भय इथले संपत नाही

Dainik Gomantak
शनिवार, 16 मे 2020

माणसांची संख्या वाढली. डाॕक्टरी इलाजाने जगण्याचे प्रमाण वाढले. पुर्वी ज्या ज्या रोगावर औषधे नव्हती त्यावरही आता औषधोपचार होऊ लागले. आजारी माणसे खडबडीत बरी होऊ लागली. एड्स, कॕन्सर सारखे रोगही वेळीच योग्य ऊपाय केले की बरे होऊ लागले, तसतसे नवीन नवीन रोग ऊत्पन्न होऊ लागले. जगात हाहाकार माजविणारा "कोरोना" , संपुर्ण जगाला वेठीस धरणारा रोग थैमान घालतोच आहे.

आनंद एम. नाईक,
पेडणे, गोवा.

कोरोनाचा विळखा हळूहळू भारतीय जनतेच्या गळ्याभोवती पडू लागला आणि सगळीच यंत्रणा खडबडून जागी झाली. ज्या विषाणूमुळे चीन सारख्या प्रगत राष्ट्रात हाहाकार माजवला त्याचे लोण जगभर पसरु लागले. अमेरिकेची परिस्थिती तर अत्यंत दयनीय झालेली आज आपण बघतो. स्पेन, ईटली, इंग्लंडला अमेरिकेने कधीच मागे टाकले. महाराष्ट्राची परिस्थितीही वाईट झालेली आहे. त्यामानाने आमच्या छोट्याशा गोव्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नसल्याने गोव्याला ग्रिन झोनमध्ये टाकून आमचे रोजचे व्यावहारही हळूहळू मार्गी लागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सर्वच भारतीयांना धोक्याची सूचना दिलेली आहे. सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिलेला असतानाही, जीवनावश्यक वस्तु बरोबरच दारुसाठीही ठिकठिकाणी रांगा लागलेल्या पाहून आश्चर्य वाटले.
वास्तविक पेडण्यातले गर्दीचे व सांस्कृतिक धर्तीचे कार्यक्रम मी कधीही चुकवत नाही, तरीही या भयानक विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दीत जाणे मी हेतुपुरस्सर टाळले. जेष्ठ नागरीकांना याचा प्रादुर्भाव जरा लवकर होतो म्हणून "ऊगाच कशाला विषाची परिक्षा घ्या? म्हणून खास करुन मी जाणे टाळले. परंतु मनात घट्ट रुतून बसलेली कोविडची भीती अजूनही काही जात नाही.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात काही आठवडे शक्यतो घरीच बसुन रहाण्याचा दिलेला ईशा--याची तिव्रताही आता हळूहळू कमी होत गेली. विशेषतः जेष्ठ नागरिकही "हम भी कुछ कम नही" थाटात सकाळी सकाळी व्यायाम करण्यासाठी म्हणा किंवा भाजीपाला आणण्यासाठी म्हणा बाहेर पडताना दिसू लागलेत. विविध वाहिन्या जागतिक व राष्ट्रीय घडामोडी पुन्हा पुन्हा सांगून परिस्थितीचे गांभीर्य विषद करीत आहेत. गोव्यात एकही पाॕझिटीव रुग्ण नसतानाही ऊगाच भीतीपोटी पोटात गोळा ऊठतो. कितीही साधा खोकला, थंडी, ताप आला तरीही लोक आता हाॕस्पिटलमध्ये जायला घाबरु लागलेत. कारण जरा कुठे लक्षणे आढळली तर निरिक्षणाखाली [observation] ठेवत असल्याने सर्वसामान्य लोकांनी त्याचा जास्त धसका घेतलेला आहे. कारण रोगावर अजूनही औषध सापडलेले नाही. काही वर्षांपुर्वी आफ्रिकेत "ईबोला" नावाच्या रोगाने थैमान घातले होते. तो वेळीच आटोक्यात आला म्हणून बरे झाले. HIV आला त्यावरही औषध नव्हते त्याची सहज आठवण आली. नवीन नवीन रोग जन्माला येतच आहेत. येणारा प्रत्येक दिवस भीती घेऊनच येतो. भीती घेरुन टाकते. माणूस मरणाइतका अन्य कोणत्या गोष्टीला भीत असेल असे मला वाटत नाही, असे प्रसिद्ध कादंबरीकार बाबा कदम यांच्या एका कादंबरीत वाचल्याचे सहज आठवले. ज्या चीन देशात हा विषाणू सर्वप्रथम सापडला आणि वेगाने फैलावला तो डिसेंबर महिना होता. ख्रिसमसची धूम होती नंतर नवीन वर्ष आले. सरत्या वर्षाला निरोप द्यायला नको? लोकांनी तो धुमधडाक्यात साजरा केला. म्हणूनच तर या विषाणूला "कोविड-१९" असे