विद्यार्थ्यांचा ‘पोपट’ होऊ नये म्हणजे झालं!

वयाच्या अडीच आणि तीन वर्षांवरच विद्यार्थी ‘दशा’ सुरू होते. अडीच वर्षांच्या मुलांची ही दिशाहीन अशी विद्यार्थीदशा ज्येष्ठांचे हृदय नक्कीच गलबलून टाकणारी आहे.
विद्यार्थ्यांचा ‘पोपट’ होऊ नये म्हणजे झालं!
विद्यार्थ्यांचा ‘पोपट’ होऊ नये म्हणजे झालं!Dainik Gomantak

शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी (sTUDENTS)हा केंद्रस्थानी असून परिघावर जे अनेक बिंदू असतात, तेच या केंद्रबिंदूला नियंत्रित करत असतात. बदलत्या काळानुसार आणि परिस्थितीनुसार परिघावरील बिंदूंमध्ये जे परिवर्तन होते, त्याचे पडसाद केंद्रस्थानी असलेल्या विद्यार्थ्यांवर उठतात. पूर्वीच्या काळी सामान्यपणे सहा ते सात वर्षे वयावर मूल विद्यार्थी अवस्थेत जात असे.

आज मात्र वयाच्या अडीच आणि तीन वर्षांवरच विद्यार्थी ‘दशा’ सुरू होते. अडीच वर्षांच्या मुलांची ही दिशाहीन अशी विद्यार्थीदशा माझ्यासारख्या ज्येष्ठांचे हृदय नक्कीच गलबलून टाकणारी आहे. मुलाच्या वयाच्या 18 व्या महिन्यापासून सामान्यपणे 48 व्या महिन्यापर्यंत त्याचा भाषिक विकास होत असतो, असे आधुनिक भाषाशास्त्र सांगते. भाषाशास्त्रीय विचारानुसार या काळात मुलाची भाषिक क्षमता वाढविणारे कार्य (न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग) सुरू असते. त्यामुळेच या वयात एकदा भाषिक क्षमता विकसित झाली म्हणजे कोणतेही विषय त्याला सहज समजू शकतील. परंतु आजच्या औपचारिक शिक्षणात प्राथमिक पातळीवरही भाषेला नगण्य स्थान देऊन असे अनेक विषय अभ्यासक्रमात कोंबलेले दिसतात. शिशुवर्गापासूनच असे अनेक विषय मुलांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करून भाषा संवर्धनाकडे मात्र त्यामानाने हवे तसे लक्ष दिले जात नाही. घरात एक भाषा, शाळेत दुसरी आणि टीव्हीवर तिसरी, अशा अवस्थेत मुले भाषेपासून दूर जात चालली आहेत. परिणामी, बालवयात मुलांना वाचनासारख्या सवयी लावणेही कठीण झाले आहे. सद्यस्थितीत अपरिहार्यता म्हणून हातात आलेले मोबाईलवरील गेमच मुलांना अधिक आकर्षित करू लागले आहेत.

विद्यार्थ्यांचा ‘पोपट’ होऊ नये म्हणजे झालं!
कोविड महामारीनंतर शिक्षण घेताना...

मुले मोबाईलकडे का आकर्षिली जात आहेत? त्यांच्या जीवनात आलेली ही शाळेची पोकळी भरून काढण्यासाठी काय करता येईल, याचा विचार विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून केला पाहिजे. अमूक गोष्ट करू नका, हे सांगण्यापेक्षा त्यांची आवड वा कल लक्षात घेऊन ती गोष्ट करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांना गृहीत न धरता त्यांना काय हवे आहे याचा शोध घेण्यासाठी या काळात ऑनलाईन उपक्रम वा व्हिडिओ तयार करावेत. अभ्यासक्रमातील धडे कमी केले आणि परीक्षांचे गुण कमी केले म्हणून आपले इप्सित साध्य होईल, असे वाटत नाही. कारण अनेक विषयांची लिंक ही जोडलेली असते. साहजिकच सातवीत गाळलेल्या धड्यांचा पुढचा भाग जेव्हा आठवीत शिकवायचा असेल, तेव्हा विद्यार्थ्यांची मानसिकता तो स्वीकारु शकेल का, हा प्रश्न आहे.

त्रयस्थपणे या महामारीने एकूणच शिक्षण व्यवस्थेला लावलेला सुरुंग पाहिला म्हणजे मला लहानपणी वाचलेली पोपटाच्या शिक्षणाची गोष्ट आठवते. आज त्या गोष्टीतील व्यावहारिक रूपक अधिक अर्थपूर्णतेने लक्षात येते. माझ्याप्रमाणे अनेकांनी ती वाचलीही असेल. ज्यांनी वाचली नसेल, त्यांच्यासाठी गोष्टीचा सारांश असा आहे.

