पट्टेरी वाघांची हत्या अन् आयआयटीविरुद्ध आंदोलन..!

पद्माकर केळकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

सत्तरी तालुक्यात २०२० साली जानेवारी ते डिसेंबर अशा बारा महिन्यांत दोन महत्त्वाच्या अशा घटना होऊन गेल्या. जानेवारी महिन्यात पहिल्याच आठवड्यात नववर्षाच्या सुरवातीलाच खळबळ माजून टाकणारी घटना होऊन गेली.

वाळपई :  सत्तरी तालुक्यात २०२० साली जानेवारी ते डिसेंबर अशा बारा महिन्यांत दोन महत्त्वाच्या अशा घटना होऊन गेल्या. जानेवारी महिन्यात पहिल्याच आठवड्यात नववर्षाच्या सुरवातीलाच खळबळ माजून टाकणारी घटना होऊन गेली. गोळावली गावात म्हादई वनक्षेत्राच्या क्षेत्रात घोळीन नावाने परिचित असलेल्या भागात चार पट्टेरी वाघांची हत्या झाल्याचे समोर आले होते. गोळावलीतील एका कुटुंबातील व्यक्तीची म्हैस वाघाने हल्ला करून मारली होती. त्यामुळे एका कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. दूध देणारी म्हैसचा वाघाने फडशा पाडल्याने दूध देणे बंद झाले. परिणामी आर्थिक घडी विस्कटली होती. त्याचा परिणाम म्हणून पट्टेरी वाघांना विषाचा प्रयोग करून हत्या करण्याचे धाडस करावे लागले. यात चार पट्टेरी वाघांचा मृत्यू झाला होता. त्यात नर, मादी व दोन बछड्यांचा समावेश होता. हा प्रकार समोर आल्यानंतर सरकारची झोपच उडाली होती. विशेष करून वनखात्याच्या वरिष्ठ व अन्य अधिकारी वर्गांना हे मोठे आव्हान उभे झाले होते. यात काही वाघांना जमिनीत पुरण्यात आले होते.

एकजण उघड्यावर सापडला होता. वाघाने एखाद्याची शिकार केल्यावर शिकार केलेला प्राणी तिथेच टाकतो. दुसऱ्या दिवशी वाघ आपल्या बछड्यांसह तिथे येतो व शिकार केलेला प्राणी फस्त करतो. याची माहिती असल्याने गोळावलीत देखील असेच काही घडून गेले. शिकार केलेल्या प्राण्यांवर विष टाकण्यात आले. ते नंतर बिबट्याने परिवारासहीत फस्त केल्याने चार वाघांना प्राण गमवावे लागले होते. वनखात्याच्या निष्काळजीपणाचा पर्यावरण प्रेमींनी निषेध केला होता. जानेवारी महिन्यात पहिल्याच आठवड्यात ही घटना घडल्याने पट्टेरी वाघांची हत्या ही आंतराष्ट्रीय घटना होऊन गेली. यात दोन वर्षांची वाघांची पिल्ले, चार वर्षाचा वाघ व सहा सात वर्षाची वाघीण जीवंत मारण्यात आली होती. वनखात्याने या घटनेचा तपास करीत पाच जणांना संशयित म्हणून अटक केली होती. या दरम्यान तपासावेळी वाघांची नखे गायब असल्याचे समोर आले. ही नखे मिळावी म्हणून वनखात्याने नागरिकांवर धार्मिक पध्दतीचा वापर करीत गोळावलीतील जागृत सिध्देश्वराला साकडे घातले होते. की ही नखे मिळोत. त्याचा परिणाम म्हणून काही दिवसांनी गायब झालेली नखे मंदिरात कोणीतरी ठेवलेली सापडली होती. तसेच या दरम्यान संशयितांनी वाघांची हत्या केल्याची गुन्हाची कबुली देत जागाही दाखविली होती.

