Sunderlal Bahuguna: मानवतेचा आधार हा निसर्गातच जपावा, तो दवा-दारूतून मिळणार नाही’

Sunderlal Bahuguna:
Sunderlal Bahuguna:

निसर्गाची(Nature) किंमत काय आहे, याची जाणीव प्रखरतेने आपल्या सगळ्यांना ज्या काळात होत आहे, त्याच काळात सुंदरलाल बहुगुणा(Sunderlal Bahuguna) आपल्यातून गेले आहेत. ‘नैसर्गिक साधने हीच आपल्या जीवनाचा आधार आहेत’, ही गोष्ट भारताला आणि जगाला जाणवून देणाऱ्या निवडक माणसांमध्ये सुंदरलालजींची गणना होते. पर्यावरण प्रेमाचा आणि पर्यावरण रक्षणाचा मुद्दा जेव्हा जेव्हा त्यांनी उठवला, तेव्हा त्या त्या वेळच्या सरकारांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र भारतीय समाजाने त्यांना कायम ‘अलौकिक पर्यावरणवादी’च मानले. ते शास्त्रज्ञ नव्हते; पण निसर्गाशी जोडलेले सहृदय मानव होते. ‘मानवतेचा आधार हा निसर्गातच जपावा लागेल. तो दवा-दारूतून मिळणार नाही’, हे ते कायम सांगत.(Sunderlal Bahuguna The basis of humanity has to be preserved in nature)

उत्तराखंडासारख्या छोट्याशा राज्यामध्ये पर्यावरणाला जे गंभीर धक्के बसत होते, त्याला विरोधाची सुरवात ज्या ‘चिपको’ आंदोलनापासून झाली, त्यात चंडीप्रसाद भटांबरोबर सुंदरलालजींनी एक मोठी आणि निर्णायक भूमिका बजावली. त्यांनी उत्तराखंडच्या प्रशासनाला पुन्हापुन्हा इशारा दिला होता. त्यांचा मार्ग अहिंसावादी गांधीवादी सत्याग्रहाचाच होता.त्यांनी तब्बल 75 दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळी ते फक्त बदामाच्या फळाचा रस घेऊन राहत होते. अनेकवेळा मी त्यांच्याबरोबर जात असे. या काळात त्यांच्याबरोबर मलाही अटक होत असे. जेव्हा ते काही मागण्यांसाठी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनीही त्यांच्या मागण्यांकडे फारसं लक्ष दिलं नाही. मला जाणवलं की, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनादेखील बहुगुणाजींचे मुद्दे तत्त्वतः पटत असले तरी, भांडवली गुंतवणूकदारांच्यांच प्रभावाखाली चालणाऱ्या यंत्रणा त्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळेच बहुगुणांजींनाही त्यांनी मानले नाही. मात्र बहुगुणा यांनी पर्यावरणासंबंधी त्या वेळी दिलेला प्रत्येक इशारा आज खरा ठरतोय. उत्तराखंडमधील भूस्खलन, अतिवृष्टी, पूर, भूकंपाचा त्रास तेथील दऱ्या-खोऱ्यांत राहणारी श्रमिक जनता भोगत आहे. 

आज बहुगुणांजींनी आपल्यामध्ये सक्रिय असणे आवश्यक होते. त्यांनी केवळ ‘नद्या वाचवा, जंगल वाचवा’ असे म्हटले नाही. तर ‘संपूर्ण निसर्ग आणि जीवन वाचवा’ असे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी जीवनप्रणालीचे धडेच जनतेसमोर ठेवले आहे. त्यांची भाषणे ज्यांनी ऐकली असतील, त्यांना त्यातले ममत्व, ओलावा आणि निसर्गातून माणसानेे घ्यावयाचे करुणातत्त्व दिसेल. बहुगुणाजी आणि त्यांच्या पत्नी विमलाजी हे दोघे शेवटपर्यंत गांधीवादीच राहिले. त्या दोघांचे विचार हे खरोखर जीवनदायी विचार होते, हे मला त्यांच्याशी बोलताना नेहेमीच जाणवले. 

बहुगुणाजींनी जे भोगलं ते केवळ सत्ताधीशांकडून नाही तर भांडवलदारांकडूनही त्यांना खूप भोगावं लागलं. त्यांनी कुठे ॲक्सिडेंट घडवून आणला. त्यातून टिहरीच्या विस्थापितांचा प्रश्न धसास लावण्यात अडथळे आणले गेले. विमल, जगदंबा प्रसाद आणि त्यांची मुलंबाळं असे देश- विदेशातील अनेक लोक बहुगुणांजींची प्रेरणा घेऊनच पर्यावरणाचा विचार मांडत आहेत. कार्य करत आहेत. पर्यावरणविरोधी विकासाच्या नावाने सुरू असलेल्या विनाशाच्या काळात बहुगुणा आपल्यातून गेले आहेत. त्यांना स्वतःलाही कोरोना विषाणूंच्या आजारातून जावे लागले आहे. कोरोनाग्रस्तांचे आयुष्य धोक्यात असताना बहुगुणाजींचे विचारच आपल्याला आणि पुढच्या पिढीला वाचवू शकतात. निसर्गाचं देणं जपणं, हा तो विचार. त्यांची ‘चिपको’ आंदोलनासारखी आंदोलने म्हणजे बिष्णोई समाजाकडून घेतलेल्या प्रेरणेचे प्रकटीकरण होते.

हे सर्व मुद्दे आता आपल्याला कुठे तरी अजेंड्यावर आणावे लागतील. आपली अर्थव्यवस्था बदलावी लागेल आणि अगदी तळागाळाच्या ग्रामस्वराज्याची गोष्ट जी गांधींपासून ते बहुगुणाजींपर्यंत सर्वांनी सतत मांडली, त्याचाच ध्यास घेऊन तीच पद्धती प्रशासनात आणि शासनात अमलात आणावी लागेल. बहुगुणाजींचे विचार आणि आचार आपल्या जगण्यात, आपल्या सामाजिक आणि आर्थिक कृतीत साकारावे लागतील. ‘नर्मदा बचाव’सारख्या अनेक आंदोलनांचे ते समर्थक होते. आज त्यांची खूपच गरज होती. प्रत्येक नदी आणि समुद्र, जमीन आणि शेतकरी, पशुपालक आणि पशू सर्वांचे जीवन धोक्यात असताना बहुगुणाजींचं आपल्यात असणं फार मोलाचं-महत्त्वाचं होतं. आपण त्यांचे जीवन वाचवू शकलो नाही. निदान पुढच्या पिढीचे जीवन वाचवूया, हाच संकल्प करूयात. माझी त्यांना श्रद्धांजली.

-मेधा पाटकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com