शरद पवार हेच खरे भारताचे लोकनेते

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

गेल्या सुमारे अर्धशतकाच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात दीर्घकाळ स्वत:ची नाममुद्रा उमटवणारे तथा भारताच्या सर्वांगीण विकासात अद्वितीय स्वरूपाचे योगदान देणारे शरद पवार हेच सध्या भारताचे खरेखुरे लोकनेते आहेत,

गेल्या सुमारे अर्धशतकाच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात दीर्घकाळ स्वत:ची नाममुद्रा उमटवणारे तथा भारताच्या सर्वांगीण विकासात अद्वितीय स्वरूपाचे योगदान देणारे शरद पवार हेच सध्या भारताचे खरेखुरे लोकनेते आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी व्यक्त केले.

शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी स्नेहसंवाद साधला असता या पक्षाला गोव्यात उज्ज्वल भवितव्य असल्याचे नमूद करून श्री. बर्डे म्हणाले, भारतभरातील अन्य राष्ट्रीय नेत्यांना अल्प काळ महत्त्व प्राप्त झाले; परंतु, पवारसाहेब हे सुमारे पन्नास वर्षे अविरतपणे भारतीय राजकारणात जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेले आहेत. किंबहुना, त्यांनी भारतीय जनमानसाच्या हृदयसिंहासनावर साक्षात अधिराज्य गाजवलेले आहे. गेल्या सुमारे साडेतीन वर्षांपासून आपण गोवा प्रदेश सरचिटणीसपदावर असून, या काळात पक्षाला गोव्यात दिवसेंदिवस पाठबळ मिळत असल्याचे प्रत्ययास आले, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यमान सत्ताधीशांच्या नेतृत्वाखाली भारत देश आर्थिक तसेच सामाजिकदृष्ट्या अधोगतीकडे वाटचाल करीत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भारतभरातील तसेच गोव्यातील वाटचाल आशादायक असून, या पक्षाची दिवसेंदिवस उन्नती होत आहे, असेही श्री. बर्डे म्हणाले. गोव्यात कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पक्षाच्या गोवा राज्य स्तरावरील कार्यासंदर्भात माहिती देताना श्री. बर्डे म्हणाले, मोपा विमानतळ प्रकल्पामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कित्येकदा आंदोलने करण्यात आली. विविध शासकीय अधिकारिणींना लेखी निवेदनेही सादर करण्यात आली. तसेच, इतर समाजघटकांना या विषयासंदर्भातील आंदोलनाला नेहमीच क्रियाशील पाठिंबा दिला.

श्री. बर्डे म्हणाले, म्हापसा भागातील शेतकऱ्यांची जमीन डावन टावन प्लॅनच्‍या अंतर्गत गिळंकृत करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला असता त्यासंदर्भात झालेल्या आंदोलनाना राष्ट्रवादी काँग्रेसने भरभक्कम पाठिंबा दिला. त्याबाबत आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. तसेच, पालिकेला व उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाला निवेदनेही दिली. त्‍यामुळेच ती योजना सध्या अडून राहिली आहे. त्या प्रकल्पाचे नाव पुढे करण्यात आले व नगर आणि शहर नियोजन अधिनियमांचा बडगा दाखवून सुमारे तेराशे शेतकऱ्यांची नावे जमिनमालकांच्या यादीतून वगळण्यात आली. त्‍यामुळे ते प्रकरण आम्ही उच्च न्यायालयात नेले आहे व आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.

अपुरा पाणीपुरवठा, खराब रस्ते, पाणीटंचाई, बेरोजगारी, पर्यटन व्यवसायासंदर्भात होणारी अनागोंदी अशा विविध समस्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने आवाज उठवला जात आहे. आमच्या पक्षाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील अनागोंदी खूपच कमी झाली आहे, असा दावाही श्री. बर्डे यांनी केला. कोविडसंदर्भात या पक्षाने गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात मदतकार्य केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच स्वत: टाळेबंदीच्या काळात शासकीय नियमांचे पालन करीत नसल्याने त्यांच्या विरोधात पोलिस स्थानकात तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनाही स्वत:च्या कार्यशैलीबाबत नवीन दिशा सापडली, असे नमूद करून श्री. बर्डे म्हणाले, की अशा प्रकारे तक्रारी करून सातत्याने पाठपुरावा केला नसता तर मुख्यमंत्री स्वैरपणे वागले असते व त्यामुळे, जनतेनेही टाळेबंदीच्या काळात कोविडबाबत गांभीर्य दाखवले नसते.

म्हापसा शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यात सामाजिक क्षेत्रातील इतर घटकांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही मोठे योगदान आहे. राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर म्हापशात पुन्हा सुरळीत पाणीपुरवठा झाला; परंतु, आता पुन्हा या समस्येने डोके वर काढलेले आहे. त्यामुळे, आम्ही सोमवार १४ रोजी म्हापसा येथील पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे ठरवले होते; तथापि, त्या दिवशी जिल्हा पंचायत निवडणुकीची मतमोजणी असल्याने ते आंदोलन आता मंगळवार १५ रोजी होणार आहे, असेही श्री. बर्डे यांनी स्पष्ट केले.

म्हापसा येथील श्री बोडगेश्वर शेतकरी संघाचे अध्यक्ष या नात्याने बोलताना श्री. बर्डे म्हणाले, देशभरातील शेतकऱ्यांच्‍या विरोधातील जाचक विधेयके मागे घेण्‍यात यावी या मागणीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच या पक्षाच्या गोव्यातील पदाधिकाऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दिला असून,  पक्षाचे पदाधिकारी पुढील आठवड्यात दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनानाला पाठिंबा देणार आहोत. गोव्यातील शेतकऱ्यांचा देभभरातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचेही श्री. बर्डे यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या