प्रवाहासोबत बदलायला पाहिजे कारण आयुष्य खूप सुंदर आहे.

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

ध्याचे युग हे निश्‍चित आणि अनिश्‍चितीचे आहे. प्रत्येक क्षेत्रात वारंवार बदल घडत आहेत. आज प्रगतिपथावर असलेले तंत्रज्ञान चार दिवसात कालबाह्य ठरते. आजच्या या बदलत्या प्रवाहात प्रत्येकाने स्वतःला सामावून घेण्याची गरज आहे.

ध्याचे युग हे निश्‍चित आणि अनिश्‍चितीचे आहे. प्रत्येक क्षेत्रात वारंवार बदल घडत आहेत. आज प्रगतिपथावर असलेले तंत्रज्ञान चार दिवसात कालबाह्य ठरते. आजच्या या बदलत्या प्रवाहात प्रत्येकाने स्वतःला सामावून घेण्याची गरज आहे. अन्यथा वारंवार बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण कुठेतरी बाजूला फेकले जाण्याची भीती आहे. त्यासाठी या क्षणाला प्रत्येकाने स्वतःला अपडेट ठेवण्याकडे गांर्भियाने पाहण्याचीही गरज आहे.

सतत बदलत्या जगात स्वतःवर विश्‍वास नसल्यास गुरूचे मार्गदर्शन घेणे उचित ठरणार आहे किंवा ऑनलाईन शिक्षणाचे सध्याचे युग असून प्रत्येक गोष्टीमध्ये ऑनलाईन शिक्षण घेण्याची मुभा आजच्या घडीला सर्वत्र उपलब्ध आहे. शिवाय स्वतःमध्ये बदल घडवून दिनक्रम बदलून करावी. अन्यथा माणसाच्या विचारांमध्ये, वातावरणामध्ये आणि मानसिकतेमध्ये बदल घडत नाही.

माणसाचे जीवन सध्याच्या फ्लॅट सिस्टम पद्धतीमुळे एकदम फ्लॅट होऊन गेले आहे. फ्लॅटमध्ये राहणारे कुटुंब ज्याप्रमाणे स्वतःला त्या फ्लॅटमध्ये बंदिस्त करून घेते. त्याचप्रमाणे माणसाचे विचार ही मर्यादित स्वरूपाचे उरतात. माणूस समस्यांच्या गर्तेत हरवल्याप्रमाणे वागतो. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त तो इतरांशी फारसा बोलत नसतो, फलस्वरूप काय असेल हे सांगण्याची गरज नाही.

मित्रांनो समाजात वावरत असताना एक गोष्ट आपण प्रत्येकाने ताडली पाहिजे. घरातील किंवा कामावरील समस्येबाबत बोलत राहणं हे सर्वात मोठे व्यसन असते. अशा व्यसनापासून माणसाने चार हात लांब राहून स्वतःच्या किंवा कुटुंबातील एखाद्या आनंदाविषयी बोलून सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपआपसात उद्‌भवलेल्या वादावर वरचढ ठरण्यासाठी मौन बाळगण्यात खरे समाधान असते.

सदासुखी जीवन जगण्यासाठी आपण प्रत्येकांने कार्यतत्पर राहण्याची खरी गरज आहे. ही कार्यतत्परता माणसाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात ठेवण्याची गरज आहे. क्षुल्लक गोष्टीवर बारकाईने विचार करावा, बारीकसारीक समस्या सोडविण्यासाठी आकाश-पाताळ एक करण्याची पध्दत अवलंबू नये. स्वतः हा विचार करून त्यावर योग्य तोडगा काढल्यास ते एक उचित स्वरूपाचे काम ठरेल. शिवाय आपल्या भावनांचा अनादर करणाऱ्या व्यक्तीपासून आपण चारहात दूर राहण्याची गरज असते, अशा लोकांशी अधिक जवळीक वाढवू नये. मित्रांनो एक गोष्ट प्रत्येकाने आपल्या गाठीला बांधण्याची आवश्‍यकता आहे. भूतकाळाकडे अधिक गांभीर्याने पाहू नका. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा अधिक पश्‍चात्ताप करू नये, कारण भविष्याकडे सक्षम नजरेने पाहणारी माणसे आणि आपले कार्य सुधारणारी व्यक्ती जीवनात नक्कीच यशस्वी होतात. असा माझा ठाम विश्‍वास आहे. चाणक्‍यनीती सांगते दुसऱ्यांच्या चुकामधून शिका, स्वतःवर प्रयोग करून शिकणाऱ्यांना आपले वय सुध्दा कमी पडणार आहे.

