मनोहर भाईंच्या आठवणी ‘जरा हटके’

यशवंत (सुरेंद्र) शेट्ये
रविवार, 13 डिसेंबर 2020

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमुळे मला बरेच मित्र जोडायला मिळाले. संघाची शाखा म्हणजे आमच्या बालपणीचा विरंगुळा होता आणि आजही शाखेबरोबर माझी केमिस्ट्री तशीच जुळून आहे. अगोदर सायंशाखा होती, आता मात्र प्रभात एवढाच काय तो फरक.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमुळे मला बरेच मित्र जोडायला मिळाले. संघाची शाखा म्हणजे आमच्या बालपणीचा विरंगुळा होता आणि आजही शाखेबरोबर माझी केमिस्ट्री तशीच जुळून आहे. अगोदर सायंशाखा होती, आता मात्र प्रभात एवढाच काय तो फरक. खोर्ली - म्हापसा येथील सातेरी देवीच्या प्रांगणात संघाची शाखा लागायची. स्व. बाळकृष्ण आजरेकर नित्यनेमाने शाखा लावायचे. संजय वालावलकर, अवधूत गोपाळकृष्ण पर्रीकर, विजय आपटे, दिलीप महाले, दत्तप्रसाद खोलकर, नारायण कारेकर, मगनलाल मराठे, आनंद चणेकर ही अरुणांची टीम होती, तर स्व. चंद्रकांत धाकणकर, डॉ. अनिल पडोशी, स्व. दिवाकर (दादा) जोशी, स्व. माधव केळकर, स्व. रमेश मिशाळ व सगळ्यांना पितृस्थानी असणारे पांडुरंग सामंत मास्तर अशी तरुणांची टीम होती. गोव्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले लक्ष्मीकांत पार्सेकर व आम्हा सर्वांना लहानपणापासूनच फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड वाटत आलेले स्व. मनोहरभाई पर्रीकर असे सगळेजण आम्ही संघाच्या शाखेतून घडलो.

 

‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ असे म्हणण्याजोगे ते मंतरलेले दिवस होते. शाळा, अभ्यास आणि शाखा असा आमचा सगळ्यांचा दिनक्रम लहानपणी असायचा. कधी एकदा शाखेवर जाऊन हुतुतू, आट्यापाट्या, लगोरीसारखे खेळ खेळायचं असं होऊन जायचं. या मैदानी खेळांच्या जोडीलाच नाविन्यपूर्ण अशा देशी खेळांचा पण समावेश असायचा. संघगाणी गाण्याचा तर छंदच आम्हाला लागलेला. तोंडपाठ असलेली संघाची प्रार्थना झोपेतून कुणी उठवले तरी आम्ही फाडफाड म्हणू एवढी आमची तयारी असायची. असायची म्हणण्यापेक्षा आजही आहेच म्हणा. मला संघाच्या शाखेच्या माध्यमातून स्व. मनोहरभाई पर्रीकर यांच्या मैत्रीचा झालेला परीसस्पर्श आणि त्यांच्या मर्मबंधातल्या ठेवीसारख्या जपून ठेवलेल्या आठवणी आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने नव्याने आपल्यासमोर उलगडाव्या वाटतात.

 

