Real Savarkar: ‘लंडन, मार्साय, अंदमान विसरा पण, रत्नागिरी लक्षात ठेवा’

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 मे 2021

सावरकरांच्या आयुष्यातील चार ठिकाणे मुख्यतः त्यांच्या कार्याशी निगडित आहेत. त्यांच्या वास्तव्याने ह्या चार ठिकाणांचे महात्म्य वाढले आहे. त्यांना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.  लंडनमधील इंडिया हाऊस, मार्साय (इंग्रजीत मार्सेलिस), अंदमानमधील सेल्युलर जेल व रत्नागिरीतील  स्थानबध्दता ही ती चार ठिकाणे होते.

सावरकरांच्या आयुष्यातील चार ठिकाणे मुख्यतः त्यांच्या कार्याशी निगडित आहेत. त्यांच्या वास्तव्याने ह्या चार ठिकाणांचे महात्म्य वाढले आहे. त्यांना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या ठिकाणांशी अन्य व्यक्तिंचाही संबंध आला. त्यांचे कार्यही तेवढेच महत्त्वाचे आहे. पण, सावरकर व ते स्थान ह्यांचे जे नाते निर्माण झाले आहे त्याने इतिहासात ठसा उमटविला आहे. त्यापेकीच लंडनमधील इंडिया हाऊस, मार्साय (इंग्रजीत मार्सेलिस), अंदमानमधील सेल्युलर जेल व रत्नागिरीतील  स्थानबध्दता ही ती चार ठिकाणे होत. लंडनमधील इंडिया हाऊस हे क्रांतिकारकांचे अड्ड्याचे ठिकाण व अभिनव भारत चळवळीचे केंद्र. मदनलाल धिंगडा, श्‍यामजी कृष्णवर्मा अशी क्रांतिकारक मंडळी तेथे असत. त्या वास्तुला लंडन महानगरपालिकेने ‘नीलफलक’ लावून कमीत कमी सावरकरांमधील विचारवंताना व तत्वज्ञाला अधिकृत मान्यता दिली आहे. मार्सायची त्रिखंडात गाजलेली उडी त्याला वेगळी मान्यता द्यायची गरज नाही.(Real Savarkar Forget London Marseille Andaman but remember Ratnagiri)

सावरकर म्हणजे ती उडी हे कोणताही भारतीय नागरिक जाणतो. त्यांच्या ह्या उडीमुळे फ्रान्स व इंग्लडमधील मतभेद (त्यापेक्षा शत्रुत्व) टोकाला पोचले होते. फ्रान्समधील विचारवंतानी, वेगवेगळ्या माध्यमांनी व मुख्यतः विरोधी पक्षांनी सभागृहात एवढा गदारोळ केला की, सत्तारुढ पक्षाला सत्ता सोडावी लागली होती. त्यावेळची ती आंतरराष्ट्रीय घटना होय. अंदमान ह्या ठिकाणाविषयी वा शब्दाविषयी अधिक सांगावयाची गरज नाही. त्यांच्या तेथील वास्‍तव्यातील अनुभव, तेथे लिहिलेले महाकाव्य, कारावासातील अनुभवांवर लिहिलेले ‘‘माझी जन्मठेप’’ हे पुस्तक इत्यादी सर्वच भारतीय मनाला रोमांचकारी वाटते. प्रत्येक भारतीयाचे अंदमानला जाणे व तेथील सेल्युलर जेलमधील त्यांच्या खोलीचे दर्शन घेणे हे एक स्वप्न असते. तसे करणे म्हणजे आपली देशभक्ती सिध्द करणे असे तो समजतो. त्यामानाने रत्नागिरी दुर्लक्षिलेले. तसे बघितले तर सावरकरांचे सर्व साहित्य (सामाजिक, वैचारिक, वैज्ञानिक) व कार्य हे रत्नागिरीच्या वास्तव्यात झाले. सावरकरांच्या रत्नागिरीतील स्थानबध्दतेच्या पदार्पणाला ह्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 100 वर्षे पूर्ण झाली. खरे तर हे एखाद्या उत्सवाच्या उत्साहाने साजरे करावयास पाहिजे.

