खिलाडूवृत्तीच्या भाऊंची उणीव आजही

खिलाडूवृत्तीच्या भाऊंची उणीव आजही
Bhausaheb Bandodkar

भारत देश १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वतंत्र झाला. मात्र, गोवा-दमण-दीव हे प्रदेश विदेशी सत्तेच्या कचाट्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यास आणखी १४ वर्षे, ४ महिने व ४ दिवस वाट पहावी लागली. साडेचार शतकांची पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भारताच्या लष्कराला सशस्त्र कारवाई करावी लागली. १९६३ मध्ये या संघप्रदेशाची पहिली विधानसभा घडवण्यासाठी डिसेंबर महिन्यात निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला विजय मिळाला आणि त्या पक्षाचे प्रमुख असलेले दयानंद बाळकृष्ण बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
पहिली १७ वर्षे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने गोवा दमण व दीव या संघप्रदेशावर राज्य केले. त्यातील साधारण दहा वर्षे दयानंद बांदोडकर मुख्यमंत्री होते. त्या काळात गोव्याच्या विकासाचा पाया घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांनी ती उत्तमप्रकारे पार पाडली. शिक्षण, उद्योग, पाटबंधारे, शेती, कला, संस्कृती या क्षेत्रात प्रगतीचा मोठा पल्ला या काळात गाठण्यात आला. दयानंद बांदोडकर, मुख्यमंत्रिपदावर असतानाच १२ ऑगस्ट १९७३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
दयानंद बाळकृष्ण बांदोडकर म्हणजेच भाऊसाहेब. मात्र गोमंतकीयांचे फक्त भाऊ..! ‘साहेब’ हे संबोधन गोमंतकीयांच्या अरे-तुरे मनोवृत्तीला जुळणारे नाही. साहेब, राव ही संबोधने महाराष्ट्रातील, ती सन्मान व आदर दर्शक आहेत. गोव्यात तसे नाही. अरे तुरेतही जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य सारेकाही आहे. अरे-तुरेला गोव्यात मानापमान चिकटत नाही. मुक्तीपूर्वी गोमंतकीयांचे फक्त भाऊ असलेले भाऊसाहेब झाले ते गोव्याच्या मुक्तिनंतर, महाराष्ट्रातील लोकांनी त्यांच्या परंपरेप्रमाणे त्यांच्या नावाला साहेब हे बिरुद चिकटवल्यानंतर! तोवर दयानंद बांदोडकर ही व्यक्ती गोमंतकीयांचे भाऊ होते. भाऊंचे भाऊसाहेब झाले तरी त्यांच्यात आणि गोमंतकीयांत दुरावा कधीच निर्माण झाला नाही. वर्तमानपत्रांतून, जाहीरसभांतून भाऊसाहेब झालेले जनतेच्या दृष्टीने भाऊच राहिले.
आजही कोणत्याही गावात गेलात तरी भाऊंची आठवण सांगणारी एक तरी व्यक्ती भेटतेच. भाऊंची या मातीशी, जनतेशी, त्यांच्या प्रश्नांशी, सुख-दुःखाशी, जीवनाशी नाळ किती घट्टपणे जोडली गेली होती याची प्रचिती त्यांच्याकडून भाऊंविषयी किस्से, कहाण्या, गावच्या भेटीची माहिती ऐकताना येते. मुख्यमंत्रिपदावर असताना भाऊ अशी एकेरी हाक मारून त्याचे लक्ष वेधणारी माणसे गावागावात होती. भाऊंनाही आपणास सरळ हाक मारली म्हणून कमीपणा वाटत नव्हता. ते जनतेत मिसळत, पेज आंबील खात. या जनतेच्या भक्कम प्रेमाच्या बळावर त्यांनी त्याकाळात आपल्याविरोधात उठलेली, उठवलेली अनेक राजकीय, सामाजिक वादळे पचवली, पेलली. आपली शक्ती व सत्ता केवळ लोककल्याणार्थ आणि लोकोद्धारार्थ आहे असे मानणारे भाऊ होते. त्यांना केवळ एक दशकभराचा वेळ हे सारे करण्यासाठी मिळाला. पण, त्यांनी घातलेला पाया इतका भक्कम आहे की आजची गोव्याची जी प्रगती आपण पाहतो, अनुभवतो आहोत ती सारी त्याच पायावर आकाराला आणली गेली आहे हे विसरता कामा नये.