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं मनोहरभाईंच्या बाबतीत होतं. त्यांच्यातील नेतृत्वगुण प्रत्येक प्रसंगात, हाती घेतलेल्या कार्यक्रमात लहानपणापासूनच दिसून यायचे. तल्लख बुद्धीचे, कामात तरबेज, बोलण्यात तेज, हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्यात पटाईत, माहितीचा तर खजिनाच होते आमचे मनोहरभाई. बोलण्यात कुणाला हार जात नव्हते. पुष्कळ पुस्तके वाचायचे. वाचन दांडगे होते. स्व. तारकानाथ शिंदे यांच्या लायब्ररीतली चार चार पुस्तके एकाच खेपेत वाचून सगळी पुस्तके त्यांनी वाचून संपवलेली. अभ्यासात वरचष्मा होताच, राजकारणावर बोलताना ‘संबित पात्रां’वर वरताण करायचे. आणीबाणीच्या काळात तर बीबीसीवरून बातम्या ऐकून आम्हाला माहिती पुरवायचे. त्यांच्याकडून आयआयटीमधल्या गोष्टी ऐकताना तर जाम मजा यायची. स्वारी जात्याच हुशार, उपक्रमशील आणि चळवळ्या स्वभावाची होती. संघाचे काम करतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद अशा संघ पारिवारिक संघटनांचे काम करत कधी त्यांचा भाजप प्रवेश झाला अन् मग ‘मनोहरभाई बोले आणि भाजपा डोले’ अशी स्थिती कधी प्राप्त झाली कळलंसुद्धा नाही. तो आणीबाणीचा काळ, संघावरची बंदी या सगळ्यातून तावून सुलाखून त्यांचा झालेला भाजप प्रवेश मुख्यमंत्री बनण्याच्या इराद्यानेच झालेला. गोव्यात भाजपचे बस्तान बसवून स्वारी कधी देशाच्या संरक्षण मंत्रिपदी जाऊन बसली, हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये त्यांचा समावेश झालेला. गोव्यात भाजपला सत्तास्थानी नेऊन बसविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आमची फक्त त्यांना मनापासून साथ होती. त्यानी कोणतेही काम सांगितलं, तर ते करण्यात आम्हाला धन्यता वाटायची. त्यांनी आखलेल्या मोहिमा, काढलेले मोर्चे, धरलेली धरणी, सत्याग्रह, कारसेवा सगळ्यात आम्ही अग्रणी असायचो आणि ते आमचे अग्रेसर.

 

 

मनोहरभाईंचे नेतृत्व कसं घडत गेलं त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. ‘मनोहरभाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘हमारा नेता कैसा हो, मनोहरभाई पर्रीकर जैसा हो’ अशा घोषणा तालस्वरात देत आम्ही त्यांना घडवलं म्हटलं तरी वावगं वाटू नये. खासदार - आमदारकीच्या निवडणुकांत त्यांचा हिरीरीने प्रचार करताना काहीच कसर आम्ही बाकी ठेवत नव्हतो. कुठे सायकल फेरी, तर कुठे प्रभात फेरी, परिवर्तन यात्रा या सगळ्यांमध्ये त्यांच्याबरोबर आम्ही सहभागी व्हायचो. त्यांच्याबरोबर त्यांच्या एझडी बाईकवरून मीच सर्वात जास्त फिरलो असेन. 

 

..तो त्यांचा आजार ती त्यांची शेवटच्या दिवसातली तगमग, त्यांनी आम्हाला भेटण्यासाठी दिलेली मुभा, त्याने तर आम्ही भरून पावलेलो. संजय वालावलकरांनी घडवून आणलेल्या भेटीत आमची सर्वश्री आशिष शिरोडकर, महेश कोरगावकर, हनुमंत वारंग इत्यादींबरोबर झालेली शेवटची भेट ह्रदयस्पर्शी होती. हिमालयाएवढी उंची गाठलेल्या तरीही आमच्यासाठी मनोहरभाईच राहिलेल्या त्यांची ती अवस्था पाहून आमचं मूकरूदन चालू असताना स्वतःचा मृत्यू समोर दिसताना आमची हंसून ख्यालीखुशाली विचारणारे मनोहरभाई आजही डोळ्यापुढून हलत नाहीत. मनमनाशी तादात्म्य पावलेल्या तरल मनांची ती भेट म्हणजे एक उत्कट भावाविष्कार होता, कधीच विसरता न येण्याजोगा. तो त्यांचा अखेरचा घेतलेला निरोप होता. मनोमन त्यांना डबडबल्या डोळ्यांनी अखेरचा दंडवत घातलेला. म्हापसा गाठेपर्यंतची आमची भावावस्था मनोहरभाईंनी जे आम्हाला भरभरून दिलं त्याची उजळणी करत होती. कुणीच काही न बोलता खिन्न मनाने घर गाठलेलं. अशा ‘झाले बहू, होतील बहू, परंतु यासम हा’ असलेल्या मनोहरभाईंना आजच्या त्यांच्या जयंतीदिनी विनम्र 
आदरांजली.

- यशवंत (सुरेंद्र) शेट्ये, म्हापसा

संबंधित बातम्या