दिवस सणासुदीचे असल्यामुळे राज्यांतील मंदिरांतून भजन, आरतीचे सूर ऐकायला यायला हवे होते ते येत नाहीत. ठिकठिकाणी सप्ताहाचे मोठे कार्यक्रम होणार याचीही चर्चा नाही. मंदिरेच धड खुली न झाल्यामुळे सगळेच सुनेसुने भासत आहे. देवळे उघडी झाली तरी घंटानाद नसल्यामुळे प्रसन्न वातावरणही नाही फक्त मनोमनी एकच प्रार्थना सोडव रे बाबा या संकटातून.
देवळातूनच नव्हे तर घराघरांतले भय संपलेले नाही. सणानिमित्त गोडाधोडाचे जेवणही सांभाळूनच, पूजापाठ सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच. सगळेच शिस्तप्रिय आहेत असे नव्हे, उच्च शिक्षीतही बिनधास्तपणे मास्क न घालता घराच्या उंबरठ्याबाहेर येत माॅर्निंग, इव्हिनिंग वाॅक मनमर्जीनुसार करीत आहेत. भांडारातून पायांशी अडथळे निर्माण करणाऱ्या वस्तुंची फेरमांडणी झाली, बँकांही फेररचनेत गुंतल्या तरी ऐसपैस जागेअभावी आणि देखरेख ठेवणाऱ्यांच्या मेहेरबानीमुळे ढकलणे, गर्दीवर नियंत्रण नाहीच. बसगाड्यांचेही तेच, प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक भरणे हा बसवाल्यांचा जन्मसिद्ध हक्कच असा व्यवहार, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना फाटा देणे त्या हक्कांतूनच जन्मलेले असावे. कांही मंत्री, आमदार, सचिव, जिल्हाधिकारी क्वचितच कार्यालयाबाहेर आलेले दिसतात मग वाहतूक अधिकाऱ्यांना, पोलिसांना दोष देऊन काय उपयोग ?
वृत्त प्रसिद्ध झाल्यास रोज प्रवास करणाऱ्या पत्रकारमित्रांना शिक्षा, त्यामुळे का जायचे वाटेला? आवाज उठवला नाही, पाठपुरावा केला नाही तर बेशिस्तीला चाप कसा लागणार ? त्या बेशिस्तीतून राज्याची हानी होतेय, आरोग्य दिवसेंदिवस बिघडतेय, कदाचित महिनाभरात परिस्थिती आणखी स्फोटक होऊ घातली आहे याचे भान कोणाला आहे ? त्यामुळे सर्वसामान्यांनाच जागते रहो अशी साद सातत्याने घालावी लागणार आहे, सर्वसामान्यांना बदलातून अनुकरणयोग्य, आदर्श व्हावे लागेल. आदर्शाचा पाठ वाचला म्हणून व्यवस्था थोडीच सुधारणार कारण भयगंडाने तिलाही ग्रासले आहे. पण चिंताग्रस्त होऊन काय मिळणार ? त्याऐवजी मनन, चिंतन, वाचन आणि संवादातून एकमेकांशी जवळीक ठेवणे, एकमेकांना चुका कोठे आहेत त्या दाखवणे आणि सुधारणांचा पाठपुरावा करणे हेच अस्त्र प्रत्येकाच्या हाती आज राहीले आहे. त्या अस्त्राचा योग्यवेळी वापर न झाल्यास, अचूक दिशेने ते न सोडल्यास आजच्या परिस्थितीशी मुकाबला करणे शक्य आहे का ?
युद्धाला सामोरे जाताना सेनापतीनी चाणक्यनितीतून दिलेला आदेश व त्या आदेशाची वेळीच अंमलबजावणी न केल्यास आजच नाही उद्यासुद्धा आपण सुधारणांत मागे पडणार, स्वार्थाच्या जंजाळात गटांगळ्या खात राहाणार हे नव्याने सांगण्याची गरज आहे का ? वैयक्तिक प्रगती होतच राहील पण राज्याचे काय ? राज्य बुडणार नाही ना? रसातळाला तर जाणार नाही? तसे होऊ नये यासाठीच सतर्क होऊन डोळ्यांत तेल घालून टेहेळणीची गरज आहे. काय होईल त्या टेहेळणीतून कांही लोक नाराज होतील, व्यक्तीशः फायदाही होणार नाही पण राज्याच्या सिमा सुरक्षित राहातील, काळजी घेतल्यास प्रत्येकाचे जीवन सुलभ होईल, प्राण वाचतील.