अंत्यसंस्कारासाठी निस्वार्थपणाने मदत करणारा पेडण्याचा 'देवमाणूस'

आंतरराष्ट्रीय संबंध, सीमावाद, शेजारील देशांशी नाते ह्यातून देशभक्तीचे वातावरण करणे सोपे असते. सावरकरांची अजरामर गीते, ‘जयोस्तुते’ व ‘सागरा’ गाताना व ऐकताना अंगात स्फुरण तर येतेच. पण, आताच आपण काहीतरी केले पाहिजे असे वाटावयास लागते. वरील सर्व घटना व ठिकाणे व त्यांची पार्श्‍वभूमी हे आता एका इतिहासाचा भाग झाले आहे व त्यातून आपण काहीतरी शिकले पाहिजे एवढेच ‘सार’ निघते. (त्यातही आपण किती शिकलो आहोत हा वादाचा मुद्दा आहे.)

रत्नागिरीची गोष्ट वेगळी आहे. सावरकरांनी लिहिलेले वैचारिक, वैज्ञानिक व सामाजिक साहित्य व केलेले कार्य त्यांच्या आजच्या घडीशी संबंध आहे. किंबहुना त्यागोष्टी आपण अंगीकारच्या नाहीत हे वरील तीन ठिकाणांची निर्मिती होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे, हेही आम्ही उमगून घेत नाही. त्यांच्या ह्या साहित्य निर्मितीस व कार्यास 7 ते 8 दशकांपेक्षा जास्ती काळ गेला. पण, त्याच्या यशस्वीतेचे मोजमाप करावयास गेल्यावर ते कटाकटी 5 टक्के भरेल. त्यांचे रत्नागिरीमधील काम हेही एक क्रांतिकारक आहे, हे आम्ही मानतच नाही. त्यांच्या विचारांचा आम्ही उहापोह केला असता तर गेल्या कित्येक दशकात ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या त्या झाल्या नसत्या. सामान्य माणसाला त्यांचे विचार पचविणे अवघड जाणे हे एकवेळ आपण समजू शकतो. पण सावरकरांचे अभ्यासक, वैचारिक, वारसदार  व त्यांच्या उदो उदो करणारी मंडळी ह्यांचे काय. कधी कधी वाटते की, त्यांचे वैचारिक वारसदार हेच तर त्यांचे वैचारिक विरोधक नाही ना.

गोव्याच्या जनतेच्या मनावर राज्य करणारे मुस्लीम समाजातील पहिले मंत्री

त्यांच्या माध्यमातून ह्या काही दशकांच्या कालावधीत त्यांचे विचार व कार्य संपूर्ण समाजात पाझरले पाहिजे होते. पण तसे दिसत तरी नाही. कारण आहे त्या वारसदारांची कृतिशून्यता, निव्व्ळ चर्चा व संमेलनावर भर. इंडिया हाऊस, मार्साय, अंदमान ह्यांचा उदो उदो करणे व रत्नागिरीला दुय्यम महत्त्व देणे हा सावरकरांचा अपमानच म्हटला पाहिजे. पतितपावन मंदिरास आज अंदमानसारखे वलय प्राप्त व्हावयास पाहिजे. प्राण तळमळला पाहिजे तो समाजात दिसणाऱ्या व खंत वाटावयास लावणाऱ्या अशा सामाजिक विषमतेबद्दल आतापर्यंत शेकडो पतितपावन मंदिरे तयार होऊन एकजिनसी समाजाचे सावरकरांचे स्वप्न वास्तवात यावयास पाहिजे होते. मार्साय घटनेला 100 वर्षे झाली (2010) तेव्हा जत्रा जमली होती. रत्नागिरीच्या 100 वर्षाला ‘ना चिरा ना पणती’  
आजच्या घडीला महत्त्व आहे, ते रत्नागिरीच्या कार्याच्या उदिष्टांचे सावरकरांनी जसे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून लेखण्या मोडा, बंदुका धरा असा संदेश दिला होता. तसा त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘लंडन, मार्साय, अंदमान विसरा. पण, रत्नागिरी लक्षात ठेवा.’ हा संदेश आम्ही डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. सावरकर स्वतःच तर म्हणाले होते. माझी मार्सायची उडी एकवेळ विसरली तरी चालेल, पण माझे सामाजिक कार्य लक्षात ठेवा.

- विवेक नवरे

संबंधित बातम्या