...तर विकासरथाचा मार्ग खडतर!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौरा केला आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधीचे आश्वासन मिळवले. या छोटेखानी राज्याचा मुक्तीनंतरच्या साठ वर्षांतही पूर्ण विकास झाला नाही की विकासाच्या संकल्पना वेळोवेळी बदलत गेल्याचा फटका राज्याला बसला याविषयी कधीतरी विचारमंथन झाले पाहिजे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौरा केला आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधीचे आश्वासन मिळवले. या छोटेखानी राज्याचा मुक्तीनंतरच्या साठ वर्षांतही पूर्ण विकास झाला नाही की विकासाच्या संकल्पना वेळोवेळी बदलत गेल्याचा फटका राज्याला बसला याविषयी कधीतरी विचारमंथन झाले पाहिजे. विकास म्हणजे काय? याची व्याख्या सरकारच्या लेखी काय आहे आणि जनतेच्या लेखी काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध का होतो ही मानसिकताही समजून घेतली पाहिजे. ज्या युवा वर्गाच्या भवितव्यासाठी ही सारी धडपड सुरू आहे, त्यांना नेमके काय वाटते तेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

परवाच्या पिढीच्या विकासाच्या संकल्पना, कालच्या पिढीच्या विकासाच्या संकल्पना, आजच्या पिढीच्या विकासाच्या संकल्पना आणि उद्याच्या पिढीच्या विकासाच्या संकल्पना जुळणाऱ्या नसणार. मात्र, त्यात किमान सूत्र समान असावे, अशी अपेक्षा बाळगण्यात काहीच हशील नाही. वर्षानुवर्षे विकासाचे केवळ प्रयोग होत राहिल्यास गोवा मुक्तीच्या शताब्दी वर्षातही गोवा हे विकसित राज्य होणार नाही.

मुक्तीनंतरच्या पन्नास वर्षात ‘घरटी एक शौचालय’ उभे राहू शकले नाही. यावरून आजवरच्या सरकारांनी काय दिवे लावले हे स्पष्ट होते. कुळ मुंडकार प्रकरणातील तुंबलेले खटले हे आजवरच्या सरकारांच्या सुशासनाचा उत्कृष्ट नमुना मानला जावा. सरकारने सर्वसामान्यांचे जीवन किती सुसह्य केले, यावरूनच त्या सरकारचे मोजमाप होते. या कसोटीला किती सरकारे उतरतील, हे जनतेनेच आता ठरवावे. जनतेला दीड वर्षात तशी संधी मिळणार आहे, ती जनता घेणार हा खरा प्रश्न आहे. 
पर्यटन असे असावे की त्याने पर्यावरणाला धोका पोहोचता नये. धनिकांचेच लाड होता नयेत, ‘सीआरझेड''चा भंग होता नये, हा इथल्या जनतेचा हट्ट आहे. स्थानिकांना देशोधडीला लावणारा कोणताही उद्योग इथे येता नयेत, याबाबत इथल्या जनतेत एकमत आहे. त्यामुळे खनिज, सेझ, औष्णिक ऊर्जा, पंचतारांकित पर्यटन अशा संकल्पनांना विरोध होतो आहे.

नेते आणि जनता यांच्या विकासाच्या संकल्पना पूरक असायला हव्यात. त्यात दरी निर्माण होता नये. विकासाच्या रथाची ही दोन चाकेच आहेत. त्यामुळे त्यांनी परस्परांना पूरक भूमिका न ठेवल्यास विकासरथ पुढे सरकूच शकणार नाही. विकासाच्या आपल्या संकल्पना जनतेवर न लादता, जनतेलाही विश्‍वासात घेतले गेले पाहिजे.