भाऊंच्या समाजकारणाचा हा प्रवास गोव्याच्या मुक्तीपूर्व काळातून सुरू होतो. त्यावेळी गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. त्यावेळच्या मुक्तीलढ्याला भाऊंनी सढळहस्ते मदत केली. त्याच्या संशयावरून पोर्तुगीजांनी भाऊंना अटक केली आणि तीन महिने तुरुंगात डांबलेही होते. गोवा मुक्त झाला, तेव्हा कॉंग्रेससाठी पूरक वातावरण आहे, कॉंग्रेसच्या उमेदवारीवर दगड जरी ठेवला तरी तो निवडून येईल असे सांगण्यात येत होते. त्याकाळात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, म्हणजे गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याचे समर्थन करणाऱ्या पक्षाचे सरकार सत्तेवर आणणे तशी कठीण गोष्ट दिसत होती. गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता गेल्यानंतर चर्चच्या आशिर्वादाने ‘युनायटेड गोअन्स’ या नावाने वेगळी चूल काहींनी मांडली होती. तो मगोच्या विरोधात अर्थातच होते. आज जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा बोलबोला आहे तसाच त्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा होता. गांधी नेहरूंच्या कॉंग्रेसला नाकारून इतरांना मत देण्याची कोणाची टाप आहे, असे कॉंग्रेसवाल्यांना वाटत असे. सत्तेची स्वप्न पाहणारे तेव्हाचे कॉंग्रेसचे नेते मगो, युगोच्या वावटळीत कुठे गायब झाले ते त्यांनाच ठाऊक आणि मगोची सत्ता आली. त्यावेळी आमदारही नसलेले भाऊ मुख्यमंत्री झाले. नंतरच्या काळात त्यांनी गोव्याचा सामाजिक, बौद्धीक आणि भावनिक विकासही केला.
गोवा मुक्त झाला आणि गोव्याला नवा मुख्यमंत्री मिळाला या घटनेची दखल त्यावेळी अख्ख्या जगाने घेतली होती. भाऊंना त्यावेळी विदेशांतील संस्था, संघटना आणि व्यक्तींकडून आलेली पत्रे पाहता एखाद्या राज्याचा कोणी मुख्यमंत्री झाला म्हणून जगाने त्याची दखल किती घ्यावी याचे हे चपखल असे उदाहरण ठरावे. आता सध्या अनेकजण गोमंतकीयत्व आणि प्रादेशिकतावादावर तावातावाने बोलत असतात. दिल्लीसमोर झुकता कामा नये असे सांगत असतात (प्रत्यक्षात दिल्लीवाल्यांच्या कळपात सुख मानतात तो भाग वेगळा) पण, भाऊंनी आपला गोमंतकीय बाणा त्यावेळी इंदिरा गांधी यांनाही दाखवला होता. संघप्रदेश असल्याने मंत्रिमंडळ निवडीसही केंद्राची मान्यता लागत असे. भाऊंनी ठरवलेल्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांच्या नावाला केंद्राची लगेच मान्यता मिळाली नाही म्हणून दोन दिवस इंदिरा गांधीच्या भेटीची प्रतीक्षा केल्यानंतर भाऊ तडक गोव्यात निघून आले होते.
भाऊंच्या दातृत्वाच्या कथा तर आजही गावागावातून ऐकायला मिळतात. त्यांचे दातृत्व व दानत एवढी प्रसिद्ध होती की मदतीसाठी देशभरातून पत्रे येत, मदतीविषयी आभार मानणारीही अनेक पत्रे आज त्यांच्या संग्रहात आहेत. अनेकजण भाऊंना व्यक्तीशः कधी भेटलेही नाहीत. पण, त्यांना भाऊ मदत करतील याविषयी वाटत असलेला विश्वास पत्रातून व्यक्त झाला आहे. यावरून भाऊंच्या व्यक्तीमत्वाची राष्ट्रीय पातळीवरील उंची समजते. कोणत्याही प्रश्नावर भाऊ तोडगा काढतील हा विश्वास त्यांनी कमावला होता. त्यांच्या कन्या स्व. शशिकला ताई यांच्याबरोबरील संवादात भाऊंच्या अनेक पैलूंचा उलगडा होत असे. नेपाळ, उत्तरप्रदेश, बंगाल, केरळ, तमीळनाडू अशा विविध प्रांतांतून भाऊंना लोकांची पत्रे येत यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज करता येतो.
