
उन्हाळा येतानाच आपल्यासोबत अनेक प्रकारचे सुगंध घेऊन येतो. कच्च्या कैरीचा, पिकलेल्या आंब्यांचा, फणसाच्या गऱ्यांचा, जांभूळ आणि करवंदांचा, पाण्यात घातलेल्या वाळ्याचा, मोगरा-बकुळ आणि सुरंगीच्या फुलांचा आणि आणखी एक घरभर दरवळणारा सुवास, जो काळाच्या आड हरवून गेलाय, तो म्हणजे गव्हाच्या चिकाचा.
कदाचित गोमंतकीयांना हा गव्हाचा चीक आणि तो शिजत असताना घरभर पसरणारा सुवास अपरिचित नसणार. गव्हाचा चीक म्हटल्यावर मन आपोआप बालपणात आणि खास करून उन्हाळ्याच्या सुट्टीत रमू लागते.
उन्हाळ्याचा काळ, म्हणूनच अनेक कारणांनी ‘नॉस्टॅल्जीक’ करतो. एक काळ असा होता की पूर्ण वर्ष उन्हाळ्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट बघितली जायची. वर्षभरात शाळेला सर्वांत मोठी सुट्टी याच काळात मिळायची.
उन्हाळा आणि सुट्टी, असे समीकरण असले तरी उन्हाळा आणि वाळवणाची कामे हेही एक आम्ही राहत असलेल्या वाड्याचे समीकरण होते. आमचा वाडा छान ऐसपैस होता. सुंदर, आखीवरेखीव चौसेपी अशी पुढे-मागे दोन अंगणे होती. पुढच्या अंगणात नाही, पण मागच्या अंगणात वाड्यातील बायकांचे राज्य होते.
कधी भोंडला, तर कधी कुणाचे डोहाळ जेवण याच अंगणात होत. उन्हाळ्यात तर या अंगणाची वाटणी व्हायची ती उन्हाळी वाळवणाच्या कामासाठी. या सगळ्या कारणांमुळे मागच्या अंगणात जिवंतपणा कायम जगायचा.
उन्हाळी वाळवण ही पुढच्या वर्षभरासाठी केली जाणारी बेगमी, म्हणजेच साठवणूक असते. महिलांनी आजही पद्धत जपून ठेवलीय. आपली खाद्यसंस्कृती इतक्या विविध खाद्यप्रकारांनी आणि खाद्यपदार्थांनी समृद्ध आहे.
त्यात वाळवणाला वेगळे महत्त्व आहे. भात-वरण, भाजी-पोळी, चटणी-कोशिंबीर, अगदी चिकन -मटणाचा बेत असला तरी या पदार्थांइतकेच ताटात पापड, कुरडई-पापडी, सांडगे, खारोड्या, खिच्चे पापड, लोणचे यासारख्या वाळवणातून आलेल्या, तळलेल्या कुरकुरीत पदार्थांना महत्त्व आहे. किंबहुना या पदार्थांशिवाय जेवणाचे ताट अपुरे - अर्धवट वाढल्यासारखे वाटते.
आपल्याकडे नाही तर जगात सर्वत्र अगदी प्राचीन काळातही खारवलेल्या पदार्थांचा इतिहास सापडतो. पदार्थ जास्त काळ टिकावेत म्हणून ते खारवून, म्हणजे आधी उन्हात वाळवून, मग त्याला मीठ लावून पुढच्या काळासाठी साठवून ठेवले जायचे.
ही पद्धत आजही सर्वत्र अस्तित्वात आहे. यालाच ‘वाळवण’ म्हटले जाते. बालपणीच्या दिवसांत, उन्हाळ्याच्या काळात शेजारपाजारच्या अंगणात मुद्दाम डोकावून यावे, असे वातावरण असायचे. अंगणात कोणी काय वाळत घातलेय हे तिथे डोकावताच समजायचे.
खरे तर तिथे डोकावण्याआधीच दूरपर्यंत पसरणाऱ्या सुवासाने समजून जायचे. त्यात तोंडाला पाणी सुटेल असा गव्हाच्या चिकाचा वास असायचा. गव्हाचा चीक करणे म्हणजे एक मोठा सोहळा. तीन दिवस आधी गहू भिजत घालणे, रोज त्यातले पाणी बदलणे, मग ते गहू बारीक वाटून घेऊन ते शिजवणे, हे सगळे करताना वाड्यातील अनेकजणींना बघितलेय.
ते बारीक वाटलेले गहू जेव्हा शिजायला घातल्यावर त्या गव्हाच्या चिकाचा अफलातून वास घरभर पसरतो. शेजारीपाजारी मुद्दाम सांगावे लागत नाही. हा सुगंधच, ‘कशाची तयारी चाललीय’, हे सर्वांना सांगून येतो.