नाव पडले असावे असे म्हणतात. ज्या चीनमध्ये या रोगाची लागण लागली ते लोण जगभर पसरले आणि अमेरिकेतील मृत्यूच्या आकड्यानी चीनलाही मागे टाकले. प्रत्येक राष्ट्राने कोविड विषाला गांभिर्याने घेतले नाही म्हणून प्रगत राष्ट्रांत तो जास्त फैलावला की आमच्यापेक्षा त्यांच्या टेस्टी खुप अचूक असतात, काहीच कळायला मार्ग नाही. त्या प्रगत राष्ट्रानी सोशल डिस्टंन्सिंग गांभिर्याने घेतले नसावे म्हणून कोविडची लागण फैलावली आणि मृत्यूचा आकडा वाढला की अन्य काही कारणे होती? काहीच कळेनासे झाले आहे. लेख लिहीपर्यत २१२ देशामध्ये कोरोनाच्या विषाणूने बाधीत झालेल्यांची संख्या ३८, ४९,३३२ असून , २,६५,९१७ लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत. वृत्तवाहिन्या पहातांना भीती मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. औषधाचाही शोध लागायचा आहे आणि मनातून मरणाचे भय काही जात नाही.
आज कोणताही आजार झाला की किती तरी चाचण्या केल्या जातात. प्रत्येक पेशंटला झटपट निदान हवे असते. कार्डीवोग्राम, एक्स रे, स्कॕनींग केल्या शिवाय योग्य वेळी योग्य निदानच होत नाही. प्रगती झाली तशी नवीन नवीन यंत्रे ऊदयाला आली. गरजेपोटी काही तपासण्या, चाचण्या करुन घेणे मी समजू शकतो, परंतु केवळ मरणाची भीती घालून केलेल्या चांचण्याही करुन घेतल्या जाऊ लागल्या. कधी कधी हे अतीच होतंय असे आपल्याला नाही का वाटत? डाॕक्टर सांगतात ना, ते तञ्ज्ञ आहेत. आपल्याला त्यातले काय कळते म्हणून आपणही त्या चाचण्या करुन घेतो. कारण, मरणाची भीती अजून संपत नाही.
माणसांची संख्या वाढली. डाॕक्टरी इलाजाने जगण्याचे प्रमाण वाढले. पुर्वी ज्या ज्या रोगावर औषधे नव्हती त्यावरही आता औषधोपचार होऊ लागले. आजारी माणसे खडबडीत बरी होऊ लागली. एड्स, कॕन्सर सारखे रोगही वेळीच योग्य ऊपाय केले की बरे होऊ लागले, तसतसे नवीन नवीन रोग ऊत्पन्न होऊ लागले. जगात हाहाकार माजविणारा "कोरोना" , संपुर्ण जगाला वेठीस धरणारा रोग थैमान घालतोच आहे. भोंदू बाबांप्रमाणेच नवसाला पावणा-या मोठमोठया देवांची देवालयेही झटपट बंद करण्यात आली. नवसाला पावणारे देवळातले देवही आता दिर्घ मुदतीच्या रजेवर गेलेले आहेत. डॉक्टर, औषधालये, दवाखाने आणि पोलिस यंत्रणा हीच आता "देवालये" झालेली आहेत, हे सत्य आता कधीही नाकारता येणार नाही.
पुर्वी आमचे एकच डाॕक्टर सर्व रोगांवर औषधोपचार करायचे आणि झपटप रोगही बरे व्हायचे. आज परिस्थिती खुपच अवघड आणि बिकट झालेली आहे. प्रत्येक अवयवांसाठी आज स्वतंत्र डाॕक्टर उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्याही आज लक्षणीय वाढलेली आहे. डॉक्टरांच्या शिक्षणासाठी होणारा प्रचंड खर्च, ऊपकरणासाठी, हाॕस्पिटलच्या ऊभारणीसाठी खर्च, परिचारीका व इतर कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा खर्च, त्यामुळे भरमसाठ फी आकारणे मी समजू शकतो. गोवा सरकारने दीन दयाळ स्वास्थ्य योजना (DDSS ) राबऊन सर्वसामान्य रुग्णाची फारच मोठी सोय केलेली आहे. आज रोगांची आणि रोग्यांचीही संख्या लक्षणीय वाढलेली आपल्याला पहायला मिळते. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण निरोगी असावे. त्यासाठी कितीही पैसा खर्च करायची त्यांची तयारी असते. प्रसंगी शेत, जमिन, दागदागीने विकून अथवा स्वतःचे राहते घर देखील गहाण टाकले जाते. कर्ज काढूया आणि आरोग्य राखुया असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे. कारण आजारपण आले की मृत्यूची भीती मनात घर करते.
