प्रा. सुरेंद्र सिरसाट: उत्‍कृष्‍ट नाट्य कलाकाराचा असाही एक किस्सा...

प्रा. सुरेंद्र सिरसाट: उत्‍कृष्‍ट नाट्य कलाकाराचा असाही एक किस्सा...
Surendra Sirsat loyal activist of M G P His journey was like a president

 प्रा. सुरेंद्र सिरसाट यांचा म.गो.पक्षाचा निष्ठावान कार्यक्रर्ता ते म.गो. अध्यक्ष असा त्यांचा प्रवास होता. 1991 सालापासून त्यांनी सलग 9 वर्षे म.गो.पक्षाचे अध्यक्षपद स्‍वीकारले. सन 2000 सालामध्ये म.गो.च्या अध्यक्षा शशिकलाताई यांच्‍याबरोबर त्यांचे पटले नाही, तेव्हा ताईंनी त्याची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या जनता पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्षपद स्‍वीकारले. जनता पक्षाच्या माध्यमातून त्यानी राज्यभर मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गोवा प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड केली होती. त्यानंतर त्याची राष्ट्रीय सचिव म्हणून पवारांनी नेमणूक केली.

प्रा. सुरेंद्र सिरसाट यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1946 साली झाला. 1977, 1987 व 1984 या सालामध्ये त्यांनी म.गो. पक्षाचे अध्यक्षपद तब्‍बल 9 वर्षे भूषविले जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही त्‍यांनी भूषविले आहे. कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाचे 20 वर्षे प्राचार्य म्हणून त्‍यांनी काम पाहिले. ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव, वैश्‍य मंडळाच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष महारूद्र, संस्थानचे माजी अध्यक्ष देव बोडगेश्‍वर देवस्थानाचे माजी सचिव, म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष, वैश्‍य अर्बन को. ऑपरेटीव्ह सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष, गोवा राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, म्हापसा अर्बन बँकेचे माजी संचालक म्हणून त्‍यांनी काम पाहिले आहे. 

शिक्षण कारकिर्द

प्रा. सिरसाट यांनी महाविद्यालयीन शिक्षण धेंपे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी ज्ञानप्रसारक विद्यालयाच्या प्राथमिक विभागात शिक्षक म्हणून रूजू झाले त्यानंतर प्राथमिक विभाग प्रमुख त्याची नेमणूक केली. त्यांचे गुरू व म्हापशाचे पहिले आमदार स्व. रघुनाथ (बाप्पा) टोपले यांनी त्यांना बोलावून घेऊन आपल्या माजी विद्यार्थ्यांला जनता हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी दिली. त्यानंतर त्यांना ज्ञानप्रसारक विद्यालयात पदवी गटात नोकरी मिळाली. त्या ठिकाणी ज्ञानदान देत असतानाच त्यांना ज्ञानप्रसारक उच्च माध्यमिक विद्यालयात कॉमर्स शाखेत अकौंटन्‍सी विषय शिकविण्यासाठी त्या ठिकाणी निवड झाली. त्या अनुभवाच्या बळावर त्यांची उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी1987 मध्ये नेमणूक केली.

जवळजवळ 20 वर्षे ते प्राचार्य होते. म्हापशाचा आमदार असूनसुद्धा त्‍यांनी आपल्या शिक्षकीपेशाकडे दुर्लक्ष केले नाही. आमदार व प्राचार्य या दोन्ही पदांना त्यांनी समान न्‍याय दिला. सिरसाट यांनी एमकॉम, डीएफई पर्यंतचे शिक्षण घेऊनसुद्धा त्यांनी त्याकाळात आपल्या आर्थिक परिस्‍थितीच विसर पडला नाही. प्राथमिक शिक्षण ते उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदापर्यंत झेप घेतलेल्‍या सिरसाट यांना उच्च माध्यमिक विद्यालयात फक्त वाणिज्य शाखा होती, त्यामध्ये कला विभाग, विज्ञान विभाग, व्यावसायिक शाखा, अशा शाखा चालू केल्या व ज्ञानप्रसारक उच्च माध्यमिक विद्यालयाचे नाव उंचावले. त्यांनी 11 वी 12 वीच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी अ बुक किपींग अॅण्ड अकाऊटन्सी अभ्यासक्रम लिहून पुस्तक प्रसिद्ध केले होते.

