‘धीर धरी तो गंभीर’ जीवनाचा जीवित-महिमा

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

कथा- कादंबरीच्या क्षेत्रात हरी नारायण आपटे यांनी आणि नाटकाच्या क्षेत्रात आप्पासाहेब किर्लोस्कर यांनी नवप्रवर्तन केले.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी वाङमयात कविता, कादंबरी, कथा आणि नाटक या क्षेत्रांत आधुनिकतेचे नवे युग अवतरले. कवितेच्या क्षेत्रात केशवसुतांनी, कथा- कादंबरीच्या क्षेत्रात हरी नारायण आपटे यांनी आणि नाटकाच्या क्षेत्रात आप्पासाहेब किर्लोस्कर यांनी नवप्रवर्तन केले. या गंगोत्रीपासून पुढे मराठी वाङमयाचा गंगाप्रवाह झाला. या प्रदीर्घ कालखंडातील वाङमयीन कालखंडाचे विहंगमावलोकन केले असता अनेक वृत्तिप्रवृत्ती आढळतात. या काळातील लेखनप्रेरणांचे स्वरूप पाहता त्यात विविधता दिसून येते. उद्‌बोधन, समाजप्रबोधन, विशुध्द आनंदनिर्मिती आणि ज्ञानप्रसार या त्यांतील प्रमुख प्रेरणा आहे. या प्रेरणा- प्रयोजनांमुळे मराठी वाङमय परिपुष्ट झाले. भाषाभिवृध्दीबरोबर वाङमयीन अभिरूची वाढली. नंतरच्या पिढ्यांमध्ये या प्रवृत्तिप्रवाहांचे आणि विचारांचे अभिसरण झाले.

वाङमयसंहितेच्या या उगमस्थानाकडे पाहणे हे नेहमीच प्रेरणादायी असते. मराठी कवितेत क्रांतिप्रवणता आणणाऱ्या केशवसुतांशी हरिभाऊ आपटे यांची मैत्री होती. एवढेच नव्हे तर ‘केशवसुतांची कविता' संपादित करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक'द्वारा चाललेल्या वाङमयीन उपक्रमशीलतेविषयी, कादंबऱ्यातून साधलेल्या समाजप्रबोधनाविषयी आणि एकूण त्यांच्या पुरोगामी जीवनदृष्टीविषयी केशवसुतांच्या मनात ममत्वाची भावना होती. म्हणूनच त्यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो?' च्या कर्त्यास ही कविता लिहावीशी वाटली. या झाल्या परस्परांविषयीच्या वाङमयीन अनुबंधाच्या गोष्टी.

आता थोडेसे हरी नारायण आपटे यांच्या वाङमयीन व्यक्तिमत्त्वाविषयी. त्यांनी आपल्या वाङमयीन प्रवासात कवितालेखन केल्याचे आढळत नाही. पण हे लेखन त्यांनी मुळीच केले नाही असे नव्हे. त्यांच्या या प्रवासाच्या पाऊलखुणा शोधताना हाही प्रकार त्यांनी हाताळला असे दिसून येते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबईत आणि पुण्याच्या सरकारी हायस्कूलमध्ये झाले. संस्कृतशास्त्रांच्या खासगी मार्गदर्शनाखाली हरिभाऊंचा संस्कृत भाषेचा अभ्यास झाला. इंग्रजी साहित्याचे विपुल वाचन त्यांनी केले. त्या साहित्याचा प्रभावही त्यांच्यावर होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वासुदेवशास्त्री खरे, वा.शि. आपटे यांच्यासारखे व्यासंगी शिक्षक त्यांना लाभले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ‘निबंधमाले’चे वाचन त्यांनी समग्रतेने केले. त्यामुळे स्वभाषा, स्वधर्म आणि स्वदेश या त्रयीविषयी त्यांच्या मनात दृढ प्रेम निर्माण झाले.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या अकाली निधनामुळे शोकार्त अंतःकरणाने हरिभाऊंनी "शिष्यजनविलाप'' हे ८४ श्‍लोकांचे वृत्तबध्द काव्य लिहिले. संस्कृत- मराठी- इंग्रजी वाङमयाच्या परिशीलनामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. आगरकरांनी शेक्‍सपिअरच्या ‘हॅम्लेट'चे ‘विकार विलसित’ हे भाषांतर केले. १८८२ साली ‘निबंध चंद्रिकेत' या नाटकाचा ७२ पानांत चिकित्सक वृत्तीने परामर्श घेतला. मराठीतील ‘स्फुट गोष्टी'चे ते निर्माते समाजहिताच्या आंतरिक तळमळीने लिहिलेल्या वास्तववादी बैठक असलेल्या त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे मराठी कादंबरीतील सामाजिकतेचे आदिपर्व. ‘गणपतराव', ‘यशवंतराव खरे', ‘मी', ‘जग हे असें आहे’, ‘मायेचा बाजार', ‘भयंकर दिव्य', ‘आजच' आणि ‘कर्मयोग' या त्यांच्या कादंबऱ्या. ‘करमणूक' मधून क्रमशः प्रसिध्द झालेल्या. ‘पण लक्षात कोण घेतो?' या कादंबरीतील वास्तववादी जीवनदर्शनामुळे ती ‘साहित्यातील मानदंड' ठरली. काळ बदलला तरी आजही तिच्यातील वाङमयीन गुणवत्ता कमी झालेली नाही. ‘वज्राघात', ‘उषःकाल' आणि ‘गड आला पण सिंह गेला' यासारख्या ऐतिहासिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. 

