Konkani Language : कोंकणीत रुजलेले पोर्तुगीज शब्द

इतर भाषांतील शब्द घेतल्याने भाषा दुर्बल होत नाही, उलट अधिक वृद्धिंगत होते. कोकणी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत, जे मूळ पोर्तुगीज आहेत, हे सांगितल्याशिवाय आज कुणालाही कळणार नाही. यामुळेच, कोकणी सर्वसमावेशक, प्रवाही भाषा बनली आहे.
Konkani Language
Konkani Language

Konkani Language : मनुष्य अगदी ‘सूज्य’ आणि ‘सुबेज’ आहे असं कोकणीत म्हणतात. सूज्य आणि सुबेज हे दोन्ही शब्द पोर्तुगीज आहेत. सूज्य म्हणजे घाणेरडा व सुबेज याचा अर्थ जास्त बोलणारा. सुबेज म्हणजे मुळात जास्त.

कोकणी भाषेत किती टक्के पोर्तुगीज शब्द घुसले आहेत हे तसं सांगणं कठीण. पण, निदान दहा टक्के तरी असतीलच. कारण साडेचारशे वर्षे पोर्तुगीज गोव्यात होते, यावरून त्या भाषेचा जो प्रभाव कोकणीवर झाला तो शाश्वत राहणारच. आजची पिढी जरा कमी वापर करते. पण माझ्या आईची पिढी जास्त शब्द वापरत होती. कारण ते लोक पोर्तुगीज शिकले होते. तरीही काही शब्द घट्ट चिकटले. कायमचे.

पोलिसांनी ‘तालांव’ दिला असं म्हणतो. तालांव म्हणजे दंड. दिल्लीत वगैरे चलन दिलं म्हणतात. जगभर चलन व गोव्यात तालांव. आम्ही शाईला ‘तींत’ म्हणायचो. फाउंटन पेनमध्ये तींत घालायचो. शाई हा शब्द वापरला नाही. तबला वा पखवाजच्या पुड्यावर जी वर्तुळाकार काळी शाई लावायचे त्याला मात्र ‘शाय’ म्हणायचे.

आमच्या लहानपणी कोकणी बोलताना जास्त शब्द होते ते मूळ पोर्तुगीज शब्द काही प्रमाणात काळाच्या ओघात गायब झाले वा लुप्त झाले हे खरं. पण ‘फोग’ (फटाकडे वगैरे) अजून आहे. तो कायम राहणार. ‘जनेल’ म्हणजे खिडकी. हा शब्द पोर्तुगीज आहे हे कोकणी बोलणाऱ्यांना माहीत नाही. त्यात नवलही नाही. कारण, भाषा बोलतात त्यांना भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन यांच्याशी काही देणंघेणं नसतं. आगपेटीला अजूनही मी ‘फस्क’ म्हणतो जो मूळचा पोर्तुगीज शब्द आहे.

शतकांच्या कालचक्राच्या उत्क्रांतीतून आजची कोकणी घडली आहे. गोव्याच्या इतिहासात ज्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक घटना घडल्या, त्यांचा परिणाम आणि परिपाक कोकणी भाषेत स्पष्ट दिसतो. हा अभ्यास फारच रंजक आहे. संशोधनात्मक दृष्टिकोन मात्र पाहिजे. बहुभाषाकोविद, विद्वान दाल्गाद यांनी पोर्तुगीज कोकणी कोश त्याकाळी लिहिला. तो एक पाया होता. डायगो रिबेरो व इतर अनेक धर्मगुरूंनी कोश निर्माण कार्यात बहुमूल्य योगदान दिले आहे. शणै गोंयबाबांच्या अनेक पुस्तकातून पोर्तुगीज शब्दांच्या कोकणीत प्रवाहित झालेल्या शब्दांवर भाष्य आहे.

लहानपणी आम्ही शाळेत जाताना गणवेषाची अर्धी चड्डी असायची, त्याला ‘कालसांव’ म्हणायचो. खरं म्हणजे कालसांव शब्दाचा अर्थ पॅण्ट. पण अर्धी चड्डी म्हणजे कालसांव असा अर्थ डोक्यात घर करून राहिला. पर्यटक लोक, महिला, पुरुष, मुलं कालसांव घालून शहरातून हिंडत असतात, असं लोक बोलताना आम्ही ऐकतो.

Konkani Language
Portuguese: उद्ध्वस्त करणारा अँग्लो-पोर्तुगीज करार!

