
प्रसाद पाणंदीकर
सध्या गोव्याच्या रस्त्यावर एकदम आणीबाणीची परिस्थिती झाल्याचे दिसून येते. अक्षरशः दररोज अपघात होऊन लोकांचे हकनाक बळी जाताना दिसतात. ही एक चिंताजनक बाब आहे व या परिस्थितीची कारणे शोधून त्यावर त्वरित उपाययोजना ही व्हायलाच हवी.
गोव्यामध्ये 15 लाख लोकसंख्येला जवळपास 12 लाखापेक्षा जास्त वाहने नोंदणीकृत आहेत. त्याशिवाय पर्यटकांच्या हजारो गाड्या इथल्या रस्त्यावर सतत फिरत असतात. वाहनाची संख्या लोकसंख्येच्या मानाने दररोज जास्त वाढत असते.
पण परस्पर रस्त्यांची लांबी, रुंदी व क्षमता तशी वाढत नाही. याकारणाने रस्त्यावर अतिशय वाहनगर्दी होऊन अपघात होण्याची शक्यता वाढणे साहजिकच आहे.
रस्त्यावर जे अपघात घडतात त्यांना खालील चार गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत असतात.
चालक नियंत्रण
वाहन स्थिती
रस्ता स्थिती
पादचारी वर्तन
याबाबत पूर्वीच्या लेखांत या सगळ्यांचा अनेकवेळा आढावा घेतलेला गेला आहे.
यांपैकी रस्ता अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून अपघात बघितले तर ते नियंत्रित करण्यासाठी रस्ता अभियांत्रिकी एकदम बिनचूक आणि तंतोतंत असणे गरजेचे असते.
त्यासाठी प्रत्येक रस्त्याची सुरक्षितता पडताळणी (रोड सेफ्टी ऑडिट) केली जाऊ शकते व त्या रस्त्याच्या अभियांत्रिकीत काय त्रुटी आहेत व त्या होणाऱ्या रस्ता अपघाताला कारणीभूत आहेत की नाही याचे अत्यंत तपशीलवार व शास्त्रोक्त विश्लेषण केले जाऊ शकते.
त्याच्यावर उपाययोजना केल्या जाऊ शकतात, जेणेकरून भविष्यात या कारणासाठी अपघात होऊ नयेत. म्हणून रस्ता सुरक्षितता पडताळणी म्हणजे नेमके काय, ते आपण समजून घेऊ.
रस्ता अभियांत्रिकी हे एक मोठे शास्त्र आहे. यात अनेक गोष्टी येतात. रस्त्याची रुंदी, भूमितीय संरचना, नाके व जंक्शन यांची संरचना, खड्डेविरहित पृष्ठभाग, रस्त्यावरची चिन्हे व खुणा, वर मारलेले पट्टे, पाण्याचा निचरा होण्यास गटार, अपघात झाल्यास सुरक्षितता देण्याची निष्क्रिय साधने, पादचारी सुविधा, रोषणाई इत्यादी.
यातील पडताळणीच्या दृष्टिकोनातून मुख्य गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:--
कुठल्याही रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी नजर अंतर (साईट डिस्टन्स) हे सगळ्यांत महत्त्वाचे असते. नजर अंतर म्हणजे दुसरे वाहन, पादचारी किंवा अडथळा दिसल्यानंतर, असलेल्या वेगापासून सुरक्षितपणे स्वतःचे वाहन थांबवणे.
हे अंतर पुष्कळ गोष्टीवर अवलंबून असते, त्यातील प्रमुख म्हणजे वाहनाचा वेग, चालकाची सतर्कता व भौतिक अंतर. रस्ता अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून नजर अंतर सगळ्यात महत्त्वाचे जे जाग्यावरच्या भौतिक अंतरावरून ठरते. त्यामुळे ते जागेवर जाऊन तपासणे व नसल्यास उपलब्ध करून देणे हा या पडताळणीचा एक मुख्य उद्देश असतो.
प्रत्येक रस्त्यावर व नाक्यावर किमान नजर अंतर असणे अतिशय महत्त्वाचे आहे जेणेकरून वाहने त्या अंतरात टक्कर न होता सुरक्षितपणे थांबविली जाऊ शकतात. तसेच नाक्यांची व जंक्शनची रचना शास्त्रोक्त पद्धतीची व रहदारी बेटाचा व्यास किमान असावा लागतो, जेणेकरून मोठ्यांतली मोठी अवजड वाहने लीलया त्यावर वळवली जाऊ शकतात.
