IFFI 2021: विश्वाला जोडणाऱ्या इफ्फीचा वारसा जपा!

2004 साली गोव्यात आलेला भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात स्थिरावत आहे, याची पावती कोविडच्या कठीण कालावधीत जानेवारी 2020 मध्ये आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवाने मिळाली. वर्षभरात दुसरा असला तरीही 52 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव राज्यात आणि तोही पूर्वनियोजित कालावधीत होत असून ते आव्हान पेलण्याची जबाबदारी गोवा मनोरंजन सोसायटीवर राहाणार आहे.
IFFI 2021: विश्वाला जोडणाऱ्या इफ्फीचा वारसा जपा!
विश्वाला जोडणाऱ्या इफ्फीचा वारसा जपा!Dainik Gomantak

भविष्यातील इफ्फी च्या (IFFI) नियोजनाचा प्रारंभ इफ्फीत येणारे सिनेनिर्माते, दिग्दर्शकांसोबतच्या विचारविनिमयातून होऊ शकतो. स्थिरावणाऱ्या इफ्फीमुळे तसेच त्यातून पर्यटन, व्यावसायिक क्षेत्राला आर्थिक बळ मिळत असल्याने इफ्फीचे अधिक नेटके आयोजन व्हावे, याचीही काळजी घ्यावी लागेल. इफ्फीत जगाच्या कानाकोपऱ्यातील सिनेमाबरोबरच सिनेनिर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार, तंत्रज्ञ, गायक तसेच सिनेक्षेत्राशी निगडित प्रतिनिधी राज्यात येतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने इफ्फी वैश्विक होतो.

इफ्फीतून सरकारला फायदा, नुकसान किती होते, त्यापेक्षा राज्याच्या विकासाला चालना मिळते हे लक्षात घेऊनच इफ्फीसाठी गोव्यात नव्या साधनसुविधा उभाराव्याच लागतील. जागतिक किंवा देशातील उद्योजकांच्या सहकार्याने येत्या दोन-तीन वर्षांत त्या उभारणे शक्य आहे. राज्य सरकारला इफ्फीसाठी पूरक साधनसुविधांच्या बांधणीची योजना केंद्र सरकारला सादर करून केंद्रीय निधी मिळवता येईल. इफ्फीतील सिनेमा व्हर्चुअल माध्यमातून जगातही पोचतो. त्यामुळे कदाचित प्रतिनिधींची संख्या महोत्सवप्रेमींपुरती मर्यादित होऊ शकते, त्याचाही विचार साधनसुविधा उभारताना करावाच लागेल.

इफ्फी सृजनशीलतेला उत्तेजन देणारा असल्यामुळे राज्यातील सृजनांना त्याचा लाभ मिळायला हवा. वर्षभर इफ्फीतील साधनसुविधांचा उपयोगही व्हावा, यासाठी समांतर योजनाही हव्यात. इफ्फीचे दीर्घकालीन फायदे मिळणार असल्यामुळे दर्जेदार साधनसुविधांच्या निर्मितीला प्राधान्यक्रम हवा. या साधनसुविधांचा लाभ शेजारच्या राज्यांतील सिनेनिर्मिती क्षेत्राला गोव्यात चित्रिकरणासाठी आल्यावर होऊ शकतो. गोव्यात सिनेनिर्मितीसाठी कौशल्याचा विकास होणे यापुढे अपरिहार्य असल्यामुळे सिनेनिर्मितीसाठी आवश्यक असे अभ्यासक्रम राज्यात सुरू करता येतील. त्यासाठी काही करार इफ्फीला येणाऱ्या गोव्याबाहेरील सृजनांसमवेत होऊ शकतात.

विश्वाला जोडणाऱ्या इफ्फीचा वारसा जपा!
गोव्यात ‘इफ्फी’चे आयोजन कोणासाठी?

एक गोष्ट नक्की, की गोवा मनोरंजन सोसायटीसाठी कायमस्वरूपी कुशल मनुष्यबळ उभारण्याचीही वेळ आली आहे. मनुष्यबळासंदर्भात इफ्फीत येणाऱ्या निर्माते, तंत्रज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकते; पण दुर्दैवाने अजूनही प्रशासन गंभीर नाही. माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांच्यामुळे सिनेमासाठी मल्टीप्लेक्स संस्कृती गोव्यात रुजली. त्या संस्कृतीतूनच इफ्फी गोव्याचा झाला, हे कसे विसरता येईल? गेल्या वर्षी मल्टीप्लेक्समध्ये सुधारणा झाल्या. कोविडमुळे थिएटर्स बंद राहिल्यामुळे इफ्फीतच त्यांचा खऱ्या अर्थाने यंदा उपयोग होईल.

सृजनशीलता गोव्याच्या मातीत आहे, कौशल्याची जाण काही अंशी कै. पर्रीकर यांना होती आणि त्यामुळे त्यांनी इफ्फीचा थोर वैश्विक वारसा गोव्यात आणला असावा. या वारशाचे जतन करायचे असेल तर साधनसुविधांच्या नियोजनाबरोबरच गोमंतकीय संस्कृती, परंपरेचे, वैविध्याचे दर्शनही इफ्फीत नित्य व्हायला हवे. आयनाॅक्स प्राकारातही ते होऊ शकते. काँक्रिटीकरणात, गजबजाटातही मांडवी काठ टिकला आहे. संस्कृती, परंपरा टिकली आहे आणि इफ्फी गोव्यातील संस्कृतीचा, परंपरेचा भाग बनला आहे. इफ्फीतील वैश्विक परंपरेतून एकतेचा मंत्र, संदेश मिळतो. त्या एकतेच्या बळावरच पर्रीकर यांनी लावलेले रोप मोठे होत आहे. ते यापुढे कोणीही हिरावून घेऊ नये, यासाठी दक्षता घ्यायला हवी.

52 व्या इफ्फीचे स्वागत करताना इफ्फीची पताका आणखी उंच जाईल, हेच ध्येय राज्य सरकारसमोर हवे. चांगल्या सिनेमांबरोबरच गोव्याला लाभलेल्या आतिथ्य परंपरेचा आस्वाद विश्वाला दिल्यास ती वैश्विक पातळी का गाठू शकणार नाही? गोव्याला साहित्य, संगीत, वादनाची देणगी लाभलेली आहे ती दालनेही इफ्फीत दिसावी. इफ्फी बाजार, मोबाईल सिनेमा गोव्यातून खुलला. छोटा सिनेमाही इफ्फीतूनच मोठा झाला, जगातही पोचला. मानवतेची मूल्येही तेथेच रुजली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com