यावेळी केंद्रीय वन्यजीव गुन्हा अन्वेषण विभागाच्या राजेंद्र गरवाड, अय्या मल्या आदी पथकांनी गोळावलीत भेट दिली होती. ही घटना होण्याआधी गावचा प्रसिध्द भुगत हा उत्सव होता. जो जंगल परिसरात केला जातो. या उत्सवानंतर वरील घटना समोर आली होती. एकूणच गोळावलीतील चार वाघांची हत्या प्रकरण सत्तरीत बरेच गाजले होते. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी नगरगाव पंचायत भागातील भोंबेडे गावात केबलच्या फासात अडकेला जखमी बिबटा सापडला होता. वनखात्याने गुंगीचे औषध देऊन जखमी बिबट्याला ताब्यात घेतले होते. मार्च महिन्यात कोरोगा रोगाचा फैलाव जगाच्या पाठीवर होऊ लागला. पण सत्तरी मात्र कोरोनापासून दुरच होती. पण खबरदारी म्हणून २२ मार्चपासून सत्तरीत टाळेबंदीचे पालन नागरिकांनी जबाबदारीने सुरुवातीला केले होते. सत्तरीत कोरोनाची प्रकरणी हळूहळू उदयाला येऊ लागली होती. त्याची गांभीर्यता लक्षात घेत वाळपई सरकारी आरोग्य केंद्रातर्फे विविध दक्षता म्हणून उपाय योजना हाती घेण्यात आल्या. जून महिन्यात गुळेली पंचायत क्षेत्रातील मेळावली गावात होऊ घातलेल्या आयआयटी संस्था विरोधी आंदोलनाने डोके वर काढले होते. मेळावली गावात सरकारने आपल्या सरकारी जमीनीत आयआयटी संस्था बांधण्याचा विचार पक्का केला होता. त्यावरुन गावच्या लोकांनी एकजूट दाखवित आंदोलनाला सक्रियतेने सुरुवात केली.

राज्य सरकार पासून ते केंद्र सरकारपर्यंत निवेदनांची मांदियाळी सुरू केली होती. 
मेळावली गावातील ६७/१ या सरकारी जागेत ही शैक्षणिक संस्था हाती घेतली. पण लोकांनी या जागेत उत्पन्न आहे. म्हणून संस्थेला विरोध करण्यात प्रारंभ केला. गेल्या अनेक वर्षापासून मेळावली वासीय या जागेत काजू अन्य पिक घेऊन जगत आले आहे. संस्था बांधली तर सर्व जमीन हातातून जाणार म्हणून आंदोलनाने उग्र रुप धारण केले. लोकांची सतावणूक केली जाते, दबाब आणला जातो. म्हणून वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चे काढले हे सत्र सुरू झाले. वाळपईत दोन तीनवेळा रँलीही काढण्यात आली व आमच्या जमिनी आम्हाला द्या, जमिनी नावावर करा अशा घोषणा होऊ लागल्या. याच दरम्यान मेळावलीत आयोजित केलेली पत्रकार परिषद सरकारने पोलिस यंत्रणाच्या सहाय्याने होऊ दिली नाही. परिषद घेत असेलेल्या लोकांना ताब्यात घेतले होते. या घटनेचा सोशल मीडिवरून बरीच रणधुमाळी पहावयास मिळाली. व तिथूनच आयआयटी आंदोलनाला खरी बळकटी मिळाली. व आंदोलन तीव्रतेने सुरु झाले. आयआयटी संस्थेला विरोध केला जातो. म्हणून काही सरकारी कर्मचारींच्या दूरवर बदल्याही झाल्या. एकूणच सरकार व मेळावली लोक यांच्यात जबरदस्त ठिंणगी उसळली होती. मागील महिन्यात मुख्यमंत्री डाँ. प्रमोद सावंत यांनी मेळावली गावात जाऊन आयआयटी परिसराची पहाणी केली व लोकांना विषय पटवून सांगितला होता. पण त्यावेळीही लोकांनी संस्था नकोच अशी कडक भूमिका घेतली. आता डिसेंबर महिन्यातही हे आंदोलन सुरूच आहे. 

संबंधित बातम्या