पॉझिटिव्ह ‘सिग्नल’!

मकरंद टिल्लू
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

काही वर्षांनी सिग्नल पाळणारे लोकं दिसले  तर त्यामध्ये तुमचे निश्चित योगदान असेल.‘लाल’ असो वा’ हिरवा’,समाजात बदल घडवायला...पॉझिटिव्ह ‘सिग्नल’ जास्त महत्त्वाचा!!!

हाच्या टपरीवर, पानाच्या ठेल्यावर, ऑफिसमध्ये डबे खाताना... या व अशा ठिकाणी गप्पांच्या मैफिली रंगतात. वेगवेगळे विषय निघतात. उदाहरणार्थ गप्पांच्या मैफलीत ‘ट्रॅफिक सिग्नल पाळणे’ या विषयावर चर्चा सुरू होते. कोणीतरी म्हणतो, ‘‘आपल्याकडे  लोकांना शिस्तच  नाही. ‘हिरवा’ लागल्यावर  गाडी सुरू करण्याऐवजी ‘लाल’ पाहूनच लोकं पुढं जातात.’’ दुसरा त्यामध्ये भर टाकताना सांगतो, ‘‘सिग्नल बंद असताना एका तरुण मुलाने गाडी पुढे काढली. तेवढ्यात तिकडून बस आली. तो मरता मरता वाचला.’’

तिसरा म्हणतो, ‘‘आपल्या भारतातली लोकं सिग्नल तोडतात. परदेशात लोकं सिग्नल पाळतात.’’ मग तो परदेशातल्या गोष्टी सांगायला लागतो. याच विषयावर दुसऱ्या ग्रुपमध्ये चर्चा होते. त्यात अशाच स्वरूपातील मते ऐकायला मिळतात. कोणी तरी त्याबाबतचा आपला अनुभव उदाहरणांसकट रंगवून सांगतो. या सगळ्या गोष्टी आपलं मन टिपत असतं....जी गोष्ट आपण वारंवार बोलतो, ऐकतो ती आपल्या मनावर ठसत जाते. त्यातून  आपले ठाम मत होतं, की ‘लोकं सिग्नल तोडतात’!...वेळ आल्यावर आपणही ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये तेच मत सांगायला लागतो. त्यातून  समाज मन तयार होतं. थोडक्यात, समाजात गप्पांमध्ये, बातम्यांमध्ये एखादा विषय निघतो. त्यावर कोणीतरी आपलं मत मांडतो. त्याबाबतचा एखाद्याचा प्रत्यक्ष अनुभव त्या विचाराला बळकटी देतो. एखाद्या व्यक्तीबाबत, घटनेबाबत समाज सकारात्मक किंवा नकारात्मक होण्याचीही ही प्रक्रिया असते. सतत नकारात्मक ऐकून पुढं आपणही तसेच विचार करायला लागतो.

...मग एखाद्या वेळेला तुम्ही सिग्नलवर असता. तुम्हाला जायची घाई असते. एखादी व्यक्ती त्याच वेळी सिग्नल तोडताना दिसते. मनात विचार येतो, ‘सगळेजण सिग्नल तोडतात. एखाद्या वेळेला आपण तोडायला हरकत काय?’... आणि नकळत तुम्ही देखील  सिग्नल तोडून गाडी पुढं काढता. 
नकारात्मक  कृतीचं रूपांतर सकारात्मक कृतीत करायचं असल्यास आपल्याला नव्या नजरेतून जगाकडं बघावं लागतं. तुम्हाला आजूबाजूच्या जगात सकारात्मक बदल करण्याची नक्कीच इच्छा असेल, तर मग एक बदल नक्की करून तर बघा.

यापुढं सिग्नलवर उभे राहिल्यानंतर अचानक कोणी सिग्नल तोडून पुढं जाताना दिसेल. त्याच्याकडं लक्ष देऊन पाहात बसण्याऐवजी पटकन मागे बघा. अनेक लोकं सिग्नलवर उभे दिसतील. सिग्नल पाळत!!! ... रात्री-बेरात्री आजूबाजूला कुठंही पोलिस उभे नसताना सिग्नल पाळत उभी राहिलेली माणसे या नव्या दृष्टीतून तुम्हाला दिसतील. यापुढं ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये ‘ट्रॅफिक सिग्नल पाळणे’ या विषयावर चर्चा सुरू होईल. कोणीतरी या विषयावर अमेरिका, सिंगापूरच्या गोष्टी सांगायला लागेल. तेव्हा ठणकावून सांगा, ‘भारत बदलत चाललाय. लोकं सिग्नल पाळायला लागले आहेत!!!’त्यांनाही मान वळवून बघायला सांगा. तुमची सकारात्मक दृष्टी त्यांना नवीन दिशा देईल! काही वर्षांनी सिग्नल पाळणारे लोकं दिसले  तर त्यामध्ये तुमचे निश्चित योगदान असेल.‘लाल’ असो वा’ हिरवा’,समाजात बदल घडवायला...पॉझिटिव्ह ‘सिग्नल’ जास्त महत्त्वाचा!!!

(लेखक एकपात्री कलाकार व लाफ्टर योगा ट्रेनर आहेत.)
 

संबंधित बातम्या