काळ होतो, ‘इतिहास’

हेमा नायक
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

आपले मूल हुशार, बुद्धिवान आणि ज्ञानी व्हावे, असे प्रत्येक स्त्रीला वाटते. म्हणूनच तर ही संपन्नता मातेच्या अंगी असली पाहिजे. आमचा गोवा भौगोलिक आकाराने लहान असला तरी या इवल्याशा परिसरात कितीतरी घडामोडी घडल्यात त्याच्या बऱ्याचशा नोंदी काही काळाने पुसूनही जातील. सगळ्याच नोंदी लिखित इतिहासात सापडतीलच असे होत नाही.

 

हेमा नायक

माणसाला जीवन एकदाच मिळते, त्या जगण्याचे सार्थक करावे. संसाराचे चाक चालूच असते. कधी वेगाने तर कधी संथ. कालचा काळ आज भूतकाळ बनतो, तर आजचा वर्तमानकाळ उद्याचा भूतकाळ. ५० वर्षा आधीचा काळ आज इतिहासाच्या पानातून शिकावा लागेल. कधीतरी आमचीच मुले म्हणायला लागतील ‘मां सुनाओ, मुझे वह कहानी जहाँ एक राजा हो और एक रानी.’ आणि मग आपल्याला बालपणातील कितीतरी गोष्टी आठवू लागतील. आईच्या कुशीत झोपताना आजच्या मुलांना काऊ चिऊच्या गोष्टी नको असतात. त्यांना आपल्या मनाला भावणाऱ्या खऱ्या खुऱ्या गोष्टी पाहिजेत. कोणत्याही एखाद्या समारंभाचे सूत्र संचालन करणाऱ्या व्यक्तीकडे श्रोत्यांना झुलवीत ठेवण्यासाठी निवेदनाची खास अभिनय शैली असावी लागते, त्याच बरोबर आपल्या गोड आवाजातून सभोवतालच्या बऱ्याच गोष्टींची माहिती आणि ज्ञान अधून मधून शब्दाद्वारे श्रोत्यांना द्यावे लागते. अंगी असलेले ते कसब समारंभाची उंची गाठायला उपयोगी पडते. हाच संदर्भ आमच्या जगण्याकडे लावला पाहिजे. जीवन म्हणजे अफाट अनुभव आणि भरगच्च माहितीच्या जमेतून संपन्न होऊन काठोकाठ भरलेली जणू पाण्याची घागर.

आपले मूल हुशार, बुद्धिवान आणि ज्ञानी व्हावे, असे प्रत्येक स्त्रीला वाटते. म्हणूनच तर ही संपन्नता मातेच्या अंगी असली पाहिजे. आमचा गोवा भौगोलिक आकाराने लहान असला तरी या इवल्याशा परिसरात कितीतरी घडामोडी घडल्यात त्याच्या बऱ्याचशा नोंदी काही काळाने पुसूनही जातील. सगळ्याच नोंदी लिखित इतिहासात सापडतीलच असे होत नाही. समतोल राखून लिहिलेला तो इतिहास असतो. पण लेखक ज्या समाजात राहून जेवढ्या गोष्टी अनुभवतो आणि इतरांच्या तोंडून ऐकतो त्यांचा उल्लेख सर्जनशील साहित्यकृतींतून जरूर वाचायला मिळतो.
भारत पाकिस्तान फाळणीसंबंधी कितीतरी कथा आणि कादंबरी भारतीय भाषांतून आपल्याला संदर्भाकरिता मिळू शकतील. गोव्यात कितीतरी आंदोलने झालीत. गोवा मुक्ती संग्राम, ओपिनियन पोल, भाषा आंदोलन, उटा आंदोलन, गोवा बचाव आंदोलन, भाटकारशाही, शिक्षण माध्यम आणि आताची उदभवलेली समस्या कोरोना वायरस असे अनेक. त्या त्या काळातील वातावरण, त्या काळची व्यक्तिमत्त्वे, त्यांचे राहणीमान, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक तसेच आर्थिक परिस्थितीवर लेखकांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीने लिहिलेले लिखाण आले पाहिजे.

