आम्‍हांला स्‍नेहाचा अभिमान, स्नेहा विद्यार्थी दशेतही होती ‘लीडर’!

पाकिस्तानला दहशतवाद थांबवा, असे संयुक्त राष्ट्रसभेच्या आमसभेत स्पष्ट शब्दांत सांगणारी स्नेहा आमच्या शाळेत शिकली
आम्‍हांला स्‍नेहाचा अभिमान, स्नेहा विद्यार्थी दशेतही होती ‘लीडर’!
Sneha Dubey was also leader in school timeDainik Gomantak

मडगाव: काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान यांना संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत खडे बोल सुनावणारी भारताची सचिव स्नेहा दुबे (Sneha Dubey) ही विद्यार्थी दशेत असतानाही ‘लीडर’च होती. आपले म्हणणे ठामपणे मांडून ते दुसऱ्यांना पटवून देण्याची हातोटी तिला त्यावेळीही होती.

स्नेहाचे विद्यालयीन शिक्षण ज्या शाळेत झाले त्या मनोविकास शाळेच्या शिक्षकांनी तिच्या आठवणी जागवल्या. 1999 ते 2003 अशी चार वर्षे स्नेहाने या शाळेत शिक्षण घेतले होते. याच शाळेतून 2003 साली दहावी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ती पुण्यात गेली होती.

मनोविकासच्या माजी संचालक तेरेझा आल्मेदा यांनी स्नेहाबद्दल सांगितले, की ती तशी जास्त बोलणाऱ्यांपैकी नव्हती, पण आपले विचार ती ठामपणे मांडायची. शाळेत तिचा मित्र-मैत्रिणींचा गोतावळाही बराच मोठा होता. स्नेहाचे वडील त्यावेळी गोव्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होते आणि त्यांचे कुटुंब कोलवा येथे राहायचे. स्नेहाने मनोविकास शाळेत जरा उशिराच प्रवेश घेतला होता. मात्र, लवकरच तिने सर्वांशी जुळवून घेतले, असे आल्मेदा यांनी सांगितले.

Sneha Dubey was also leader in school time
UN मध्ये पाकिस्तनला खडसावणाऱ्या स्नेहा दुबेचं गोवा कनेक्शन

आल्मेदा म्हणाल्या, आम्ही आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा ठेवायचो. त्यावेळी ती आपले म्हणणे ठामपणे मांडायची. शिक्षकांनाही ती आपले म्हणणे पटवून द्यायची. शालेय शिक्षण संपल्यावर ती पुण्यात शिकायला गेली, तरी नंतर शाळेच्या एका स्नेहसंमेलनाला ती आवर्जून उपस्थित राहिली होती, असे त्यांनी सांगितले.

आम्‍हांला स्‍नेहाचा अभिमान

पाकिस्तानला दहशतवाद थांबवा, असे संयुक्त राष्ट्रसभेच्या आमसभेत स्पष्ट शब्दांत सांगणारी स्नेहा आमच्या शाळेत शिकली याचा आम्हांला अभिमानच आहे, अशी प्रतिक्रिया तिची इंग्लिशची शिक्षिका आणि त्यावेळच्या मुख्याध्यापिका गीता चोप्रा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, स्नेहा ही 2003 च्या तुकडीची हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या त्या तुकडीत आणखीही काही हुशार विद्यार्थी होते. मात्र, त्या सर्वांत ती उठून दिसायची. तिला तिच्या वडिलांनीही बरेच प्रोत्साहन दिले. पालक-शिक्षक संघटनेच्या बैठकीला ते जेव्हा हजर असायचे त्यावेळी ते असेच दुसऱ्यांना प्रोत्साहन द्यायचे. स्नेहानेही आपल्या वडिलांचेच गुण उचलले, अशी प्रतिक्रिया चोप्रा यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.