कोकणी मराठीचे अद्वैत गोदातीरी साकार

मराठी भाषा ही महाराष्ट्राप्रमाणे गोव्याचीही आहे यात शंका नाही. या संदर्भात आतापर्यंत अनेक संशोधकांनी पुराव्यासह हे सिद्ध केलेले आहे.
ADV. Ramkant Khalap
ADV. Ramkant KhalapDainik Gomantak

रमाकांत खलप

भूमी ही भूमी कुसुमाग्रजांची. त्यांनाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. ते सांगून गेलेत ,

कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले

कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले

कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले

स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती

मातीवर चढणे एक नवा थर अंती !

पंधराव्या शतकाच्या अखेरीस गोव्यातील श्री गोकर्ण मठाचे मठाधिपती श्रीजीवोत्तमतीर्थ आसेतु हिमाचल पदभ्रमणास निघाले. त्यांनी हिमालयातल्या बद्रीकेदारसह अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. या तीर्थयात्रेत गोदा तटावरील नाशिक तीर्थस्थळीही ते आले.

त्यांनी आपल्या भ्रमणाचा वृत्तान्त काव्य रूपात लिहिला. ‘तीर्थावळ’ हे त्यांच्या दीर्घ काव्याचे नाव. गोमंतकीय संशोधक डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांनी या काव्यातल्या काही ओव्या, ‘गोमंतकाचा मराठी वारसा’ या आपल्या संशोधन ग्रंथात उद्धृत केल्या आहेत. नाशिक संदर्भात तीर्थावळीतले शब्द असे आहेत.

तीर्थावळ

नमुनि साधुसंतां विठ्ठलाचे भक्तां ऐकावि अणुभवाची मात। पंढरीविणे निघालों म्हणती हें बोलणे सकळींका (प्रत) ।

गेलों नरसिंहपुरा नरसिंहां दर्शनें पातकां पुरवील अंत। निरभिउरें तिरीं संगमी स्नान जें करितां धन्य जालों कृतकृत्य ।

गेलों गोदावरी पाहिली नाशिका करूं दर्शन जेथ गाव । पंचवटिके गुंफे सीतासहित जेथ स्वामी होते रघुनाथ ।

पाहिली ब्रह्मगिरी केली प्रदक्षिणा वैतरणीये प्रणिपात । गंगाद्वार तेथे स्नान करुनियां कुशावती यशस्नात ।

जपध्यान पूजा करुनि तिचे ठायी आनंदलो हृदयात । धन्य झालों कृतकृत्य झालों ।

पण आरत पंढरपुरीं माझा स्वामी ।

तो विठ्ठल हरि ।।१॥

सुमारे ६०० वर्षानंतर गोव्यातले आणखी एक मठाधिपती आज आमच्यासोबत नाशिक क्षेत्री आले आहेत. ते मडगावचे. मडगावचे जुने नाव मठग्राम. त्याअर्थाने आदरणीय दामोदर मावजो मठग्रामाधिपती आहेत. कोकणी या नवभाषेचे ते आद्य प्रणेते आहेत.

आमच्या गोवेकर मित्रांनी कोकणी भाषेच्या प्रगतीसाठी एक खास मठ उभारला. हा मठ आता खूप मोठा झालाय. दामोदर मावजो या कोकणी मठाचे खरे मठाधीश आहेत. त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या प्रसवल्या.

त्यांना अनेक पुरस्कार लाभले. त्यांच्या वाङ्मयाची अनेक भाषांत रूपांतरे झालीत. त्यापैकी ‘कार्मेलीन’ या त्यांच्या कादंबरीस ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. आपण त्यांचा इथे गौरव केलात. त्या गौरवात मला आणि नामदार सुधीर मुनगंटीवार यांना सहभागी करून घेतलेत.

माझा हा बहुमान आहे. मी तीर्थावळीचे शब्द उचलून म्हणू इच्छितो की, मी आज धन्य झालो, कृतकृत्य झालो!

गोव्याची साहित्य परंपरा फार जुनी आहे. शामराज ऊर्फ कृष्णदास शामा या गोवेकरी गावकराने १५२६साली श्रीकृष्ण चरित्रकथा या काव्य ग्रंथाची रचना केली. या ग्रंथाची हस्तलिखित प्रत आजही पोर्तुगालमध्ये ब्राग येथील ग्रंथ संग्रहालयात उपलब्ध आहे.

१५७९साली फादर स्टीफन्स या पाद्रीचे आगमन गोव्यात झाले. त्याने कृष्णदास शामा यांच्या मूळ श्रीकृष्ण चरित्रग्रंथाची रोमन लिपीतली प्रत तयार केली असा कयास प्रसिद्ध संशोधक अ. का. प्रियोळकर व डॉ. पिसुर्लेकर यांनी मांडला केला आहे. डॉ. वि. बा. प्रभुदेसाईंना श्रीकृष्णचरित्रात मराठीचा स्पष्ट शब्दांत उल्लेख आढळला.