पैशांचे वाटप, जेवणावळी, भेटवस्तूंची खैरात असे प्रकार पूर्वी कधीच होत नव्हते. कार्यकर्तेच स्वतःच्या खिशाला चाट लावून उमेदवाराचा प्रचार करीत, आज ते चित्र आमूलाग्र बदलले आहे. पैसे हातात पडल्याशिवाय कार्यकर्ता हलत नाही. अनेक मतदारांनाही आमिषे मिळताहेत; मात्र ती तत्कालिक असल्याचे निवडणुकीनंतर निदर्शनास येते तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो आहे. त्यामुळे निवडणुकीतून काही चित्र पालटेल, अशी आशा करण्यात काही अर्थ राहतो का? या प्रश्नाचे उत्तर काय असेल याची पडताळणी ज्याने त्याने आपापल्या मनाला विचारून करून घ्यावी. त्याचे उत्तर काय असेल यावरच राज्याचे भवितव्य अवलंबून असेल.

मानवी समाज जीवनामध्ये युवाचे स्थान अनन्यसाधारण आहे. युवा जसा विचार करतो तसे जीवन घडते. समाजात तसाच विचार संचारतो. त्याच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीचा उदय झाला, तर राष्ट्र स्वतंत्र होते. त्याच्या मनामध्ये धर्मांधता, सांप्रदायिकता, दहशतवाद, जातीवाद साकारला तर तसेच वातावरण उदयास येते. मानवतावाद, लोकशाही जीवनमूल्ये, स्त्री-पुरुष समानता हा श्रेष्ठ विचार उदयास आला, तर तसे जीवन गतिमान होते. संकल्पना, विचार, जीवनबोध यांच्यावरच व्यक्तिजीवनाचे व समाज-राष्ट्रजीवनाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे युवा वर्गाचे काय म्हणणे आहे, हे कधी सरकार आता जाणून घेणार आहे, की नाही.
पृथ्वी गोल आहे, ही नवी संकल्पना योग्य की पृथ्वी सपाट आहे, ही जुनी संकल्पना योग्य; सूर्य स्थिर आहे ही नवी संकल्पना जीवनात घ्यावयाची की सूर्य अस्थिर आहे, सूर्य चालतो ही पारंपरिक जुनी संकल्पना मनाला शिकवावयाची; स्त्री-पुरुषांना विकासाची समान संधी ही नवी संकल्पना योग्य की स्त्री-पुरुष असमानता ही जुनी संकल्पना योग्य; जाती-जातींच्या उतरंडीमधील असमानता संस्कार न्याय संकल्पना की समान न्याय संस्कार संकल्पना उचित; जुन्या-नव्या संकल्पनांमध्ये आजचा युवा वावरताना दिसतो. आपले राज्य कसे असावे याविषयीच्या त्याच्या मनातील संकल्पना या विचारांच्या पाईक असतात. त्यानुसार सरकार वागले तर; राज्याचा समतोल विकास होत जाणार आहे.

जुन्या-नव्या संकल्पना यांचा संघर्ष माणसासोबतच विकसित झाला आहे. जुन्या संकल्पनांची जागा नेहमीच नव्या संकल्पना घेत आल्या आहेत. जी व्यक्ती नवी संकल्पना स्वीकारते, तिचा नेहमीच जोमाने विकास झाला आहे. त्यांची प्रगती झाली आहे. जुन्या-नव्या संकल्पना, मग त्या जीवन जगण्यातील कोणत्याही पैलूमधील असो; त्यांची भूमिका व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित असते. आपल्या समाजातील काही चतुर लोक, काही चतुर संघटना कावेबाज-षड्‌यंत्रासारखे स्वत: नव्या संकल्पना जीवनात स्वीकारतात आणि स्वत: विकास करतात. स्वत: नव्या संकल्पना स्वीकारतात आणि जुन्या संकल्पना दुसऱ्यांना शिकवतात. ही धूर्तता आजच्या लोकजीवनाने स्पष्ट केली आहे. बहुसंख्य युवामन सरळमार्गी असते. परंपरावादी असते. दारिद्र्य, दैन्य हे नशिबाने आले, ही जुनी संकल्पना घेऊन वागत असते. दारिद्र्य, दैन्य हे उत्पादनाच्या साधनांनी निश्‍चित होते, हे नवी संकल्पना सांगते. 
कोविड महामारीच्या काळात अनेकांचे उत्पन्नाचे स्रोत आटले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय बंद झाले. त्यांनी अनेक वेगळे मार्ग शोधले. ‘व्होकल फॉर लोकल’ नावाने फेसबुकवर एक गट आकाराला आला. त्यात गोमंतकीय माणसांची उद्यमशीलता दिसून आली. व्यापार उदीमात गोव्याच्या माणसांना किती रस आहे, हे समजून आले. आजवर एकेका व्यवसायातून माघार घेणारा गोमंतकीय पुन्हा व्यवसायाकडे वळला आहे. खलाशी म्हणून जगभर जाणारा, परंपरागत व्यवसाय परप्रांतीयांच्या हवाली विनासायास करणारा, आपली दुकाने भाड्याने देऊन घरीच आरामात सुशेगादपणा मानणारा, शॅक परवाना घेऊन तो चालवण्यास दुसऱ्यास देणारा गोमंतकीय माणूस पुन्हा आपल्या व्यवसायांकडे परतत असल्याचे दिसते. भले अंगमेहनतीच्या क्षेत्रात सध्या त्याचा शिरकाव नसेल. पण, बदलत्या परिस्थितीची त्याला झालेली जाणीव ही आतापुरती तरी पुरेशी आहे.