प्रत्येक वर्षी मुसळधार पाऊस पडायला लागला, की आपल्याकडील धरणे तुडुंब भरून वाहू लागतात. मग आपल्याला धोक्याच्या सूचना मिळू लागतात. धरणाजवळ असलेल्या गावांना जास्त भिती असते. साळावली धरणाची आणि तेथील परिसराची मला जास्त ओढ. कारण धरणासाठी निवडून काढलेला गाव तो माझ्या मामाचा गाव. लहानपणी आपण झुकुझुकु झुकुझुकु अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जावूया. हे गीत म्हणत सुटी पडल्यावर मोठ्या खुषीने मामाच्या गावाला जायचो आणि मजेत राहायचो. तो गाव निसर्गाने वरदान दिल्या सारखा हिरवाचार होता. आजच्या पिढीतील मुलांना सांगितल्यास खरे वाटणार नाही, इतका तो वैभवसंपन्न गाव होता. आंब्याच्या विविध जाती. मानकुराद, मुसराद, फेर्नांद, फुर्ताद. आता त्यांची लागवडही दिसत नाही कोठे. या गावातून आंब्याची निर्यात व्हायची. उसाचे मळेच होते. सुजलाम सुफलाम असा हा गाव होता. साखर आणि गुळाचे उत्पन्न इथे व्हायचे. एका वेळेस आंबे, फणस आणि नारळ काजुचे भरघोस पीक देणारा हा कुर्डी गाव आता भकास वाटतोय.
भाटकार – मुंडकार या नात्या मधले हेवेदावे बघितले. क्रूर होती भाटकारशाही. मूठभर भाटकार आणि राहिलेले मुंडकार. शेक गाजवायचे गरीब प्रजेवर. तीन हजार लोकवस्ती असलेल्या त्या गावाचे आज नाव निशाण राहिलेले नाही. लोकाना वाल्किणी आणि वाडे इथे हलविले, पण ज्या सुपीक जमिनीवर हे धरण बांधले गेले त्या धरणाचे पाणी राज्यांतील लोकांना मिळते. भूतपूर्व मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या सुपीक डोक्यातून आलेली ही सुपीक कल्पना होती जी १९८० च्या दरम्यान पूर्णत्वाला आली. या धरणासाठी दोन पिकाळ गाव पाण्याखाली गेले, कुर्डी आणि कुर्पे. साळावली नदी म्हणून त्याला साळावली धरण म्हणण्यात आले. पण अजूनही आठवण केली की डोळ्यासमोर त्या गावातील वातावरण आणि तिथे पिकणारी शेती भाती, फळ पिकावळ आणि प्रेमळ माणसांची देखील
आठवण येते.
कुर्डी गाव पाण्याखाली गेला. तो गाव आता इतिहासजमा झाला. आणखी काही वर्षानंतर तर त्याचे नाव आणि खुणाही राहणार नाही. पण कोणीतरी कधीतरी नक्कीच धरणाचे कूळ मूळ शोधण्यासाठी संशोधन करेल तेव्हा कुर्डी गावची महिमा त्याच्या लेखणीतून कागदावर उतरेल. अभिमानाची गोष्ट म्हणजे याच गावी झाला गोव्यातील थोर गायिका मोगूबाई कुर्डीकर यांचा जन्म. त्या हिंदुस्थानी संगीतातील गायिका. जयपूर – अत्रौली आणि आग्रा घराणे ह्या दोन संगीत घराण्याच्या शैलीत त्या शिकल्या. त्या गानतपस्विनी म्हणून ओळखल्या जायच्या, त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविले होते. गानसरस्वती किशोरी आमोणकर त्यांची मुलगी. त्यांना आपल्या आईचा मोठा अभिमान होता. त्यांची संगीतातील कारकीर्द त्यांनी पुढे नेली.
आठवणी सुखद असतात. या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. आपल्या हयातीत जितके होईल तितके करीत जावे. त्यांच्या पाऊलखुणा कधीच पुसणाऱ्या नाहीत

संबंधित बातम्या