
श्रिया टेंग्से
वाऱ्याच्या मोठ्ठ्या झोतासरशी पावसाचा तोल जातो. तोल सावरायच्या नादात पाऊस धडपडत खिडकीशी येतो. रात्रीच्या अंधारातही त्याला माझा चेहरा दिसल्याशिवाय राहत नाही. माझ्या गालांवर उतरण्याखेरीज त्याला दुसरा आधार मिळत नाही. अवचित आलेल्या त्या ओल्या स्पर्शाने माझी चुळबुळ होते. छातीवरची गोधडी मी खसकन गालांवर ओढते. चेहऱ्यावर सांडलेले थेंब पुसते अन् गोधडीच्या पदरात तोंड खुपसून पुन्हा गाढ झोपते.
अगदी सवयीप्रमाणे खिडकीबाहेर दिसणारा चांदोबा केव्हाच ढगांआड झालेला असतो. किंचित उजळलेल्या झरोक्यांच्या कडा, कौलांवरून वाहणाऱ्या बेसुमार पावसाचा आवाज आणि सारखा तळ्यात मळ्यात खेळणारा अवखळ वारा, या सगळ्यांपासून दूर नेत, आपल्या कुशीत कवटाळून घेत, माझी गोधडी मला अंगाई गात असते.
अगदी सवयीप्रमाणे ऊन, थंडी, पाऊस; ऋतू कोणताही असो! छातीला बिलगून बसणारा गोधडीचा पदर जवळ नसेल तर डोळ्याला डोळा लागत नाही. गोधडीचा स्पर्श इतका सवयीचा! ही गोधडीतली लुगडी पूर्वी आजी नेसायची. तेव्हापासूनचं नातं आहे, माझं आणि त्या पदराचं. खेळून आल्यावर मी हातपाय धुवावेत किंवा जेवल्यावर चूळ भरून यावी, लुगड्याच्या पदराखेरीज मला हात - तोंड पुसायला दुसरं काही मिळायचं नाही.
अंगावर काही उसळून घ्यावं, खेळताना धडपडून खरचटून घ्यावं, झोपेत लाळ घोटावी किंवा सर्दी पडसं भरभरून वाहावं, थोडक्यात मी काहीही करावं आणि पदराने ते सारं काही वात्सल्याने आपल्या ओंजळीत वेचून घ्यावं. आहे इतकं माझं बालपण या पदरात सामावलेलं...
याच पदराला धरून हळूहळू उभं राहत, माझं बालपण मोठं झालेलं आई - बाबांनी डोळे वटारले की त्याच पदरामागे लपावं, कुळागरातल्या माडांतून हिंडताना त्याच पदराचं टोक आपल्या चिमुरड्या बोटांनी गच्च पकडून ठेवावं, डोळ्यात गंगायमुना भरून याव्यात अन् त्यांनाही पदराची ओढ वाटावी, रात्रीच्या अंधारात डोळे मिटल्यावर छातीशी आवळलेल्या पदराचीच सोबत व्हावी तेव्हाची ती सवय, आजही सुटली नाही.
लुगडी नेसून - धुवून जीर्ण झाली की आजी आणि आईने त्यांची गोधडी मांडायला घ्यावी. आईचं त्यातल्या त्यात एखादं चांगलंसं सुती पातळ बाहेरून आवरणासाठी घ्यावं. आणि एकदा का हा गोधडीचा घाट घातला की जवळपास आठवडाभर दुसरं वेळ घालवायचं साधन नाही. सगळी कामं उरकली, घरात आवरून सावरून झालं की दिवसभराच्या कामाने थकलेल्या हातांनी गोधडीची मांडावळ करायला घ्यावी.
पुढचा आठवडाभर मग, मागील ओसरीत गोधडीचा घाट असे. धागे घालत असताना आजीच्या शिणलेल्या डोळ्यांत अपार माया दाटून येई. कामाने रापलेला आईचा हात एक एक नाजूक धागा ओवी... दिवसभराची दगदग या मनगटात उतरलेली आणि काळजातून वाहणाऱ्या मायेने बोटं ओलसर झालेली. झोपाळलेल्या तान्ह्या बाळाला वात्सल्याने थोपटणारे आईचे हे हात तितक्याच वात्सल्याने गोधडी शिवायचे.
आजीने उभे, मोठे धागे घालायचे आणि आईने आडवे लहान धागे एक उभा धागा ओलांडून पुढे जावं, तर लगेच आडवा धागा येतो. पुन्हा उभा, पुन्हा आडवा. गोधडीचा पट संपेपर्यंत हा क्रम सुरूच. आईनं, आजीनं पांघरलेली संसाराची शालही अशीच सुख आणि दुःखाच्या उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विणलेली.
जणू त्या दोघींच्या आयुष्यातील पावला-पावलावरची गोष्ट गोधडीने अलगद झेललेली. झालेल्या मुक्या जखमांवर आपली ऊब धरलेली. सुखाच्या क्षणांची आठवण अंगाई म्हणून जपलेली. गोधडी ही अशीच जगाला आपली आणि आपल्याला जगाची ओळख होण्या’आधीपासून’ आपल्याला ओळखणारी.
नऊ महिने आईच्या गर्भाशयात शांत निजलेलो असताना राखणीचा पदर होऊन कमरेला करकचून कवटाळणारी. त्या काळात आई दगदगीच्या जगात दिवसभर वावरत असताना आपल्याला मात्र पदराआड घेऊन मऊ मऊ स्वप्नांच्या जगात वावरणारी.
गलबलाट गोंगाटापासून दूर नेत आपल्याला जोजवणारी आपल्याशी सतत खेळणारी, आपल्याला अंगाई गाणारी. आपल्या अस्तित्वाशी आपली ओळख करून देणारी अन् रात्रीच्या अंधारात आपलं अस्तित्व विसरायला लावणारी गोधडी; ही अशीच...
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.