विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज ज्येष्ठ सदस्य प्रतापसिंह राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याची छाप होती. राणे यांनी विधानसभेत पाऊल ठेवण्यास आज पन्नास वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने विधानसभा कामकाज दुपारी जेवणाच्या सुट्टीसाठी थांबवण्यात आले तेव्हा त्यांचा विधानसभेच्या मधल्या भागातील मोकळ्या जागेत गौरवही करण्यात आला. या निमित्ताने सत्ताधारी व विरोधक एकत्र आले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून राणे यांचे अभिनंदन केले.
दुपारी भोजनोत्तर सत्रात विधानसभेचे कामकाज सुरू झाले, तेव्हा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडला आणि सुरवातीला केवळ विरोधी पक्ष नेते व मुख्यमंत्री त्यावर बोलतील, असे ठरले. मात्र, प्रत्येकानेच बोलण्याची इच्छा व्यक्त केली. दोन दोन मिनिटे म्हणता म्हणता, दोन तासांहून अधिक वेळ राणे यांच्यावर विधानसभेत कौतुकाचा वर्षाव होत राहिला. राणे यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे या निमित्ताने उलगडले गेले. काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस हे आता उपसभापती आहेत. त्यांनी तर राणे यांनी आपल्याला बोलावून घेऊन काँग्रेसमध्ये आणले आणि उमेदवारी घेण्यास कसे भाग पाडले आणि त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री ऐकत नव्हता म्हणून आपल्याला पैंगीण मतदारसंघातून कशी उमेदवारी दिली याचा किस्सा ऐकवला.
Goa Budget 2021:मुख्यमंत्र्यांनी केला स्थानिकांवर योजनांचा वर्षाव
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी व औद्योगिक विकास महामंडळासाठी अनेक जण टपून बसले असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री राणे यांनी ते महामंडळ आपल्याकडे कसे सोपवले. आदल्या दिवशी आपण महामंडळाचा ताबा घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आदेश कसा काढला हे ही आपल्या विशिष्ट शैलीमध्ये सांगितले, हे सारे सांगत असताना सभापती राजेश पाटणेकर यांनाही राणे यांच्याबरोबर झालेली पहिली भेट सांगण्याचा मोह आवरला नाही. आपण, एका बेकायदा बांधकामाच्या संदर्भात राणे यांना भेटलो होतो, त्यावेळी ते आपल्यावर बरेच ‘उखडले’ होते मात्र दोन दिवसानंतर त्यांनी काम सुरू करण्यास मुभा कशी दिली, हा किस्सा त्यांनी सांगितला. राणे यांच्या प्रेमापोटीच आपण एकदा काँग्रेसमध्ये उडी मारून आलो होतो, असे सांगताना त्यांना स्वतःला हसू आवरले नव्हते.
Goa Budget 2021: आर्थिक शिस्तीत कोटींची उड्डाणे
हे सगळे झाले असले, तरी आज विरोधकांनी पहिल्याच दिवशी आपल्या ‘आक्रमक बाजा’ची प्रचीती आणून दिली. सत्ताधारी आमदार एलिना साल्ढाणा यांनी रेल्वे मार्ग दुपदरीकरण यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात उत्तर देत होत्या. साल्ढाणा आपल्या शैलीमध्ये प्रश्नांची पूर्ण उकल करत विचारणा करत असतानाच प्रश्नोत्तरांची वेळ संपली. त्यामुळे सभापतींनी शुन्य प्रहराचा पुकारा केला. तरीही साल्ढाणा यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभापतींनी त्यांना परवानगी दिली नाही. यामुळे त्या नाराज झाल्या.
हीच संधी साधून विरोधकांनी या विषयावर अर्धा तास चर्चा करा म्हणून सभापतींना समोरील जागेत धाव घेतली. त्याआधी त्यांनी उभे राहून आधी मागणी केली. यामुळे सभापतींना पंधरा मिनिटे कामकाज तहकूब करावे लागले होते, पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्यामुळे ते नंतरच्या कामकाजाच्या वेळीही आक्रमकपणा दाखवतील, असे वाटत होते. मात्र तो आक्रमकपणा नंतरच्या कामकाजाच्यावेळी दिसला नाही राणे यांच्या वरील ठरावावर अनेक जण बोलत राहिल्याने अर्थसंकल्प मांडणीसाठी मुख्यमंत्र्यांना सायंकाळचे सहा वाजले..!