विषाणु माघार घेत नाही, जाळे पसरवतो म्हणून त्याला हात पाय किती पसरण्यास द्यायचे याचा विचार गंभीरपणे होईल का ? सिमा, मर्यादा घातल्या नाहीत तर विषाणु राज्यावर पूर्णपणे कब्जा मिळवण्यास मागे राहील का ? आपणच तर नियोजनाअभावी विषाणुच्या हाती राज्यशकट देत नाही ना अन्यथा त्याचे वर्चस्व कसे ? कोठे फसली अंमलबजावणी ? कोठे गहाळ राहीली यंत्रणा ? उत्तरे मिळवायलाच हवीत, त्या उत्तरांतून हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीवर काबू मिळवता येईल, त्या उत्तरांतूनच लढण्याचे बळ मिळेल. लढाई एकजुटीने करायला हवी, समन्वयातून यशाचा केंद्रबिंदू गाठता यायला हवा तरच ते टिकेल, चिरकाल राहील, फळेल, बहरेल.
ही भाषा आहे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या डाॅक्टरांची. कोरोनाशी टक्कर देताना डाॅक्टर आणि वैद्यकीय यंत्रणाही मेटाकुटीस आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येची त्यांना चिंता आहे. चाचण्यांची संख्या वाढवताना मूळ संपर्काचा मागच घ्यायचे विसरल्यास उपाययोजनेतून आशेचे किरण दिसतानाच विस्कळीतपणातून, बेफिकीरीतून नवे संकट आ वासून उभे राहाणार आहे. त्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात शिल्लक राहीली आहे का ? डाॅक्टर स्वतःलाच प्रश्न विचारत आहेत, त्यांना वास्तवाची जाणीव आहे, तरीही प्रत्येकाला वाचवणे आपला धर्म, ध्येय असल्याची त्यांची धारणा बनलेली आहे. रुग्णांवर उपचार करताना, त्यांना संजीवनी देताना संशोधनात्मक कामकाज, अभ्यास अखंड चालू राहील्यास कोरोनावर विजय मिळवण्याचे दिवस दूर नाहीत. मात्र विजयाच्या स्वप्नावर स्वार होण्याऐवजी वास्तवाशी जुळवून घेणे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटते, विस्कटलेली घडी सावरण्यासाठी त्यांची धडपड त्यांतून होते.
कोरोना कसा आला ? किती काळ राहाणार? कोणते महिने विषाणुला अनुकूल, प्रतिकूल आहेत ? लस कधी बाजारात येईल, तिची किंमत किती असेल ? इत्यादी प्रश्नांबद्दल संशोधक, डाॅक्टरांच्या मनात आजही गोंधळ आहे. अमेरिकेतील कांही डाॅक्टर्स तसे उघडपणे मान्यही करतात, औद्योगिक कंपन्यांना कंत्राटी कामगार पुरवणारेच नव्हे तर गोव्यातील मुख्य कोविड योद्धे डाॅ.एडविन गोम्स कोविड रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटिबाॅडिजबद्दल, हर्ड इम्युनिटीबद्दल - सामूहिक प्रतिकारशक्तीविषयी बोलतात त्यावेळी प्रतिप्रश्नही केले जात नाहीत कारण अज्ञानच अधिक. नेमके त्याचसमयी देश विदेशातील संशोधक वेगळीच भाषा करतात हर्ड इम्युनिटी तथा सामूहिक प्रतिकारशक्ती इतर आजार असलेल्यांसाठी कूचकामी कशी ठरू शकते असे इशारे दिले जात आहेत. एकदा कोविड झालेला दुसऱ्यांदा पाॅझिटिव्ह होणार नाही या मताला छेद देणारा मतप्रवाह अभ्यासकांत आहे. कोविड निगेटिव्ह आलेलाच नव्हे तर कोविड सूचकही - असिम्पटाॅमेटिक रुग्णही पाॅझिटीव्ह होऊ शकतो अशीही माहिती अभ्यासातून पुढे येऊ लागली आहे.
अशावेळी जागते रहो असा नारा चालूच ठेवावा लागेल.
जागते रहो असा नारा देताना अंमलबजावणीसाठी सरकारी यंत्रणा प्रत्यक्षात काय करते ? औद्योगिक वसाहतीतील उपहारगृहे, केअर सेंटर्सकडे फिरकते का ? रोज येणारी आंकडेवारीतील गणिते समजून घेत भविष्यात येणाऱ्या बिग पिक्चरसाठी साधनसुविधा जलदगतीने उभारल्या जाव्या म्हणून
योजना तयार असल्यास त्या मूर्तरुपात येण्याकरीता प्रयत्न झाले का ? सरकारला फक्त प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधांच्या वितरणात का स्वारस्य आहे ? त्यामुळे काय साध्य झाले आहे? त्यामागे अर्थकारण काय आहे ? कर्फ्यू म्हणजे काय रे ? कर्फ्यू आहे मग लष्करही असायला हवे, ते का नाही रस्त्यावर, पोलिसही नाहीत, रोखणार कोण? चला नियम मोडायला मोकळे ही नागरीकांची भाषा कोणाला ऐकू येईल का ?