‘कोर’ म्हणजे रंग. कसला कोर आहे गाडीचा? असं विचारलं जातं. चतुर्थी जवळ आली की आम्ही बाजारात जाऊन फोली आणत. ‘फोल’ म्हणजे पातळ कागद. मुख्यत: तो सजावटीचा कागद असा अर्थ प्रचलित झाला. अजूनही आम्ही रंगीत कागद आणतो त्याला फोलीच म्हणतो. लिव्हर म्हणजे यकृत. पोर्तुगीजमध्ये त्याला ‘फिग्द’ म्हणतात. हा शब्द अजूनही अनेक वयस्क आणि विशेषकरून कॅथलिक लोक गोव्यात वापरतात. ‘गड्डो’ म्हणजे खेळण्याची गोटी. गड्डो हा पोर्तुगीज शब्द. ‘गुरूत’ म्हणजे चिकटवण्याचा डिंक वा गम. आमचे काका चतुर्थीला फोली चिकटवताना गुरूत आण म्हणायचे. तळलेले मासे खाल्ले ते ‘माल’ पडले, असं कोकणीत म्हणतात. माल हा पोर्तुगीज शब्द. माल म्हणजे वाईट. कोकणीत ‘माल पडप’(त्रास, वाईट होणे) हा वाक्प्रचार बनला आहे. मेज (टेबल), कदेल (खुर्ची) हे शब्द पोर्तुगीज आहेत.

धन्यवाद शब्दाला ‘ओब्रिगाद’ हा शब्द अजूनही लोक वापरतात. ‘जोत्यांची पार’ म्हणजे चपलांची जोडी. त्याला जाऊन निरोप दे असं सांगताना कोकणीत त्याला ‘रेकाद’ (रकाद) दे असं म्हणतात. फुफ्फुसांना ‘पुल्मांव’ म्हणतात जो पोर्तुगीज शब्द आहे. मोठी जखम झाली आणि चार ‘पोंत’ पडले असं म्हणतात. पोंत म्हणजे टाके. कायम कोकणीत रुतलेले हे शब्द. ‘पेजाद’ म्हणजे जबरदस्त वा वजनदार. हा शब्द सर्रासपणे वापरतात. कार्डबोर्डला ‘पापेलांव’ हा शब्द अजूनही वापरतात. अजागळ वेंधळ्या प्रकरणालाही पापेलांव म्हणण्याचा प्रघात आहे. आंबाडे, बिमलां वा कच्चा आंबा घालून जे गोड लोणचें आम्ही करतो त्याला ‘मेल’ म्हणतात. मेल हा पोर्तुगीज शब्द असून त्याचा अर्थ मध असा होतो.

पायमोज्यांना ‘मेय’ हा शब्द कोकणीत वापरतात, तो मूळ पोर्तुगीज आहे. ‘लिंप’ म्हणजे स्वच्छ, जो शब्द कोकणीत घोळतो. ‘लात’ म्हणजे डबा. ‘लापयांव’ म्हणजे कंदील. ‘गेर्र’ म्हणजे युद्ध. ‘गवेत’ म्हणजे खण. ‘गोस्त’ म्हणजे रुची, पण हल्ली हा शब्द विविध अर्थच्छटांसहित कोकणीत वापरात आहे. ‘आमी खूप घोस्त काडला’ म्हणजे आम्ही खूप आनंद घेतला असं वाक्य दक्षिण गोव्यात जास्त प्रमाणात घोळतं. ‘फोंड’ हा मूळ पोर्तुगीज शब्द. म्हणजे खोल खड्डा. त्याच्यावरून कोकणीत फोंडकूल म्हणजे लहान खड्डा असा शब्द घडला. ‘हांव फोंडांत पडलों’ याचे दोन अर्थ होतात. मी प्रत्यक्षात रस्त्यावरील खड्ड्यात पडलो अथवा मी त्रासात सापडलो असा. ‘फोल्ग’ म्हणजे मौजमजा, चंगळवाद. फोल्गी म्हणजे विलासी. हे शब्द सर्रासपणे वापरात आहेत. रेनकोटला आम्ही ‘कापोत’ म्हणतो. आताची पिढी हे शब्द वापरतात की नाही याची माहिती नाही. ‘काबार’ म्हणजे समाप्त.

पोर्तुगीज शब्दांचं हे वैविध्य व काही अपभ्रंश होऊन कोकणीत आलेले शब्द हा एक सागरच आहे. ‘पिकार’ (जावप-होणे), ‘पिकासांव’ हे शब्द पोर्तुगीज आहेत. ‘पिड्ड्यार’ हा शब्द कोकणी नव्हे. खराब होणे, मरणे यासाठी ‘पेड्डेर’ जालो असं अजूनही वापरतात. आरामखुर्चीला ‘वोल्तेर’ म्हणायचो आम्ही. हा शब्द सध्या तितका प्रचलित नाही.

वानगीदाखल अवघ्या शब्दांची चर्चा वर केली आहे. पण, अनेक शब्द आहेत जे पाल्हाळ होईल म्हणून घेतले नाहीत. ‘पोर्तुगीज शब्दांचा कोकणी भाषेवरील प्रभाव’ या विषयावर प्रा. एडवर्ड डी लिमा यांनी लिहिलेले पुस्तक खूपच सुंदर आहे. कोकणी अभ्यासकांनी ते जरूर शिकावं. कोशकारांनी व भाषा अभ्यासकांनी कोकणीत आलेले पोर्तुगीज शब्द यांचं संकलन करून एक वेगळा कोश विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com