रस्त्याची सर्वसाधारण रुंदी, जी त्याची क्षमता ठरवते, हा एक रस्ता सुरक्षिततेचा महत्त्वाचा निकष आहे. पण रस्ते पाहिजे तसे रुंद केले जाऊ शकत नाही कारण एकतर दुतर्फा खेटून इमारती उभ्या असतात किंवा जमीन संपादन एकदम महागडे व वर्षॉनुवर्षे चालणारे किचकट व वेळखाऊ असते. बेकायदेशीर अतिक्रमण केलेली घरे जी रस्त्याची रुंदी कमी करतात, नजर अंतर घटवतात व रस्ता अपघातग्रस्त घडवतात. त्यामुळे ती काढून टाकणे हा एक सुरक्षिततेचा अविभाज्य भाग आहे.
आदर्श रस्ता म्हणजे दुभाजक असलेला, जेणेकरून विरुद्ध बाजूची रहदारी वेगळी होते व समोरासमोरची टक्कर टळते, खड्डेविरहित पृष्ठभाग, दुचाक्यांना वेगळी वाट, पादचाऱ्यांना सुरक्षित उंचावलेला पदपथ, रस्त्यावरची सगळी चिन्हे, खुणा, गतिरोधक, पट्टे, सिग्नल, आदर्श आकाराचे चौक व जंक्शन, सगळीकडे किमान नजर अंतर, रस्ता उंचावर असल्यास बाजूला अपघाती कुंपण इत्यादी.
आपत्कालीन पद्धतीने अपघातग्रस्त रस्ता एकदम सुधारित केला जाऊ शकत नाही. फक्त कुंपण, चिन्हे, खुणा व रस्त्यावरचे पट्टे एवढे काय ते लावले जाऊ शकतात. रस्ता रुंद करायला अतिरिक्त जमिनीची गरज लागते ज्यामुळे रुंदीकरणाला पुष्कळ वेळ लागतो. रस्ता सुरक्षितता पडताळणी करण्यासाठी भारतीय रस्ता कॉंग्रेसने आयआरसी-एसपी-८८ हा खास मानक बनवलेला आहे.
ज्या जागी वारंवार अपघात होतात किंवा होण्याची शक्यता असते त्याला ‘अपघातप्रवण क्षेत्र’ म्हणतात. त्यात जर एखाद्या 500 मीटर पट्ट्यात तीन वर्षांत पाच अपघात किंवा दहा लोक मृत्यू पडलेले आहेत त्याला ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणजे ‘काळी जागा’ म्हटले जाते. तेव्हा असल्या ब्लॅक स्पॉटची खास पडताळणी होते व तिकडच्या सगळ्या त्रुटी काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.
रस्ता कितीही आदर्श असला म्हणून अपघात व मृत्यू टाळले जाऊ शकतात असे नाही. अतिवेगामुळेही अपघात घडतात. आता नव्या झुआरी पुलाचीच बातमी पाहा. तिकडे रस्ता असा आहे की ज्याच्यावर अक्षरशः विमान उतरू शकते एवढा रुंद व सरळ. पण हल्लीच अतिवेगामुळे अपघात होऊन तिथे एक दुचाकी चालक मृत्युमुखी पडला.
त्यामुळे फक्त रस्ता अभियांत्रिकी योग्य असून चालत नाही, वाहन, चालक व पादचारी सगळे योग्य वागणारे असावे लागतात. रस्ता वेड्यावाकड्या पद्धतीने ओलांडून खूपवेळा पादचारी अपघातास कारणीभूत ठरतात. सर्वोच्च न्यायालयाने वाढत्या अपघातांची दखल घेऊन एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे जी प्रत्येक राज्याला भेट देऊन ‘ब्लॅक स्पॉट’ची पाहणी व पडताळणी करते.
वर नमूद केल्याप्रमाणे रस्त्यावरची एकूण एक सुरक्षितता प्रामुख्याने चार गोष्टींवर अवलंबून असते. रस्ता अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून शास्त्रोक्त पडताळणी करून जर सगळ्या त्रुटी दूर केल्या तर त्या दृष्टिकोनातून अपघात व्हायचे बंद होतील, पण इतर तीन कारणांमुळे होऊ शकतात.
अपघात कमी होण्याच्या इतर तीन कारणांपैकी प्रमुख आहे, कायद्याचे तंतोतंत पालन करून शिस्तीने व जबाबदारीने वाहन चालवणे किंवा पादचाऱ्याने शिस्तीने व संयमाने रस्ता ओलांडणे, ज्यामुळे एकूण एक अपघाताचे प्रमाण अत्यंत कमी होऊ शकते व जी सतत बळी जाण्याची मालिका चालू झालेली ती खंडित होऊ शकते व यात चालकाची भूमिका सगळ्यात महत्त्वाची ठरते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.