले. हा गोव्याच्या इतिहासातला सर्वांत क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणारा कालखंड होता.

लिस्बनमधील अर्क्विवो दा पालासिओ दा अजुदा येथे मला एक पत्र पोर्तुगालमधील माझ्या कामाच्या दरम्यान आढळले. हे पत्र असोळणा, कुंकळ्ळी, वेळ्ळी आणि वेरोडा येथील ग्रामस्थांनी दि. 12 नोव्हेंबर 1727 रोजी पोर्तुगालच्या राजाला लिहिले होते. या पत्रात ग्रामस्थांनी त्यांची देवळे जाळण्याचा व मूर्ती तोडण्याचा निषेध व्यक्त केला आहे आणि पोर्तुगीज अधिकाऱ्यांविरुद्ध दाद मागितली आहे. गोव्यातील अधिकाऱ्यांना धार्मिक छळ थांबवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी लोकांनी राजाकडे केली होती. आपल्या श्रद्धांविषयी जागृत असलेल्या लोकांचे हे निवेदन राजाने मान्य केले. ही मागणीदेखील त्या कालावधीची साक्ष देते जेव्हा नागरिकांना सार्वजनिक असहमती व्यक्त करण्याचा आणि लिस्बनमधील सरकारचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार होता. गोवेकरांनी केलेले आवाहन मंजूर करण्यात आले आणि मंदिरांच्या पुनर्बांधणीचा आदेश देण्यात आला, याची साक्ष हा दस्तऐवज देतो.

गोव्याचा चेहरामोहरा बदलणारा 1736 चा आदेश हा त्या काळातला आहे, ज्या काळात राज्यविस्तार आणि पंथविस्तार एकच होता. किंबहुना पंथविस्तार म्हणजेच राज्यविस्तार होता. राज्य आणि पंथ भिन्न नव्हते. गोव्यातील हिंदूंवर अमानुष अत्याचार झाले, त्यांचे ख्रिस्तीकरण दडपशाहीने झाले ही गोष्ट मान्यच आहे. पण, त्यासाठी आजच्या ख्रिश्चनांना दोष देणे किंवा त्याच नजरेने पाहणेही योग्य होणार नाही!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com