म्हणोनि सुत झाला सांगत । तो कृष्णदास सामा सुत । दशम स्कंदीचा सांगेन वृत्तान्त । मराटीया ।

मुखा आणि प्रतिमुखा । दोहिंसि अंतर जितुका। तितुंके आम्हि आणि शुका। केलें घडे। २३९।

अग्नि आणि स्फुलिंगा। जंवबिंधू आणि मेघा। सागरा आणि तरंगा। जितुला पाडु ।४०। तितुकें आम्हा आणि तया। संस्कृता आणि मराटेया । बोल आले प्रेमे या। कथेलांगीं।

कृष्णदास या नावाच्या धरतीवर ख्रिस्तदास या नावाने फादर स्टीफन्स यांनी आपल्या ख्रिस्तपुराणात मराठी भाषेचा गौरव खालील शब्दात केला आहे.

जैसी हरळां माजि रत्नाकिळा। कि रत्नां माजि हिरा निळा । तैसी भासां माजि चोखळा ।

भासा मराठी। (१२२)

जैसी पुस्पां माजि पुस्प मोगरी । कि परिमळां माजि कस्तुरि।

तैसी भासां माजि साजिरी मराठिया। (१२३)

पखिआं मधें मयोरु । वृखीआं मधें कल्पतरू ।

भासां मधें मानू थोरु । मराठीयेसि । (१२४)

तारां मधें बारा रासी । सप्त तारां माजि रवी ससी ।

यां दिपीच्यां भासां मधें तैसी । बोली मराठिया ।

शिवाजी महाराजांनी गोव्यातल्या नार्वे येथील श्रीसप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवालयाच्या महाद्वारावर असलेल्या शिलालेखात ‘श्रीसप्तकोटीश शके १५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ:॥ असे शब्द आहेत. जीर्णोद्धारास १३ नोव्हेंबर १६६८ रोजी सुरुवात करण्यात आली.

फादर स्टीफनच्या ख्रिस्तपुराणाप्रमाणेच इतर काही पाद्रींनी मराठीत वाङ्मय निर्मिती केली. पाद्री मानुयल जाकीस-द-नरोनिया यांचे ‘ख्रिस्ताचे यातना गीत’ या नावाचे मराठी काव्य उपलब्ध आहे. त्यातल्या ‘साबात मातेर’ यातली दोन कडवी वाचण्याचा मोह मला होतोय. येशू ख्रिस्ताला क्रूसावर लटकवल्यानंतर त्याची माता मेरी फार दुःखी होते. कवी लिहितो

देवमाता दुःखी फार गाळूनी अश्रूंची धार,

क्रुसाशी उभी राही।

त्यावरी पुत्रा पाहूनी, तरवार भोसकूनी

तिच्या हृदयी जाई...

कती क्लेशे व्यापलेली किती खेदें भरलेली

होती धन्य माता ती ।

माया तिच्या हृदयाची, आणि यातना पुत्राची

यांना सीमा नव्हती ....

मातेला असे पहावे आणि रडू न पावावे

तो पाषाणे हृदयी ।

माता पुत्राशी मिळूनी दुखींता जाई सोडूनी

ऐसा कोण निर्दयी....

ADV. Ramkant Khalap
दाक्षिणात्य होयसळ मंदिरे

मराठी भाषा ही महाराष्ट्राप्रमाणे गोव्याचीही आहे यात शंका नाही. या संदर्भात आतापर्यंत अनेक संशोधकांनी पुराव्यासह हे सिद्ध केलेले आहे. तथापि कोकणी हीच खरी गोमंतकीय भाषा आहे आणि मराठी ही उपरी आहे, असा वाद गोंमतकांत स्वातंत्र्यानंतर जोरकसपणे उभा राहिला.

गोमंतकाच्या स्वातंत्र्यानंतर लगेच महाराष्ट्रवादी गोमंतक नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाला. मराठी ही गोव्याची भाषा आणि कोकणी ही तिची बोली असा स्पष्ट ल्लेख म. गो. पक्षाच्या घटनेत होता. गोव्याचे विलीनीकरण महाराष्ट्रात व्हावे, अशी मागणी या पक्षाची होती.

१९६७साली ओपिनियन पोल घेतला गेला. त्यांत विलीनीकरणवाद्यांचा पराभव झाला. स्व. दयानंद बांदोडकर त्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने जनमत कौल (ओपिनीयन पोल) मान्य केला.

त्यांच्या निधनानंतर मी त्यांच्या जागी निवडून आलो. १९७६साली गोव्यात आणखी एक निवडणूक झाली त्यावेळी अधिकृतरीत्या कोकणी व मराठी या दोन्ही भाषा गोव्याच्याच आहेत, अशी भूमिका घेतली.