मांगोरनंतर राज्यातील अन्य झोपडपट्ट्यांवर नजर ठेवली असती तर नागरी क्षेत्रातील झोपडीवजा लहान घरेच नव्हे तर बंगल्यापर्यंत कोरोन घुसला कसा? वैज्ञानिकांनी त्यासंदर्भात गणिते प्रारंभीच मांडून ठेवलेली असताना कोरोनाचा प्रवास मांगोरमधून दाबोळी विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांपर्यंत, राजधानी पणजीपर्यंत कसा होऊ शकेल याचा अंदाजच सरकारी यंत्रणेला आला नव्हता का ? याप्रश्नांची उत्तरे आरोग्य सचिवांनी मिळवली तर भविष्यातील वाटचाल किंचित सुकर होईल अन्यथा आगेकूच खडतर आहे.
कोविड रुग्णांच्या सहवासात तीन महिन्यांचा कालावधी घालवल्यामुळे आपल्या शरीरात कोविडला टक्कर देण्यासाठी अॅण्टीबाॅडिज तयार झाल्या असतील या भ्रमात असलेले डाॅ.एडविन कोविड + होतात त्यावेळी वैज्ञानिकांच्या गणितांचा भागाकार, गुणाकारही चुकतो हे लक्षात येते. डाॅ. गोम्स यांना इस्पितळातील रुग्णांशिवाय अन्य कोणाच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग झाला असावा का ? फक्त तीन महिन्यात योद्धा हरला की त्यांनी परिस्थितीसमोर हात टेकले आहेत ? राज्याला परत ग्रिन झोनमध्ये आणण्यासाठी कोणते पाऊल उचलावे लागेल? याची रुपरेषा, इस्पितळातील अडचणी समजावून घेण्याचे काम आरोग्य सचिवांशिवाय कोण करणार ? आरोग्य सचिवांना शिक्षण सचिव पदातून मुक्त करायचे नसेल तर त्यांच्या मदतीला आरोग्य सचिव २ द्या म्हणजे त्यांचा बोजा हलका होईल. कांही प्रश्नांची उत्तरे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे डीनही डाॅ.एडविन यांच्याकडून मिळवू शकतात. एकच चांगली गोष्ट झाली ती त्यांच्याकडून इतरांना संसर्ग होण्याची जी भीती होती ती फोल ठरली आहे, अर्थात तोही एक चमत्कारच म्हणावा का ?
कोविडविषयीची भीती जनतेच्या मनातून दूर करायची असेल तर आरोग्य सचिवांपासून नित्य अहवाल जारी करणाऱ्या, लोकांपर्यंत पोचवणाऱ्या माध्यमांनाही कोविडविषयक भाषा समजून ती उपयोगात आणावी लागेल. त्याचबरोबर कोविड रुग्णांविषयी जनतेत असलेले गैरसमज, निषिद्धता
दूर करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. दुसरे तिसरे नव्हे आरोग्य खाते संचालक डाॅ. जुजे डिसा यांनी एच आय व्ही रुग्णविषयक विभाग हाताळल्यामुळे त्यांच्या तसेच सामाजिक, प्रतिबंधात्मक वैद्यकीय विभागातील वरिष्ठ डाॅक्टरांच्या मदतीने त्यासाठी नियमावली तयार होऊ शकते. सरकारी कर्मचारी, नगरसेवक, पंचायतीनाही भाषाविषयक डोस तसेच कोविडविषयी अधिक ज्ञान मिळणे अत्यावश्यक आहे.
माजी शिक्षण संचालक वंदना राव यांनी शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्याचा मोठा भाग यशस्वीरित्या हाताळला हे कौतुकास्पद आहे. उत्तर जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यक म्हणून त्यांच्याकडून चांगली कामगिरी अंमलबजावणीतून अपेक्षित आहे. बदल्यांचा धडाका विधानसभा अधिवेशनानंतर सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दोन्ही जिल्हाधिकारी यंत्रणा गतिमान होण्यात अडथळे कोणते असावे ?
जागते रहो चा मंत्र जपताना स्वयंशिस्त पालनातून
इतरांना जागे करूया. केंद्राच्या निर्देशांनुसार घरातून बाहेर पडतानाच मास्क घालायलाच हवा, इतरानाही मास्क वापराचे महत्त्व सांगूया. पार्ट्या, भोजनावळीही आवरत्या घेऊया, गर्दीचा मार्ग टाळूया, नव्या वाटाही शोधूया, विषाणु हद्दपार करण्याचा निर्धार करूया.
संपादन हेमा फडते
|