भाऊंनी केवळ खेडोपाडी शाळा पोचवल्या नाहीत तर प्रत्येक क्षेत्रात त्यांनी काम केले. गोव्याचा इतिहास म्हणजे केवळ पोर्तुगीज राजवटीचा नव्हे तर हजारो वर्षाचा त्यापूर्वीचा इतिहास गोव्याला आहे हे सत्य जगासमोर आणण्यासाठी भाऊंनी पुराण वस्तू संशोधन, पुरातन इतिहासाचे अवशेष त्यांच्या खाणाखुणा शोधून काढून त्यांचे जतन करण्याकडे लक्ष पुरवले. प्रसिद्ध इतिहास संधोधक , पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू दत्तो वामन पोतदार यांना पत्र पाठवून भाऊंनी पोर्तुगीजपूर्व इतिहासावर संशोधन करण्यासाठी एखादा तज्ज्ञ पाठवण्याची विनंती केली होती. त्यानुसार पोतदार यांनी डॉ. एच.डी. सांकलिया यांना गोव्यात पाठवण्याची व्यवस्था केली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भाऊंनी एक पत्र लिहीले होते. भाऊ मुंबईला गेले असताना तेव्हाचे महाराष्ट्राचे दुध पुरवठा उपक्रमाचे संचालक डॉ. साळपेकर यांची भेट झाली होती. त्यावेळी दूध उत्पादन आणि आधुनिक कत्तलखाने याविषयावर भाऊंनी त्यांच्याशी चर्चा केली होती. त्या साळपेकर यांना पंधरवड्यासाठी गोव्यात पाठवण्यासाठी भाऊंनी हे पत्र लिहिले होते. उसगाव येथील आजचा आधुनिक कत्तलखाना हे त्याचेच फलित आहे हे कित्येकांना ठाऊकही नाही. आज आमदार आपल्या मतदारसंघातील जनतेला विविध सोयी सुविधा आणि सणप्रसंगी वस्तूही पुरवतात. पूर्वी आमदारांची तेवढी सांपत्तिक स्थिती नव्हती. भाऊंकडून निवडणूक लढवण्यासाठी दोन हजार रुपये अनामत भरण्यासाठीही भाऊ त्यावेळी उमेदवारांना देत. विजयी झाल्यानंतर अनामत रक्कम परत मिळाल्यावर ती व्यक्तीगत कारणांसाठी खर्च केल्याचे विश्वासाने कळवणारे सहकारी भाऊंनी कमावले होते.
भाऊंनी महाराष्ट्रात साखर उद्योगामुळे भरभराट झाल्याचे पाहिले होते, त्यामुळे गोव्यात सहकारी तत्वावर साखर कारखाना उभारण्याचा संकल्प केला. उसाच्या लागवडीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी अडचण लक्षात घेऊन साळावली नदीवर धरण बांधले. साळावलीतून आज पेयजलाची गरज भागवली जात असली तरी तो मूळ पाटबंधारे प्रकल्प होता. या धरणाचे पाणी सासष्टी, सांगे, केपे या तीन तालुक्यांत खेळवून मोठे क्षेत्र उस लागवडीखाली आणण्याचे नियोजन होते. उसगाव येथे साखर कारखाना उभा राहिला. मात्र, भाऊनंतर त्याकडे खास लक्ष न दिल्याने यंदा तो सुरूही न करता येण्याची नामुष्की ओढवली आहे.
गोव्याचे आज राजकारण वैयक्तिक हेवेदावे, वैमनस्य अशा खालच्या पातळीवर घसरले असताना भाऊंचे राजकारण किती उच्च पातळीवर होते हे सांगण्याचा मोह आवरता येत नाही. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा जन्मच मराठी आणि गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्यासाठी झाला होता. या प्रश्नाचा एकदा कायमचा सोक्षमोक्ष लागावा यासाठी सार्वमत कौल (ओपिनियन पोल) घेण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव भाऊंनी बिनतक्रार स्वीकारला. त्यासाठी मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्याची अट पाळली. सार्वमत कौलात मगोचा पराभव झाला. तोही त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारला आणि पुढील निवडणुकीस सामोरे जात पुन्हा विजय मिळवला. यावरून त्यांच्या उमेदपणाचे दर्शन घडते. याचमुळे आजही भाऊंची उणीव वारंवार जाणवत राहते आणि राहणार.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com