एक पोपट स्वच्छंदीपणे विहार करून निसर्गाशी एकरूप होऊन उडत - बागडत गात असलेला राजा पाहतो. पोपट आपला मौलिक वेळ वाया घालवत आहे, असे वाटल्याने राजा प्रधान असलेल्या आपल्या भाच्याला सांगतो, ‘या मूर्ख अडाणी पोपटाला शिक्षण द्या.’ भाचा एका प्रकांड पंडिताचा सल्ला घेतो आणि त्याच्या सल्ल्यानुसार सोन्याचा पिंजरा घडवून आणतो. राजाकडून पंडिताला बिदागी आणि सोनाराला घडणावळ मिळते. पंडित भले मोठे ग्रंथ लेखकांकडून लिहून घेतो आणि त्याच्या पिंजऱ्यात ठेवू लागतो. थोड्याच दिवसांत पिंजऱ्यात पुस्तकांचा ढीग जमतो. लेखकांना मानधन मिळते. पिंजऱ्याच्या देखरेखीसाठी पगार देऊन रखवालदारही ठेवला जातो. एकूण पोपटाच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था होते. आजच्या भाषेत उत्तम साधनसुविधा दिली म्हणजे आता पोपटाला शिक्षित होण्यास काहीच हरकत नाही, असे म्हणून राजा, त्याचा भाचा आणि पंडित निर्धास्त राहतात. हे सर्व पाहणारा राज्यातील एक शंकासुर विचारतो, ‘अरे महाभागांनो, त्या पोपटाकडे कुणाचे लक्ष तरी आहे काय?’ राजा भाच्यासमवेत सोनार, पंडित, लेखक सर्वांना बोलावतो आणि केलेल्या कामाचा अहवाल मागतो. काम चोख झाल्याचा अहवाल पाहून शंकासुराकडे दुर्लक्ष करतो. उलट उत्तम कामगिरीबद्दल भाच्याला पुरस्कारही देतो. इकडे पिंजऱ्यात बंद केलेल्या पोपटासमोर दाणा-पाण्याऐवजी ग्रंथांचे ढीग टाकले जातात. पोपट हळूहळू अशक्त होत जातो. तरीही अंगातील शक्ती एकवटून तो पिंजऱ्याच्या सळ्या तोडण्याचा प्रयत्न करू लागतो. प्रधान म्हणजे राजाच्या भाच्याला हे कळत नाही की, इतक्या साधनसुविधा देऊनही हा अभ्यास न करता उडू का पाहतोय? त्याने अभ्यास करावा म्हणून भाचा लोहाराला बोलवून त्याचे पंख छाटून टाकतो आणि साखळदंडाने त्याला बांधून घालतो. त्याला वाटते, आता अभ्यासाशिवाय दुसरा कोणताच पर्याय पोपटाला राहिलेला नाही. त्यामुळे, आता पोपट नक्कीच विद्वान होईल. परंतु होते वेगळेच! पोपट हळूहळू प्राण सोडतो. शंकासुर पुन्हा एकदा पोपट मेल्याची बोंब मारतो. राजा येतो, भाच्याला सांगून पिंजरा उघडून पोपट हातात घेतो आणि पोपटाचे पोट दाबतो. पोपट ऊं की चूं करत नाही. पिंजऱ्यातील पुस्तकांच्या पानांची मात्र फडफड राजाच्या कानावर पडते......इथे गोष्ट संपते.

विद्यार्थ्यांचा ‘पोपट’ होऊ नये म्हणजे झालं!
गोव्यात वातावरण बदलाचा फटका! समुद्री कासवांचे आगमन लांबणीवर

राजाच्या राज्यातला एक पोपट कमी झाला म्हणून राज्यात काही फरक पडत नाही. उलट, पोपटाच्या निमित्ताने भाच्याला पुरस्कार, सोनाराला घडणावळ, पंडिताला बिदागी, लेखकाला मानधन आणि लोहाराला मोबदला मिळाला होता, तो थोडाच परत केला जाणार होता? आजच्या विद्यार्थ्यांचा असा पोपट होऊ नये, याची दक्षता सामाजिक भान ठेवून संबंधित लोकांप्रमाणेच समाजानेही घेण्याची गरज आहे. कारण आजचा विद्यार्थी याच समाजाचा उद्याचा जबाबदार नागरिक होणार आहे.....

-डॉ. विद्या प्रभुदेसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com