डाॕक्टरांचा हात लागल्या शिवाय माझा एकही आजार बरा होत नाही. ताप असो, सर्दी असो अथवा खोकला असो मला डाॕक्टरांशिवाय पर्याय नाही. एकदा अशीच मला सर्दी झाली होती. ती बरी होता होता खोकला सुरु झाला. तो खोकला थांबता थांबेना. मी कुठेतरी वाचल्याचे आठवले की सात दिवसांच्या वर सर्दी-खोकला राहिला की त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मला एखादा गंभीर आजार झाल्याच्या अविर्भावात मी तडक दवाखाना गाठला आणि सुतकी चेहऱ्याने बाहेरच्या बाकड्यावर नंबरची वाट पहात बसून राहिलो. तपासण्या झाल्या. गोळ्या व औषधे घेवून मी तडक घर गाठले. दारात पाऊल टाकताच "सौ" च्या प्रश्नांचा भडीमार सुरु झाला.
"डाॕक्टर काय म्हणाले ?
.अहो बोला ना, कोणते निदान केले?
मी गोळ्या आणि औषधाच्या बाटल्या पुढे केल्या.
" पण तुम्हाला झालय काय, ते तरी सांगा?
मी विचारले नाही. त्यांनीही सांगितले नाही. मला काय झालेय तेच मुळी विचारण्याचा मला धीर झाला नाही. एखादा असाध्य रोग असला तर....?
साधा खोकलाच तर येतोय तुम्हाला. ऊगाच जीवाला भीता बुवा तुम्ही.
डॉक्टरांकडे गेलो की माझे नेमके हे असेच होते. मला काय झालेय तेच डॉक्टरांना विचारण्याचे ध्यर्य मला होत नाही.
दैनिकांत, साप्ताहिकात किंवा मासिकात डॉक्टरी सल्ल्याचे एखादे सदर चालूच असते. काही साप्ताहिकात, मासिकांत निरनिराळे रोग आणि त्यावरील ऊपचार यांची सदरे चालू असतात. सोशल मिडीयावरही काही ठराविक माणसे अशा सल्ल्याचे रतीब सतत घालत असतात. मी मात्र असे लेख वाचायच्या भानगडीत पडत नाही, कारण काही गंभीर रोगात आढळणारी लक्षणे साध्या साध्या रोगातही कमी अधिक प्रमाणात आढळून येतातच. त्यामुळे आपल्यालाही तोच गंभीर आजार तर झालेला नाही ना, याची ऊगाच धास्ती वाटू लागते.
परदेशात म्हणे दर सहा सहा महिन्यानी स्वतःची पुर्ण तपासणी करुन घेतली जाते. त्यामुळे रोगांची पुर्वकल्पना मिळते व वेळीच ऊपचार करुन घेणे फायदेशीर ठरते. पण आपल्यापैकी किती जणांना हे परवडण्यासारखे आहे?
मागच्या वर्षी अशाच अचानक उद्भवलेल्या आजाराने माझा शेजारी गेला. काहीच ऊपचार करता आले नाहीत. झाले, मुलीने आमचे पुर्ण मेडिकल चेकअप करण्याचे फर्मान सोडले. बायकोने ते करुनही घेतले. माझी मानसिक तयारी झाली नाही. मी तो बेत लांबणीवर टाकला, कारण.....!
काल सहजच बोलता बोलता मित्राने एक गोष्ट सांगीतली. घटना आमच्याच पेडणे महालातली आहे. आज प्रत्येक कुटूंबाला आपल्या मुलांने अथवा मुलीने डॉक्टर अथवा इंजिनियर व्हावे असेच वाटत असते. मुलीची जबरदस्त ईच्छा असूनही मुलीला तीचे वडील डॉक्टर करु शकले नाहीत. तीने परिचारीकेचा मार्ग निवडला. शिक्षण झाले. एका सरकारी हाॕस्पिटलमध्ये नोकरीही मिळाली. सर्व काही छान चालले असतांना एके दिवशी कधी कधी आपल्या छातीत जळजळल्याचे वडील सांगायला लागले. परंतु खाणे-पिणे तर चालूच होते. बाबांचे संपुर्ण मेडिकल चेकअप करण्याचा मुलीने हट्ट धरला. शेवटी वडिल तयार झाले. तपाणीत कॕन्सरचे निदान करण्यात आले. त्याना तो धक्का पचवता आला नाही आणि धडधाकट वाटणारा तो जीव ऊन्मळून पडला. त्यानी अंथरुण धरले. तो ऊठलाच नाही. वडिलाना मेडिकल चेकअपसाठी नेले याचे शल्य मात्र मुलीला आजही छळते.
सद्याच्या धकाधकीच्या जीवनात एखादा शुल्लक आजारही मानसिक संतुलन बिघडवून टाकतो. त्यामुळे आपल्याला कसला तरी असाध्य रोग जडल्याचे वाटू लागते. शेवटी काय मरणाचे भय अजूनही संपत नाही.

संबंधित बातम्या