मित्रांनो आपण जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिल्यास या जगात अशक्‍य अस काहीच नाही. अशक्‍य गोष्टी शक्‍य करण्यासाठी माणसाच्या मनगटात ताकद व स्वतःमध्ये जिद्द व चिकाटी असण्याची गरज आहे. अशक्‍य हा शब्द माणूस आपल्या सोयीप्रमाणे तयार करतो. तोच माणूस अशक्‍य असणाऱ्या गोष्टी शक्‍य करून दाखवत असतो. कधीकाळी माणूस आकाशात उडेल असं कुणाला तरी पूर्वीच्या काळात वाटलं असेल. नक्कीच नसेल मात्र विमानाचा ज्यावेळी शोध. लागला त्यावेळी माणसाला आकाशात उडणं शक्‍य झालं. मित्राने जन्मास आलेली  व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने महान होते, जन्माने नव्हे.

मी म्हणजे सर्वकाही अशा गुर्मीत राहणारी माणसं हा खरा म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. आपल्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही. अशी बिरुदावली मिटवणाऱ्या माणसांमुळे समाजात थोड्या प्रमाणात एकमेकांमध्ये दुरावा होतो. मी म्हणजेच सर्वस्व आहे असे जो माणूस म्हणतो त्यासंबंधी संत तुकाराम महाराजांचे विचार मुद्दाम नमूद करावेसे वाटतात. संत तुकाराम महाराज सांगतात जी व्यक्ती अशा प्रकारच्या सर्वस्वाबद्दल बोलते ती व्यक्ती सहजपणे इंद्रियाधीन होते. इंद्रियाधीनता माणसाला मानवतेपासून चार हात लांब नेण्याचे काम करते. अर्थात माणूस इंद्रियांचे चोचले पुरविण्यासाठी बऱ्याच वेळा नको असलेले उपद्‌व्याप करत असतो त्याचे ते उपद्‌व्याप त्याला कळत न कळत ईर्षा, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार आदींमध्ये अडकून टाकण्यात यशस्वी होतात. त्यासाठीच माणूस ओठात एक आणि पोटात एक असा वागतो. त्याचे ते वागणे इतरांसाठी घातक असते. असं नाही तर ते त्याला स्वतःला ही खूप  घातक ठरणारे असते.

मित्रांनो, सध्याच्या जगात मानवी जीवन जगणे वाटते तितके सोपे नाही, संघर्ष हा जीवनाचा आजच्या घडीला अविभाज्य घटक बनला आहे. संघर्षाशिवाय आज काहीच शक्‍य नाही, मित्रांनो म्हटलंय आहे ना, देवाशिवाय देव्हाऱ्याला महत्त्व नाही आणि पाषाणावर हातोड्याचे घाव बसल्याखेरीज दगडसुध्दा देव बनत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनतीला महत्त्व आहे. जीवन सफल बनविण्यासाठी पायांवर पाय ठेवून न बसता शीघ्रगतीने बदलणाऱ्या काळाच्या अंतरगाथा ठाव घेऊन त्यानुसार बदलण्यासाठी प्रत्येकाने सज्ज राहिले पाहिजे. कारण काळ हा कुणासाठी थांबत नसतो, त्याला थांबविण्याची शक्ती आजच्या घडीला माणसामध्ये नाही. बदल हेच सातत्य आहे. त्यानुसार स्वतःला बदलून घेणे म्हणजेच जगण्याची आजची खरी पध्दत आहे.
राहणीमान इतकं गतिमान झालेलं आपण पाहतो की आयुष्यात जे काही मिळवायचं असले ते योग्यवेळेत मिळविण्याची गरज आहे. कारण एकंदर गोष्टीचा आढावा घेतल्यास आयुष्य आपल्याला संधी कमी आणि इतर नको असलेले व्याप अधिक देत असते. या सर्वांवर मात करत जीवन जगणं ही एक कला आहे. त्यासाठी हास्य नसेल तर आयुष्य कमकुवत होतं तो कमकुवतपणा बाजूला सारण्यासाठी सर्वजण कटिबद्ध होऊ या.

संबंधित बातम्या