नियमित मिळणाऱ्या उत्पनाच्या पैशातून दारिद्र्य नष्ट होते. आपल्या दु:खाचा विचार, आपल्या शोषणाचा विचार, आपल्या प्रगतीचा विचार ही नेहमीच आपली स्वत:ची विचार संकल्पना ठरविते. आपलीच बुद्धी ठरविते, देव ठरवत नाही. धर्म ठरवत नाही. परंपरा ठरवत नाही. आपण जसे ठरवतो तसे घडते. कवी कुसुमाग्रज म्हणतात, ‘माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार, व्यर्थ हा पुकार देवादारी''. आजचे युग हे विज्ञानाचे आहे. लोकशाही जीवनमुल्यांच्या विचाराचे आहे. सामाजिक न्याय संस्थांचे आहे. हे जरी आपले राजकीय-सामाजिक वास्तव असले, तरी आपले समाजमन व युवामन जुन्या-नव्या संकल्पना-विचाराने भरलेले आहे. सुंदर डांबरी रस्ते व उंच इमारती असलेले शहर असो, की मध्ययुगीन घरं-दारं असलेले गाव असोत, त्यामध्ये ठासून ठरलेल्या जुन्या संकल्पना आणि मूठभर नव्या संकल्पना यांचेच वास्तव आहे. नवा माणूस, नवा समाज, नवा भारत घडविण्याची प्रचंड शक्ती युवाच्या हातात आहे. त्याची विचार करण्याची शक्ती तरुण मनात आहे. त्याच्या अंत:करणात उसळणाऱ्या जुन्या-नव्या संकल्पनांच्या विचारात आहे. मानवतेचा, समतेचा व लोकशाही विचार संकल्पनेचा विचार करणे व विकास करणे हेच आजच्या युवापुढचे खरे आव्हान 
आहे. 

जुन्या संकल्पनेच्या सिंहासनावर नव्या संकल्पना विराजमान करणे, हेच त्याचे खरे वर्तन आहे. मानवी जीवन संकल्पनाशिवाय अपूर्ण आहे. कुजलेल्या, मृत संकल्पनेची राख नदीच्या प्रवाहात टाकणे असो; जिवंत जीवनातून बाजूला सारणे असो; हे जरी कष्टाने करावे लागत असले तरी ते अपरिहार्य आहे. चांगल्या जीवनासाठी, चांगल्या समाजासाठी नव्या संकल्पनांचा विकास हे युवाचे कर्तव्य आहे. आजचा युवा उद्याचा वृद्ध आहे, तसेच आजच्या नव्या संकल्पना जुन्या होतीलही! कारण भविष्यात खूप खूप काही काही दडलेले असते. त्यामध्ये संकल्पनाही आहेत आणि त्यापेक्षा आपले आजचे समकालीन जीवन अधिक मौलिक आहे. त्यामुळे सरकारने जीवनाची मौलिकता वृद्धिंगत करणे हा युवांचाच गौरव आहे.

संबंधित बातम्या