आणखी वाचा:

स्वराज्याची सर सुराज्याला नाही: मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर -

"जीवित- महिमा'' ही हरिभाऊ आपटे यांची कविता म्हणजे एच. डब्ल्यू. लॉंगफेलो या अमेरिकन कवीच्या ‘ए साऽम ऑफ लाइफ' या कवितेचे रूपांतर आहे. लॉंगफेलो हा हरिभाऊंचा आवडता कवी असावा. त्यांच्या ‘मी' या कादंबरीतदेखील
""Let  us then be up and doing
     With a heart  for any fate
     Still Achieving Still pursuing
Learn to labour and to Wait ''

  हे अवतरण उद्‌धृत केल्याचे आठवते. ते तर प्रयत्नवादाचे नितांत मधुर सुक्त आहे. हे रुपांतर करताना त्यांनी अनंतफंदी यांनी हाताळलेला फटका हा काव्यप्रकार स्वीकारलेला आहे. फटका हा काव्यप्रकारात आत्मनिष्ठ आशय संभवत नाही. उपदेशपरता असते. साधारणतः आचारनिष्ठ अंतर्मुख जीवन आणि खोटे बहिर्मुख जीवन यामधील विसंवाद दाखविणे हे फटका या काव्यप्रकाराचे लक्षण असते. 
हरिभाऊ आपटे यांचा प्रस्तुत फटका सद्यःस्थितीत प्रेरक ठरणारा आहे. विसंगतीवर प्रहार करणारा आहे. मनामनांवर पसरलेला निराशेचा तवंग दूर करून जीवनेच्छा वृद्धिंगत करणारा आहे.

सुरुवातीलाच हरिभाऊ आपटे सांगतात, "‘असार जीवन, केवळ माया' हे रडगाणे गात बसू नका. त्यामुळे जीवन व्यर्थच जाणार आहे. जो माणूस झोपा काढीत राहिला तो माणूस मेलाच म्हणून समजा. त्याबद्दल काहीच संशय बाळगू नका.

जीवनातील सकारात्मक अनुभूतीचा पुरस्कार करताना हरिभाऊ म्हणतात, "वास्तवात आपण जे असार मानतो, त्याच्या अंतरात पुष्कळ सार सामावलेले आहे. हे जाणून आपले कर्तव्य मन लावून करा बरे! आपण मेलो म्हणजे श्रेयस लाभले, साऱ्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली असे समजू नका. ‘माती असशी मातिंत मिळशी' हे तत्त्व आत्म्याला लागू पडणार नाही. सुख-दुःखाचे भोग भोगणे हा मुळी जीविताचा हेतू नाही. आजच्यापेक्षा उद्या काहीतरी श्रेयस्कर स्वरूपाचे करू हा मनाचा निर्धार हवा. विद्या अपरिमित आहे आणि काळ मात्र अल्पमात्र आहे. तो झरझर धावत आहे. अशी आपल्या मनाची धारणा हवी.
तुम्ही कितीही शूर छातीचे असा. एक ना एक दिवस हळुहळू मृत्यू तुम्हाला गाठणारच आहे.

विशाल स्वरूपाच्या विश्‍वाच्या समरांगणात जीवनाचे हे युध्द निरंतर चालूच राहणार आहे. त्यात धैर्याने लढून शूर म्हणून नाव कमवा. 
मुकी बिचारी कुणीही हाकलली तर मुकाट्याने चालू लागणारी मेंढरे बनू नका. स्वयंप्रेरणेने वाटचाल करायला शिका. होऊन गेलेल्या गोष्टीसंबंधी पुनःपुन्हा विचार करू नका. गतकाळाबद्दल विनाकारण शोक करीत राहू नका. भविष्यकाळ अतिसुखाचा असेल याचाही भरवसा बाळगू नका. कारण त्यामुळेदेखील अपेक्षाभंगाचे दुःख पदरी पडण्याची शक्‍यता आहे.
आपली सध्याची घटिका जशी जाते ती साधा. जे तुम्हाला करायचे आहे ते आताच करा. चित्तामध्ये सदैव धैर्य बाळगा, परमेश्‍वरावर भरवसा ठेवा. आजवर जे महात्मे होऊन गेले त्यांनी असामान्य कर्तृत्व गाजविले, त्यांचे चरित्र अभ्यासा. त्यांच्यापासून प्रेरणा घ्या. आपण त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करणे हा त्यातून खरा बोध सापडतो. भवसागराच्या वाळवंटावरून क्षणभंगूर जीवनाचा त्याग करीत असताना त्यावर आपली चार पावले उमटविण्याचा मार्ग योग्य. तेथून पैलतीरावर जाण्यासाठी जीवनाचा सागर मोठा दुस्तर खरा.

एखादा माणूस धडपड करतो. अपयश स्वीकारतो. पूर्णतः निराश होऊन जातो. असा माणूस दृष्टिपथात आला असता आपली पावले पुढे पुढे पडतील. त्यातूनच आपल्याला धीर येईल. हे सत्य कोण बरे नाकारू शकेल?
तेव्हा तुम्ही आता उठा, जागृत व्हा. झोपू नका. " पुढे कसे होईल? असे म्हणून हताश होऊ नका. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जा. दीर्घोद्योग सोडू नका.
‘धीर धरी तो गंभीर’ हा जीवनाचा मंत्र आहे. हे जाणा. हे विसरू नका.’’ तत्कालीन प्रबोधन युगाला साजेसा उपदेश हरिभाऊ आपटे यांनी आपल्या या काव्यरचनेतून केलेला आहे.

-डॉ. सोमनाथ कोमरपंत

संबंधित बातम्या