उत्‍कृष्‍ट शिक्षक पुरस्‍कार प्राप्‍त

5 सप्टेंबर 2004 रोजी राज्य सरकारने सुरेंद्र सिरसाट यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्ञानप्रसारक कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाने संगणक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यामुळे ७ डिसेंबर २००५ ला नवी दिल्ली येथे राष्ट्रपती कलाम यांच्या हस्ते सिरसाट यांना संगणक साक्षरता उत्कृष्टता पुरस्कार प्राप्त केला होता. सिरसाट सरांनी उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणली होती. वर्ग सुरू होण्यापूर्वी तसेच मध्यावर व वर्ग संपल्यानंतर ते आपल्या प्राचार्य कार्यालयातून बाहेर येऊन प्रत्येक विद्यार्थ्यांवर त्यांची नजर असे. काही विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आढळून आल्यास लगेच पालकांना बोलावून घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या समस्येवर चर्चा करून तोडगा काढत असत. त्‍यामुळे आजपर्यंत विद्यार्थी व पालकांमध्ये त्यांच्या प्रती आदराचे स्थान होते.

उत्‍कृष्‍ट नाट्य कलाकार

सुरेंद्र सिरसाट हे उत्कृष्ठ नाट्य कलाकार, नाट्य लेखक तसेच ललीत लेख, काव्य असे साहित्य क्षेत्रात काम केले आहे. गोव्याच्या अनेक वर्तमानपत्रांतून त्‍यांनी आपली लेखमाला प्रसिध्द केली आहे. महारुद्र प्रासादिक संगीत नाटक मंडळीचा सिरसाट सर नाट्य कलाकार होते. हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या पाच नाटकापैकी दुसरे नाटक सरांच्या नावावर होत असे. त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे कुठलीही भूमिका ते सहजपणे साकारत होते. श्री शांतादुर्गा देवीच्या शिशिरोत्सवातसुद्धा त्यांनी धारगळ येथील श्री शांतादुर्गेच्‍या प्रांगणात भूमिका साकारल्या आहेत. आमदार असतानासुद्धा त्यांनी नाटकात कामे केली आहेत. विधानसभेचे सभापती असतानासुद्धा त्यांनी नाटकात भूमिका साकारल्‍या. रात्री १०.३० वा. नाटक होणार, पण सिरसाट सर सभापती असूनसुद्धा रात्री १० पर्यंत नाट्यगृहात पोहोचत असत. प्रमुख भूमिका साकारत असताना त्यांना नोकराचीसुद्धा भूमिका साकारण्‍यास कधीही कमीपणा वाटला नाही. 

म्‍हापशाच्‍या जडणघडणीत मोलाचा वाटा

म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे प्रा. सिरसाट हे विश्वस्त होते. तसेच ते माजी अध्यक्ष होते. म्हापसा शहरातील सर्वात जुने मंदिर असलेल्या श्री महारुद्र संस्थानचे माजी अध्यक्ष, श्री देव बोडगेश्वर देवस्थान समितीचे माजी सचिव व उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ज्ञानप्रसारक मंडळाचे सहावर्षे सरचिटणीस व उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. वैश्य मंडळाच्या सर्वासाधारण सभेचे अध्यक्ष व अखिल गोमंतक वैश्य परिषदेचे माजी उपाध्यक्ष व वैश्य भारतीचे संपादक होते. म्हापसा ग्रामस्थ हिंदू सभेचे माजी अध्यक्ष, सम्राट क्लब ऑफ म्हापसाचे माजी अध्यक्ष तसेच म्हापशाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. आमदार असताना त्यांनी अनेक खासगी विधायके आणली. त्यामध्ये महिला आयोग हे महत्त्‍वाचे होते. म्हापसा शहराचा चौफेर विकास केला होता. सुरेंद्र सिरसाट हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.

असाही किस्सा...
सिरसाट सरांच्या मळीवाडा येथील निवासस्थानासमोर ब्रह्मवाठार राष्‍ट्रोळी देवस्थान आहे. त्याठिकाणी 25जानेवारीला उत्सव होतो. सरांनी आपल्या तारुण्यावर नाटक लिहिले होते. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. म्हापशातील नाट्यप्रेमी लोकांनी त्याना त्याकाळीत पाठिंबा दिला होता. सिरसाट सर भूमिकेत शिरल्यानंतर त्यांनी त्या भूमिकेला न्याय दिल्याशिवाय राहत नसत. सिरसाट सरांचा रंगभूमीवर प्रवेश झाल्यानंतर टाळ्यांच्या कडकडात त्यांचे नाट्यप्रेमी अभिनंदन करीत 
असत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com