पुढे १९८४साली म. गो. पक्षाने आपल्या घटनेत बदल केला आणि दोन्ही भाषांना मान्यता दिली. पुढे मराठी व कोकणी या दोन्ही भाषा शासकीय व्यवहाराच्या भाषा असाव्यात, अशी भूमिका घेतली. त्यानुसार दोन्ही भाषा अधिकृतरीत्या शासकीय व्यवहाराच्या भाषा म्हणजेच राज भाषा झाल्या.

ADV. Ramkant Khalap
ब्राह्मणांचे संरक्षक क्षत्रिय

अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर शासकीय भाषा कायदा किंवा राजभाषा कायदा विधानसभेने संमत केल्यावर हा वाद आता जवळजवळ शमला आहे. हा कायदा भारतीय घटनेच्या कलम ३४५नुसार पारीत करण्यात आला आहे. या कलमाची भाषा सुपरिचित आहे.

Art 345: Official Langauge and Language of state - subject to the provision of article 346 and 34%, the legislature of a state may by law adopt any one or more of the languages in use in the State or hindi as the language or languages to be used for all or any of the official purposes of the State.

Provided that, until the legislature of a State otherwise provides by law, the English language, shall continue to be used for the official purposes within the Stare for which it was being used immediately before the commencement of this constitution.

गोव्यात दोन्ही भाषा कोकणी आणि मराठी प्रचलीत असल्यामुळे दोन्ही भाषा शासकीय व्यवहाराच्या भाषा म्हणून गोवा विधानसभेने स्वीकृत केल्यामुळे हा वाद आता शमला आहे. या संदर्भात गोव्यातल्या मराठीवाद्यांनी मोठा समंजसपणा दाखवला.

कोकणीला त्यांनी मुळीच विरोध केला नाही. उलट कोकणीच्या उत्कर्षासाठी कोकणीबरोबर रोमन लिपीतल्या कोकणीसही किमान 10 वर्षांची मान्यता मिळावी आणि कोकणी भाषा अनेक प्रकारे लिहिली बोलली जात असल्यामुळे प्रमाण कोकणी भाषा सिद्ध करण्यासाठी खास कमिशन नेमण्याचा आग्रहही आम्ही धरला होता. त्यात यश आले नाही ही गोष्ट अलाहिदा.

ADV. Ramkant Khalap
संस्कृतीच्या उदयास्ताची सूर्यकिरणे

कुठलीही भाषा त्या त्या भाषकांचे अनमोल असे वैभव असते. आम्हा गोंमतकीयांस मराठी आणि कोकणी या दोन्ही भाषांच्या रूपाने सरस्वती प्रसन्न झाली आहे. अवघ्या २५ वर्षांत कोकणीला प्रथम वाङ्मयीन भाषा म्हणून साहित्य अकादमीने मान्यता दिली.

पुढे कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषा गोव्यातल्या शासकीय भाषा म्हणून कायद्याद्वारे मान्य करण्यात आल्या. शिवाय घटनादुरुस्ती करून घटनेच्या आठव्या परिशिष्टात कोकणीचा समावेश करण्यात आला. कोकणी आमच्या ओठी गोडावली आणि मराठी आमच्या हृदयांत विसावली, अशी आजची परिस्थिती आहे.

या संदर्भात एक खंत मला व्यक्त करावीशी वाटते. देशाची साहित्य अकादमी विविध राज्यांतील साहित्याला पारितोषके देते. गेल्या दोन दशकांत कोकणी साहित्याला साहित्य अकादमीने अनेक पुरस्कार दिले. परंतु गोव्यातल्या मराठी साहित्याची साहित्य अकादमी नोंद घेत नाही,

ADV. Ramkant Khalap
Restaurants In Panjim: डाऊन द रोड- रिव्हरफ्रंट

ही वस्तुस्थिती आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही आधुनिक गोमंतकीय मराठी साहित्याला कितपत मान देते याचा विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांनी करावा, असे मला सुचवावेसे वाटते.

एकंदरीत वसंत व्याख्यान मालेने कोकणीला आपल्या व्यासपीठावर मानाचे स्थान दिले, ही घटना आम्हा गोमंतकीयांना अभिमानास्पद आहे. मराठी कोकणीतल्या अद्वैताचा साक्षात्कार या पवित्र भूमीवर तुम्हाआम्हांस घडला आहे.

गोवा हा बृहन्महाराष्ट्राचा भाग आहे. बृहन्महाराष्ट्राची अभिनव कल्पना १९२३मध्ये गोमंतकातच मांडली गेली. याची आठवण मराठी ज्ञानोपासकांनी ठेवावी, अशी नम्र विनंती करतो. देवभूमी गोमंतकमधून आलेले आम्ही दोघे देवभूमी नाशिकमधल्या गोदातीरी उभे आहोत.

तुमच्या रूपाने सीतामाई आणि रघुनाथ यांचेच दर्शन आम्हाला होत आहे. तुम्हांद्वारे त्या अलौकिक युगुलास प्रणाम करून माझे शब्द आटोपते घेतो. नमस्कार!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com