आमच्या वाड्यात ही सगळी ‘वाळवणा’ची कामे सामूहिक असायची. आजही महिला सामूहिक पद्धतीने ही कामे करतात. वाड्यात त्यावेळी राहणाऱ्या घारगे काकूंचे वाळवण वाड्यात सर्वांत आधी तयार व्हायचे. कुरडयांचा चीक तयार करण्याचे किचकट काम त्या मोठ्या कौशल्याने करायच्या.
चीक शिजत असताना पूर्ण वाडाभर त्याचा घमघमाट सुटायचा. खूप हावरटासारख्या आम्ही सगळ्या मुली घारगेकाकूंच्या वाळवणाच्या पदार्थांवर लक्ष ठेवून असायचो. त्यांच्या घरी चीक बनवायला सुरुवात झाली की, आम्ही सगळी मुले वाटी चमचा घेऊन त्यांच्या घरी पोहोचायचो. वाटीत चीक आणि त्यावर तुपाची धार पडली की, सगळे अंगणात जाऊन खात बसायचो.
मग पुढचा तासभर शांतता असायची. दुसरीकडे घारगे काकूंची याच गरमगरम चिकाच्या भराभर कुरडया घालायची लगबग सुरू असायची. चकलीच्या सोऱ्यातून नाजूक धाग्यांसारख्या गोल गोल आकारात पडणारा पांढरा शुभ्र चीक कुरडईचे रूप घ्यायचा. कुरडया घालत असताना त्या सगळ्या प्रक्रियेचे निरीक्षण करायला आवडायचे.
कुरडया झाल्या की काकू साबुदाण्याच्या पापड्या वाळत घालायच्या. प्लास्टिकच्या पेपरवर व्यवस्थित ओळीत पापड्या घालण्याचे काम आम्ही लक्षपूर्वक बघत बसायचो. या अर्धवट वाळलेल्या, थोड्याशा ओल्या, थोड्याशा वाळलेल्या पापड्या खायला असल्या भारी लागायच्या! वाड्यात दुपारी शुकशुकाट असायचा.
याचा फायदा घेऊन आम्ही काकूंच्या साबुदाण्याच्या पापड्यांवर डल्ला मारायचो. त्या वाळत घातलेल्या पापड्या तिथून उचलून खाल्ल्या की त्या पेपरवर पापडीचा ठसा उमटलेला असायचा आणि एक रिकामी जागा तयार व्हायची. मग आम्ही मोठ्या शिताफीने तिथल्या बऱ्याच पापड्यांच्या जागांची अदलाबदल करून टाकायचो.
यामुळे त्या वाळत घातलेल्या पापड्यांमधील काही पापड्या आमच्या पोटात गेल्या आहेत हे कधीच लक्षात यायचे नाही! या कामात आम्ही अगदी एक्स्पर्ट झालो होतो. संपूर्ण देशभर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या प्रकाराने वाळवणाचे पदार्थ बनवले जातात, याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात.
काश्मीरमध्ये बर्फ पडतो त्या काळात घराबाहेर पडता येत नाही. अशा वेळी उपयोगी पडावे म्हणून काश्मिरी महिला उन्हाळ्यात कोबी, फ्लॉवर, बटाटा, कांदा यासारख्या भाज्या चिरून त्याला मसाले आणि मीठ लावून वाळवून ठेवतात. बर्फवारीच्या काळात याच वाळवलेल्या भाज्यांची भाजी केली जाते.
अशीच पद्धत खान्देशातही अस्तित्वात आहे. ’उसऱ्या’ नावाचा एक वेगळा प्रकार या भागात बघायला मिळतो. गवार, भेंडी, वाल भाजी आणि कैरीच्या फोडी या सावलीत वाळवून साठवून ठेवतात. उन्हाळ्यात भाजीचा तुटवडा असतो तेव्हा याच सुकवलेल्या भाजीपासून छान चविष्ट भाजी बनवली जाते.
उन्हाळ्यात भाजी मिळत नाही आणि खूप महागही होते. त्यावर इथल्या गृहिणींनी शोधून काढलेला उत्तम पर्याय म्हणजे उसऱ्या. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान येथे उडदाचा पापड बनवला जातो, तर दक्षिण भारतात तांदळाचा.
राजस्थानमध्ये ताटाच्या आकाराचा पापड असतो, तर दक्षिण भारतात हातच्या आकाराचा पापड असतो. प्रमाण वेगळे असेल, आकार वेगळे असतील पण भारतभर वाळवणाचे पदार्थ अतिशय प्रिय आहेत. आजही ग्रामीण भागात या काळात घरोघरी हे पदार्थ बनवले जातात. वाड्यात राहत होते तोवर हे सगळे पदार्थ प्रत्यक्ष बनताना बघायला मिळायचे. पण त्यानंतर बघितलेच नाहीत.
कुरडया बनवण्यासाठी केला जाणारा गव्हाचा चीक खूप वर्षांत खाल्ला नाहीये. पुढच्या पिढीपर्यंत या सगळ्या गोष्टी टिकून राहिल्या पाहिजेत यासाठी त्याचे दस्ताऐवजीकरण करायला हवे असे वाटू लागलेय!
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.