Gulmohar: लालजर्द कृष्णचुडा

इंग्रजीत गुलमोहराच्या झाडाला ‘फ्लेम ट्री’म्हटले जाते.
Gulmohar
GulmoharDainik Gomantak

Gulmohar आपल्या भोवतालच्या रणरणत्या उन्हाशी स्पर्धा करत गुलमोहर फुलतो. अंगोपांगी लालभडक होऊन जातो. लाही करून टाकणारे ऊन, गुलमोहराच्या बहरात मस्त जमून येते.

उन्हाळ्यात एरवी आकाशातले किंवा जमिनीवरचे ऊन जसे डोळ्यांना त्रासवते तसे गुलमोहराच्या बहरामधले ऊन मात्र अजिबात त्रासवत नाही. उलट ते डोळ्यांना सुखावून टाकते. वणव्याच्या अंगाला असे आनंदी सुख क्वचितच फुटते.

वैशाखातल्या निळ्याभोर आकाशाविरुद्ध आपला जन्मोजन्मीचा बहर घेऊन येणाऱ्या या झाडाचे नाव देखील किती सुंदर आहे- गुलमोहर! गुलमोहराचा बहर जगातील सर्वात सुंदर बहरांपैकी नक्कीच एक असेल.

उष्ण कटिबंधीय हवामान असलेले ब्राझील, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया हे सारेच देश, आपापल्या उन्हाळ्यात गुलमोहोरात बहरून जातात. फ्रेंच लोकांच्या रक्तातच रोमान्स भरलेला आहे. त्यांनी गुलमोहराच्या फुलाला ‘स्वर्गाचे फुल’ असे नाव दिले आहे.

इंग्रजीत गुलमोहराच्या झाडाला ‘फ्लेम ट्री’म्हटले जाते. लालजर्द फुलांनी पेटलेले गुलमोहराचे झाड कुणा इंग्रजाला तेवणाऱ्या ज्योतीसारखेही दिसले असेल. ही झाडे जंगलातही पाहायला मिळतात त्यामुळे त्यांना ‘जंगलातील आग’ असेही म्हटले जाते.

आग, फ्लेम अशी अगदी सिनेमास्टाईल धगधगणारी नावे जरी गुलमोहराच्या झाडाला लाभलेली असली तरी या झाडाच्या सावलीत (बहर असताना किंवा नसताना देखील) नेहमीच शीतलता अनुभवायला मिळते.

Gulmohar
Gomantak Editorial: खाकी वर्दीला गुंडांचे आव्हान

वैशाखाच्या झळांमध्ये झळाळून फुललेला गुलमोहर, पुढे ज्येष्ठ-आषाढातल्या पावसापर्यंत ओलेत्याने निथळत, फुलांचा भार माथ्यावर घेऊन उभा राहतो. त्या काळात खाली सांडणाऱ्या फुलांचा सडा, जमीनही भिजल्याने लाल-केशरी-नारंगी होत, अभिनिवेशाने मांडत राहते.

ऑक्टोबर-नोव्हेंबर येता येता ते लाल फुलांनी वेढलेले झाड पुन्हा रिकामी होते. पाच सुंदर पाकळ्या असणाऱ्या या फुलांचा थाट, सुमारे पाच महिने गुलमोहराच्या झाडाचा ‘कोरस’ बनून राहिलेला असतो.

गुलमोहोराच्या झाडांचे वैज्ञानिक नाव ‘डेलोनिक्स रेजिया’ असे आहे. मूळ मादागास्करचा असलेला हा गुलमोहर भारतात कसा आला याबद्दल आख्यायिका आहेत. काहींच्या मते तो ब्रिटिशांनी २०० वर्षांपूर्वी भारतात आणला तर काहींच्या मते प्राचीन आंतरखंडीय उलथापालथीमधून तो फार जुन्या काळात भारतात (व इतर उष्णकटिबंधीय प्रदेशात) पोहोचला.

Gulmohar
Air Quality: हवी हवी अशी हवा

गुलमोहरच्या झाडाला संस्कृत भाषेत ‘कृष्णचुडा’ असे सुंदर नाव आहे. आयुर्वेदातही गुलमोहरांच्या फुलांचे महत्त्व सांगितले गेले आहे. त्याच्या झाडाची साल व पाने यात औषधी गुणधर्म आहेत.

अतिसार, मधुमेह, रक्ताची कमतरता, शोष अशा अनेक समस्यांवर गुलमोहोराच्या फुलांपासून बनवलेल्या औषधांचा उपचार सांगितला गेला आहे. पिवळा गुलमोहर गुठळ्या आणि सायनस यावर प्रतिबंधक म्हणून वापरला जातो.

जंगल, रस्ते, घरांचे अंगण या साऱ्या जागांना गुलमोहर एक आकर्षक रूप प्रदान करतो. गुलमोहराचे झाड लावणेही सोपे आहे. बियाणे रुजवून किंवा त्याची सुमारे १ ते २ इंच रुंदीची फांदी कलम करून अनेक लोक हे झाड लावतात. काही लोक गुलमोहराचे बोन्साय देखील करतात. या झाडाचे झाडांचे सरासरी आयुष्य सुमारे ५० वर्षे असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com